केरळनं तुटवडा बघून स्वतःचं सुरू केली मास्क, सॅनिटायझरची निर्मिती

१७ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.

कोरोनापासून बचावासाठी आपण सगळ्यांनाच मास्क वापरायची गरज नाही, असं सरकारनं वेळोवेळी सांगितलंय. तरीही लोकांची मास्क खरेदी काही केल्या थांबताना दिसत नाही. सध्या कुठल्याही मेडिकलमधे गेलं की कानावर एक वाक्य हमखास पडत, ‘भैय्या एक सॅनिटायझर दिखाये. मास्क है क्या?’ मग दुकानदार शांतपणे त्याला मास्क किंवा सॅनिटाझर आणून देतो. तो ग्राहक त्या वस्तूची तपासणी करतो आणि किंमत विचारतो. त्यानंतर मात्र तो दुकानदार वस्तूची जी किंमत सांगतो ती ऐकून त्या ग्राहकाची आणि आपली बोबडीच वळते.

कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून हात सतत धुवावे, शिंकताना, खोकताना रूमाल धरावा असं सारखं ऐकत असतो. सोशल मीडिया आणि इंटरनेटवरचे वेगवेगळे फोटो पाहून मास्क लावणं गरजेचं आहे असंही आपल्याला वाटतं. पण मेडिकलमधे मास्क, सॅनिटायझर विकत घ्यायला गेलं तर त्याची अव्वाच्या सव्वा किंमत सांगितली जाते.

हेही वाचाः सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

३० रुपयाचं सॅनिटायझर ५०० रुपयांना

कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी पुढच्या १०० दिवसांपर्यंत मास्क आणि सॅनिटायझर या गरजेच्या वस्तू म्हणजेच इसेन्शिअल कमॉडिटीमधे गणल्या जातील असं सरकारनं जाहीर केलंय. शिवाय, केंद्राच्या २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नॅशनल फार्माक्युटीकल प्राईसिंग अथॉरिटीला मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्जची किंमत ठरवण्याचे अधिकार सरकारला देण्यात आलेत. पण तरीही परिस्थितीत काही सुधारणा होताना दिसत नाही.

कोरोनाचा प्रसार व्हायच्या आधी ३० ते ४० रुपयाला मिळणारं सॅनिटायझर आज २५० ते ५०० रुपयाना विकलं जातंय. लाईफबॉय, डेटॉल सारख्या प्रसिद्ध ब्रॅण्डचं सॅनिटायझर बाजारत उपलब्धच नाहीय. आणि बाटलीवर किंमत नसलेलं, कुठल्याही ब्रॅण्डचं सॅनिटायझर विक्रेता १०० रुपयापेक्षा कमी किंमतीत विकत नाही.

मास्कचीही तीच गोष्टय. पूर्वी १० ते २० रुपयाला मिळणारे मास्क आज असेच १००-२०० रुपयाला मिळतायत. अशा अडचणीच्या काळात वस्तूची किंमत वाढवून बहुतांश विक्रेते संकटात भर टाकतायत. पण अनेक जण आपल्या खिशातला पैसा घालत मदतीचा हातही पुढे करतायत.

सामान्य माणसालाही मास्क मिळाला पाहिजे

केरळमधल्या एका मेडिकल विक्रेत्याने या अडचणीच्या काळाचं भान ठेवलंय. लाइव मिंटने दिलेल्या एका बातमीनुसार केरळ मधला हा विक्रेता फक्त २ रूपये किमतीनं मास्क विकतोय. नदीम असं या दुकानदाराचं नाव असून केरळमधल्या कोची शहरात त्यांचं मेडिकल शॉप आहे.

‘आम्ही आत्तापर्यंत ५ हजार मास्कची विक्री केलीय. हे सगळे मास्क २ रुपयाना विकलेत. सामान्य माणसांना महागडे मास्क घेणं परवडत नाही. त्यामुळे या अडचणीच्या काळात हॉस्पिटलमधे काम करणाऱ्यांना किंवा विद्यार्थांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क विकायचे असं आम्ही ठरवलं होतं.’ अशी प्रतिक्रिया नदीमनं दिली.

‘आता या मास्कची मूळ किंमतही वाढलीय. आम्ही ८ ते १० रुपयाना एक याप्रमाणे मास्क खरेदी केलेत. पण विकताना आम्ही जुनी २ रूपये किंमतच ठेवलीय. बाकी ठिकाणी २५ रूपये किंमत लावली जाते.’ दुसरीकडे केरळ सरकारनंही स्वतःचं मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचाः कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

केरळ सरकारचं होतंय कौतूक

आता केरळ सरकारनंही आपल्या राज्यातल्या लोकांपर्यंत मास्क पोचवण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचललंय. सरकारनं तुरुंगात असलेल्या कैद्यांकडे मास्क तयार करण्याची जबाबदारी सोपवलीय. तुरुंगातून मास्कचा पहिला टप्पाही आता तयार होऊन आलाय. दररोज दहा हजार मास्क बनवले जाणार आहेत.

याविषयी खुद्द मुख्यमंत्री पिनाई विजयन यांनी एक ट्विट करून माहिती दिलीय. ते लिहितात, ‘कोविड-१९ मास्क समस्येवरचा तोडगा. मास्कचा तुटवडा बघून राज्याच्या सर्वच तुरुंगाना मास्क बनवण्याच्या कामात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज तिरुवनंतपुरमच्या तुरुंग अधिकाऱ्यांना मास्कचा पहिला टप्पा सरकारकडे दिला.’

गेल्या ३० जानेवारीला केरळमधे देशात पहिली कोरोना पॉझिटिव व्यक्ती आढळली होती. काही दिवसांतच आणखी दोन व्यक्ती आढळल्या. तिन्ही व्यक्तींना औषधोपचार करून ३ फेब्रुवारीला घरी सोडण्यात आलं. सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनुसार केरळचा दुसरा तर महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात १३७ व्यक्तींच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव निघाल्यात. तर तीन जणांना जीव गमवावा लागलाय.

मास्कसोबतच केरळनं येत्या १० दिवसांत १० लाख सॅनिटायझर बॉटल्स बनवण्याचाही निर्णय घेतलाय. कर्नाटकमधल्या भाजप सरकारनंही वैचारिक मतभेज बाजूला सारत केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय. केरळमधे सध्या डाव्या पक्षांचं सरकार आहे.

कैदी बनवतायत मास्क

लाइव मिंटच्याच एका बातमीनुसार, उत्तर प्रदेशमधल्या जेल कैद्यांनाही मास्क बनवायचं काम दिलं गेलंय. मथुरा जेलमधल्या कैद्यांकडून गेल्या शनिवारी आणि रविवारी मास्क बनवून घेतले. हे ५०० मास्क राज्यातल्या इतर जेलमधल्या कैद्यांना वाटण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशात एकूण ७१ जेल आहेत. त्यातल्या ५५ जेलमधे मास्क बनवण्याची प्रक्रिया सुरू झालीय, अशी माहिती जेल अधिकारी आनंद कुमार यांनी लाइव मिंटला दिली.

उर्वरित १६ मधे जेलही मास्क बनवण्यात यावेत अशी सुचना तिथल्या जेलरला देण्यात आलीय. हे सगळे मास्क सरकारी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बनवले जातात. त्यासाठी जेलकैद्यांना खास ट्रेनिंगही देण्यात आल्याचं या बातमीत जेल अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलंय.

हेही वाचाः कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

मास्कची किंमत कमी करता येईल?

भारतात कोरोना वायरस आलाय हे कळल्यावर अनेकांनी सॅनिटायझर, मास्क यांची भरपूर खरेदी केली. काहींनी सॅनिटायझरच्या ४० बाटल्या एकाचवेळी घेतल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे अचानक मागणी वाढली आणि पुरवठा मात्र गरजेनुसार होत नसल्याने सॅनिटायझर, मास्कच्या किमतीत वाढ झाली.

अशावेळी जेलमधल्या कैद्यांकडून मास्क तयार करून ते माफक दरात विकल्यानं सर्वसामान्य माणसांनाही त्याचा लाभ मिळू शकेल. शिवाय, कुणी दुकानदार तोटा सहन करत स्वतःच्या खिशातून पैसे घालून मास्क विकत असेल, तर त्याचं विशेष कौतूक करायलाच पाहिजे. या संकटाच्या काळातही लोक आपली माणूसकी सोडत नाहीत, हेच यावरून दिसतं.

हेही वाचाः 

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार 

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?