आयपीएल २०२१ च्या लिलावामागचं लॉजिक काय?

०१ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.

आयपीएल २०२१ लिलाव नुकताच चेन्नईत पार पडला. आयपीएलचा हा काही मेगा लिलाव नव्हता. कारण फक्त २९२ खेळाडूच शॉर्टलिस्ट होते. पण, यंदाचा आयपीएल लिलाव गाजला तो दोन कारणांनी. पहिलं म्हणजे आयपीएल इतिहासात लागलेली सर्वात मोठी बोली आणि दुसरं म्हणजे मोठ्या रक्कमांना घेतलेले नवखे खेळाडू तेही जलदगती बॉलर.

सगळ्यात पहिल्यांदा आपण दणदणीत कमाई करणाऱ्या ख्रिस मॉरिसकडे वळू. कारण तोच यंदाच्या लिलावाचा ग्लॅमर चेहरा राहिलाय.

हवेहवेसे फास्ट बॉलर

दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएल लिलावाचे मागचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत. त्याने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपये आपल्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले. ख्रिस मॉरिस हा ३३ वर्षाचा तसा कारकिर्दीच्या उताराला लागलेला खेळाडू आहे. त्याला इतकी मोठी किंमत देऊन राजस्थान रॉयल्सने का घेतलं?

याचं उत्तर देण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच युएईत झालेल्या आयपीएल टी ट्वेन्टी स्पर्धेकडे पाहुया. या स्पर्धेच्या बॉलिंगच्या स्टॅटवर नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल की सगळ्यात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पहिले चार बॉलर हे फास्ट बॉलर आहेत.

कसिगो रबाडा ३० विकेट, जसप्रीत बुमराह २७, ट्रेंट बोल्ट २५ आणि एनरिच नॉर्खिया २२ विकेट. विशेष म्हणजे या सगळ्यांनी युएईच्या वाळवंटात घाम गाळून या विकेट मिळवल्यात. त्याचाच परिणाम हा आपल्याला यंदाच्या आयपीएल लिलावात दिसला. यंदाच्या आयपीएल लिलावात ५ कोटींच्यावर बोली लागलेल्या ६ खेळाडूंमधे ४ खेळाडू हे फास्ट बॉलर आहेत.

हेही वाचा: आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

स्टोक्स आहे, मग मॉरिस कशाला?

यंदाच्या लिलावाने दाखवून दिलं की, आता आयपीएलचा ट्रेंड बदलतोय. फास्ट बॉलरना सुगीचे दिवस आलेत. असेच सुगीचे दिवस काही वर्षांपूर्वी अडगळीत पडलेल्या लेगस्पिनर्सना आले होते. या फास्ट ट्रेंडचा काही अंशी फायदा ख्रिस मॉरिसला मिळाला. पण, त्याची फास्ट बॉलिंग आणि टप्प्यावर असलेलं नियंत्रण इतक्याच गोष्टी त्याला १६ कोटी देऊन गेल्या नाहीत. तरी त्याची स्फोटक बॅटिंग आणि उत्तम फिल्डिंगही त्याला पोषक ठरली.

सध्या वर्ल्ड क्रिकेट वर्तुळात अष्टपैलू खेळाडूंना मोठी मागणी आहे. हे अष्टपैलू खेळाडू टीमला बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही विभागात उत्तम समतोल साधून देतात. त्यामुळेच त्यांची चलती आहे. म्हणूनच प्रत्येक आयपीएल टीम मालक आपल्याकडे अशी दुहेरी धार असलेली तलवार बाळगण्यासाठी आतूर असतो. जगभरातल्या नावाजलेल्या आणि उत्तम दर्जाच्या फास्ट बॉलिंग करणाऱ्या अष्टपैलूंमधे ख्रिस मॉरिसचं नाव आवर्जून घेतलं जातं.

पण, ज्या टीमने त्याला इतकी किंमत देऊन घेतलं त्या टीमला खरं तर त्याची गरज होती का? तर याचं उत्तर आहे 'नाही.' कारण राजस्थान रॉयल्सकडे मुळातच बेन स्टोक्स आहे आणि तो त्यांच्या टीमकडून उत्तम कामगिरी करतोय. मग आता राजस्थान रॉयल्स त्याच धाटणी ख्रिस मॉरिस १६ कोटीला घेऊन त्याचं काय लोणचं घालणार की काय? हे समजत नाही.

विराटची फँन्सी फटाक्यांची आवड

भारताच्या पिचवर राजस्थान बेन स्टोक्स, ख्रिस मॉरिस आणि जोफ्रा आर्चर या फास्ट बॉलरचा अंतिम अकरात कसा मेळ बसवणार हे त्यांनाच माहीत.आरसीबीची ३० कोटींची महागडी शॉपिंग आयपीएलमधल्या सगळ्यात ग्लॅमरस टीमकडे ज्याच्याकडे जगभरातले नावाजलेले स्टार खेळाडू होते आणि आहेत. पण, यांनी आरसीबीला एकदाही आयपीएल चषक मिरवण्याची संधी दिलेली नाही.

यंदाच्या लिलावात त्यांनी जवळपास ३० कोटी खर्चून दोन खेळाडू आपल्या गोटात ओढले. पहिला म्हणजे ग्लेन मॅक्सवेल ज्याला आरसीबीने १४ कोटी २५ लाख देऊन घेतला. तर दुसरा कायल जेमिसन ज्याच्यावर १५ कोटींची उधळण करण्यात आली.

आता मॅक्सेवेलला १४ कोटी २५ लाख देऊन घेतल्यानंतर भारतातला गेल्या दशकभरापासून आयपीएल पाहणारा चाहता डोक्याला हातच लावणार. कारण, मॅक्सवेलच्या बाबतीत आयपीएलमधे नाव मोठं लक्षण खोटं ही म्हण जवळपास रुढ झालीय. त्याने एखाद दुसरी इनिंग सोडली तर फार काही पराक्रम केल्याचं ऐकण्यात नाही.

पण, आरसीबीचा म्होरक्या विराटला अशा फँन्सी फटाक्यांची आवडच आहे. त्यामुळे त्याने ही खरेदी केली याचं आश्चर्य वाटायला नको. विराटला मॅक्सवेलचा होम ग्राऊंड चिन्नास्वामीवर त्याच्या छोट्या बाऊंडरी आणि पाटा पिचवर चांगला उपयोग होईल, असं वाटत असावं.

हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

१५ कोटींचं पदार्पण

आरसीबीची दुसरी मोठी खरेदी म्हणजे कायल जेमिसन. न्यूझीलंडच्या या उंचपुऱ्या फास्ट बॉलरवर आरसीबीने त्याच्या उंचीला साजेशीच बोली लावली. त्यांनी त्याला १५ कोटींना खरेदी केलं. कायल जेमिसनवर विराटचा जीव येणं साहजिक आहे. कारण भारत न्यूझीलंड दौऱ्यावर होता त्यावेळी त्याने भारतीयांच्या नाकी नऊ आणले होते. त्याच्या बॉलिंगमधे अचूकता आहे. त्याला त्याच्या उंचीचाही फायदा होतो.

याचबरोबर त्याने पदार्पणाच्या सिरीजमधे बॅटिंगची आपली चमक दाखवून दिली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधे खेळणं स्वाभाविकच होतं. पण, पदार्पणाच्या आयपीएलमधेच त्याला १५ कोटी रुपये मिळणं भुवया उंचावणारंच होतं. आता आरसीबीने उंचपुऱ्या बॉलरवर इतका खर्च केलाय तर पाहुया हाताबाहेर असलेल्या आयपीएलच्या ट्रॉफीपर्यंत आरसीबीचा हात पोचतो का?

बीग बॅश लिगमधले दोन हिरे

आयपीएल ही जगातली सगळ्यात मोठी टी ट्वेन्टी क्रिकेट लीग आहे. त्यामुळे सगळ्या जगाचं त्याच्याकडे लक्ष असणं स्वाभाविकच आहे. मात्र आयपीएलचंही जगभरातल्या इतर टी ट्वेन्टी लीगवर बारीक लक्ष असतं. मग ती बीग बॅश असो की, कॅरेबियन प्रीमियर लीग. आयपीएल फ्रेन्चायजींच्या टॅलेंट हंट टीम त्यावर लक्ष ठेवून असतात.

ज्या टीमची टॅलेंट हंट टीम हिरे शोधून आणण्यात माहीर असते त्या टीमचा कायम फायदा होत असतो. यंदाच्या आयपीएल लिलावातही असाच एक बीग बँश लीगमधले असेच दोन हिरे चमकले. त्या हिऱ्यांची नावं आहेत झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडीथ. दोघेही उजव्या हाताचे फास्ट बॉलर. झाय रिचर्डसनने यंदाचा बीग बॅश हंगाम चांगलाच गाजवला. त्याने या हंगामात तब्बल २९ विकेट घेतल्या.

आयपीएल २०२० मधे फास्ट बॉलरनी केलेली भन्नाट कामगिरी पाहता आयपीएल फ्रेंचायजी या फास्ट बॉलर्सच्या जमातीवर अधिक फोकस करणार असा अंदाज होताच. या दोन फास्ट बॉलर्सवर आयपीएल पदार्पणातच लागलेल्या बोलीवरून हा अंदाज खरा ठरला.

हेही वाचा: रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा

फास्ट बॉलरना पोषक पीच

झाय रिचर्डसनला पंजाब किंग्जने १४ कोटी देऊन खरेदी केलं. बरं, इतक्यावरच ते थांबले नाहीत तर आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सिरीज न खेळलेल्या रिले मेरेडीथवरही त्यांनी ८ कोटींची उधळण केली. पंजाबने या दोन फास्ट बॉलरवर २२ कोटी खर्च करण्याचं लॉजिक काय? तर याचं लॉजिक असं की, पंजाब किंग्ज हा आपल्या घरच्या मोहालीच्या मैदानावर जवळपास ८ सिरीज खेळणार आहे.

यातल्या काही सिरीज संध्याकाळी खेळल्या जातील. भारतातला एकमेव पिच जो फास्ट बॉलरना पोषक असतो तो म्हणजे मोहालीचा. त्यामुळेच पंजाबने आपल्या टीमला २२ कोटी देऊन हे दोन २४ वर्षाचे नव्या दमाचे नवखे फास्ट बॉलर आपल्याकडे खेचले. बरं रिचर्डसन तसा ओळखीतला आहे.

मेरेडीथवर ८ कोटी म्हणजे कहर झाले असं आपल्याला वाटेल पण, त्याचे बीग बॅशमधले काही स्पेल पाहिले तर याच्याकडे चांगला दमखम आहे आणि तो सातत्याने १४० किमी वेगाने बॉलिंग करू शकतो याची जाणीव झाली. पंजाबने या १४० किमीवरच ८ कोटींचा जुगार खेळला असणार.

चमकणारी भारतीय नावं

यंदाच्या आयपीएल लिलावात दोन भारतीय नावं चांगलीच चर्चेत आली. ती म्हणजे कृष्णाप्पा गौतम आणि शाहरुख खान. गौतमने ९ कोटी २५ लाख खिशात टाकले तर दुसऱ्याने पदार्पणात ५ कोटी २५ लाखाची बोली मिळवली. गौतम हा तसा आयपीएल वर्तुळातला जुना खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २४ आयपीएल मॅचमधे १८६ धावा केल्या आहेत.

त्याची आयपीएलमधली सगळ्यात जास्त धावसंख्या आहे ३३. गौतम हा ऑफ स्पिन बॉलिंगही करते. त्याने आयपीएलमधे आतापर्यंत २४ मॅचमधे ४०८ चेंडू टाकले आहेत. त्यात त्याने ५६२ धावा देत १३ विकेट घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ही ८.२६ आहे. अशा या सुमार कामगिरी करणाऱ्या ऑलराऊंडला चेन्नई सारख्या डोकं लावून क्रिकेट खेळणाऱ्या टीमने इकॉनॉमी पेक्षाही जास्त म्हणजे ९ कोटी २५ लाख रुपये देऊन आपल्या गोटात सामील करुन घेतलं.

कर्नाटकच्या या अनकॅप खेळाडूला यंदाच्या आयपीएलमधे लागलेली ही जास्तीची बोली आहे. पण, सीएसकेने अशाच धाटणाचा अजून एक खेळाडू याच लिलावात खरेदी केला. तो म्हणजे इंग्लंडचा ऑफ स्पिनर ऑलराऊंडर मोईन अली. सीएसकेने त्याला ७ कोटी देऊन आपल्या टीममधे घेतलं.

त्याची बोली कृष्णाप्पा गौतमपेक्षा कमी लागली असली तरी अनुभूव आणि क्लास पाहता त्यालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमधे खेळायला विशेष परवानगी दिलीय. कारण येत्या वर्षभरात दोन टी ट्वेन्टी वर्ल्डकप होणार आहेत. त्यातला एक वर्ल्डकप भारतात होणार आहे.

आता सीएसकेने कृष्णाप्पा गौतमच्या हार्ड हिटिंग आणि ऑफ स्पिन बॉलिंगकडे पाहून त्याला इतक्या मोठ्या किंमतीला खरेदी केलं असेल तर मग मोईन अलीला ७ कोटी का दिले असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण सीएसकेकडे रवींद्र जडेजा, इम्रान ताहीर, मिचेल सँटनर हे फिरकी बॉलर आहेतच मग या दोन्ही ऑफ स्पिनर्सना एकाचवेळी कसं खेळवणार हा प्रश्नच आहे. मग दोघांनाही दिलेली इतकी मोठी किंमत अवास्तव वाटणारच.

हेही वाचा: विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज

क्रिकेटमधला शाहरुख खान

यंदाच्या आयपीएलमधे अनकॅपमधला दुसरा पैशात खेळणारा खेळाडू म्हणजे शाहरुख खान. याचं नाव अभिनेता शाहरुख खानवरुन ठेवण्यात आलं आहे. पण, याला ५ .२५ कोटी देऊन विकत घेतला तो प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जने. या अष्टपैलू खेळाडूने लिलावापूर्वीच क्रिकेट जगाचं लक्ष आपल्याकडे खेचलं होतं. विशेष म्हणजे तो पंजाब किंग्जच्या गोटात येण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंट कॅम्पातून मुशाफिरी करुन आलाय. तो चेन्नई सुपर किंग्ज ज्यूनियर स्पर्धेचा सर्वोकृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला होता.

याचबरोबर तो मुंबई इंडियन्सचे टॅलेंट हंट ट्रायलही देऊन आला होता. त्याने खऱ्या अर्थाने आयपीएल जगाला आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलं ते यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी ट्वेन्टी स्पर्धेत. सेमिफायनलमधे १९ बॉलमधे ४० रन ठोकून तामिळनाडूला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्याकडे या फ्रेंचायजीचं लक्ष गेलं. शेवटी त्याला आयपीएलमधे दणदणीत कमाईसह एन्ट्री मिळाली. त्याची बॅटिंगची शैली स्फोटक आहे. धिप्पाड शरीरयष्टीच्या शाहरुखला त्याच्या ताकदीचा पुरेपूर फायदा करुन घेता येतो. त्यामुळेच त्याला मिळालेली किंमत ही अवास्तव वाटत नाही.

गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्यात टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

युनोनं २०२१ फळं, भाजीपाल्यांचं वर्ष जाहीर का केलंय?

कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?