सायटोकाइन: कोरोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू या प्रोटिनच्या गोंधळामुळे

१२ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


जगभर कोरोनामुळे जे काही मृत्यू होतायत त्याला शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन कारण ठरतंय. हे प्रोटिन खरंतर शरीरातली रोगप्रतिकार शक्ती  वाढवायला मदत करतं. पण एकाएकी सायटोकाइनचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातं. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती  जास्तच सक्रिय होते. रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचं नुकसान करायला सुरवात करते.

माझी 'इम्युनिटी पावर' स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मला काही होणार नाही असं आपण अनेकवेळा म्हणतो. आजारी पडलं, दुखलं खुपलं तर आपल्यातल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे आपण वाचू म्हणून माणसं बिनधास्त असतात. गोळ्या औषधांसोबत खाण्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे कोणताही आजार आणि वायरसमधून आपण सहीसलामत बाहेर पडू असा विश्वासही असतो.

सध्याच्या कोरोना वायरसच्या संकटातही रोगप्रतिकार शक्ती वाढवायचे सल्ले दिले जातायत. ज्यांची इम्युनिटी चांगली त्यांच्या जिवाला धोका कमी असं म्हटलं जातंय. पण या रोगप्रतिकार शक्तीचा गोंधळ उडाला तर? वाचायला थोडं विचित्र वाटेल. पण हा गोंधळ आपल्याला काळजीत टाकणारा आहे. आपल्या शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन त्याला कारण ठरतंय.

कोरोना वायरसमुळे जगभर मोठ्या प्रमाणात मृत्यू होतायत. त्यातल्या अधिकाधिक मृत्यूला रोगप्रतिकार शक्ती जास्तच सक्रिय करायला लावणारं सायटोकाइन जबाबदार आहे. लॅन्सेट मॅगझिनमधे प्रसिद्ध झालेल्या संशोधनातूनही ही गोष्ट पुढे आलीय. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातंय.

हेही वाचा: डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

अशी गोंधळते रोगप्रतिकार शक्ती

रक्तातल्या पांढऱ्या पेशी रोगप्रतिकार शक्ती वाढवायचं काम करतात. या पेशीचे वेगवेगळे प्रकार असतात. साइटोकाइन रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतं. तसंच लाल आणि पांढऱ्या पेशींमधे समन्वय आणि संवाद ठेवण्याचं काम करतं. रोगप्रतिकार शक्ती वायरस किंवा रोगांशी लढते तेव्हा त्यांच्या सोबतीला सायटोकाइन प्रोटिनही पुढे असतं.

पण कधीकधी आजार किंवा वायरसची लढताना रोगप्रतिकार शक्ती गोंधळात पडते. आपली तयारीच नसेल आणि अचानक एखाद्या शत्रूशी आपल्याला लढावं लागलं तर? आपण गोंधळून जाऊ ना? एखादा वायरस रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करायला लागतो. तेव्हा शरीरातल्या साइटोकाइनचं प्रमाण अचानक वाढायला लागतं.

हे वाढणारं प्रमाण आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. थोडक्यात काय तर रोगप्रतिकार शक्ती जास्तच सक्रिय होते आणि एखाद्या रोगाशी लढा देण्याऐवजी आपल्या शरीराचं नुकसान करायला ती सुरवात करते. ही अवस्था सायटोकाइन स्टॉर्म म्हणून ओळखली जाते.

इतर आजारांमधे सायटोकाइन स्टॉर्म

कोरोनाचा संसर्ग झालेले पेशंट हॉस्पिटलमधे ऍडमिट होतात तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात सायटोकाइन गडबड करायला सुरवात करते. सायटोकाइन स्टॉर्मची अवस्था आली म्हणजे माणूस मरेलच असं नाही. रिकवरी झाल्याची उदाहरणही आहेत. शिवाय हे केवळ कोरोना वायरसमधेच आढळून आलेलं नाहीय.

इतर अनेक आजारांमधेही सायटोकाइन स्टॉर्मची अवस्था आलीय. अनेकांचा मृत्यू झालाय. रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या जीवावर बेतलीय. १९१८ मधे आलेल्या स्पॅनिश फ्लू आणि कोरोना कुटुंबाचं भावंडं असलेल्या २००३ मधल्या सार्सच्या साथीतही सायटोकाइन स्टॉर्ममुळे अनेकांना जीव गमवावा लागला.

स्वाईन फ्लूच्या साथीतही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे वायरसपेक्षा वायरस काळात रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्रिय झाल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय.

हेही वाचा: १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?

मानवी पेशींवर हल्ला

कोणताही संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सायटोकाइन स्टॉर्मची अवस्था निर्माण होत असल्याचं दिल्लीच्या केजीबी पंत हॉस्पिटलचे डॉ. एस. एम. रहेजा यांनी 'द क्विंट' या वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. त्यामुळे कोरोना वायरसचा संसर्ग झाल्यानंतर पेशंट सायटोकाइन स्टॉर्मच्या अवस्थेत असेल तर त्याची स्थिती अधिक गंभीर होते असंही त्यांचं म्हणणं आहे.

अशावेळी नेमकं काय होतं? सायटोकाइन स्टॉर्मच्या अवस्थेत मानवी पेशी आपल्या फुफ्फुसाकडे जमा होतात. पेशींवर हल्ला केला जातो. नसा फुटतात. ताप येतो. डोकेदुखी सोबत ब्लड प्रेशर कमी होतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. सोबतच रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

फुफ्फुस, हृदयासोबत शरीरातला एक एक अवयव आपलं काम करणं बंद करतो. माणूस कोमातही जाऊ शकतो. अशावेळी आपल्यातली रोगप्रतिकारक शक्ती हीच आपला सगळ्यात मोठा शत्रू ठरते.

रिसर्च आणि औषधंही

यावर काही औषध आहे का? तर जगभरातल्या दोन कंपन्यांनी यावर गेल्यावर्षी रिसर्च केल्याची माहिती फार्मा टाइम्स या वेबसाईटवर वाचायला मिळते. स्वित्झर्लंडमधली नोवार्टिस आणि अमेरिकेच्या इनसाईट कंपनीनं जकावी या औषधावर रिसर्च केलाय. अनेक औषधांची चर्चा होतेय. चर्चेतल्या टोसिलीजुमाबवर इटली आणि चीनमधे रिसर्च झालाय.

सायटोकाइन स्टॉर्ममधे फुफ्फुसामधला संसर्ग अधिक धोकादायक ठरतो. त्यामुळे कोरोनातल्या मृत्यूच्या नेमक्या आकडेवारीवर वेगवेगळे रिसर्चही पुढे आलेत. अमेरिकेतल्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोलनुसार, गेल्यावर्षी कोरोना वायरसमुळे जितक्या लोकांचा मृत्यू झाला त्यातल्या २७ टक्के लोकांचे मृत्यू सायटोकाइन स्टॉर्ममुळे झाले.

कोरोना पेशंटमधे सायटोकाइन स्टॉर्मची अवस्था निर्माण होत असल्याची माहिती चीनच्या वुहान शहरातल्या डॉक्टरांनी पहिल्यांदा जगाला दिली. बीबीसी हिंदीवरच्या एका लेखात ही माहिती वाचायला मिळते. गेल्यावर्षी वुहान शहर कोरोना वायरसचा हॉटस्पॉट होतं. इथूनच वायरस जगभर पसरला. तिथल्या १५० कोरोना पेशंटवर गेल्यावर्षी रिसर्च करण्यात आला. यातले मृत्यू केवळ सायटोकाइन स्टॉर्मच्या अवस्थेमुळे झाल्याची माहिती पुढे आलीय.

हेही वाचा: 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया