औरंगजेबला कबरीत घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलं. पण त्याचवेळी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली होती. सध्याच्या 'औरंगजेबची कबर’ उखडण्याच्या अतिरेकी भाषेत हिंदू-मुस्लिम मतं तोडण्याचा डबल गेम आहे.
इतिहासातली मढी उकरून काढण्याची खोड पूर्णपणे वाईटच! पण गेली ३५-४० वर्ष हिंदू- मुस्लीम धर्मांधता पेटती ठेवण्यासाठी जुनी-पुराणी मढी उकरून त्याभोवती देशाचं राजकारण सत्ता लाभाचा पिंगा घालण्यात दंग आहे. त्यात आता औरंगजेबाच्या कबरीची भर पडलीय. ती कबर असलेल्या खुलताबाद आणि औरंगाबाद शहरात २५ किलोमीटरचे अंतर आहे.
हेही वाचा: लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी
औरंगजेब हा दिल्लीचा बादशाह. पण छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्माणाच्या मोहिमांनी तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याने नानाप्रकारे शिवरायांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी तो अपयशी ठरला.
१६३६ ते १६४४ या काळात औरंगजेबला त्याच्या वडलांनी- बादशाह शाहजहानने सुभेदारीसाठी दौलताबादला पाठवलं होतं. त्यावेळी 'खडकी' नावाने ओळखला जाणारा हा परिसर औरंगजेबचा आवडता प्रांत होता. तो दख्खनच्या परिसरात फिरायचा. त्याने दौलताबाद ते वेरुळ हा रस्ता बांधला होता.
औरंगजेबाला १६५२ला दुसऱ्यांदा 'खडकी'ची सुभेदारी मिळाली. त्यानंतर तो तिथे १६५९ पर्यंत राहिला. या ७ वर्षांत त्याने तिथं अनेक वास्तू बांधल्या. यात 'किले अर्क' आणि 'हिमायत बाग' यासारख्या अनेक बागांचा समावेश होतो. त्यामुळेच खडकीचं 'औरंगाबाद' असं नामांतर झालं.
छत्रपती शिवरायांचं ३ एप्रिल १६८०ला निधन झालं. शिवरायांच्या पश्चात संभाजी राजे 'छत्रपती' झाले. १६८१-८२ला मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढू लागलं; म्हणून औरंगजेब पुन्हा दक्षिणेत आला आणि त्याने औरंगाबादेत आपला तळ ठोकला. त्याने ११ मार्च १६८९ला कटात फसून पकडलेल्या संभाजीराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
संभाजीपुत्र शाहूला आपल्या नजरकैदेत तब्बल २० वर्ष ठेवलं. त्याच्यावर इस्लामी संस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी औरंगजेब मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होता. तो मावळे निकराची झुंज देत हाणून पाडत होते. संभाजीराजांच्या हत्येनंतर मावळे जवळपास निर्णायक होते. पण त्यांना औरंगजेबाला रोखण्यासाठी रायगडावरचा भगवा आणि शिवरायांनी दिलेला ’स्वराज्य’ हा मंत्र पुरेसा होता.
दरम्यान, ताराराणी यांचा उदय झाला. त्या शिवरायांचे स्वराज्याचे 'सरसेनापती' हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६७५ मध्ये झाला. वडील- हंबीररावांनी त्यांना लहानपणापासून युद्धकलेचं शिक्षण दिलं होतं. १६८३-८४ च्या सुमारास ताराबाईंचं लग्न शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्याशी झालं. त्यापूर्वी शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदासाठी वादाची शक्यता निर्माण होण्याची लक्षणं दिसताच; हबीररावांनी आपले सख्खे भाचे आणि 'भावी जावई' असलेल्या राजाराम महाराजांऐवजी संभाजीराजांची छत्रपतीपदी निवड करून आपल्या न्यायवृतीचं दर्शन घडवलं.
हेही वाचा: महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
संभाजीराजांची हत्या झाली. ’संभाजी’पुत्र शाहू औरंगजेबच्या कैदेत अडकल्याने राजाराम महाराज 'छत्रपती’ झाले. त्यानंतर काही दिवसांत- म्हणजे १६८९ला मुघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यातून राजाराम महाराजांसह ताराराणी शिताफीने निसटल्या. तिथून राजाराम महाराज जिंजीला पोचले; तर ताराराणी कोल्हापूरच्या विशाळगडला पोचल्या. तिथे ताराराणींनी लष्करी आणि मुलकी व्यवहाराची माहिती शिकून घेतली.
१६९१ला त्या जिंजीला राजाराम महाराज यांच्याकडे पोचल्या. त्यांना ९ जून १६९६ला पुत्र झाला. त्याचं शिवाजी असं नामकरण झालं. पण त्यांचा पुत्रप्राप्तीचा आनंद फार काळ टिकला नाही. ३ मार्च १७००ला राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबला वाटलं, आता मराठा साम्राज्याचा अंतिम निकाल लागला! त्याचा हा अंदाज पंचविशीतल्या ताराराणींनी खोटा ठरवला.
स्वराज्याचे युवराज 'संभाजीपुत्र’ शाहू औरंगजेबच्या कैदेत होते आणि औरंगजेबच्या आक्रमणामुळे दक्षिणेतल्या स्वराज्याची घडी विस्कटली होती. मुघल सैन्याने हल्ल्यांचा धुमाकूळ घालून शिवरायांनी मोठ्या शौर्याने कब्जात आणलेले सर्व किल्ले एकेक करत जिंकले होते.
मराठ्यांची गादी वारसाविना मोकळी होती. अशात ताराराणी यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाचा - म्हणजे शिवाजी-दुसराचा विशाळगडावर राज्याभिषेक करवून घेतला आणि त्याच्या नावाने त्या कारभार पाहू लागल्या.
धनाजी जाधव हे त्यांचे ’सेनापती’ होते. त्यांच्या सोबतीला उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ पुढे ते सातारा गादीचे ’छत्रपती’ शाहू यांच्याकडून प्रधानकीची वस्त्रं-अधिकार घेऊन 'पहिला पेशवा' झाले. हे शूर सेनानी एकत्र आले होते. यांच्या बळावर ताराराणी स्वत: घोडदौड करून, कधी तलवारीच्या बळावर तर कधी मुत्सदी बोलणी करून एक-एक करत किल्ले जिंकू लागल्या.
हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी
एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते, हा विचार नव्वद वयाच्या जवळ आलेल्या औरंगजेबला असह्य होऊ लागला. त्यातून त्याच्याकडून अधिक चुका होऊ लागल्या. त्यात २५ वर्ष आपलं घर-दार सोडून आलेले मुघल सैन्यही वैतागले होते. त्यातच माणमधे आलेल्या महापुरात घोडे, खजिना आणि मुघल सैनिक मोठ्या संख्येने वाहून गेले.
बादशहा औरंगजेबही लंगडा झाला होता. हा मोका साधून ताराराणी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गालितगात्र झालेल्या औरंगजेबला मराठी मातीत 'अल्ला प्यारे' करून टाकलं. औरंगजेबच्या मृत्यूनंतर संभाजीपुत्र शाहू महाराजांची सुटका झाली. त्यांनी परतताच 'छत्रपती’पद मागितलं. पण तब्बल ७ वर्ष मिळेल त्या मावळ्यांना घेऊन औरंगजेबशी लढणार्या ताराराणींनी शाहूंची मागणी धुडकावली.
या वादात मराठेशाहीच्या कारभाऱ्यांनी तेल टाकण्याचा उद्योग केल्यामुळे या वादाची परिणती युद्धात झाली. त्याची अखेर शाहू महाराजांची ’सातारा गादी' आणि पलीकडे, ताराराणीसाहेबांची 'करवीर गादी’ अशी छत्रपती पदाची वाटणी झाली. ताराराणी १७६१ पर्यंत म्हणजे वयाच्या ८६ वर्षांपर्यंत जगल्या. औरंगजेबचा खातमा अहमदनगरमधे झाला. पण, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या मृतदेहाचं दफन खुलताबादला करण्यात आलं.
औरंगजेबने आपल्या इच्छापत्रात 'मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी. ती मी स्वतः कमावलेल्या पैशातच बांधावी. त्यावर एक मोगऱ्याचं छोटं रोपटं लावावं,' अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खुलताबादला 'गुरू' सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीशेजारी औरंगजेबची कबर बांधण्यात आली.
औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा आणि 'कुराण शरीफ’ नकलून काढायचा. त्यातून जी कमाई झाली, तेवढ्याच पैशात; म्हणजे १४ रुपये १२ आणे खर्चात त्यावेळी कबर बांधण्यात आलीय. ही कबर औरंगजेबचा मुलगा आझमशाहने बांधलीय. त्याने पुढे आपल्या आईच्या स्मरणार्थ औरंगाबादेत 'ताजमहाल'सारखा दिसणारा 'बीबी का मकबरा'ही बांधला. त्यात औरंगजेबच्या पत्नीची कबर आहे.
१९०४-०५च्या दरम्यान लॉर्ड कर्झनला या कबरीची माहिती समजली. '१६५९ ते १७०७ इतका काळ दिल्लीचा बादशहा असलेल्याची कबर इतकी साधी कशी काय असू शकते?' असं वाटल्यामुळे त्याने कबरीभोवती मार्बल ग्रिल बसवून थोडी सजावट केली. ही कबर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड
दक्षिण भारतातल्या 'इस्लामगड' आणि सुफी पंथाचे केंद्र असलेल्या खुलताबादेत 'भद्रा मारुती’ या धार्मिक स्थळाबरोबर सुफी संत आणि इस्लामी राजघराण्यातल्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्यात एक कबर औरंगजेबची आहे. यापेक्षा त्या कबरीला आजवर फारसं काही महत्त्व नव्हतं. पण गेल्या आठवड्यात तिथे एमआयएम पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी गेल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं.
ओवेसींचं तिथं जाणं, हे सहज नव्हतं. त्यात योजकता होतीच. महाराष्ट्रात १९ महानगरपालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात औरंगाबाद आणि मराठवाड्यातल्या आणखी काही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांचाही समावेश आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादचे खासदार आहेत.
औरंगाबाद शहरात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ती मतं अजूनही बऱ्यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत. ती भाजपकडे येणार नाही, हे स्पष्ट आहे. ती एमआयएमकडे एकगठ्ठा येण्यासाठी ओवेसी बंधूप्रमाणे भाजपही प्रयत्नशील आहे.
अकबरूद्दीन ओवेसींच्या 'औरंगजेब कबरी दर्शनानंतर शिवसेनाला औरंगाबादचा नामबदल 'संभाजीनगर' करण्याच्या घोषणांची आठवण देत उचकवण्यात आलं. तसाच, 'औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? ती उखडून दाखवा!' असा आवाजही शिवसेनेला देण्यात आलाय. यात शिवसेनेची हिंदू मतं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लीम मतं तोडण्याचा 'डबल गेम' आहे.
ताराराणी आणि त्यांच्या मावळ्यांनी औरंगजेबला संपवलाय. पण त्यांनी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची ’कबर' होऊ दिलीय. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली. त्यामुळे 'औरंगजेबची कबर’ उखडण्याची अतिरेकी भाषा करणं, हेच मुळी स्वराज्य धर्माला नाकारण्यासारखं आहे.
तसंच संभाजीराजांची हत्या तुळापूर इथं झाली. ते पुणे जिल्ह्यात येतं. म्हणून संभाजीराजांचं स्मरण जागवण्यासाठी पुणे जिल्ह्याचा नामबदल ’संभाजीनगर’ असा केला पाहिजे. ते 'पेशव्यांचं पुणे' म्हणणाऱ्यांना मान्य आहे का, ते आधी तपासून घ्यावं!
औरंगजेबला कबरीत घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलंय. हा इतिहास लक्षात ठेवून औरंगजेबला कबरीपुरतंच मर्यादित ठेवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा नामबदल 'ताराराणी नगर' असा केला पाहिजे. असं काही ओवेसी बंधूना सुचणार नाही आणि त्यांना 'टीम बी' म्हणून वापरणारे असा आग्रह धरणार नाहीत!
हेही वाचा:
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?
(लेख साप्ताहिक चित्रलेखातून साभार)