नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

२६ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात विचारवंतांची जी पहिली पिढी होती त्यात नलिनी पंडित होत्या. अग्रगण्य विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. २६ जुलै २००९ ला त्यांचं मुंबईत निधन झालं. महात्मा गांधींच्या चळवळीत अग्रभागी असलेल्या कोकणातल्या भांडारकर कुटुंबात १९२७ साली त्यांचा जन्म झाला. महात्मा गांधींची चळवळ जोरात असतानाच त्यांचा पिंड घडत गेला.

स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेल्या उदारमतवादी पंडित कुटुंबातल्या मधुभाई पंडित यांच्याशी विवाह झाल्यावर त्या मुंबईत आल्या. अतिशय संपन्न असं वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्य जगून वयाच्या ८२ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या.

महाराष्ट्रातल्या तीन पिढ्यांचं वैचारिक प्रबोधन

१९४८ साली एम.ए. झाल्यावर त्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापक झाल्या. कॉलेजमधला विषय अर्थशास्त्र असला तरी त्यांच्या लेखनाचा विषय मात्र प्रामुख्याने राजकीय समाजशास्त्र हा होता. मनानं गांधीवादी आणि बुद्धीनं मार्क्सवादी असलेल्या नलिनी पंडितांच्या विचारावर ज्येष्ठ विचारवंत आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक गं. बां. सरदार यांचा प्रभाव होता.

६० वर्ष त्यांनी आपल्या लेखन आणि भाषणातून महाराष्ट्रातल्या तीन पिढ्यांचं वैचारिक प्रबोधन केलं. महाराष्ट्रातल्या पुरोगामी कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण केली. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्रातल्या दलित शोषित आणि बहुजनांच्या प्रश्नांची आणि चळवळीची चर्चा इथल्या सुशिक्षित पांढरपेशा वर्गापर्यंत पोचवण्याचं काम केलं.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

पुस्तकांचे विषय आणि मांडणीतलं वेगळेपण

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या सर्व पुरोगामी चळवळीशी विशेषत: तरुणांच्या चळवळीशी त्यांचा जिवंत संबंध होता. युवक क्रांती दल, दलित पॅंथर, सत्यशोधक अशा जातीय शोषणाविरोधी लढणाऱ्या सर्व चळवळींच्या त्या वैचारिक मार्गदर्शक होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेतून लोकशाही, सामाजिक न्याय, उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये व्यक्त झाली. या मुल्यांवर आधारीत समाजरचना निर्माण करण्यामधे इथल्या दलित शोषितांच्या चळवळीचं योगदान कोणतं, हेच समान सूत्र त्यांच्या लिखाणामधे आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर नजर टाकली तर त्यांचं योगदान लक्षात येतं.

१९५५ मधे वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी पहिलं पुस्तकं लिहिलं. ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास’. त्यानंतर १९६५ मधे ‘जातीवाद व वर्गवाद’, १९७३ मधे ‘स्वातंत्र्योत्तर दलितांची चळवळ’, तर १९८३ मधे ‘गांधी’ पुस्तक लिहिलं. १९८६ मधे ‘धर्म, शासन व समाज’, १९९६ मधे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, २००१ ला ‘जागतिकीकरण आणि भारत’ ही पुस्तकं लिहिली. नलिनीताईंच द्रष्टेपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या विषयात आणि त्यांच्या मांडणीच्या वेगळेपणात आहे.

१९७० नंतर भारतात राजकीय परिस्थिती बदलली. विविध राजकीय आणि सामाजिक प्रवाह निर्माण झाले. त्यातून अनेक प्रश्न पुढे आले. जनता पक्षाचा उदय, मंडल, बाबरी, मागासजातीच्या आणि प्रादेशिक पक्षांची निर्मिती, स्रियांच्या आणि दलितांच्या भागीदारीच्या चळवळी, हिंदूराष्ट्र निर्मितीच्या कार्यक्रमाचे विविध आविष्कार. या सगळ्यामागचं राजकीय समाजशास्त्र समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं मार्गदर्शक ठरली.

विचारधारांचा संघर्ष आणि नलिनीताईंचे विचार

स्वातंत्र्य चळवळीतून आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या दलित शोषितांच्या चळवळीतून विविध विचारधारा आणि लोकशाही, सामाजिक न्याय, उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता ही मुल्यं कशी प्रस्थापित होत गेली याचा आढावा त्यांनी आपल्या पहिल्या दोन पुस्तकातून घेतला. १९८५ मधे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रनिर्मितीच्या वैचारिक अधिष्ठानाविषयी वाद सुरु झाला. त्यातूनच मुख्य दोन प्रवाह पुढे आले. जहाल आणि मवाळ.

या दोन विचारप्रवाहामधील वाद हा आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा हा नसून, राष्ट्रनिर्मितीचा पाया धर्माधिष्ठित असावा की धर्मनिरपेक्ष असावा हा होता. गांधींच्या नेतृत्वामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या पायावर भारताची निर्मिती झाली असं विवेचन त्यांनी केलं. स्वातंत्र्य चळवळीतल्या या विचारधारा आजही जिवंत आहेत. कट्टरपंथीय आणि उदारमतवादी विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार पुरोगामी कार्यकर्त्यांना मार्गदर्शक आहेत.

हेही वाचा: केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी

राजकारण समजावून सांगणारी पुस्तकं

स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजात आणि वेगवेगळ्या समाजगटांत झालेल्या चळवळींचा विचार जात आणि वर्ग अशा दोन्ही दृष्टीकोनातून करायला हवा. त्यावरूनच कुठल्याही चळवळीचं समाजातल्या विकासातलं नेमकं योगदान ठरलं पाहिजे. असा विचार त्यांनी आपल्या ‘जात व वर्ग’ या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकात त्या जातीयवाद या शब्दापासून भिन्न अर्थाचा असा जातवाद हा शब्द वापरतात.

जातींवर आधारित चळवळींमधून शोषित जातींचें आणि त्यांच्या अधिकारांचे प्रश्न मांडले जात असतील तर अशा चळवळींना प्रगतशील समजल पाहिजे असं त्या यात मांडतात. या पुस्तकात त्यांनी ब्राम्हणेत्तर चळवळ, सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ या चळवळींवरच्या दृष्टीकोनातून विश्लेषण केलंय. मंडल नंतरचं राजकारण हे मुख्यत: बहुजन समाजात संघटित झालेल्या विविध मागास जातींच्या संघटनांचे आणि त्या विरोधी उभ्या असलेल्या जातीयवादी प्रवाहाचं आहे.

या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी मंडल पूर्वी लिहिलेलं हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल आणि सध्याच्या राजकीय स्थितीमधे आपली भूमिका ठरवण्यासाठी मदत होईल.

गांधी, आंबेडकर तत्वज्ञानातली समान सूत्रं

आधुनिक भारताच्या जडणघडणीमधे ज्यांच्या विचारांचा महत्वाचा वाटा होता त्यापैकी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली. गांधी पुस्तकात गांधींच्या सत्याग्रहाची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा सर्व बाजूंनी त्यांनी चिकित्सा केली आहे. त्यांचे गांधी हे पुस्तक मराठी साहित्यातला अनमोल ठेवा आहे असं म्हणता येईल.

गांधी आणि आंबेडकर ही पुस्तकं लिहिताना त्यांची काही भूमिका होती. भारताच्या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीत गांधीप्रणित सत्याग्रह आणि डॉ. आंबेडकरांची दलितांच्या हक्कांची क्रांतिकारक चळवळ यांचा वस्तुनिष्ठ ऐतिहासिक दृष्टीने विचार करायला हवा असं त्यांचं मत होतं.

हेही वाचा: एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

चळवळी व्यापक परिवर्तनाचा भाग

गांधीवादी आणि आंबेडकरी चळवळींतून भारतीय समाजातल्या अनेक शक्ती बंधनमुक्त झाल्या आहेत. वेगवेगळ्या थरातल्या सर्वसामान्य लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या विचारसरणीतलं सामर्थ्य काय आणि त्यांच्या मर्यादा काय, याचं त्यांनी विश्लेषण केलं होतं. हे विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण होतं. दोन्ही चळवळी एकमेकांना पुरक आहेत. हे त्यांच विश्लेषण आज किती महत्वाचं ठरतंय.

उदा. महात्माजींनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर सूतकताईची अट घातली, पण काँग्रेसच्या प्रत्येक क्रियाशील कार्यकर्त्यानं आपल्या घरात एक तरी दलित नोकर किंवा पाहुणा ठेवावा असा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात कधीच मंजूर होऊ शकला नाही. असं असलं तरी गांधी आणि आंबेडकरांच्या चळवळी एका व्यापक परिवर्तनाच्या चळवळीच्या भाग होत्या. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रस्थापनेमधे त्यांची महत्त्वाची भूमिका होती हे त्यांनी आग्रहानं मांडलं आहे.

गांधीवादी जीवन जगणाऱ्या नलिनीताई

उच्च जातीवर्गामधे जन्माला आलेल्या नलिनीताईंनी आयुष्याची ५० वर्ष स्वत:ची बुद्धी आणि लेखणी दलित बहुजनांची वकिली करण्यासाठी वापरली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्त राहिल्या. वक्तशीरपणा आणि साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता.

त्यांचा साधेपणा निव्वळ पोशाखात नव्हता तर प्रत्येक गोष्टीत होता. उदा. सुखवस्तू कुटुंबात राहूनही त्यांनी शेवटपर्यंत कायम बस आणि ट्रेनने प्रवास केला. साधा आहार, साधी रहाणी, त्यांचे साधेपण कधीच पोशाखी नव्हते. अशा या खऱ्या अर्थाने गांधीवादी जीवन जगणाऱ्या नलिनीताई होत्या.

हेही वाचा: 

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला? 

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत 

काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान 

जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?