स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो.
साहित्य आणि कलाकृतीतून स्वातंत्र्याबद्दल वेगवेगळी मतं किंवा विचारप्रवाह व्यक्त होत राहिले. काहींनी याबद्दल गंभीर प्रश्न उभे केले. आजतागायत जगात सर्वत्रच याबाबतचे चर्चा चर्वण चालूच आहे. असो.
स्वातंत्र्य मिळालेल्या देशात या स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे अनेक सिनेमे तयार झाले. तिथली लोकशाही स्थिरावल्यावर व्यक्तिस्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य अशा अनेक विषयाबद्दल कलाकृती तयार होत राहिल्या. यातल्या अनेक कलाकृती मूळ साहित्य स्वरूपात आणि नंतर त्या साहित्यावर निर्माण झालेले सिनेमा, चित्र शिल्प, नाट्य कलाकृती असं याचं स्वरूप आहे.
स्वातंत्र्योत्तर पिढीने आपला मोर्चा स्वातंत्र्याची चिकित्सा करण्यासोबतच जगण्याच्या इतर संघर्षाकडे वळवला. यातूनच तिथली लोकशाही अधिक प्रगल्भ होत राहिली. या विषयांबद्दल अमेरिकेमधे इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक प्रमाणात कलाकृती निर्माण झाल्यात. ज्या लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मुल्यांसाठी अमेरिका ओळखली जायची त्यापेक्षा ‘ग्रेट’ अमेरिका बनवण्याची स्वप्नं दाखवणारे अध्यक्ष निवडून आले. मात्र त्यांनी या मुल्यांनाच नख लावलं.
त्याचा विरोध तिथल्या कलाकारांनी आपल्या कलाकृतीतून केला. हाच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामधील आणि एका प्रगल्भ लोकशाहीमधील फरक आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमधे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सत्ताधीशांनी लोकशाही मूल्यांची कितीही गळचेपी केली तरी कुणी काहीच करत नाहीत.
काही अपवाद वगळता सर्व कलाकृती त्या सत्ताधीशांचे गुणगान गाण्यातच धन्यता मानतात. हे नक्कीच एका प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण नाही. अमेरिकेमधे हे होऊ शकतं कारण तिथे वेगवेगळ्या विचारप्रवाहांची चाड राखणार्यांची मोठी परंपरा आहे. म्हणून आजही तिथे राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयावर टीका केली म्हणून देशद्रोहाच्या गुन्ह्यामधे अटक केली जात नाही. आणि राष्ट्राध्यक्षावर स्तुतिसुमनं उधळली म्हणजे राष्ट्रभक्ती समजली जात नाही.
स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या आणि त्यांच्या विकल्या गेलेल्या प्रती या आणि त्यातलं साहित्यमूल्य या अर्थाने हे मोठेपण आहे. स्टीफन किंग यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या साहित्यावर खूप मोठ्या प्रमाणात सिनेमांची निर्मिती केली गेलीय. तब्बल २७७ सिनेमे, टीवी सीरियल आणि इतर दृक्श्राव्य माध्यमासाठीचा मूळ कलाकृतीचा लेखक म्हणून स्टीफन किंग यांची नोंद आहे.
स्टीफन किंग यांची ‘कॅरी’ ही पहिली कादंबरी १९७४ मधे प्रकाशित झाली. त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे १९७६ मधे ‘कॅरी’ हा सिनेमा आला. या सिनेमाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि स्टीफन किंग हे नाव घराघरात पोचलं. पुढे त्यांचा आलेख कायम चढताच राहिला. एकाच दिग्दर्शकाने स्टीफन किंग यांच्या कथेवर आधारित अनेक सिनेमे बनवले आणि अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या एकाच कथेवर अनेक सिनेमा बनवले अशीही अनेक उदाहरणे आहेत.
हेही वाचा: अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट
फ्रँक डाराबॉन्ट हे त्यापैकीच एक. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा याचं सर्वोत्तम उदाहरण. स्टीफन किंग हे फार चतुरस्र लेखक. भय, थरार, गूढ, विज्ञान अशा अनेक विषयांच्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यासाठीच ते जास्त प्रसिद्ध आहेत. मात्र फ्रँक डाराबॉन्ट यांना स्टीफन किंग यांच्या आडवळणाच्या कथा अधिक भावतात. त्यांचंच त्यांनी सिनेमात रूपांतर केलं.
‘डिफरन्ट सिझन्स’ ही स्टीफन किंग यांची साहित्यकृती ऑगस्ट १९८२ मधे प्रकाशित झाली. साडेपाचशे पानाच्या या पुस्तकात चार लघु-कादंबर्या होत्या. त्यातील एक होती ‘रीटा हेवर्थ आणि शॉशांक रिडीम्पशन’. या लघुकादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या कोणत्याही यादीमधे हा पहिल्या पाचमधेच आहे.
मानवी भावना आणि लोकशाहीतील संस्थांचा सहसंबंध उलगडणारी ही कथा. कथेच्या मानाने सिनेमाची लांबी खूप आहे. शॉशांक या काल्पनिक कारागृहामधे ही कथा घडते. अँडी डुफ्रेन या तिशीतील उंचपुर्या, सुंदर दिसणार्या गोर्या गुबगुबीत श्रीमंत तरुणाला त्याच्या पत्नीच्या न केलेल्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा होते. त्याची रवानगी इतर अजून काही कैद्यासोबत शॉशांक या कारागृहामधे होते.
कारागृहातलं हे जग अँडीच्या मुक्त, आलिशान जगापेक्षा फार वेगळं आहे. या जगण्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. सुरवातीचे काही वर्ष त्याला तिथे स्थिर व्हायला खूप अवघड होतं. तिथे तो हळूहळू काही मित्र तयार करतो. रेड हा त्याचा पहिला मित्र. तो आपल्या पत्नीसह शेजार्याचा खून करून कित्येक वर्ष झालीत इथे पडून आहे. रेड हाच या कथेचा निवेदक आहे. त्याच्या निवेदनानेच कथा सुरू होते आणि संपते. मूळ पुस्तक आणि सिनेमातील ही रचना सारखीच. रेड हा कारागृहातील ‘सुपरमार्केट’ आहे.
सिगरेटपासून तर इतर कोणतीही जीवनावश्यक वस्तू तो कारागृहामधे कैद्यांना हवी तेव्हा मिळून देतो. अँडी हा रेड कडून दगडाचे छोटे शिल्प बनवण्याची छोटी हातोडी आणि रीटा हेवर्थ या मादक अभिनेत्रीचे पोस्टर घेतो. रेडने या कारागृहातून बाहेर पडण्याची अपेक्षा सोडून दिलीय. तर अँडी खुनी, बलात्कारी कैद्यांमधे राहून आपला निरागसपणा जपत कारागृहातून पळून जाण्याचे मनसुबे आखत असतो.
अँडी कारागृहाच्या छताला रंग देण्याचे काम सुरू असताना पहार्यावरील सैन्याच्या प्रमुखाला प्राप्तीकर भरण्याच्या अडचणीबद्दल चर्चा करताना ऐकतो आणि त्याला करसल्ला देऊन त्याचे प्राप्तीकर विवरणपत्र मोफत भरून देतो, असं सांगतो. हाही प्रसंग अगदी संवादासहित पुस्तकात जसा आहे तसा सिनेमात आहे.
हळूहळू पुढील काही वर्षांत कारागृहातील सर्व कर्मचार्यांचं विवरणपत्र भरून देण्याचं काम अँडीकडे येतं. यामधे जेलरची विवरणपत्र भरताना जेलरच्या भ्रष्ट कमाईतून आलेला पैसा अँडी एका खोट्या नावाने खाते उघडून त्यात वळते करतो. वर्षानुवर्ष हे चालत राहतं. या कामातून अँडीची कारागृहात पत वाढते. त्याला इतर कामातून सूट मिळून ग्रंथालयात काम करण्याची सुविधा मिळते.
हेही वाचा: झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार
इथे कमरेत वाकलेला एक म्हातारा कैदी कामाला असतो. त्याला मदतनीस म्हणून अँडी काम करू लागतो. या ब्रुक्स नावाच्या म्हातार्याशी आधीही अँडीचा खुपदा संबंध आलेला असतो. जेवताना अँडीच्या ताटातील भातात ब्रुक्स लहान पक्ष्यांना भरवत असतो. असा पक्षी आपल्या स्वेटरच्या खिशामधे ब्रेक्सने पाळलेला असतो. तो ब्रुक्ससोबतच मोठा होतो. त्यासोबतच त्याच्या खोलीत आणि ग्रंथालयात लपून राहतो.
पक्षी हे मुक्त स्वातंत्र्याचं प्रतीक. मात्र इथले पक्षी ते विसरून गेलेत. ही प्रतीकात्मक रचना कारागृहातील कैद्यांसाठी वापरलेली आहे. इथले कैदी या वातावरणाला सरावलेत. इथून बाहेर पडण्याचा ते विचारही करू शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक रचना माणसाला असं स्थिर करून टाकतात. हे अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्याला किती मारक आहे असं चित्रण केलेलं आहे.
या ब्रुक्स म्हातार्याची चांगल्या आचरणामुळे शिक्षेपेक्षा लवकर सुटका होते तर तो सहकारी कैद्याचा खून करून पुन्हा कारागृहामधेच राहण्याचा प्रयत्न करतो. अँडी त्याला असे करण्यापासून वाचवतो. ब्रुक्स बाहेर पडून एका सुपरमार्केटमधे नोकरी करतो. मात्र कारागृहाबाहेरच्या मुक्त जगण्याशी तो एकरूप होऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करतो. त्याचीही अवस्था त्याने पाळलेल्या पक्ष्यासारखीच आहे.
पक्षी असूनही तो उडत नाही. अशीच अवस्था रेडचीही आहे. अँडी मात्र या वातावरणात स्वत:चं अस्तित्व टिकून ठेवतो. आपली स्वतंत्र जगण्याची स्वप्न रंगवतो, त्यासाठी नियोजन करतो. आणि आपण योग्य नियोजन केलं तर एक दिवस यातून बाहेर पडू हा स्वतःवरील विश्वास ढळू देत नाही.
वर्षानुवर्ष जेलरच्या भ्रष्ट संपत्तीतून अँडी ठरावीक रक्कम एका गुप्त खात्यावर वळती करत असतो. सोबतच दगडातून शिल्प कोरायच्या हातोडीने आपल्या खोलीतून प्रचंड लांब भुयार खोदतो. करोडोंची रक्कम साठल्यावर एक दिवस त्यातून पळून जातो. सांडपाण्याच्या गटारातून बाहेर पडल्यावर मोकळ्या मैदानात पावसात भिजण्याचा आनंद घेऊन आपल्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतो. तो पाऊस अँडीचा सर्व भूतकाळ धुऊन काढतो.
एक मुक्त भावनेने भरलेला अँडी त्या गुप्त खात्यातील सर्व रक्कम काढून मेक्सिकोच्या समुद्रकिनार्यावरील एका खेड्यात जाऊन राहतो. हे सर्व नियोजन अँडीने कसं केलं हे सिनेमात पाहणं खूप महत्त्वाचं आहे. लघुकादंबरीतील रचनेपेक्षा ही थोडी वेगळी रचना आहे. यामधे रेडसुद्धा सहभागी आहे. बोलण्या बोलण्यातून अँडी रेडला या सर्वांची कल्पना देत असतो.
काही काळानंतर रेड पॅरोलवर सुटतो. ब्रुक्सने काम केले तिथेच काम करतो. तो राहिला त्याच खोलीत राहतो. त्या खोलीत अशी अनेकांची नावं लिहिलेली आहेत ज्यांनी ब्रुक्सप्रमाणे आपलं स्वतंत्र जीवन संपवलं. रेड मात्र अँडीपासून प्रेरणा घेत मुक्त जगण्याची कास धरतो. अँडीने इशारा दिलेलं ठिकाण शोधतो आणि त्याच्यापर्यंत मेक्सिकोच्या समुद्रकिनार्याला जाऊन त्याला भेटतो. इथे सिनेमा संपतो.
पुस्तकातील कथा मात्र यापेक्षा आधी संपते. रेड अँडीला शोधायला जाण्यासाठी बसमधे बसतो इथे लघुकादंबरीतील कथा संपते. लघुकादंबरीत रेड आणि अँडीची भेट होत नाही. सिनेमात मात्र रेड आणि अँडीची भेट होण्याचा समुद्रकिनार्यावरील सीन खूप महत्त्वाचा आहे. या दोघांची भेट सिनेमातील कथेला अधिक उंचीवर घेऊन जाते.
हेही वाचा: भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?
मूळ कथा आणि सिनेमातील कथा यात खूप साधर्म्य आहे. मूळ कथेतील सर्व महत्त्वाच्या घटना आहे त्या संवादासह सिनेमात चित्रित केलेल्या आहेत. सिनेमाची कथा मात्र मूळ कथेपेक्षा थोड्या अधिक लांबीची आहे. सिनेमाच्या रचनेसाठी आणि त्या रचनेचा प्रभाव होण्यासाठी कारागृहामधील घटनांचे विस्तृत चित्रण सिनेमात केलेले आहे.
अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण अनुभवतो. ही पात्रं प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वेळ घेतलाय, ही गोष्ट आपल्याला सिनेमा पाहताना जाणवते. मुख्य पात्रांचा अभिनयही कसदार आहे. कथेतील नायक बुटका तर सिनेमातील अँडी सहा फुटांपेक्षा उंच आहे. मात्र त्याचा सहज निष्पापपणा नजरेत भरतो.
रेड मूळ कथेमधे आयरिश गोरा धिप्पाड माणूस आहे तर सिनेमात आयरिश संबंध असलेला काळा माणूस आहे. कलाकाराच्या निवडीसाठी हे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला घ्यावं लागतं. त्यांच्या दिसण्यापेक्षा अभिनयाचा गुण महत्त्वाचा असतो. म्हणून शेवटी अँडीची मुक्तता आपल्याला आनंद देऊन जाते. रेड आणि अँडीच्या भेटीने आपणही समृद्ध होतो.
हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपणही अनुभवतो. यासाठी जी सिनेमाची रचना दिग्दर्शकाने केलेली आहे त्यात तो काही दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेतो. त्याने सिनेमाची लांबी वाढते मात्र सिनेमा पाहिल्यावर असं कुठंही जाणवत नाही. एक स्वतंत्र श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो. या अनुभवाचं वर्णन फार कुणी करत बसू नये. हा जगण्याला पुरून उरेल एवढा अनुभव असून तो ज्याने-त्याने स्वतः घ्यावा.
हेही वाचा:
चला यंदा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया!
अरुण जेटलींच्या मृत्यूचं कारण वेट लॉस सर्जरी?
(हा लेख ‘आपले वाङमय वृत्त’ या नियतकालिकाच्या ताज्या अंकातून घेण्यात आलाय)