एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

२५ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.

सह्याद्री रांगांच्या कुशीत वसलेलं सरमळे हे पिटुकलं गाव. पाच सहा वाड्यांचं. तस दुर्गमच. पण तेवढंच निसर्गाने नटलेलं. दिसायला खरंतर अप्रतिमच. एखाद्या गरीब पण नितांतसुंदर मुलीसारखं.

१९८० च्या दशकात माझा या गावात जन्म झाला. आधीच दुर्गम असलेल्या या गरीब खेड्यात माझा जन्म एका दलित कुटुंबात. तो काळ आमच्या आजी आजोबांच्या एकदम वैभवाचा. घरी खूप गाई, गुरं, बैल, रेडे आणि कितीतरी खंडी भाताची शेती. त्या वेळी दलित वाडीतलं एकमेव सधन घर आमचं. पुण्याई हा शब्द खरा मानायचा तर माझे आजी आजोबा देवमाणसं. कुणासाठीही धावून जाणारी, कुणालाही जीव लावणारी. वागणं आरपार साधं. माझ्यावर पहिला प्रभाव माझ्या आजी आजोबांचा आहे. त्यांनी दिलेल्या नैतिक ताकदीवरच मी आजवर उभा आहे.

मी माझ्या गावामुळे

घरात काहीच कमी नव्हतं. अन्न, दुधदुभतं. घरातले सर्व जण शेतात राबायचे. शेती एवढी की गावातले सवर्ण समाजातले कामेरी आमच्या शेतीत राबत. माझं लहानपण एकदम झोकात गेलं. हवं तसं हुंदडलो. सरमळ्याच्या दगडधोंड्यात, दऱ्याखोऱ्यांत, पावसापाण्यात. दलित असण्याचे, अभावाचे, गरिबीचे भोग माझ्या नशिबात आले नाहीत. विनाकारण मी रडगाणं लावणार नाही. आमच्या गावात दलित सवर्ण असा टोकाचा भेदभाव कधीच जाणवला नाही. आजही नाही. याबाबतीत आमचा गाव नंबर वन. सो कॉल्ड उच्च जातीतली माणसं सो कॉल्ड खालच्या जातीतल्या माणसांना भाऊ, काका, दादा, ताई, मावशीशिवाय बोलत नाहीत. अगदी स्मार्ट फोनच्या काळातही.

सरमळे गावचं पाणीच भारी आहे. या गावाने कला, संगीत, नाटकाचा वारसा मोठ्या प्रेमाने आजही जपून ठेवलाय. माझ्या वाडीत एकापेक्षा एक तमाशा कलाकार, गायक, तबलावादक होते. आजही आहेत. कुणाचं लग्न झालं की त्या रात्री लगेच तमाशा सादर केला जाई. आत्माराम कांबळे, सीताराम कांबळे, पुनाजी कांबळे, लाडू नाईक, विष्णू नाईक, पुंडलिक नाईक, माझे वडील तुकाराम कांबळे आणि साक्षात नटेश्वरालाही हेवा वाटावा असा कलंदर कलावंत लक्ष्मण देऊसकर. हे सर्व भजन, तमाशा आणि नाट्यबहादूर.

हाच माझा वारसा आणि माझ्यावरचा प्रभाव. मी या सर्वांचा आहे. समजुतीत आल्यापासून या सर्वांची कला मी याची देही याची डोळा पाहलीय. स्वतःमधे झोकून घोकून घेतलीय. हे सर्वजण माझं संचित आहेत. पुनाजी कांबळे यांनीच माझ्या वडलांना गायनाचा वारसा दिला. मी गावाच्या भजनात गायला सुरूवात केली, तेव्हा बाबांनी भजन बंद केलं. आत्माराम कांबळे ही अवलिया तमाशा बहाद्दर. जुन्या काळातला, पण प्रगतीवादी विचारांचा. साक्षात डॉ. बाबासाहेबांचं भाषण मुंबईत ऐकून आला आणि आरपार बदलला. तेव्हाच सरमळ्याच्या दलित वस्तीमधे परिवर्तनाची पहिली ठिणगी पडली. हे मी ऐकलंय, तेव्हा माझा जन्म झाला नव्हता.

पुंडलिक नाईक आजूबाजूच्या पन्नास साठ गावांतले बिस्मिल्ला खां. अप्रतिम सनईवादक. कित्येक कवींचं वरदान लाभलेला आमचा आबा लक्ष्मण नाईक - देऊसकर. आणि साक्षात भगत लाडू कांबळे. त्याचा गावऱ्हाटीमधे खतरनाक दरारा. एकट्या सरमळ्याच्या माझ्या वाडीत एवढी भारी माणसं. अजून काय हवं होत मला. यातून मी लिहिता झालो.

प्रॅक्टिकल आंबेडकरवाद सापडला

मी लिहिलेली पहिली कविता. कवितेचं नाव, `चाललो होतो आडवाटेनं`. पुढे खरोखरच त्या कवितेसारखा पुढे मी आडवाटेनं चालत राहिलो. मळलेल्या वाटा सोडून. सातवीत असताना माझा एक जीवलग मित्र गेला, सखाराम. धनगर समाजातला. तो कुठल्याशा आजाराने अचानक गेला. त्या वयात पहिल्यांदा समजलं, दुःख काय आहे ते. सखाराम गेला, हे मी सहनच करु शकलो नाही. आजही नाही.

आठवीनंतर मात्र माझ्या आनंदी जगण्याला तडा गेला. उद्ध्वस्त झालो मी मनाच्या पातळीवर. शाळेत जावंसंच वाटत नव्हतं. भीतीच वाटायची. मराठी शाळेत मी हुशार विद्यार्थी. दरवर्षी पहिला नंबर सोडला नव्हता. बिलवड्याच्या राजा शिवाजी विद्यालयातली आठवी, नववी, दहावी ही तिन्ही वर्षं दुःखदायक, मानहानीकारक आणि त्रासदायक गेली. केवळ आम्ही दलित असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास द्यायचे. सर्वांच्या समोर जातीवाचक बोलायचे. सर्वांच्या समोर जनावरासारखं मारायचे. केवळ जातीमुळे. मग शाळेत जावंसंच वाटायचं नाही. मनाची प्रचंड घुसमट. प्रचंड मानसिक कुचंबणा.

हाच त्रास माझे चुलत काका राजन कांबळे यालाही भोगावा लागायचा. मुख्याध्यापकाने आम्हाला दोघांनाही उद्ध्वस्त करून टाकलं. अभ्यासावरचं मन उडालं होतं कधीच. व्हायचं तेचं झालं. हुशार असूनही आम्ही दहावी नापास झालो दोघेही. जातीव्यवस्थेचा पहिला भयंकर अनुभव. त्या मुख्याध्यापकाने आमच्या जखमेवर आणखी मीठ चोळलं. म्हणाला, तुम्ही हीन जातीतले लोक. तुम्ही काय दहावी पास होणार? तुम्हे दोघे कधीच दहावी पास होऊ शकत नाही.

आता मनात पहिली ठिणगी पडली. इथेच जाळ पेटला जातीव्यवस्थेच्या विरोधात. मी सगळं मनात कुढत रडत बसणं झटक्यात फेकून दिलं. राजनकाकाही पेटून उठला. मुख्याध्यापकाचं चॅंलेंज घेतलं. दोघांनीही दुसऱ्या वर्षीच दहावी पास करुन दाखवलं. राजन मधे कधीतरी म्हणाला होता, याला आपण गाठून मारुया कुठेतरी. पण मी बोललो, असं नको करुया. दहावी पास झाल्यावर मी म्हणालो, बांद्यामधे जाऊया, पेढे आणुया आणि या मुख्याध्यापकाला पेढे देऊया. आम्ही तसं केलंही. त्या गृहस्थाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मला तेव्हा कळलं, हा प्रॅक्टिकल आंबेडकरवाद आहे. असं जिंकायचं असतं.

मी एकटा पडलो

दहावीनंतर गाडी सुसाट सुटली. तोवर आजी आजोबा जग सोडून गेले होते. खऱ्या अर्थाने मी एकटा पडलो होतो. हळूहळू घरातील वैभवाला उतरती कळा लागली. घराची दैना व्हायची वेळ आली. माझे बाबा सर्वात मोठे म्हणून लाडावलेले आणि सर्वात छोटा काका लहान म्हणून. तो मुंबईची नोकरी सोडून गावी आला. पक्का दारुडा आणि आणि भाईगिरी करणारा. माझे बाबा त्याच्यापेक्षा दारुडे.

बारावीपासून बीएपर्यंत या दोघांच्या रोजच्या राड्याला जीव कंटाळला. आमच्या भरलेल्या घराचा या दोघांनी सत्यानाश करुन टाकला. गाईगुरं गेली, तशी माणसंही दूर गेली. घराला गरिबी आली. मुळातच मी लिहिणारा. कुठे कुठे गावात रानावनात फिरायचो. आजी आजोबांची आठवून काढून एकटाच खूप रडायचो. तसा मी नास्तिक. पण मी आजीच्या आठवणीने तिच्या माहेरचा देव म्हणून घोडेमुखाला आयुष्यात पहिल्यांदा हात जोडला. मी रात्रीचा गावी परततो तेव्हा आमच्या सातेरी भगवतीचं चोरुनच मुखदर्शन घेतो. आजोबांची ग्रामदेवता म्हणून.

घरच्या अशा अवस्थेला सांभाळलं माझी आई, माझे दोन कष्टकरी काका, सुवर्णाकाकी आणि बयआत्या यांनी. त्यांच्यामुळे आमचं मोठं कुटूंब पूर्ण उद्ध्वस्त होता होता वाचलं. दरम्यान दारुडे लहान काका शेवटी दारुनेच गेले. बाबांनी आत्ता दारु सोडलीय. तेही आता थकलेत. मी कलेक्टर झालो नाही, म्हणून सतत शिव्या घालणारे बाबा आता मला यायला उशीर झाला तर काळजी करतात.

सावंतवाडीच्या पंचम खेमराज कॉलेजामधे मी आलो आणि माझ्या कवितेला वेग आला. सावंतवाडीला मुळातच कला, संस्कृती आणि शांततेचा वारसा आहे. त्याचाही फायदा झालाच. सावंतवाडी हे माझ्या मामाचं गाव. इथेच लहानपणी खेळलो रुळलो बागडलो. आई लग्नाआधी एका ख्रिश्चन कुटुंबाकडे कामाला होती. इथेच असायचा माझा मोठा मामा, विष्णू. एकदम अवलिया. त्याच्या कोटाच्या अजब खिशामधे मी काय काय शोधायचो! कधी खाऊ, तर कधी बॉल मिळायचा. आणि एक दिवस मामाच्या खिशात सापडलं छोटं पुस्तक, नवा करार. मी शाळेच्या बाहेर वाचलेलं पहिलं पुस्तक.

तुफान पेलवत नव्हतं

इथं एफवाय आणि एसवाय बीएला असताना साहित्य समजू लागलं. इथेच समजू लागलं युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचं वादळ. साक्षात अगणित सूर्यांचा प्रकाश. महासूर्य. प्रश्न पडला, अरे आपण कुठे आहोत आपण, आणि आपले लोक! जणू तुफान आलं माझ्या आयुष्यात. झपाटून गेलो मी. पण हे तुफान नीट पेलवता येत नव्हतं. कुणाचा दिलासा, मार्गदर्शन नव्हतं. काय करायला हवं, हेचं कळत नव्हतं. पण ते वयही तसंच होतं.

मी सुसाट सुटलो, बेछूट आणि बेसुमार. मराठी आणि इंग्रजी वाचनाचा सपाटा सुरू झाला. मग भाषणं, चळवळी, आंदोलनं, उपोषणं, नवनवे लोकं, ओळखी, राजकारण, समाजकारण, कविता, नाटकं, विद्रोही संमेलन, विचारसरण्या, वादविवाद, आर्थिक हेळसांड, तिरस्कार, मॅडनेस, उद्वेग, उत्साह, आशा निराशेचा खेळ, एकटेपणा. कधी आदर, तर खूप वेळा अपमान, आयुष्याची धूळधाण. तरीही चौफेर, बेछूट लेखन, वाचन. सोबत कुणीच नाही. ना जयभीमवाले, ना लाल सलामवाले, ना जय शिवाजीवाले, ना आणखी कुणी.

मित्र अडचणीत पैसे द्यायचे. पण मागून खूप जास्त बदनामी करायचे. नको ते आरोप करायचे. पण मी कधीच बाई, बाटली या गोष्टी केल्या नाहीत. कारण डोक्यात वेगळंच वातावरण होत. या कठीण काळात मला समजून घ्यायचे आमच्या सावंतवाडीचे नेते, आता मंत्री असणारे दीपकभाई केसरकर. ते मदत करायचे.

माझ्या भीमाचा शिलेदार

मी जगभरातल्या डाव्या विचारांच्या लेखकांचं अधिक वाचायचो. पण ते पचवून मला बॅलन्स राहता येत नसे. खूप आक्रस्ताळी बोलायचो. मग माझ्यावर मार्क्सवादी असल्याचा स्टॅम्प मारला. न्यायाच्या गोष्टी मार्क्सवादात असतील तर आहे मी मार्क्सवादी. पण मार्क्स, सार्त्र, काम्यू, कान्ट, रेम्बो, मार्कवेज, ब्रेख्त ते उत्तर आधुनिक देरिदा आणि नवा मार्क्स थॉमस पिकेटी पचवूनही मी आहे, माझ्या भीमाचा शिलेदार.

मी दिशाहीन असायचो. पण आई आणि बहीण मला समजून घ्यायच्या. मधे मधे त्यांच्या कानावर यायचं की अनिलचं इंग्रजी चांगलंय. तो काय काय भारी लिहितो वगैरे. मी गावोगावी जाऊन एकांकिका करायचो. हीच माझी मी ठरवलेली नाट्यचळवळ. पण वडील माझ्या या धंद्यांना भीकेचे डोहाळे म्हणायचे. ते माझं तोंड बघत नसत. टोकाचा तिरस्कार करत. मी नोकरीधंदा करायचो नाही. माझी ती अक्षम्य चूक होती. पण मी कुठे चिकटतही नव्हतो. माझं कुठे जमतही नव्हतं.

मित्रांचे पैसे घेऊन ते परत न केल्याने माझी पैशाच्या शंभरपट बदनामी व्हायची. मी आक्रमक असल्याने सवर्ण आणि दलित संघटनांमधे कुणालाच नको होतो. साध्या वर्तमानपत्रांच्या ऑफिसमधे माझ्या बातम्या आणि माझ्यावर बहिष्कार असायचा. दुपारचा चहा पिऊन तासनतास लायब्रऱ्यांमधे वाचत बसायचो. पण मी माझं नाट्यलेखन आणि कवितालेखन मराठी, इंग्रजी दोन्ही भाषांत सुरूच ठेवलं.

एक मित्र माझी नेहमी कदर करत होता. तो सुदीप कांबळे. कणकवलीतल्या जानवली गावचा. परिवर्तनाच्या लढाईतला पक्का शिलादार. दुसरे एसपी कॉलेजमधील माझे आवडते विद्वान मित्र प्रा. जी. ए. बुवा सर. त्यांना अनेक वेळा आर्थिक त्रास द्यायचो. ते सांगायचे, अनिलमधे नुसता लेखक नाही, तर खूप मोठा लेखक दडलेला आहे. शिवाय मी दुसरा आरती प्रभू जन्माला आलोय, असं म्हणणारे ज्येष्ठ लेखक विद्याधर भागवत. मला उत्तर आधुनिक विचार प्रवाहावर इंग्रजीत लिहायला लावणारे डॉक्टरेटपर्यंतची दारं उघडणारे अनुराग कंधारकर.

मुंबईत आधार मिळाला

माझा मोठा भाऊ शरदभाई माझ्या मागे उभा होता. तो कधीही माझ्यावर ओरडला नाही. मी नवी मुंबईत असताना त्यानेच माझं पहिलं पुस्तक छापण्यासाठी वहिनीचे दागिने विकून पैसे दिले. मी नोकरी कमी करुन मुंबईभरची नाटकं बघून उशिरा रुमवर यायचो, तेव्हा वहिनीही कधीही मला बोलली नाही. थॅंक्स भाई, थॅंक्स वहिनी.

गावाला कंटाळून मी मुंबईत गेलो. कामासाठी धडपड करत होतो. नवी मुंबईतल्या घणसोली गावात राहत होतो. तिथे एका ग्रेट माणसाशी भेट झाली. नाटककार आणि दिग्दर्शक नंदकुमार म्हात्रे. नंदू सरांनी मला लहान भावासारखं वागवलं. त्यांच्या प्रतिष्ठित घरात ते मला आजही आपल्या भावाप्रमाणे समजतात.

तेव्हा मी नवी मुंबईत एका लोकल पेपरमधे काम करत होतो. २००८ साल होतं ते. एक दिवस मला संजय परब नावाच्या अनोळखी माणसाचा फोन आला. संजय परब बोलतोय, तू अनिल सरमळकर का? ताबडतोब सीएसटी लोकल पकडून टाइम्स ऑफ इंडियाला ये. जसा होतो, तसा पोचलो. ज्येष्ठ नाटककार, समीक्षक, लेखक जयंत पवार सरांनी त्यांना माझा नंबर दिला होता. काही वेळेतच मी तिसऱ्या मजल्यावर पोचलो. संजय परब, सचिन परब आणि नीलेश बने या त्रिमूर्तीने मला उभं केलं. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला शिकावू उमेदवार म्हणून रुजू झालो. वर्षभर ते काम केलं.

द फॉक्सः सत्तांधांच्या नाशाचा पट

पुन्हा गावाला परतलो. पुन्हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान माझं लग्नही झालं. कलेची आणि लेखनाची बंडखोरी म्हणून या भन्नाट काळात मी `द फॉक्स` हे भन्नाट नाटक लिहिलं. मला माहीत होतं, एवढं बंडखोर नाटक कोणीही करणार नाही. म्हणून मी त्याच्या मंचन करण्याच्या मर्यादांचा विचार न करता लिहित गेलो. एकाच माणसाची असंख्य रुपं, वृत्ती, विकृती त्यात आल्यात. एक सत्तांध माणूस स्वतःचा आणि समाजाचा कसा नाश करतो, याचा भव्य पट त्यात मांडलाय.

जगात कुठेही घडू शकेल, असं हे नाटक मी इंग्रजीतून लिहिलं. संघर्षाच्या कठीण काळातच मी ब्रिटीश कवी, गीतकार, कार्यकर्ते बेंजामिन झेपनिया यांच्या ऑनलाईन संपर्कात आलो. ते गोव्याला आले असताना मी त्यांना नाटकाची संहिता दिली. त्यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. त्यांचा स्वभाव खूप ग्रेट आणि खरोखरच खुला आहे. त्यांनी माझा `पॅसेज ऑफ पॅसेज` हा कवितासंग्रही वाचलाय. त्यांना माझ्या कविता महत्वाच्या वाटल्या.

ते अमेरिकेला परत गेल्यावर त्यांनी कळवलं की त्यांनी `द फॉक्स` वाचलंय. विशेष म्हणजे त्यांना ते आवडलंय. ते त्यांना जागतिक दर्जाचं वाटलं. मी खूप खूश झालो. ते म्हणाले, हे नाटक जागतिक रंगभूमीवर यायला हवं. मी तसा प्रयत्न करतोय. आता तर बेंजामिन सर म्हणाले, ते खरं ठरतंय. त्यांच्या प्रयत्नातून `द फॉक्स` आता अमेरिकेत न्यूयॉर्क येथील ब्रॉडवेवरच्या रंगभूमीवर सादर होणार आहे. तसे मेल त्यांनी मला पाठवलेत.

काहूरः कोकणाचा सिनेमा

ब्रॉडवे हा अमेरिकन रंगभूमीचा प्राण आहे. तिथे नाटक सादर होणं, हे प्रत्येक नाटककाराचं स्वप्न असतं. माझं ते स्वप्न पूर्ण होतंय. ब्रॉडवेवरील टोनी अवार्ड विजेते प्रख्यात दिग्दर्शक केनी लिओन याचं दिग्दर्शन करत आहेत. स्टीवन पास्कल आणि केरी वॉशिंग्टन त्यात मुख्य भूमिका करत आहेत.

अमेरिकेत हे सारं होत असतानाच मी इथे कोकणाच्या पार्श्वभूमीवर टीनएजर्सचं भावविश्व दाखवणारा `काहूर` हा सामाजिक, रहस्यमय सिनेमा मी लिहून दिग्दर्शित केलाय. त्याचं शूटिंग पूर्ण झालंय. त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. याच कथानकावर मी २०१०मधे एक डॉक्युमेंटरी बनवली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अडीच वर्षांच्या अथक परिश्रमांतून अनेक अडचणींवर मात करुन काहूर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ते काम आटोपेपर्यंत `द फॉक्स` या नाटकासाठी नाटकाच्या संस्थेकडून अधिकृत विजासाठीची कागदपत्रं येतील. त्यानंतर मी अमेरिकेसाठी रवाना होईन.