मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
झारखंडमधे आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. एकूण ८१ जागांसाठी पाच टप्प्यांत निवडणूक होतेय. आता दोन टप्प्यांतलं मतदान शिल्लक आहे. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान झालं. यामधे केवळ १५ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. महत्त्वाचं म्हणजे पाच जागांवर एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही.
दुसऱ्या टप्प्यात २० जागांसाठी सात डिसेंबरला मतदान झालं. या सगळ्या जागांवर एकूण २६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधे केवळ २९ महिलांचा समावेश होता. पहिल्या दोन टप्प्यांत एकूण ३३ जागांसाठी सगळेच राजकीय पक्ष आणि अपक्ष यांच्यातर्फे एकूण ४४९ उमेदवारांमधे केवळ ४४ महिलांचा समावेश होता. म्हणजेच या दोन टप्प्यांत केवळ दहा टक्के महिलाच निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
झारखंड विधानसभा निवडणुकीत सगळ्या ८१ जागांसाठी भाजप, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, राष्ट्रीय जनता दल आणि ऑल झारखंड स्टुडंट युनियन या प्रमुख पक्षांनी ३९ महिलांना उमेदवारी दिलीय. या पक्षांनी आपण लढत असलेल्या एकुण उमेदवारांच्या तुलनेत केवळ १२ टक्के महिलांना तिकीट दिलंय.
जवळपास सगळेच राजकीय पक्ष महिलांच्या सन्मानाची भाषा करतात. पण तिकीट द्यायची वेळ आली की कारणं द्यायला लागतात. ‘आपल्या पक्षात महिलांचा खूप सन्मान केला जातो. त्यांना राजकीय संधी देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. पण निवडणुकीच्या रिंगणात जिंकून येण्याचं मेरीट हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या उमेदवार जिंकून येऊ शकतात, त्यांनाच तिकीट देतो. इच्छा असूनही आपल्याला तिकीट देता येत नाही.’ असा लोकप्रिय दावा जवळपास सगळ्याच पक्षांकडून केला जातो. हाच दावा झारखंडमधल्या राजकीय पक्षांकडूनही केला जातोय.
हेही वाचाः महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!
भाजपने ८१ पैकी ७९ जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. यामधे केवळ सात महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. म्हणजेच भाजपने आपण लढवत असलेल्या एकूण जागांच्या तुलनेत केवळ ८.८ टक्के महिलांना तिकीट दिलंय. सात जागांवर निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने तर एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही.
मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वातल्या भाजप सरकारचा मित्रपक्ष आजसूने मात्र भाजपच्या तुलनेत अधिक महिलांना उमेदवारी दिलीय. स्वबळावर ५३ जागा लढवत असलेल्या आजसूने ९ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. म्हणजेच महिलांना तिकीट देण्याचं हे प्रमाण १७ टक्के एवढं आहे.
आजसूनंतर महिलांना तिकीट देण्यात काँग्रेसचा नंबर लागतो. झारखंड मुक्ति मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबतच्या आघाडीत काँग्रेसने आपल्या वाट्याच्या ३१ जागांपैकी पाच जागांवर महिलांना तिकीट दिलंय. हे प्रमाण एकूण उमेदवारांच्या १६ टक्के आहे.
सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवत असलेल्या झारखंड विकास मोर्चाने १२ महिलांना उमेदवारी दिलीय. हे प्रमाण १५ टक्के एवढं आहे. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत आघाडी केलीय. यामधे जेएमएमने ४३ जागांवर आपले उमेदवार उभे करताना केवळ सहा महिलांना उमेदवारी दिलीय. हे प्रमाण १४ टक्के एवढं आहे.
१५ वर्षाच्या झारखंडमधे जशाजशा निवडणुका होताहेत त्यामधे महिला उमेदवारांची संख्या वाढताना दिसतेय. झारखंडच्या निर्मितीनंतर २००५ मधे पहिल्या विधानसभेची निवडणूक झाली. पहिल्याच निवडणुकीत पाच महिला विधानसभेत पोचल्या. यानंतर २००९ मधे वेगवेगळ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढवत ८ महिला विधानसभेवर गेल्या.
गेल्यावेळी २०१४ मधे ही संख्या एकने वाढून नऊवर गेलीय. महत्त्वाचं म्हणजे गेल्या पाच वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकीतही दोन महिला उमेदवारांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मावळत्या विधानसभेत महिला उमेदवारांची संख्या ११ वर गेलीय.
२८८ जागा असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या केवळ २४ महिला आमदार आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना विधानसभेत जाण्याची संधी मिळालीय. एकूण संख्येच्या तुलनेत महिलांची ही टक्केवारी ८.३ टक्के एवढी आहे. गेल्यावर्षी ती ७.३ टक्के एवढी होती.
हेही वाचाः कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?
गेल्यावेळी दुमका मतदारसंघातून जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांचा पराभव करून लुईस मरांडी विधानसभेत गेल्या. दुसरीकडे सिल्ली मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत आजसूचे प्रमुख सुदेश महतो यांना जेएमएमच्या सीमा देवी यांच्याकडून मात खावी लागली. मरांडी आणि देवी या दोघीही पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मंत्री नीरा यादव यावेळीही भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमुळे पुन्हा एकदा मोदी लाटेचा जोर दिसला. महिलांना आपल्याकडे वळवण्यात यश आल्यामुळेच नितीश कुमार यांनाही बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा यश मिळालं. महिलांचा मतदानातला वाढता टक्का बघून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी वेगवेगळी आश्वासनं देतात. झारखंडमधे भाजपकडून महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतेय.
झारखंडमधे दुसऱ्या टप्प्यात २० जागांवर मतदान झालं. यापैकी ९ जागा अशा आहेत, जिथे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यामधे मझगांव, मनोहरपूर, चक्रधरपूर, घाटशिला, पोटका, खरसावां, चाईबासा, खुंटी आणि सिमडेगा या जागांचा समावेश आहे. इथे महिला मतदाराच उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत.
हेही वाचाः
झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील उणे-अधिक
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?