हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

२५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील.

गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच वर्षं पूर्ण करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास मिळवलाय. काही फार मोठं आक्रीत घडलं नाही तर शिवसेनेसोबत भाजप सहज सत्तेत येतेय. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार, हेही जवळपास नक्की आहे. इतकं सारं असूनही हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वासाठी हा फार मोठा पराभव ठरतोय.

पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर पाच वर्षं वर्चस्व गाजवलं. फडणवीसांच्या मुत्सद्दीपणाचे गोडवे गात त्यांची भक्तमंडळी आणि माध्यमं थकून गेली होती. गेल्या वर्षभरात विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोठमोठी घराणी काँग्रेसमधे आणून त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळल्याचं सांगितलं गेलं. पण पाच वर्षं छोट्या छोट्या लढाया जिंकताना फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. त्याचं कारण,

सगळे आकडे खाली आलेत

२०१४च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता भारतीय जनता पक्षाने १२२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या होत्या. कुणा एकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं नव्हतं. तरीही तेव्हा आतापर्यंतची पक्षाची सर्वोत्तम कामगिरी झाली होती. २०१९च्या लोकसभेतही हा आकडा अधिक वाढला. भाजप शिवसेना युतीने मिळून २२७ विधानसभा जागांवर मताधिक्य मिळवलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर भाजप स्वबळावर सत्ता मिळवू शकेल आणि युती २४० पेक्षा जास्त जागा मिळवेल, असा प्रचार भाजपकडून केला जात होता. काही एक्झिट पोलने तर त्यावर शिक्कामोर्तबही केलं होतं. पण प्रत्यक्षात आता शिवसेनेशी युती असताना फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला शंभरच्या आसपास घुटमळत राहावं लागलं. जर भाजप शंभरच्या खाली राहिली, तर ते त्यांच्यासाठी लाजिरवाणं ठरेल.

हेही वाचाः सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

मराठ्यांचा नेता बनायचं स्वप्न अपूर्ण

कोल्हापूरचे संभाजी छत्रपती, विखे पाटील, मोहिते पाटील, नारायण राणे यांच्यापासून सुरू करत थेट सातारा गादीच्या उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले अशी बडी बडी मराठा घराणी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करून भाजपला शरण गेली होती. राज्याचं नेतृत्व फडणवीस करणार आणि स्थानिक पुढारपण मातब्बर घराण्यांनी करावं, असा फॉर्म्युलाही तयार झाला. त्यामुळे फडणवीस हे ब्राह्मण असून मराठा समाजाचे नेते बनलेत, असं बिंबवलं जात होतं. मराठ्यांचं नेतृत्व करेपर्यंत आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नेते बनणार नाही, हे फडणवीसांनाही माहीत होतं. विधानसभेच्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी त्यांना खात्री होती.

मात्र घडलं भलतंच. शरद पवारांची जादू चालली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला मराठा तरुण पवारांच्या मागे जादू झाल्यासारखा गेला. त्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमधे गेलेले भलेभले नेते विधानसभेत पडताना दिसले. त्यात दस्तुरखुद्द उदयनराजेही होते. शिवाय भाजप शिवसेनेचे परंपरागत मराठा उमेदवारही मागे पडले. या सगळ्यातून फडणवीसांचं मराठ्यांचे नेते बनण्याचं स्वप्न भंगलं. आता लगेचच्या भविष्यकाळात ते पूर्ण होण्याची शक्यताही कमीच दिसते.

प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या विरोधात मराठेतर समाजांची बांधणी करून यश मिळवण्याचं समीकरण भाजपने फक्त विधानसभा निवडणुकांतच नाही, तर जिल्हापरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांमधेही यशस्वी करून दाखवलं होतं. पण आता मोठमोठे मराठा नेतेच भाजपमधे गेल्याने हे सारं गणितच हललं होतं. त्याचे परिणाम या निकालांत दिसत आहेत. आता फडणवीसांना पुन्हा जिंकायचं असेल तर नवी समीकरणं तयार करावी लागतील.

फडणवीसांकडून सगळेच दुखावलेले

२०१४च्या निवडणुकांत भाजप एकदिलाने लढली होती. कारण मुख्यमंत्रीपदाचे अनेक चेहरे मतदारांसमोर होते. पण आता खूप पाणी वाहून गेलंय. फडणवीसांमुळे मागच्या तीनेक वर्षांत नितीन गडकरी, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील असे अनेक नेते होते. त्यामुळे भाजपचे अनेक तुकडे लढत होते. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातलाही एक वर्ग त्यांच्यावर नाराज होता. ते मोदी, शहांच्या खूपच आहारी गेलेत असा या संघातल्या नेत्यांचा आरोप होता.

शिवसेना भाजपवर नाराज असली तरी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं गूळपीठ असल्याचं अनेकदा स्पष्ट दिसत होतं. पण जागावाटप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर उभे राहिल्यामुळे शिवसेनाही नाराज होती. मुख्यमंत्री स्वबळावर सत्ता आणण्याच्या प्रयत्नात असल्याची त्यांची तक्रार होती.

त्याशिवाय ईडीने आरोपपत्र दाखल केल्यामुळे शरद पवार डिवचले गेले. त्यानंतर विरोधकांमधल्या एका गटाचा सॉफ्ट कॉर्नरही फडणवीस गमावून बसले. इतके विरोधक असल्यामुळे फडणवीस विरोधकांनी पक्ष, विचारधारा न पाहता हातमिळवणी केली किंवा ते पुढे तसं करू शकतात.

हेही वाचाः विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

विदर्भात अपेक्षित यश नाही

विदर्भ हा फडणवीसांच्या गड होता. विदर्भाच्या जोरावरच भाजप सत्तेत आली होती. विदर्भातल्या ६४ जागांपैकी भाजपने तब्बल ४७ जागा जिंकल्या. आता २०१९ला विदर्भातला तो आकडा फक्त २८वर आलाय. मागच्या निवडणुकांतल्या विदर्भातल्या यशाचं श्रेय फडणवीसांना देण्यात आलं होतं. ते मुख्यमंत्री बनण्यातही ते एक कारण होतं.

आता विदर्भातल्या अपयशाचं श्रेयही त्यांना द्यावं लागेल. विदर्भात स्वतःच्या मर्जीतले उमेदवार उभे करण्याचा एक प्रयत्नही त्यांनी केलाय. तेही त्यांच्यावर उलटलेलं दिसतंय. उदाहरणार्थ, त्यांचे अगदी जवळचे असलेले त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी परिणय फुके साकोरी मतदारसंघातून पराभूत जालेले आहेत.

`हा तर नैतिक पराभव`

ज्येष्ठ पत्रकार संजय जोग म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत आपण केलेल्या कामांच्या आधारावर जरी फडणवीसांनी कौल मागितला असता, तरी त्यांना यापेक्षा चांगला निकाल पाहायला मिळायला असता. पण त्याजागी त्यांनी जो अहंकार आणि उन्मादाचं प्रदर्शन प्रचारादरम्यान केलं. त्यामुळे मतदारांनी त्यांना अपेक्षित यश दिलं नाही. आता शरद पवारांचं राजकारण संपवून फक्त आपलं आणि आपलंच वर्चस्व असायला पाहिजे, या हट्टामुळे त्यांना धक्का बसलाय. हा निकाल म्हणजे त्यांचा नैतिक पराभवच आहे.'

संजय जोग पुढे म्हणाले, `महाराष्ट्रात आता कोणतीच समस्या उरलेली नाही, असं सांगून केवळ पाकिस्तान, काश्मीर, ३७० असेच मुद्दे प्रचारात आणल्याचेही परिणाम निकालात दिसत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली असती, तर निकाल वेगळे असते.`

हेही वाचाः 

शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?

पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?