हॉलिवूडची अभिनेत्री मर्लिन मन्रो तिच्या मादक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढवलेला मृत्यू यामुळे तिच्या आयुष्याची कायमच चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत.
हॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि मादक सौंदर्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी 'मर्लिन मन्रो' हिच्यावर मागच्या वर्षी बायोपिक येऊन गेला. त्याचं नाव होतं - 'ब्लॉन्ड' . या बायोपिकमधे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅना डे अरमस हिने मन्रोची भूमिका साकारली होती. मर्लिनचं सौंदर्य वाखाणण्याजोगं होतं.
डाव्या गालावरचा काळ्या रंगाचा ब्युटी मार्क मर्लिनच्या सौंदर्यात आणखी भर टाकायचा. मादक डोळे, चकाकणार्या कुरळ्या केसांमुळे मर्लिनचं सौंदर्य आणखी बहरायचं. पण, हे ग्लॅमर फार काळ टिकू शकलं नाही. खूप कमी वयात तिचा मृत्यू झाला.
प्रचंड ग्लॅमर, आजुबाजूला माणसांची गर्दी, विलासी जगणं आणि अनेक अफेअर्स... शेवटी गूढ मृत्यू... अशी एक हॉलिवूडची तारका मर्लिन जिच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही उलगडू शकलं नाही. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत.
हेही वाचाः अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट
मर्लिन मन्रोचा जन्म १ जून, १९२६ला झाला. औषधांची अधिक मात्रा घेतल्यानं ५ ऑगस्ट, १९६२ला तिचा मृत्यू झाला. तिचा जन्म आणि बालपण लॉस एंजेलिसमधे गेलं. मर्लिनला अनेकांकडून प्रेम मिळालं. पण, तिचं दु:ख न कुणी समजलं न कुणी तिचा आधार बनलं. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढावलेला मृत्यू यादरम्यान तिच्या जीवनातली काळी बाजू कुणालाच दिसली नाही, असं म्हणायला हरकत नाही. तिचं नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबाल खेळाडू जे डिमॅगियोशीही जोडलं गेलं होतं. मन्रोनं अनेक लग्नं केली, ती सगळी अयशस्वी ठरली.
अनेक सवयी, बिनधास्त वागणं आणि प्रेक्षकांच्या गर्दीमधे खेचल्या गेलेल्या मर्लिनच्या आयुष्याची खरी आयुष्याची कहाणी कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावी. चरित्र लिहिणार्यांनी तिच्या ग्लॅमरस जीवनाची दुसरी बाजू दाखवली. तिने लिहिलेली पत्रं, कविता आणि रोजनिशी, सिमेमांचं कॉन्ट्रॅक्ट असे अनेक दस्तावेज 'फ्रॅगमेंट्स: पोएम्स, इंटिमेट नोट्स, लेटर्स बाय मर्लिन मन्रो' नावानं छापण्यात आले.
तारुण्यात अनेक पुरुषांशी संबंध, शोषणाचे किस्से आणि प्रेमासाठी व्याकुळ झालेल्या मर्लिनचा संदिग्ध मृत्यू जगजाहीर आहे. काही पत्रं, पुस्तकांतून खासगी जीवन सार्वजनिक झाल्याने तिच्या आयुष्यातले अनेक पैलू बाहेर आले. अभिनेत्री म्हणून जगताना ग्लॅमर, सिनेमा, चर्चा आणि बरंच काही अवतीभोवती असतानाही कधी कधी माणसांची गर्दी तिला सहन होत नसे. अभिनेत्री असल्यामुळेच ती आपल्या मनातल्या गोष्टी कदाचित सार्वजनिकपणे व्यक्त करू शकली नसावी. म्हणूनचं तिनं आपल्या लिखाणाचा आधार घेऊन ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला.
मर्लिनचं मुळचं नाव नौरमा जीन बेकर. मर्लिन नावाच्या पुस्तकात नार्मन मेलर म्हणतो- 'एकीकडे अवैधता आणि दुसरीकडे वंशागत विक्षिप्ततेचा इतिहास. तिच्या आजोबांनी आपलं शेवटचं आयुष्य मनोरुग्णांच्या इस्पितळात घालवलं. तिची आजी अतिशय सुंदर होती. तीही मृत्यूआधी मनोरुग्णांच्या इस्पितळात होती. तिच्या आईच्या आयुष्यातला अधिक काळ मनोरुग्णांच्या आश्रयस्थानात गेला होता. मर्लिनच्या एका मामाने आत्महत्या केली होती. आईला मनोरुग्ण आश्रयस्थानात नेलं जायचं, तेव्हा मर्लिनला अनाथालय किंवा पोषणगृहात राहावं लागत असे.' मर्लिनच्या पूर्वायुष्यातला इतिहास तिच्या जगण्याला वेगळा अर्थ देऊ शकला असं म्हणायला हरकत नाही.
अल्पवयीन असतानाच मर्लिनला समजलं होतं की, आपल्या सौंदर्याकडे पुरुष आकर्षित होतायत. मृत्यूच्या दोन वर्षापूर्वी तिनं लेखक जेक रोजेन्सला सांगितलं होतं की, सुरवातीला तिनं मॉडेलिंग केलं. पुढे हॉलिवूडमधे दाखल झाल्यानंतर अनेक सिने निर्मात्यांच्या संपर्कात ती आली. सिने निर्मात्यांना जे हवंय, ते जर त्या अभिनेत्रीला मान्य नसेल तर तिची जागा घेण्यासाठी ४० जणी तयार असायच्या. तिचे अनेक सिने निर्मात्यांशी संबंध आले होते. यापुढेही जाऊन तिने ब्रिटीश पत्रकार डब्ल्यू. जे. वैदरबीला सांगितलं होतं की, स्वत: आपण ठरवू शकत नाही की, कुणाशी संबंध ठेवायचे. नाही तर तुम्ही सिनेतारका कधीच होऊ शकत नाही.
हेही वाचाः जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा
मर्लिनचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. बालपण अनाथालय आणि बालगृहात गेल्यामुळे तिला खूप कमी शिक्षण घेता आलं तिच्याकडे होतं ते रुप, विलक्षण सौंदर्य. मात्र, तिच्या मानेवर सिनेतारका होण्याचं भूत बसलं होतं. त्यासाठी ती काहीही करायला तयार होती.
अनेक अफेअर्स केल्यानंतर मर्लिन उदासिन झाली होती. ती प्रेमासाठी काहीही करायला तयार होती. तिला अनेकांनी गाडी, बंगले, विलासी चैनीचं आमिष दाखवलं. पण, ती कायमस्वरुपी त्या-त्या पुरुषासोबत राहायला तयार नव्हती. तिला हवं होतं ते 'प्रेम' खरं प्रेम जे तिला आयुष्यात कधीही मिळालं नाही.
त्यादिवशी ती थोडी अस्वस्थच होती. ज्या व्यक्तीला तिनं फोन केला, ते तिचं शेवटचं बोलणं होतं. त्या व्यक्तीचं नाव लाफोर्ड होतं. लाफोर्डने सांगितलं होतं की, मर्लिनला त्यानं रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. पण, जेव्हा त्यानं संध्याकाळी मर्लिनला फोन केला, तेव्हा ती चिडचिड करत होती. तिने जेवणासाठी यायला नकार दिला. ती उदास वाटत होती. तिच्या स्वरात कंप जाणवत होता.
लाफोर्डही हॉलीवूडशी संबंधित होता. लाफोर्डने पुढे सांगितलं- रात्री ८ वाजता पुन्हा मर्लिनला फोन केला, तेव्हाही तिने यायला नकार दिला. कापर्या आवाजात ती म्हणाली, 'प्रेसिडेंटना गुडबाय सांग आणि तुलाही गुडबाय.' पण, लोकांना वाटत होतं की, तो खोटी कहाणी सांगत आहे. मर्लिनला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रेसीडेंट जॉन एफ केनेडी आणि त्यांचे भाऊ यांच्यासोबत सातत्याने पाहिलं जायचं. लाफोर्ड आणि केनेडी बंधूंचे चांगले संबंध होते.
असं म्हटलं जातं की, मर्लिनने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलं होतं. पण, काहीजण म्हणतात की हा खून होता. प्रश्न हा होता की, तिने खाल्लेल्या इतक्या झोपेच्या गोळ्या कुठून आल्या? औषधांची बाटली कुठे गायब झाली? ज्या बेडवर तिचा मृतदेह होता, त्यावरचं बेडशीट जराही विस्कटलेलं दिसलं नाही.
असंही म्हटंलं गेलं की, मर्लिनच्या किडनीमधे ड्रग्ज मिळालं नाही. तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत, तर तिला इंजेक्शन दिलं गेलं होतं. एकूणच परिस्थिती संशयास्पद होती. लोकांनी संशयाचं बोट जॉन एफ केनेडी यांच्याकडेही दाखवलं. कारण, केनेडी आणि मर्लिनचे संबंध बिघडले होते आणि ती त्यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेणार होती.
अनेक पत्रकारांनी तिच्या मृत्यूनंतर टेलिफोनचे रेकॉर्ड आणि इतर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या हाती काही लागलं नाही.एका पत्रकारला मर्लिनच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्रांचं बंडल मिळालं. ही पत्रं मर्लिनआणि केनेडी बंधुंमधे लिहिली गेलेली होती.
गुडमनने एक केनेडी आणि मर्लिन यांच्या भोवती फिरणारं पुस्तकही लिहिलं. पण, कोणताही प्रकाशक ते छापायला तयार नव्हता. मर्लिनच्या आत्महत्येनंतर एक वर्षांनी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली. अखेर ते पुस्तक छापण्यात आलंच. पुस्तकाचं नाव होतं 'मर्लिनचा रहस्यमयी मृत्यू'.
हेही वाचाः
झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग
कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं
(साभार - पुढारी)