शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

०८ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १५ दिवस झाले. दोन आठवडे उलटूनही महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर काही केल्या तोडगा निघेना. इतके दिवस भाजपच्या नेत्यांचा फोनही न उचलणाऱ्या शिवसेनेने आता बोलणीस तयार असल्याचं सांगितलंय. पण त्यासाठी एक अट घातलीय. फिफ्टी फिफ्टीची ही अट जुनीच असली तरी याला आता एक नवं वळण आलंय.

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाला रोज नवं वळण मिळतंय. आज काहीसा तोडगा निघेल असं वाटत असतानाच शिवसेना-भाजपमधल्या राजकारणाने एक नवं वळण घेतलंय. शिवसेना आणि भाजपमधला वाद आता निव्वळ सत्तेच्या वाटाघाटीपुरता मर्यादित राहिला नाही. तो खऱ्याखोट्याच्या लढाईपर्यंत पोचलाय.

भाजप-शिवसेनेतला नेमका वाद काय?

सध्याचा सारा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे निर्माण झालाय. ते विधान म्हणजे, ‘भाजप शिवसेना युतीतल्या फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यात मुख्यमंत्रीपद येत नाही.’ दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं. आणि इथेच शिवसेना, भाजपमधली वाटाघाटीची चर्चा फिसकटली. कारण शिवसेनेच्या मते, फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यात मुख्यमंत्रीपदही ठरलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालादिवशी फिफ्टी फिफ्टी हाच सत्तावाटपाचा फॉर्म्युला असल्याचं म्हणाले होतं. ते म्हणाले, ‘हा जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणार आहे. मुख्यमंत्री कुणाचा होईल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जागावाटपावेळी भाजपची अडचण आपण समजून घेतली. पण आता भाजपची अडचण समजून घेऊ शकत नाही. लोकसभेवेळी युती झाली तेव्हा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. तो आता लपवून ठेवण्यात अर्थ नाही.’

हेही वाचाः तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मग ठरलं काय होतं?

लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप युती तूटणार असल्याचं बोललं जात होत. अशावेळी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप नेतृत्वाखालच्या एनडीएमधे राहूनच शिवसेना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विधानसभेसाठीची जागावाटप आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुन्हा सरकार आल्यावर पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचाही आम्ही निर्णय घेतलाय.’

आता उद्धव ठाकरे खुद्द मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर सांगितलेल्या फिफ्टी फिफ्टीच्या वचनावर बोट ठेवताहेत. आणि इथेच गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेच्या चर्चेचं घोडं पेंड खाल्लंय. आज भाजपने सत्तास्थापनेसाठी काही करता येईल का, याच्या चाचपणीसाठी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून असं काही ठरलं नसल्याचं सांगितलं.

संजय राऊत काय म्हणाले?

भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून गेल्यावर शिवसेनेचे नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दुपारी तीनच्या सुमारास एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांनी ‘ठरल्याप्रमाणे करा’ हा एक ओळीचा फॉर्म्युलाच महायुतीचा मंत्र असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसंच राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत खरेखोटेपणाच्या मुद्द्यावर जोर दिला. याआधीही ते हा मुद्दा बोलत आलेत.

संजय राऊत म्हणाले, ‘शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहमीच भूमिकेवर ठाम राहिलेत. भूमिकेवर ठाम राहण्याचा मुद्दा भाजपला विचारायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी युती तुटेल असं मी काहीच करणार नाही. युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, असं सांगितलं. २४ तारखेला निकाल लागल्यावरही हेच सांगितलं आणि विधीमंडळ पक्षनेता निवडीवेळीही हेच सांगितलं.’

‘शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदारांना धडा शिकवायचाय. मतदारांना शिवसेनेला मुख्यमंत्री झालेलं बघायचंय. ठरल्याप्रमाणे करा या मंत्रालाच लोकांनी जनादेश दिलाय. अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री करा, असा फॉर्म्युला आहे.’

हेही वाचाः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’

‘प्राण जाए, पर वचन ना जाए’

शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षांमधली युती ही गेल्या २५ वर्षांत एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलीय. या युतीला एक भावनिक किनार आहे. या किनारीमुळेच २०१४ मधेही युती तोडण्याची घोषणा कोण करणार यावरून ही चर्चा बरीच लांबली होती. आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी हाच धागा पकडून युती तोडण्याचं पाप मी करणार नसल्याचं सांगत एक प्रकारे भाजपवर ‘ठरल्याप्रमाणे करण्याचं’ दबावतंत्र वापरत आहेत.

दुसरीकडे लवकरच गोड बातमी मिळेल असं रोज सांगणारे भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसही शिवसैनिकच आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर चांगलंच की, असं म्हणाले. यावर राऊत म्हणाले, ‘शिवसैनिक खोटं बोलत नाही. दिलेल्या शब्दाला जागतो. वचनाला जागतो आणि शिवसैनिक सत्तेसाठी, खुर्चीसाठी कुणाच्या पाठीत खंजीर खूपसत नाही.’ आणि हाच बाळासाहेबांचा शिवसैनिकांवरचा संस्कार असल्याचं सांगायलाही राऊत विसरत नाहीत.

निवडणुकीत सारे पक्ष जाहीरनामे काढतात. शिवसेना जाहीरनाम्याला वचननामा म्हणते. आता तिच शिवसेना ‘प्राण जाए, पर वचन ना जाए’ हीच शिवसैनिकाची व्याख्या असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना ‘ठरल्याप्रमाणे करा’ अशी आठवण करून देतेय.

आता मार्ग काय?

शिवसेनेनं वेळोवेळी सगळ्यांत मोठी पार्टी म्हणून भाजपने सरकार बनवावं असं सांगताना आपण विरोधात बसायला तयार असल्याचं कधीच सांगितलं नाही. शिवसेनेशिवाय भाजप सत्तेवर येऊच शकत नाही, हे ओळखलेल्या शिवसेनेला सत्तेचा मार्ग आपल्यापासूनच जातोय हे चांगलं माहीत आहे. त्यामुळेच इतके दिवस भाजपच्या ज्येष्ठ नेतेमंडळीचं साधे फोनही उचलत नसलेल्या ‘मातोश्री’वरून एक गोड बातमी आलीय.

ती बातमी सांगताना संजय राऊत म्हणाले, ‘ठरल्याप्रमाणे करा, असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे. तसंच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होईल.’ आता हा प्रस्ताव मान्य केल्यास आतापर्यंत मीडियामधे क्लिन इमेजचे मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीसासाठी मोठा झटका असेल. आणि शिवसेना खरी ठरेल. एक खोटं झाकण्यासाठी भाजपकडून मतदारांना उल्लू बनवलं गेल्याचंही चित्र निर्माण केलं जाऊ शकतं. असं शिवसेनेनं माघार घेतल्यास ते खोटारडे ठरू शकतात.

सध्याच्या दुहेरी पेचप्रसंगात सत्तेच्या समसमान जागावाटपासोबतच खरेखोटेपणाच्या निकषावरही सोडवावा लागणार आहे. आणि आता या दोन पातळ्यांवर ‘तेरी भी जीत मेरी भी जीत’ सारखा विनविन फॉर्म्युल्याने तोडगा काढला तरच या पेचप्रसंगातून काहीतरी ठोस तोडगा निघू शकतो.

हेही वाचाः 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?