राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
वंचितला प्रचंड यश मिळालं असतं. अगदी लोकसभेला मिळालेल्या ४२ लाख मतांहून अधिक दीड ते दोन कोटींच्या घरात मतांची संख्या पोचली असती. जूनमधे झालेल्या पहिल्या सर्वेत हा आकडा कंफर्म होता. परंतू हळूहळू हा आकडा घटत गेला. त्याचं कारण खुद्द वंचितच्या आक्रस्ताळ्या प्रचाराचं आहे.
वंचितने शेवटपर्यंत विरोध हा दोन्ही काँग्रेसला ठेवला. भाजपला विरोध करण्यासाठीची स्पेस तशी छोटीशीच ठेवली. दुसरं म्हणजे टीवी चॅनेल्स, फेसबुक लाईव वर जे बोलणं व्हायचं ते प्रचंड एरोगंस दाखवणारं होतं. या एरोगंसपायी आज फडणवीस घरी बसले आहेत.
निम्म्याहून अधिक ठिकाणी चुकीचे, जनसंपर्क नसलेले उमेदवार दिले गेले. वंचित हा वर्षभराचा पक्ष आहे म्हणून माफ करता येणार नाही. बाळासाहेब आणि भारिप बहुजन महासंघ यांचा ३५ वर्षांचा अनुभव आहे. पोलिंग स्टेशनवर नीट एजंटही नेमण्यात आले नव्हते.
मतदारसंघ बांधणी, बुथ बांधणी या अंधश्रद्धा वाटाव्यात अशा पद्धतीने झिडकारण्यात आल्या होत्या की काय अशी शंका येते. दोन कोटींचा आकडा घसरत घसरत शेवटी २६ लाखांवर आला. शेवटच्या टप्प्यात पवारांच्या पावसात भिजण्याच्या घटनेची तुलना बाळासाहेबांच्या पावसात भिजण्याच्या घटनेशी करून जो काही प्रचाराचा प्रकार केला गेला त्याने नुकसान झालं.
फारशी राजकीय बुद्धी न वापरता मतदान करणाऱ्या अनेक मतदारांचं मत बदललं. यात बाळासाहेबांचा काही रोल नव्हता. परंतू काही उतावीळ प्रचारकांनी संभाव्य परिणाम लक्षात न घेता खिल्ली उडवली आणि जो बिगर मागासवर्गीय मतदार वंचितकडे झुकलेला होता तो तिथून मागं हटला. हे एक्झिट पोलमधे आलेलं मत आहे.
हेही वाचाः मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात
शेवटचं. निकाल आल्यानंतर वंचितचाच प्रचार करणाऱ्यांनी काँग्रेसच्या २३ जागा पाडल्याचं आनंदाने कबूल करत स्टेटस टाकले होते. हा म्हणजे स्वतःहून पक्षावर बी टीम असल्याचा शिक्का लावायला स्पेस मोकळी करून देण्यासारखं होतं.
विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक पत्रकारांनी दर्शवलेली नाराजी अशी होती, आज वंचितची सभा कुठे आहे हे आम्हाला ठाऊक नसतं. कारण तसं रीतसर पत्र किंवा तसे मेसेजेस आम्हाला पाठवलेले नाहीत. जोपर्यंत असाईनमेंटला पक्षाकडून अधिकृतरित्या कळवलं जात नाही तोपर्यंत आम्हाला ड्यूटी तरी कशी असाईन करणार. हे तेवढचं खरं आहे.
वंचितला लोकसभेला माध्यमांमधे भरपूर फुटेज मिळालं. कारण तेव्हा मीडियापर्यंत नीट कम्युनिकेशन होत होतं. पत्रकारांच्या अनेक ग्रुपमधे सभा, परिषदांचे मेसेजेस नीट येत होते. विधानसभेच्या वेळेस हे सगळं मिसिंग होतं. किंवा खुप तुटपूजं होतं. बाय द वे. मेसेजेस, कॉलिंग फ्री आहेत.
वंचितला अजूनही चांगले फ्युचर आहे. पण त्यासाठी खूप बांधणी करावी लागेल. फ्युचरिस्टिक विजन असणारे वक्ते लागतील. कार्यक्रम लागेल. टाळ्या मिळवणारी भाषणं आता चालत नाहीत. नव्याने उभारणी करावी लागेल. सांख्यिकी समजून घ्याव्या लागतील. नवीन भाषा, नवीन कपडे, नवा पेहराव, नवीन ग्राऊंड आत्मसात करावं लागेल. मीडियामधली नवीन स्पेस बळकावी लागेल. तेव्हाच शक्य आहे.
राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. संवादाची जागा गरजेची असते. संवाद हा प्रत्येकासोबत असणं क्रमप्राप्त असतं. बोलण्याच्या ताकदीपेक्षा ऐकण्याची ताकद महत्त्वाची असते. यासाठी एक उदाहरण द्यावंसं वाटतं.
दिल्लीत इंदिरा गांधींच्या शासनकाळात असं म्हटलं जायचं, की इंदिरा गांधीच्या लोकप्रियतेला आणि राजकारणातील यशाला कधीच छेद दिला जाऊ शकत नाही. कारण त्या बाईचा कान खूप मोठा आहे. त्या कानात सर्वांचं ऐकून घेण्याची अमर्याद क्षमता आहे. आपण ऐकून घेतलं पाहिजे. सांख्यिकीला समजून घेतलं पाहिजे.
हेही वाचाः शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर
राजकारणात मित्र वाढवणं गरजेचं आहे. कारण राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही. असो.
येत्या काळात १२ महापालिका आहेत. वंचित आघाडीने नव्याने तयारी करून या महापालिका ताब्यात घ्याव्यात. कारण तेवढं पोटेंशिअल नक्कीच आहे. मी मतदार आहे वंचितचा आणि कायम राहील. कारण वंचित माझ्या सार्वभौमत्वाचं राजकारण करतेय. त्यांचा कार्यक्रम नुसता डेवलपमेंटचा नाही तर सामाजिक न्यायाचा आहे.
हेही वाचाः
सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी
भारताने आरसीईपीमधे सामील होणं का टाळलं?
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’