जगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यंदा मंदीचं सावट

०७ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय.

'ऑटो एक्स्पो २०२०' मधे दोन प्रकारच्या गोष्टी पहायला मिळतील. ६ ते ९ फेब्रुवारीला ऑटो एक्स्पोचा एक भाग दिल्लीच्या प्रगती मैदानावर असेल. यात एक्स्पो संदर्भातलं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या कॉन्फरन्स, उत्पादनांचं लाँचिंग होईल. तसंच जागतिक दर्जाचं तंत्रज्ञानही पहायला मिळेल. तर ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीला होत असलेल्या ग्रेटर नोएडातल्या एक्स्पोमधे फक्त वाहनं लाँच केली जातील.

ऑटो एक्स्पो पाहायचा तर चार्जेस आहेत. त्यासाठी पर तिकीट ३५० ते ७५० रुपये मोजावे लागतील. आजपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळात ऑटो एक्स्पो एंजॉय करता येईल. तसंच लकी ड्रॉमधे कार जिंकण्याची संधीही आहे. त्यामुळे वाहन प्रेमींसाठी ही एक  सुवर्णसंधी म्हणावी लागेल. 

हेही वाचा: ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?

अशी झाली ऑटो एक्स्पोची सुरवात

भारताच्या राजधानी दिल्लीत दर दोन वर्षांनी ऑटो एक्स्पो अर्थात जगभरातल्या वाहनांचा मेळावा भरवला जातो. शांघाय मोटर शो नंतरचा जगातला हा सगळ्यात मोठा व्यापार सोहळा आहे. ऑटो एक्स्पोच्या वेबसाईटवर याबद्दलची माहिती वाचायला मिळते. १९८५ मधे भारतात ऑटो एक्स्पोचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८६ मधे ऑटो एक्स्पो प्रत्यक्षात आला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी याला प्रमोट केलं होतं. त्यावेळेस एकूण ९ दिवस ऑटो एक्स्पो चालला.

२००६ नंतर यात मोठ्या प्रमाणात बदल झाले. कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यापारी गुंतवणुकच्या दृष्टीने याच्याकडे पाहण्यात येऊ लागलं. या मेळाव्याचं आयोजन हे ऑटोमोटीव कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, भारतीय उद्योग संघ आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग या संस्था, संघटनांच्यावतीने करण्यात येतं. २०१२ पर्यंत ऑटो एक्स्पोचं आयोजन दिल्लीच्या प्रगती मैदानावर व्हायचं. २०१४ पासून नोएडाच्या इंडिया एक्स्पो मार्टमधे केलं जातं.

यावेळची थीम थोडी हटके

२०१९ मधे नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात ऑटो एक्सपो आयोजित करण्यात आला होता. ‘टेक्नोवेशन, डिस्कवर इनोवेशन फॉर फ्युचर’ ही गेल्यावेळची थीम होती. यावेळची थीम आहे ‘एक्सपोजिंग द  वर्ल्ड ऑफ मोबॅलिटी’. येणारं जग तांत्रिकदृष्ट्या गतिशील बनवण्याचा संदेश हा एक्स्पो देतो. सुरक्षित, क्लिन, कनेक्ट, डिजाइन केलेलं आणि गोष्टी शेअर करण्यावर कार्यक्रमाचा भर असेल. सर्वांना जोडून घेणं हा याचा उद्देश असल्याचं ऑटो एक्स्पोच्या वेबसाईटवर वाचायला मिळतं.

या एक्स्पोमधे ६ दिवस वेगवेगळ्या विषयांसाठी राखून ठेवण्यात आलेत. ऑटो एक्स्पोचं निमित्त साधत वेगवेगळ्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. समाजाच्या गतिशीलतेचा वेगळा पैलू लोकांपुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. या सहा दिवसांमधे एंटरप्राइझ अर्थात उपक्रम दिवस, सदिच्छा दिवस, कौटुंबिक दिवस, महिला उर्जा दिवस, ग्रीन अर्थात हरित दिवस आणि ड्रायव्हिंग एक्सपीरियनस दिवस असे काही दिवस साजरे होतील. त्यातही वेगवेगळी कल्पकता दिसेल.

हेही वाचा: मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?

ऑटो कंपन्यांचा असाही प्रयत्न

७ फेब्रुवारीपासून ऑटो एक्स्पो हा सर्वसामान्यांसाठी खुला असेल. त्यामुळे निदान वेगवेगळ्या कार पाहण्याचा आनंद घेता येईल. बीबीसी मराठीनं ऑटो एक्स्पोमधल्या कारमधून कंपन्या अत्यानुधिकतेची स्वप्न दाखवत असल्याचं म्हटलंय. त्यात एक्स्पोतल्या अनेक कारचा संदर्भही दिलाय. मारुती सुजुकीनं २०२२ पर्यंत १० लाख गाड्या बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. ‘मिशन ग्रीन मिलियन’ हे त्यांचं स्लोगन आहे. या गाड्या प्रदूषणविरहीत असतील असंही त्यांनी घोषित केलं. त्याचाच एक भाग म्हणून इफ्यूचेरो ही इलेक्ट्रिक एसयूवी आणलीय.

चीनच्या बलाढ्य अशा ग्रीन वॉल मोटर्स या कंपनीनंही भारतात प्रवेश केलाय. त्यांनी इलेक्ट्रिक कार ब्रँडसोबत दोन कॉन्सेप्ट कार्स एच आणि विजन २०२५ या गाड्या आणल्यात. किया मोटर्सने 'कार्निवल' आणली. तर सॉनेट नावाची गाडीही लाँच केली आहे. फॉक्सवॅगन आणि स्कोडा या कंपन्यांनीही टायगुन आणि वीजन इन या कार आणल्या आहेत. हीरो कंपनीची हाय स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटरही यात आहे. तसंच ऑटोही आहेत. त्यामुळे बाजाराच्या मागणीप्रमाणे अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न कंपन्या करताहेत.

महिंद्राची इलेक्ट्रिक कार, टाटाची सिएरा

टाटा मोटर्स, महिंद्रा या कंपन्यांनी या एक्सोतून आपल्या अनेक गाड्यांचं ब्रॅंडिंग केलंय. महिंद्रानं प्रतिक्षेत असलेल्या एक्सयूवी ३०० आणि केयूवी १०० हे दोन इलेक्ट्रिक मॉडेल या निमित्ताने बाजारात आणलेत. केयूवी १०० ही भारतातली  कमी किंमत असलेली इलेक्ट्रिक कार आहे. किंमत ८.२५ लाख आहे. कारला एकदा चार्ज केलं की सिंगल चार्जवर १४७ किलोमीटर पर्यंत धावेल. ५० मिनिटांमधे ही ८० टक्के चार्ज होते. असं कंपनीचं म्हणणं आहे. यासोबत यात एअर कंडीशनर, रिेमोट आणि सेंट्रल लॉक सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सची सात सीटर असलेली एसयूवी ग्रॅवीटस ही कार ऑटो एक्स्पोमधून नव्यानं बाजारात येतेय. २०१९ मधे कार टाटा बजार्ड या नावानं बाजारात आली होती. टाटाची ९० च्या दशकातली सिएरा एसयूवी ही कारही नव्या रुपात पुन्हा भेटीला येते आहे. याचं इंटीरिअर झकास आहे. विशेष म्हणजे या कारला तीन दरवाजे असतील. सोबत टाटानं हॅरियर एसयूवी चं बीएस ६ मॉडेल लॉन्च केलं आहे. याची किंमत १३.६९ लाख आहे.

हेही वाचा: लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?

मंदीच्या सावटामुळे दिग्गज कंपन्या गायब

देशभरात मंदीचं मोठं सावट आहे. ऑटो इंडस्ट्रीत झालेल्या घसरणीच्या बातम्या आकडेवारीसहीत आपण वाचल्या असतील. ऑटो सेक्टरवर त्याचा परिणामही झाला.  वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली. गुंतवणुकीसह कंपन्यांना मिळणारं फंडिंग कमी झालं. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे अनेक दिग्गज कंपन्या या ऑटो एक्स्पोमधे सामील होत नसल्याचं दिसत आहे. तशा बातम्याही येताहेत. काही कार आणि टू वीलर कंपन्यांचा समावेशही असेल.

टीवीएस मोटर, बीएमडब्लू, होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया अशांसारख्या ऑटो सेक्टरमधल्या दिग्गज कंपन्या ऑटो एक्स्पोपासून लांब आहेत. चीनवर कोरोना वायरसचं सावट असलं तर ग्रेट वॉल मोटर्ससारख्या कंपन्या यात  सामील झाल्यात. अनेक गाड्या अशा असतात ज्यांची नावं घेतली तरी लोक लगेच आकर्षित होतात. अशा गाड्यापैकी पोर्श, वॉल्वो, टोयोटो, जीप सारख्या ब्रॅंडनी ऑटो एक्स्पोपासून लांब राहणं पसंत केलंय.

हेही वाचा: 

आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या मागे आहे सुरस कथेचा इतिहास

आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?

दिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल