मेट्रो ठरणार का मुंबईची नवी लाइफलाइन?

२९ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्‍या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?

आठ-दहा वर्षांपूर्वी ‘जागतिक आनंद दिनी’ पहिल्यांदा ‘आनंदाचा निर्देशांक’ प्रसिद्ध झाला तेव्हा त्याविषयी उत्सुकता होती. सर्वात ‘आनंदी देश’ कोणता, हे ठरवताना नोकरी-व्यवसायाच्या संधी, शिक्षण, निवास, कायदा-सुव्यवस्था, व्यवस्थेतला लाचखोरपणा, संपर्क साधनं अशा घटकांसोबतच देशातल्या दळणवळण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही विचार या अहवालात केला जातो. यात घर ते कार्यालय अशा कराव्या लागणाऱ्या दैनंदिन प्रवासाचा विचार केला तर आपण शेवटून पहिले ठरू, असं त्यावेळी सामान्य मुंबईकर म्हणून वाटलं होतं.

दररोज रेल्वे, बेस्ट, टॅक्सी-रिक्षाने प्रवास करताना गर्दी, वाहतुक कोंडी, वेळ-सुरक्षेबाबतची अनिश्चितता अशा कित्येक अडचणींचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. पावसाळ्यात तर या हालांना पारावार राहत नाही. ही दमवणूक दिवसभराचा उंचावलेला ‘आनंदाचा निर्देशांक’ झटक्यात खाली आणणारी न ठरेल तरच नवल.

मुंबईसारख्या वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असलेल्या आर्थिक महानगरीची ही अवस्था तर इतर शहरांचं काय? भारत त्यावेळी पहिल्या शंभरात नव्हता, हे नव्याने सांगायला नको. थोडक्यात विकसित देशांमधे मानवाच्या सर्वांगीण विकासाचा, आनंदाचा विचार करताना कार्यक्षम वाहतुक व्यवस्थेला अर्थकारण, शिक्षण, निवारा, व्यापार-उद्योगधंद्यांच्या बरोबरीने स्थान दिलं गेलंय.

हेही वाचा: १५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं

मुंबईचा प्रवास गुंतागुंतीचं समीकरण

मुंबईकरांची मानसिकता आणि वाहतुकीचा बोजवारा भारतात तर शहरागणिक वाहतुकीची व्यवस्था बदलते. उदाहरणार्थ पुणेकरांचं त्यांच्या दुचाकीशिवाय पान हलत नाही. तर मुंबईची ओळख लोकल, बेस्ट, काळीपिवळी टॅक्सीशिवाय पूर्ण होत नाही. मुंबईसारख उपनगरीय रेल्वेचं जाळं देशात कुठेही पाहायला मिळत नाही. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुंबईत रुळायला शहराची भूशास्त्रीय रचना, वातावरण यांबरोबरच इथली विशिष्ट आर्थिक, राजकीय परिस्थिती, रहिवाशांची सामुहिक मानसिकता हे घटक कारणीभूत ठरले.

मुंबईकरांच्या बाबतीत ही मानसिकता दोन प्रकारची. एक पावसाळ्यात पूर, दहशतवादी कारवाया, हल्ले होत असतानाही पुन्हा उभे राहण्याची ‘मुंबई स्पिरीट’वाली मानसिकता. तर दुसरी कमालीच्या सहनशीलतेची. नाहीतर जीवघेण्या गर्दीचा सामना करत शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला दररोज दीड ते चार तासांचा प्रवास तोही वर्षानुवर्ष करत राहणं त्याला कधीच शक्य झालं नसतं!

आतापर्यंत मुंबईच्या आर्थिक जडणघडणीच्या काळात दळणवळणाचा मोठा भार रेल्वे-बेस्टने पेलला. दररोज साधारण ७० ते ८० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. हा प्रवास कसारा ते सीएसएमटी १०५ किलोमीटर तर बोरीवली ते चर्चगेट  ४० किलोमीटर असा कितीही असू शकतो. तसंच तो उत्तरेकडून दक्षिण मुंबईकडे असा सरळरेषीय असेल असंही नाही.

मुंबई शहरात, उपनगरात आणि मुख्य म्हणजे वेशीवर येऊ घातलेल्या हजारो गृहप्रकल्पांमुळे हा प्रवास मुंबई, शहर-उपनगरं, ठाणे, नवी मुंबई, पालघर असा अनेक जिल्ह्यांना छेद देत लघुकोन, काटकोन, विशालकोनासोबत त्रिकोणाची किमया साधू लागला आहे. रेल्वे, बेस्ट, एसटीसोबतच अपवर चालणारी प्रवासी वाहतुक सेवा, कार-बस पुलिंग अशा नानाविध प्रकारांची भर त्यात पडू लागली आहे. घर ते कार्यालय असा हा प्रवास गुंतागुंतीचं समीकरण बनू लागल्यामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा पार बोजवारा उडालेला दिसून येतो.

पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय

शहरातल्या वाहतुकीच्या प्रश्नावर उपाय म्हणून सरकारने मेट्रो-मोनोरेल आणली. त्यापैकी मोनोला प्रवाशांकडून प्रतिसाद नसल्यानं ती पांढरा हत्ती ठरली असली तरी ‘मेट्रो १’ने मुंबईकरांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो याची चुणूक दाखवून दिली. चार ते साडेचार लाख प्रति दिन प्रवासीसंख्या असलेली संपूर्ण क्षमतेने चालवली जाणारी ही देशातली एकमेव मेट्रो!

आठ वर्षांच्या इतिहासात तांत्रिक अडचणींमुळे बंद राहण्याची वेळ ‘मेट्रो १’वर क्वचितच आली. ‘मेट्रो १’पासून सुरू झालेलं हे जाळं दक्षिण मुंबईच नाही तर पश्चिमेला मीरा-भाईंदर तर पूर्वेला कल्याण-भिवंडीपर्यंत तब्बल ३३७ किलोमीटरच्या मार्गिका बांधून विस्तारण्यात येणार आहे. मुंबईत कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जेव्हीएलआर, एससीएलआर, ईस्टर्न फ्री वे असे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. पण, मेट्रो ही उपनगरीय रेल्वे खालोखाल मार्गिकांचं जाळं असलेली दुसरी मोठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ठरेल. या ९ ते १० मेट्रो मार्गिकांचा मुंबईकरांच्या भविष्यातल्या वाहतूक व्यवस्थेवर आणि एकूणच शहराच्या आर्थिक-भावनिक जडणघडणीवर कसा परिणाम होईल, याचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं.

२०३१पर्यंत प्रवासीसंख्या ६ लाखांवर

मेट्रोच्या ३३७ पैकी सुमारे २०० किलोमीटर मार्गिकांचं बांधकाम सुरू झालंय. त्यातल्या पश्चिम रेल्वेला दोन्ही बाजूंनी समांतर जाणाऱ्या ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ ए’ या मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत आल्या आहेत. परस्परांना पूरक ठरल्यानं या तिन्ही मार्गांवरची प्रवाशीसंख्या १५ हजाराने वाढली आहे.

या तिन्ही मार्गांवर सध्या सुमारे चाळीस एक गाड्या चालवल्या जातायत. २०३१पर्यंत मार्गावरची प्रवासीसंख्या ६ लाखांच्या आसपास जाईल असा अंदाज आहे. उर्वरित मार्गिकांपैकी ‘मेट्रो ३’चं काम प्रगतीपथावर असून दोन वर्षात तीही सेवेत येईल. इतर मार्गिकांचं काम रामभरोसेच म्हणायला हवं.

हेही वाचा: मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार

मुंबईला उभ्या-आडव्या छेदणाऱ्या मेट्रो

मेट्रोचे सर्व मार्ग उन्नत आहेत. अपवाद फक्त राजकीय हेव्यादाव्यात सापडल्यानं रखडलेल्या ‘मेट्रो ३’चा. विमानतळ, अनेक महत्त्वाची रेल्वे स्थानकं सीएसटी-चर्चगेटसह, नरिमन पॉईंट, सीप्झ, ‘एमआयडीसी’तील व्यावसायिक संकुलं, बीकेसी, काळबादेवी, वरळी, दादर-प्रभादेवी, अंधेरी पूर्व यांना जोडत मुंबईच्या पोटातून जाणारी ही एकमेव भुयारी मेट्रो या सगळ्यात ‘गेमचेंजर’ ठरेल.

‘मेट्रो १’ हा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्ग सीप्झ, ‘एमआयडीसी’ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना जोडतो. तर दहिसर पश्चिम - डी.एन.नगर आणि दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व या अनुक्रमे ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गांमुळे सर्वाधिक वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्ग आणि लिंक रोडवरची वाहतुक कोंडी दूर व्हायला मदत झाली आहे.

या पाठोपाठ येणाऱ्या वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ या मेट्रोमुळे ठाणे-घोडबंदर परिसरात उभ्या राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांचा प्रवास सुखकारक ठरेल. ही मेट्रो एका बाजूला कासारवडवली-वडाळा आणि दुसऱ्या बाजूला ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ अशी विस्तारली जाणार असल्याने ठाण्यापलिकडे राहणा़र्‍या उपनगरवासीयांचाही शहराकडचा प्रवास आरामदायी बनेल, अशी अपेक्षा आहे.

या शिवाय ‘मेट्रो ६’, ‘मेट्रो २ बी’, ‘मेट्रो ९’ अशा मुंबईला उभा-आडवा-तिरका छेद देत वेगवेगळ्या दिशांना जोडणा़र्‍या मार्गिकांमुळे सार्वजनिक वाहतुकीचा रेल्वे-बेस्टच्या खांद्यावरचा बराच मोठा भार दूर होणार नसला तरी हलका नक्कीच होईल.

मेट्रोचा विस्तार व्हायला मदत

मेट्रो उपनगरीय रेल्वे, एसटी यांना शक्य तिथं जोडली जातेय. मोनो रेल सध्या जरी फायद्यात नसली तरी भविष्यात तिला मेट्रोने जोडली तर तीही कार्यक्षमतेने चालवता येईल. मोनोरेल ‘मेट्रो३’शी जोडण्याची योजना असल्याचं ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’अर्थात एमएमआरडीएनं जाहीर केलं आहेच.

केवळ मोनोच नाही तर वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकाही एकमेकींना जोडण्यात येणार आहेत. त्याचे फायदे ‘मेट्रो १’शी ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ ए’ जोडली गेल्याने दिसून आले. या मेट्रो जिथं जोडल्या जातात तो मार्ग सामान्य प्रवाशांप्रमाणे गरोदर, आबालवृद्धांसाठी पुरेसा सुरक्षित, सहजसोपा आणि रूंद-मोकळा असावा.

मेट्रोकरिता एकात्मिक तिकीटप्रणाली विकसित झाली आहे. भविष्यात रेल्वे, बेस्टशीही ती जोडली जाणार आहे. जिथं शक्य होईल तिथं मेट्रो रेल्वेशीच नाही तर विमानतळ, व्यापारी संकुलं-आस्थापनं-मॉलनाही जोडण्यात येणार आहे. येत्या काळात मोठ्या गृह संकुलांना जोडण्याची योजना आहे. यामुळे मेट्रोचा विस्तार व्हायला मदत होईल.

मेट्रोमुळे हे फायदे हेरून अंधेरी, वर्सोवा, लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग या ठिकाणच्या विकासकांनी मेट्रो स्थानकांना लागून असलेल्या गृह प्रकल्पांचा भाव आतापासूनच वधारून ठेवला आहे. त्यामुळे या भागातल्या जागांच्या किंमती पुन्हा एकदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत

बेस्ट-रिक्षा पूरक ठराव्यात

मेट्रो यशस्वी होण्यात ‘लास्ट माईल कनेक्ट्वीटी’चा यात मेट्रो प्रवासानंतर घर-कार्यालयापर्यंत सहजपणे उपलब्ध असलेली बेस्ट-रिक्षा-टॅक्सी अशा सेवा. यात पदपथही आले मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने मुंबईत त्यासाठीचा पाया आधीच विस्तारलेला आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतल्या ‘मेट्रो १’च्या यशस्वितेतेच्या मागे ‘लास्ट माईल कनेक्टीवीटी’ हे कारण दिलं जातं.

नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकांना जोडून बेस्ट सेवा, रिक्षा-टॅक्सीसाठी शिस्त-नियोजनबद्ध तळ आणि ज्यांना पुढचा प्रवास पायी करायचा आहे त्यांच्यासाठी चांगले पदपथ ही व्यवस्था या मेट्रो मार्गिकांना पूरक ठरते. त्यामुळे मेट्रोचं नियोजन करताना याचाही विचार व्हायला हवा. या शिवाय ई-बाईक, सायकली अशा सुविधा पुरवण्यावर ‘एमएमआरडीए’चा भर आहेच.

हेही वाचा: पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

मानसिकता बदलतेय

पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल आली तेव्हा तिला कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न रेल्वे, प्रसारमाध्यमं, राजकारणी असा सगळ्यांनाच पडला होता. पण काही ठराविक वेळेत या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. म्हणूनच या गाड्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनाबाबत राजकारण्यांमधे ‘धरलं तर चावतं...’चं वातावरण आहे.

ज्या प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलची मागणी होत आहे, तोच उद्याचा मेट्रोचा प्रवासी आहे. रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी हा वर्ग नाईलाजाने कार पुलिंग, कॅबसारख्या वाहतुक कोंडीच्या तोंडी देणाऱ्या सेवा सध्या निवडत आहे. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वेळ पडली तर अधिकचे पैसे मोजायला तयार असलेल्या या प्रवाशांचा मोठा वर्ग मेट्रोने प्रवास करायला उत्सुक आहे.

काय काळजी घ्यायला हवी?

प्रवाशांच्या या अपेक्षांचा भार भविष्यात स्वच्छ, कार्यक्षम, सुरक्षित आणि वेगवान प्रवासाची हमी देऊन मेट्रोला पेलायचा आहे. हे करताना ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, याचं भान ठेवावं लागेल. त्यात मेट्रोचे सर्वच मार्ग ‘मेट्रो १’प्रमाणे पूर्ण क्षमतेने आणि फायद्यात चालवण शक्य होईल असं नाही.

काही मार्गांना जेमतेम प्रतिसाद मिळू शकतो. पण मेट्रोच्याच नाही तर मुंबई महानगर प्रदेशाच्या एकात्मिक वाहतुक विकासाकरिता तोट्यात चालणारे हे मार्गही टिकवावे लागतील. तिथंही तितकीच स्वच्छता, सुरक्षितता, सुविधा, कार्यक्षमता द्यावी लागेल.

महत्त्वाचं म्हणजे ‘मेट्रो १’ नंतर पुढच्या दोन मार्गिका सेवेत येण्यासाठी मुंबईकरांना दहा वर्ष वाट पाहावी लागली. हा उशीर इतर मार्गिकांबाबत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

स्पर्धा नको, शहाणपण हवं

मुंबई महानगर प्रदेशाच्या एकात्मिक विकासात रेल्वे, बेस्ट, एसटी या परंपरागत वाहतूक व्यवस्थांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी मेट्रो, रेल्वे, बेस्ट, एसटी यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी परस्परपूरक सेवा देऊन, सर्व सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचा दृष्टीकोन बाळगायला हवा.

मेट्रो आल्याने रेल्वे-बेस्ट प्रवाशांची संख्या रोडावणारच आहे. या स्पर्धेत वातानुकूलित गाड्या, उन्नत मार्ग असे न झेपणारे, परवडणारे उपाय रेल्वेला आणखी गाळात नेणारे ठरतील. त्यामुळे घसरलेली प्रवासीसंख्या नकारात्मकतेनं घ्यायची की आतापर्यंत जीवघेण्या पद्धतीने सुरू असलेला मुंबई उपनगरीय रेल्वेचा प्रवास ‘मानवकेंद्री’ होत असल्याबद्दल समाधान मानायचं, हे ठरवावं लागेल.

बेस्टने मेट्रोमुळे होणाऱ्या सुधारणांनुरूप आपली सेवा विस्तारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेकडूनही हे शहाणपण दाखवलं जाणं अपेक्षित आहे. थोडक्यात प्रवाशांची मानसिकता बदलतेय. मुंबईकरांचं भावनांशी बांधिलकी दाखवण्याचं भान सर्व यंत्रणांनी दाखवलं तर मुंबईकरांच्या आनंदाचा आलेख उंचावायला नक्कीच मदत होईल!

हेही वाचा: 

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत

जगभरातल्या तरुणांना दोस्ती शिकवणारी फ्रेंड्स पंचविशीत

काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान

जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?

दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?