अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

०७ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय.

कोरोना वायरसला हलक्यात घेणं शक्तिशाली अमेरिकेलाही बरंच महागात पडतंय. एकट्या अमेरिकेतल्या कोरोनाच्या केसेसचा आकडा तेरा लाखाच्या घरात पोचतोय. तर मृतांची संख्या ७० हजारांवर  गेलीय. अमेरिकेतल्या सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला ही आकडेवारी पुरेशी आहे. पण काटेकोरपणे नियोजन करून साथीच्या आजाराला पळवून लावता येतं हे अमेरिकेतल्याच सेंट लुईस शहरानं जगाला दाखवून दिलंय.

मिसुरी राज्यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या सेंट लुईसमधे कोविड १९ च्या ७ मे २०२० पर्यंत २९५८ केसेस सापडल्यात. तर ९ जणांना जीव गमवावा लागलाय. सध्या कोरोनाच्या काळातही अमेरिकेतलं हे शहर सेफ झोनमधे आहे. ते त्यांनी केलेलं नियोजन आणि नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळल्यामुळे. बीसीसी हिंदीसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमधे पत्रकारिता केलेले जे सुशील हे सध्या याच सेंट लुईस शहरात राहतात. सेंट लुईसमधल्या नियोजनाबद्दल त्यांनी एक सविस्तर फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्यांच्या मूळ हिंदी पोस्टचा हा अनुवाद अक्षय शारदा शरद यांनी केलाय.

 

मी ज्या शहरात राहतो ते अनेक बाबतीत खास आहे. साहित्याच्याही आणि सध्याच्या साथीच्या विरोधात लढण्याच्या दृष्टीनंही. जगभरातले लोक अमेरिकेचं नाव घेताच न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, शिकागो, बोस्टन, सिएटल या शहरांचा उल्लेख करतात. पण या सगळ्यात सेंट लुईस शहरही काही कमी नाहीय.

स्पॅनिश फ्लूच्या विरोधात लढणारं सेंट लुईस

प्रत्येक शहराचं आपलं एक वेगळेपण असतं. नजरेत भरतील अशी ठिकाणं असतात. मोठे सेलिब्रिटी असतात. मी अमेरिकेतल्या ज्या शहरात राहतोय तिथं या सगळ्या गोष्टी आहेतच. पण अजून महत्त्वाचं म्हणजे कोरोना साथीच्या विरोधात लढण्याची सेंट लुईस शहराची भूमिका आहे. १९१८ ते १९१९ मधे जगभर स्पॅनिश फ्लूची साथ पसरली होती. या साथीच्या काळात सेंट लुईस शहरानं उचललेली पावलं बरंच काही शिकवणारी आहेत.

स्पॅनिश फ्लूनं अमेरिकेत सर्वांत कमी मृत्यू या शहरात झाले. हे शक्य झालं ते त्यांनी उचललेल्या पावलांमुळे. स्पॅनिश फ्लूची सुरवात नेमकी कुठून झाली याबद्दल इतिहासकारांमधे मतमतांतरं आहेत. काही इतिहासकार म्हणतात की, फ्लूची सुरवात फ्रान्समधून झाली तर काहींच्या मते, हा फ्ल्यू युरोप आणि अमेरिकेतून पसरला.

एका मतप्रवाहानुसार, स्पॅनिश फ्लूची पहिली केस ही सेंट लुईस जवळच्या कॅनसस शहरातल्या फोर्ट रावळी कॅम्प इथं सापडली. हा अमेरिकन सैन्याचा कॅम्प होता. पहिल्या महायुद्धादरम्यान सैनिक अमेरिकेतून युरोपात गेले तेव्हा हा रोग अमेरिका आणि युरोपमधे पसरला.

हेही वाचा: आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

स्पॅनिश फ्लू आणि कोरोनातलं सारखेपण

स्पॅनिश फ्लूची साथ दोन टप्प्यांत आली. सुरवातीला जून महिन्यात आणि नंतर सप्टेंबरमधे. दुसऱ्यावेळी ती अधिक घातक ठरली. पहिलं महायुद्ध चालू असल्यानं युरोपातले देश या रोगाबद्दलच्या बातम्या देत नव्हते. स्पेन हा एकमेव देश यादरम्यान तटस्थ होता. स्पेनमधूनच बातम्या यायच्या. त्यामुळेच याला स्पॅनिश फ्लू म्हटलं जात असावं. स्पॅनिश फ्लूमुळे जगभर पाच कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. यातले दीड ते दोन कोटी मृत्यू भारतात झाले होते.

स्पॅनिश फ्लूची लक्षणं ही सध्याच्या कोविड १९ पेक्षा काही वेगळी नव्हती. कमी अधिक प्रमाणात संसर्गाचा वेगही तसाच आहे. मात्र या दोन्ही आजारांमधला एकमेव मोठा फरक म्हणजे स्पॅनिश फ्लूचा २० ते ४० वर्षांच्या लोकांना मोठा फटका बसला. याउलट कोरोना वृद्ध लोकांना होण्याची शक्यता अधिक आहे.

अमेरिकेत सप्टेंबरमधे हा रोग पसरला आणि ऑक्टोबर महिन्यात त्याचं भयानक रूप समोर आलं. सेंट लुईस त्या काळातलं एक मोठं शहर होतं. तिथं शिकागोसारखंच मोठं व्यापारी केंद्रही आहे. त्यामुळे या आजाराला सामोरं जाण्यासाठी मोठी पावलं उचलली गेली.

हेही वाचा: पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

धडाडीच्या अधिकाऱ्यामुळे फ्लू नियंत्रणात

सेंट लुईस पोस्ट डिस्पेच या स्थानिक पेपरमधल्या माहितीनुसार, शहराचे तत्कालीन आरोग्य आयुक्त डॉ. मॅक्स सी स्टार्कलॉफ यांनी एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता प्रत्येक शाळा, कॉलेज, पब आणि स्थानिक व्यवसाय बंद करण्याचा. त्यावेळेस सेंट लुईस शहराची लोकसंख्या जेमतेम ८० हजार होती. अमेरिकेतल्या पहिल्या दहा शहरांमधलं ते एक शहर होतं.

शहरातली चर्चसुद्धा रविवारच्या प्रार्थनेसाठी उघडण्यास बंदी घालण्यात आली होती. दुसरीकडे शहरातल्या थिएटर मालकांनी, संगीतकार आणि मनोरंजन करणाऱ्यांनी क्वारंटाईनला विरोध केला. करिअर धोक्यात येईल असं त्यांचं म्हणणं होतं. थिएटरमधून सगळ्यात जास्त टॅक्स मिळतो. त्यामुळे थिएटर मालकांचं ऐकलं जावं असं त्यांचं म्हणणं होतं.

स्टार्कलॉफ यांनी कुणाचंच ऐकलं नाही. याचा परिणाम असा झाला की, शहर जवळजवळ बंद झालं. त्यांनी पूर्ण शहरात लॉकडाऊन केलं. फक्त बँक, पोस्ट ऑफिस आणि स्मशानभूमीचं सामान विकणारे व्यवसाय उघडण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे स्पॅनिश फ्लू नियंत्रणात येऊ लागला.

फिलाडेल्फिया, न्यूयॉर्कमधे मृतांची संख्या अधिक

अमेरिकेतलं मोठं शहर असलेल्या फिलाडेल्फियातल्या अधिकाऱ्यांनी मात्र या फ्लूच्या बातम्या लपवल्या. स्पॅनिश फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंना कमी लेखण्यात आलं. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फिलाडेल्फियात लिबर्टी लोन परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान मित्रराष्ट्रांच्या सैन्याच्या गरजा भागवण्यासाठी गवर्नमेंट बॉण्डला प्रोत्साहित करणं हा यामागचा उद्देश होता.

या परेडमधे हजारो लोकांचा सहभाग होता. फिलाडेल्फियात स्पॅनिश फ्लू मोठ्या वेगानं पसरण्याचं हे एक कारण होतं. पुढच्या दहा दिवसांमधे शहरात हजारो लोकांचा मृत्यू झाला. फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क या शहरांमधे मृतांची संख्या सगळ्यात जास्त होती.

लॉकडाऊनमुळे सेंट लुईस, मिलवॉकी या शहरांना मात्र अनेकांचे जीव वाचवण्यात यश आलं. फिलाडेल्फियात हजाराच्या मागे आठशे लोकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सेंट लुईसमधला मृतांचा आकडा साडेतीनशे इतका होता.

हे कोरोना स्पेशलही वाचा: 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण 

साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहराने आपल्या पूर्वानुभवातून कोरोनाच्या काळातही महत्वाची भूमिका बजावलीय. शहरात मार्च महिन्यातचं फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. लोकांनी त्याचं काटेकोरपणे पालन केलं. सेंट लुईस शहर हे अमेरिकेतल्या मिसुरी राज्यात येतं. कोरोनानं मृत पावलेल्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत इथं खूप कमी आहे.

न्यूयॉर्कसारखी मोठी शहरं आपल्या जुन्या अनुभवांतून आणि अमेरिकेच्या इतिहासातून काहीही शिकलेली नाहीत. एप्रिल महिन्यापर्यंत इथले व्यवसाय सुरूच होते. याचा परिणाम म्हणजे न्यूयॉर्कमधे आजघडीला २० हजाराहून अधिक लोकांचा कोरोनानं बळी घेतलाय. सेंट लुईससारख्या शहरांमधे सध्या किराणा माल, मेडिकलची दुकानं उघडी आहेत. गोरगरिबांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बस आणि ट्रेन चालू आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी काटेकोरपणे होतेय.

अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्याचा स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे. अमेरिकेतल्या लोकांना आठवड्यातून तीन चारवेळा बाहेरचं खायची सवय आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमधे जेवण बनवणं आणि ऑनलाईन जेवण पोच करण्याची परवानगी आहे. अशाप्रकारे व्यवसायांची काळजी घेत शहर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होताना दिसतंय.

हेही वाचा: 

‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?