आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

१० जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.

रिंगण या फेसबूक पेजचा सोशल मीडिया सांभाळायचं काम दिलं होतं सचिन परबांनी. त्यावेळी विठ्ठलाचा काहीतरी वीडिओ करायचं डोक्यात होतं. मी आणि गुरुप्रसाद जाधव दोघंही मिळून वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स एकमेकांना सांगत होतो. पण त्यातली एखादीतरी कॉन्सेप्ट पुढे घेवून जावी, असं अजिबात वाटत नव्हतं.

त्या दिवशी अनायसे दोघांचीही सेकंड शिफ्ट होती. तेव्हा आम्ही दोघंही एबीपी माझात होतो. एबीपी माझाची सेकंड शिफ्ट म्हणजे ४ ते १२. रात्री दहानंतर फारसं काम नसायचं.

अशी सुचली कन्सेप्ट

त्या दिवशी रात्री एकत्र जेवायला गेलो कॅन्टीनमधे. कॅन्टीनमधे जेवताना विठ्ठलाच्या या वीडिओची कल्पना डोक्यात आली. विठ्ठल उभा करायचा लोकांत आणि त्याला मुंबईभर फिरवायचा, एवढंच डोक्यात होतं. त्यानंतर जे काही मिळेल, ते बघू. अखेर कॉन्सेप्ट मिळाली होती. आम्ही ती सचिन परबांना सांगितली. दादरच्या कोणत्यातरी हॉटेलमधे बसून आम्ही त्यांना ही लाईन सांगितल्याचं आठवतंय. ते करु नका असं शक्यतो कधी म्हणत नाहीत. यावेळीही तसं काही म्हणाले नाहीत. आम्ही करायला लागलो.

विठ्ठल मुंबईभर फिरवायचा, एवढंच डोक्यात होतं. विठ्ठल कुणाला बनवायचं, शूट कोण करणार, वगैरे काही ठरलं नव्हतं. पुन्हा एका दिवशी असंच रात्री कॅन्टीनमधे बसून त्या वीडिओचा स्क्रीनप्ले लिहून काढला. पहिली फ्रेम आणि शेवटची फ्रेम हे नक्की झालं. मधे काय दाखवणार, हे मिळणाऱ्या शॉट्सवर अवलंबून होतं. आता वीडिओ करायचं ठरलं. पण विठ्ठल कोण होणार?

हेही वाचाः जगातल्या पहिल्या संत कान्होपात्रा स्मारकाची संघर्षकथा

वायरल विठ्ठलाचा शोध

मकरंद सावंत. माझ्या आणि गुरुच्या, आम्हा दोघांच्या डोक्यात दुसरं नाव नव्हतंच. ठरलं तर. लगेच मकरंदला फोन लावला. त्याला साधारण कल्पना दिली. तो नाही म्हणेल असं वाटलं होतं. कारण याआधी आम्ही एका शॉर्टफिल्मसाठी आमच्या अशा एका अभिनय करणाऱ्या मित्राला तोंड काळं करुन पूर्ण मुंबईभर फिरवलं होतं. इथेही तेच करायचं होतं.

फरक फक्त एवढा होता, की इथे तोंड काळं करण्याऐवजी तोंड काळं होण्याची भीती जास्त होती. पण मकरंदला कल्पना आवडली. प्रयोग करायला तो नेहमीच तयार असतो. आम्ही सुरु केलं. आता प्रश्न होता, की शूट कोण करणार?

मला कॅमेरा येतो. पण या वीडिओसाठी दुसरं कुणीतरी माझ्यापेक्षा चांगला माणूस वीडिओ करायला हवा होता. कॉलेजमधला मित्र दर्शन आंब्रे सारखं विचारत असायचा. काय करतोय का नवीन. काहीतरी करुया, असं सारखं सांगायचाही. यावेळी त्याला सांगितलं नसतं, तर चाललंच नसतं. दर्शन तयारच होता.

पांडुरंगाच्या मेकअपची गोष्ट

लगेच आम्ही शूटचा दिवस ठरवला. त्याआधी गुरुने आणि मकरंदने भाड्याने विठ्ठलाचा पोशाखही घेवून ठेवला. त्या भाड्याने घेतलेल्या पोशाखाचं काय झालं, तेही पुढे सांगतोच. वॉट्सअपवर ग्रुप तयार झाला. दुसऱ्या दिवशी शूट आहे असं ठरलं. भल्या पहाटे लवकरच ५ वाजता काम करायचं ठरलं. त्याआधी रात्री सगळे उत्साहात होते. ग्रुपवर चॅटिंग सुरु होती. अशात रात्री साडेदहा वाजले असतील. त्यावेळी अचानक असं ठरलं की पहाटेऐवजी आताच निघुया शूटला. सगळेच तयार झाले.

दर्शन त्याची गाडी घेवून माझ्या घरी आला. आम्ही दोघं परळला गुरुकडे गेलो. तिथून वडाळ्याला मकरंदकडे. एव्हाना १२ वाजून गेले होते. विचार करा, मकरंदच्या घरी सगळे झोपलेत. तो आम्हाला त्याच्या खोलीत घेवून गेला. दार लावलं. पांडुरंगाचे कपडे घालून भाई तयार झाला. मग त्याला गुरुने लाली-पावडर केलं.

सगळ्यात शेवटी पांडुरंगाचा ट्रेडमार्क असलेला टीळा लावला. त्यासाठी चित्रविचित्र उपदव्यापही गुरु आणि मॅकने केले. फायनली दीड-दोन वाजता अखेर अवर पांडुरंग गॉट रेडी. यानंतरचा प्रसंग सगळ्यात जास्त भारी होता. मकरंदने त्याच्या अभिनयाचे तारे कुठे आणि कसे तोडावेत, याचा भयंकर किस्सा पुढे घडला.

हेही वाचाः संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?

पांडुरंग रूममधून बाहेर आला आणि

आमचा तयार झालेला पांडुरंग रुममधून बाहेर आला. रुमची लाईट त्याने बंद केली. हॉलमधे मकरंदची आई आणि बाबा साखरझोपेत होते. त्याने घराच्या मुख्य दरवाजाचं दार उघडलं. मी, गुरु आणि दर्शन त्याच्या दारात उभे. मकरंद आईला दरवाजा बंद करण्यासाठी उठवायला गेला. आईच्या हाताला हात लावून जागं करत मकरंदने धीरगंभीर आवाजात हाक दिली.

आई. उठतेस ना. दरवाजा बंद करतेस. झोपेतून डोळे उघडल्यानंतर साक्षात पांडुरंग दरवाजा बंद करायला सांगतोय, हे पाहून त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल, हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही. हसू आवरत नव्हतं. पण त्यातही मकरंदने चल निघतो आई, दरवाजा बंद करुन झोप हं, असं पुन्हा सांगितलं. तोपर्यंत आम्ही जिन्याच्या दिशेने निघालो. पण त्याची आई जी काही दचकून उठली होती, ते दिवसभर आठवून आठवून आम्ही संपूर्ण शूटमधे वेड्यासारखे हसत होतो. पण खरी परीक्षा इथून पुढे सुरु झाली.

असं झालं शुटिंग

सगळ्यात आधी आम्ही या वीडिओचा अखेरचा शॉट शूट केला. त्यानंतर त्याला वरळी सीफेसवर वाट्टेल तिथे उभा केला. उभा आडवा शूट केला. पोलिसांची भीती वाटत होती. पण पांडुरंग खऱ्या अर्थानं दिवसभर सोबत होता. कुठेच काही अडथळ आला नाही. कॉमन मॅनजवळ आम्ही मॅकचा एक शॉट शूट केला. कॉमन मॅन शेजारी कॉमन मॅनचा देवही उभा आहे. व्वा. काय फ्रेम आहे. आम्ही आमच्याच प्रेमात पडत होतो. लाजवाब.

शूट केलेला शॉट प्रिव्हू करत होतो. तितक्यात पहाटे साडेतीन, चारच्या सुमारास एक पोरगा आला. तो सीफेसला धावत होता. एक्टिंग करण्यासाठी मुंबईत आलोय, असं सांगत होता. काही मिळेल का, कुठे काम मिळेल, कसं काम शोधायचं, वगैरे डोकं खात होता. गुरुने त्याला कामाला लावलं. वीडिओमधे पांडुरंगाला नमस्कार करुन जाणारा मुलगा साक्षात पांडुरंगानेच आमच्या मदतीसाठी पाठवला होता.

तीन वर्ष होवून गेली आहेत, कुठं असेल तो मुलगा. एक्टिंगचा नाद सोडला असावा कदाचित त्याने. फुकट काम करुन घेतल्यावर कोण कशाला एक्टिंग करतो. पण त्याने दिलेला शॉट वन टेक ओके होता. मज्जा आली.

हेही वाचाः साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

योगायोगाने जुळून आलेले शॉट्स

त्यानंतर एकापेक्षा एक फ्रेम ग्रेट शूट करत आम्ही स्क्रीनप्ले फॉलो करत गेलो. मग लोक मकरंदचे फोटो काढण्यात जास्त दंग आहेत, असं दिसायला लागलं. मग फोटो काढणाऱ्या लोकांनाच आम्ही शूट केलं. हे सगळं लोकांपासून लपून, टेली लेन्स लावून, गाडीत गुपचूप बसून सगळं शूट केलं जात होतं. यातल्या दोन, तीन गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या. यातले दोन-तीन शॉट्स हे योगायोगानं जुळून आलेत.

नंबर १: एक माणूस मकरंदला हार घालायला येतो. मकरंदही त्याचा हार अदबीनं स्वीकारतो. हे योगायोगानं घडलं होतं.

नंबर २: चर्चगेट स्टेशनच्या बाहेर शूट सुरु आहे. मकरंद आमच्यापासून बराच लांब उभाय. अशात लोकल आल्यानंतर येणारी गर्दी मकरंदला पार करुन पुढे निघून जातेय स्वतःच्या धुंदीत. अशात स्वतःच्या जेवणाची भ्रांत असणारा एकजण मकरंदला चहा आणून देतो. भाई व्वा. कसलं जबरी.

हेही वाचाः आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं

नंबर ३: कीर्ती कॉलेजच्या पुढे गेल्यावर किनारा लागतो. तिथे किनाऱ्यावर आम्ही वीडिओचे पहिले शॉट्स शूट केले. तिथे एक माणूस असाच फिरत होता. आमचं शूट झालं होतं. त्यावेळी तो माणूस मकरंदकडे गेला. मकरंदचा हात त्याने स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतला. आयला हे कसलं भारी आहे. दर्शन तयार नव्हता. त्याला रोल कर. रोल कर. म्हणत धावपळीत जो काही सेकंदांचा शॉट मिळाला, त्याने वीडिओला चारचांद लावले होते.

अशा प्रत्येक फ्रेम न् फ्रेमच्या आठवणी सांगता येतील.

शुटिंग झालं पण हाती शॉट्सची माती

शूट संपलं. सगळं फुटेज घेवून घरी आलो. घरी आल्यावर फुटेज पाहत होतो. घोर निराशा. बरेचशे शॉट शेकी होते. अनेक शॉट्सची माती झाली होती. वैतागलो. म्हटलं आता यात काही होणार नाही. अपेक्षांचा चुराडा झाला होता. पण आता एवढे कष्ट घेतलेत. एडिट तर करायला लागणारच होतं.

बसलो. सगळा वीडिओ एडीट केला. मग गुरुला दाखवला. गुरुने माझी पार लाज काढली. पुन्हा सगळा रिएडिट केला. सगळी टाईमलाईन इकडची तिकडे केली. वीडिओ तयार केला. तयार होताना असं ध्यानात आलं की हे जे काही बनलंय, ते निव्वळ ग्रेट झालंय. आईला दाखवायला बोलावलं.

तिला कधी असले वीडिओ वगैरे प्रभावित करत नसतात. पण तिला हे भारी वाटलं असावं. बाबांची पूजा सुरु होती. त्यामुळे ते टाळाटाळ करत होते. आई बाबांच्याही मागे लागली. पूजा सोडा आधी हे बघा म्हणत तीही वीडिओ दाखवायला हट्ट करु लागली. बास्स. काम झालं होतं. माऊली. वीडिओ वायरल है.

आणि माऊली वीडिओ वायरल

हा वीडिओ तीन वर्षांपूर्वीच्या आषाधी एकादशीच्या दिवस सुरु होण्याचा मध्यरात्री १२ वाजता फेसबूक पेज आणि यूट्यूबवर शेड्यूल केला. वीडिओ अपलोड करुन झोपलो. दोन-चार दिवस जाम दगदग झाली होती. उशिरापर्यंत झोपूनच होतो. सकाळी सकाळी सचिन परबांचा फोन आला.

वीडिओ त्यांना आवडला होता. त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधे जबरदस्त झालंय म्हणाले. हायसं वाटलं. म्हटलं गंगेत घोडं न्हालं. पण गोष्ट संपली नव्हती. डोळे पुसत फेसबुक उघडलं, तर वीडिओ जोरदार शेअर झाला होता. वॉट्सअपवर कौतुकाचे ढिगभर मेसेज पडले होते. धम्माल आली होती. कष्टाचं चीज झालं होतं. दरवर्षी वारीला हा वीडिओ पुन्हा ट्रेंड होतो. पुन्हा वीडिओ रिशेअर होते. वायरल केला जातो.

हे सगळं पाहिलं, की थोडं मागचं आठवतं. गलबलून जायला होतं. इतक्या लोकांपर्यंत पोचण्याचा हा वीडिओ एक महत्त्वाचं कारण बनलंय, याचा आनंद आणि अभिमान नेहमीच या वीडिओशी संबंधित असणाऱ्या आम्हा सगळ्यांना कायमच वाटत राहीलं. या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानले पाहिजेत. गुरु ठाकूरने लिहिलेले शब्द, अजय-अतुलने दिलेलं संगीत यामुळे बघ उघडूनी दार हे गाणं या वीडिओमागची मूळ प्रेरणा आहे. त्यांचे मनापासून आभार. त्यांनी हे गाणं केलं नसतं, तर कदाचित हा वीडिओही झाला नसता.

हेही वाचाः 

गांधीजींना तुकोबा भेटले होते

आपापल्या प्रबोधनाची एकादशी

पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

(लेखक हे टीवी जर्नलिस्ट असून विडिओ एडिटर आहेत.)