सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

११ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.

दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा. २१ एप्रिल १९१३ मधे मुंबईच्या ‘ऑलेंपिया थिएटर’मधे हा सिनेमा प्रदर्शित झाला. फाळके यांच्या आधीही सिनेमा निर्मितीचे प्रयत्न झाले होते. त्यातले दोन प्रयत्न महत्त्वाचे मानले जातात. मुंबईत ल्यूमिए बंधूंचे मूकपट पाहून सावेदादा म्हणजेच हरिश्‍चंद्र भाटवडेकर यांनी हॅगिंग गार्डनमधल्या पुंडलिकदादा आणि कृष्णा न्हावी यांच्या कुस्तीचं चित्रीकरण केलं. त्यासाठी लंडनहून कॅमेरा मागवला. फिल्मवर प्रक्रियासुद्धा परदेशातच केली. १८९९ च्या दरम्यान ही फिल्म दाखवली.

त्यानंतर दादासाहेब तोरणे यांनी ‘भक्‍त पुंडलिक’ या नाटकाचं चित्रीकरण केलं होतं. त्यासाठी कॅमेरा, फिल्मवरची प्रक्रिया परदेशातूनच करून घेतली. दादासाहेब फाळके यांनी लंडनला जाऊन सिनेमा निर्मितीचा अभ्यास केला. कॅमेरा आणि फिल्म आयात केली. सिनेमासाठी स्टुडिओची रचना स्वतः केली. त्यामुळे ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरतो. फाळके जे. जे. स्कूलमधे शिकले होते. काही वर्षे त्यांनी फोटोग्राफी, छपाईचा व्यवसाय केला होता.

‘सैरंध्री’ भारतीय बनावटीचा पहिला सिनेमा

बाबुराव पेंटर यांचा सिनेमाचा प्रवास विलक्षण आणि वेगळा ठरतो. बाबुराव हे सामान्य सुतार कुटुंबात जन्माला आले होते. त्यांना अर्ध्यातूनच शाळेतलं शिक्षण सोडून द्यावं लागलं. ते उत्तम चित्रकार होते. फोटोग्राफीची कला त्यांना अवगत होती; पण फाळके यांच्याप्रमाणे चित्रकला किंवा चित्रपटकला यांचं कोणतंही रीतसर प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. तरीही त्यांनी स्वतः कॅमेरा तयार केला. चित्रीकरण, संकलनाचं तंत्र अवगत केलं. त्यामुळेच त्यांचा ‘सैरंध्री’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला सिनेमा ठरतो.

११ फेब्रुवारी १९२० या दिवशी पुण्यातल्या आर्यन सिनेमागृहात लोकमान्य टिळकांनी बाबुराव पेंटर यांचा सत्कार केला. त्यापूर्वीच सिनेमासंबंधी ‘केसरी’मधे ‘सैरंध्री’बद्दल बातमी आली. त्यामधे ‘सैरंध्री’मधल्या कलाकारांच्या वेशभूषा, कलावंत आणि निर्मितीचा श्रेष्ठ दर्जा याचं कौतुक केलं होतं. ‘सैरंध्री’ हा सिनेमा युरोप, अमेरिकन सिनेमांच्या तोडीचा असल्याचं ‘केसरी’नं म्हटलं होतं. ‘सैरंध्री’ नंतर मुंबईत मॅजेस्टिक थिएटरमधे प्रदर्शित झाला. पुणेकरांप्रमाणेच मुंबईकरांनीही हा सिनेमा डोक्यावर घेतला. सिनेमातला किचकवधाचा प्रसंग वादग्रस्त ठरला.

भीम किचकाचे मुंडके पिरगळून धडावेगळे करतो. रक्‍ताच्या चिळकांड्या उडतात, असा हा प्रसंग पाहून प्रेक्षक मोठ्याने किंचाळत. घाबरून पळू लागत. इतक्या प्रभावीपणाने हा प्रसंग चित्रित केला गेला होता. मुंबईच्या गवर्नरने सिनेमाच्या चित्रीकरणासाठी माणूस मारला अशा समजातून बाबुराव पेंटर यांना नोटीस बजावली होती. किचकाची भूमिका झुंजारराव पवार यांनी केली होती. ते जिवंत असल्याचे पुराव्याने दाखवावे लागले होते. या घटनेनंतर सिनेमासाठी सेन्सॉर बोर्ड लागू करण्यात आलं.

हेही वाचा: कलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य?

कलाकारांना अभिनयाचं कसलंच ज्ञान नव्हतं

फाळके यांच्या ‘राजा हरिश्‍चंद्र’ सिनेमामधे तारामतीची भूमिका कृष्णा नावाच्या मुलाने केली होती. प्रयत्न करूनही फाळके यांना स्त्री कलाकार मिळाली नाही. मात्र, आपल्या सिनेमात स्त्री भूमिका स्त्री कलावंतांनीच केली पाहिजे, असा आग्रह बाबुराव यांचा होता. गुलाबबाई, अनुसया या कलावंत कुटुंबातल्या महिलांना त्यांनी अभिनेत्री म्हणून तयार केलं. मूकपटात सरदार बाळासाहेब यादव यांनी भीमाची आणि झुंजारराव पवार यांनी किचकाची भूमिका केली.

बाळासाहेब यादव हे बावडेकर आखाड्यातले मल्ल होते. ते वकील होते; पण कायद्याचे पदवीधर नव्हते. आपल्या अधिकारात शाहू महाराजांनी त्यांना वकिलीची सनद दिली होती. बलदंड शरीराचे बाळासाहेब अखंड सुपारी तोंडात टाकून दातांनी काडकाड फोडायचे. कासांडीने दूध पीत. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या. किचकाची भूमिका करणारे झुंजारराव पवार हे त्यावेळी दत्तोबा पवार म्हणून ओळखले जायचे. शनिवार पेठेत त्यांचं घर होतं.

केशवराव भोसले यांच्याबरोबर नाटकातून काम करणारे रावजी म्हसकर आणि नानासाहेब सरपोतदार यांचा अपवाद वगळता बहुतेक कलाकारांना अभिनयाचं कसलंच ज्ञान नव्हतं. बाबुराव पेंढारकर, केशवराव धायबर, किशाबापू बकरे हे त्यातले काही इतर कलावंत.

इंग्रजी मूकपटांनी सिनेमा काढण्याचं बीज रोवलं

‘सैरंध्री’ हा सिनेमा १९२० मधे प्रदर्शित झाला असला, तरी सिनेमा समजून घेण्याचा बाबुरावांचा प्रवास किमान दशकभर तरी सुरू असावा, असं अभ्यासातून लक्षात येतं. मुळात चित्रपटृचं स्वप्न बाबुरावांच्या मनात रुजलं ते त्यांचे मावस बंधू आनंदराव पेंटर यांच्यामुळे. आनंदराव हे अवलिया कलावंत होते. आनंदराव आणि बाबुराव यांची घरं जवळजवळ होती. त्यामुळे ते लहानपणापासून एकत्र वाढले. त्यांच्यात अत्यंत जीवाभावाचं नातं होतं.

श्रीपतराव काकडे हे त्यांचे आणखी एक मित्र. त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं. या दुकानाच्या माडीवर बाबुराव आणि आनंदराव चित्र काढायचे. केशवराव भोसले हे त्यावेळी नट म्हणून महाराष्ट्र गाजवत होते. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वतःची ललित कलादर्श मंडळी ही संस्था स्थापन केली. त्यांच्या नाटकाचे पडदे रंगवण्याच्या निमित्ताने आनंदराव आणि बाबुराव मुंबईला गेले. याच दरम्यान त्यांनी काही इंग्रजी मूकपट पाहिले. सिनेमा काढण्याच्या कल्पनेचं बीज तिथंच त्यांच्या मनात रुजलं.

मिस्त्री आडनाव ते पेंटर बंधू 

केशवरावांच्या ओळखीमुळे वाशीकर यांच्याशी भागीदारीत त्यांनी डेक्‍कन सिनेमा सुरू केला. शिवाजी थिएटरचं सिनेमागृहात रूपांतर केलं. केशवरावांच्या संस्थेतच विष्णुपंत दामले आनंदरावांच्या संपर्कात आले. डेक्‍कन सिनेमागृहाचं काम सुरू असतानाच, दामले, फत्तेलाल मदतीला म्हणून सहवासात आले. मतभेदामुळे पेंटर बंधूंनी भागीदारी सोडली. नंतर त्यांना केशवराव यांच्यामुळे ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचे पडदे रंगवण्याचं काम मिळालं. त्यासाठी ते मुंबईला गेले. त्याचदरम्यान त्यांनी फाळके यांचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ सिनेमा पाहिला.

सिनेमा पाहिल्यावर आनंदरावांच्या मनात पुन्हा सिनेमाचा विचार सुरू झाला. नाटकाचे पडदे रंगवण्याच्या कामामुळे दोघांचं मोठं नाव झालं. मिस्त्री हे त्यांचं मूळ नाव मागे पडून ते पेंटर म्हणूनच ओळखले जाऊ लागले. श्रीपतराव काकडे यांच्या मध्यस्थीने रूईकर सावकार यांच्याशी भागीदारी केली. पेंटर बंधूंनी महाराष्ट्र सिनेमा सुरू केला. शनिवार पेठेतल्या या जागेत सध्या पोस्ट ऑफिस आहे. सिनेमा लोकप्रिय करण्यासाठी ते अनेक क्‍लृप्त्यांचा वापर करायचे. सिनेमाचे भव्य पोस्टर्स तयार करत. अनेक परदेशी मूकपट महाराष्ट्र सिनेमामधे दाखवले जात. फाळके यांचे सुरुवातीचे सिनेमाही महाराष्ट्र सिनेमामधे प्रदर्शित झाले. दामले, फत्तेलाल, लिमये असे काही तरुण त्यांच्या मदतीला होते.

हेही वाचा: नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

बाबुरावांचे बंधू आनंदरावांचा अचानक मृत्यू

महाराष्ट्र सिनेमाचा शुभारंभ राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते झाला. सिनेमाची सजावट पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. सिनेमा लोक अंधारात पाहणार, मग त्यासाठी थिएटरमधे इतकी सजावट कशाला, असा गमतीचा प्रश्‍न त्यांनी पेंटरांना विचारला होता. शाहू महाराजांच्या मिश्कील स्वभावावर आणि पेंटर बंधूंच्या उत्साहावर प्रकाश टाकणारा हा प्रसंग आहे. लोकांना सिनेमा दाखवत असतानाच सिनेमा समजून घेण्याचा प्रयत्न पेंटर बंधू करत होते.

प्रोजेक्टरमधून सिनेमा कसा पडद्यावर दिसतो, हे त्यांना कळलं होतं. मधल्या काळात दादासाहेब फाळके नाशिकला रहायला गेले. पेंटर बंधू त्यांना भेटले. मात्र, कॅमेरा पाहणं, सिनेमा समजून घेण्याच्या त्यांच्या इच्छेला फाळकेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. परत आल्यानंतर त्यांनी कॅमेरा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आनंदराव त्यात जास्त उत्साही होते. त्यांनी मुंबईहून एक जुना नादुरुस्त कॅमेरा मिळवला. तो दुरुस्त करून चित्रीकरणाचे प्रयत्न त्यांनी केले. ते पहिल्या महायुद्धाचे दिवस होते.

बाहेरच्या देशातून कच्ची फिल्म, कॅमेरा मागवणं हे प्रचंड कटकटीचं आणि वेळखाऊ होतं. यातूनच आनंदराव स्वतः कॅमेरा तयार करण्याच्या खटपटीला लागले. त्यासाठी काही सुटे भाग त्यांनी तयार करून घेतले. दरम्यानच्या काळातच महायुद्धामुळे युवराज राजाराम आणि शिवाजी हे शिक्षण सोडून लंडनहून भारतात परतले. त्यांच्या स्वागताची कमान उभारण्याचं काम पेंटर बंधूंकडे होतं. कमान उभारण्याचं काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसात भिजल्याने आनंदराव आजारी पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

‘सीता स्वयंवर’ ते ‘सैरंध्री’

आनंदरावांचा मृत्यू हा बाबुरावांसाठी मोठा धक्‍का होता. असं म्हटलं जातं की, आनंदरावांना सिनेमा काढण्याचं वचन बाबुरावांनी दिलं होतं. बाबुराव त्या प्रयत्नाला लागले. कॅमेरा तयार करणं हा एक भाग झाला. पण भांडवल उभारणीपासून चित्रीकरणापर्यंतची अनेक आव्हानं त्यांना पेलायची होती. महाराष्ट्र सिनेमाच्या भागीदारीतून ते बाहेर पडले होते. या काळात  ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तानीबाई कागलकर या कलावंत महिलेनं दहा हजार रुपयांची मदत दिली.

१ डिसेंबर १९१७ रोजी पॅलेस थिएटरमधे आनंदरावांच्या फोटोचं पूजन करून महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना झाली. नंतर डेक्‍कन सिनेमा सुरू केला होता त्याच शिवाजी थिएटरमधे सिनेमा निर्मितीचं काम सुरू झालं. सुरवातीला ‘सीता स्वयंवर’ हे कथानक सिनेमासाठी निवडण्यात आलं. नंतर ते रद्द करून ‘सैरंध्री’ हे महाभारतातलं किचकवधाचं कथानक चित्रपटासाठी निश्‍चित केलं.

त्यासाठी बाबुरावांनी सिनेमातल्या अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. दोन प्रसंगांच्या मधे संवाद लेखनाच्या कामात नानासाहेब सरपोतदार यांची मदत मिळाली. नाटकाच्या तालमीप्रमाणे चित्रपटाच्या तालमी घेतल्या. रावजी म्हसकर आणि नानासाहेब सरपोतदार या दोघांना नाटकातून काम करण्याचा अनुभव होता. त्यांचा उपयोग बाबुरावांना झाला.

‘सैरंध्री’ सिनेमाची निर्मिती वेगळा प्रयोग

सिनेमाचं चित्रीकरण दिवसा चालायचं. स्टुडिओचं वरचं छत काढून नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा उपयोग करण्यात आला. रात्री फिल्म धुण्याचं काम चालायचं. ड्रम इत्यादी साधनं बाबुरावांनी आपल्या कल्पकतेनं तयार केली होती. तंत्रज्ञानाच्या बाबतीत दामले, फत्तेलाल यासारखे तरुण मदतीला होते. व्यवस्थापक म्हणून बाबा गजबर, परशुरामबापू सुतार, वेशभूषेसाठी श्रीपतराव काकडे अशा असंख्य लोकांची मदत बाबुरावांना झाली. सिनेमाची तयारी सुरू असतानाच केशवराव भोसले येऊन गेले.

बाबुरावांनी उभारलेले सेटस्, चित्रीकरणाची तयारी पाहून ते भारावून गेले. आनंदरावांचं स्वप्न तू साकार केलंस, असे उद‍्गार त्यांनी काढले. ‘सैरंध्री’ सिनेमाची निर्मिती हा एक वेगळा प्रयोग होता. बाबुराव स्वतः शिकत होते. शिकता शिकताच इतरांना शिकवत होते. महाराष्ट्र फिल्म कंपनीने इतिहास घडविला. त्यांचा ‘सैरंध्री’ हा पहिला टप्पा होता. १९२० ते १९३० हा महाराष्ट्र फिल्म कंपनीचा वैभवाचा काळ होता. १९३२ मधे ही फिल्म कंपनी बंद पडली.

महाराष्ट्र फिल्म कंपनीचे सिनेमे गाजले

‘वत्सलाहरण’च्या दरम्यान बाबुराव पेंढारकर यांच्यामुळे शांताराम वणकुद्रे हा तरुण पोरगा महाराष्ट्र फिल्म कंपनीत आला. तो बाबुरावांचा उजवा हात बनला. बाबुरावांनी नंतरचे सिनेमा बेल अँड हॉवेल कॅमेर्‍याने चित्रित केले. त्यासाठी बारा हजार रुपये शंकरराव नेसरीकर यांनी दिले. ते महाराष्ट्र फिल्मचे तिसरे भागीदार झाले. कंपनीतल्या अंतर्गत वादातून व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल बाहेर पडले. १ जून १९२९ ला त्यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३० मधे बाबुराव महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमधे तानीबाई कागलकर यांचं निधन झालं. कंपनीचे मागे राहिलेले एकमेव भागीदार शंकराराव नेसरीकर यांनी १९३२ मधे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद केली.

कंपनीतल्या २० मूकपटांचं दिग्दर्शन बाबुरावांनी केलं. त्यातल्या ‘सिंहगड’, ‘सावकारी पाश’ मैलाचे दगड मानले जातात. ‘सिंहगड’ हा देशातला पहिला ऐतिहासिक सिनेमा. या सिनेमापासून करमणूक कर सुरू झाला. तर ‘सावकारी पाश’ हा देशातला पहिला सामाजिक सिनेमा ठरतो. ‘सिंहगड’च्या चित्रीकरणादरम्यान लागलेल्या आगीत ‘सैरंध्री’ सिनेमा भस्मसात झाला. १९२४ मधला ‘कल्याण खजिना’ हा बाबुरावांचा आणखी एक महत्त्वाचा मूकपट. इंडियन डग्लस मा. विठ्ठल आणि झुबेदा यांचा हा पहिला सिनेमा.

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

९० नंतर कोल्हापूर सिनेमा निर्मितीचं केंद्र

देशातला पहिला बोलपट ‘आलमआरा’ सिनेमातले विठ्ठल आणि झुबेदा नायक-नायिका. ‘नेताजी पालकर’ हा व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. ही संधी त्यांना बाबुरावांमुळेच मिळाली. महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडल्यानंतरही बाबुरावांची सिनेमा निर्मिती सुरूच राहिली. मूकपटांबरोबरच काही बोलपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं. चित्रकलेबरोबरच शिल्पकलेचं कामही त्यांनी केलं. १६ जानेवारी १९५४ मधे त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या एकूण सिनेमांची संख्या ३० हून अधिक होते. प्रभात फिल्म कंपनी आणि तिचे भागीदार पुण्याला स्थलांतरित झाले. बाबुरावांच्या हयातीतच छत्रपती राजाराम महाराज आणि अक्‍कासाहेब महाराज यांच्या प्रेरणेतून अनुक्रमे कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन या स्टुडिओंची उभारणी झाली. त्या माध्यमातून सिनेमांची निर्मिती सुरूच राहिली. १९९० पर्यंत कोल्हापूर हे मराठी सिनेमा निर्मितीचं केंद्र होतं.

कलाकारांच्या यशाचं श्रेय ‘सैरंध्री’ सिनेमाला

बाबुरावांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतल्या कलाकारांनी नंतरच्या काळात स्वतंत्रपणे नावलौकिक मिळवला. व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, सरदार बाळासाहेब यादव, झुंजारराव पवार यांचा त्यामधे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कोल्हापूरच्या फिल्म स्कूलमधून इतर असंख्य दिग्दर्शक, कलावंत, अभिनेते तयार झाले. मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण सरनाईक ही अशी किती तरी नावं सांगता येतील.

सगळ्या मोठ्या कलाकारांच्या यशाचं श्रेय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाबुरावांच्या ‘सैरंध्री’ सिनेमाला जातं. भारतीय सिनेमा सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचं नाव देशपातळीवर घेतलं जातं. त्यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरला सर्वोच्च पुरस्कार दिला जातो; पण फाळके यांच्या कार्याची तुलना करता बाबुरावांचे कार्य कुठेच कमी दिसत नाही. काही बाबतीत तर ते अधिक उजवं ठरतं.

हेही वाचा: 

बोडो शांतता कराराने आता तरी आसाम शांत होणार का?

वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास

वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं

दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार

(साभार - दैनिक पुढारी)