वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा.
आज वॅलेंटाईन डे. प्रेमाचा दिवस. इश्क शब्द आला की आशिक दिवाने होतात. मग रोमिओ, लैला, मजनू, रांझा, ज्युलियट, हीरच्या टिपिकल लव स्टोऱ्या समोर येतात. त्याच त्याच दर्दभऱ्या स्टोऱ्या आपण कायम ऐकतो. त्यात स्वतःला शोधत राहतो. प्रेमाच्या दिवशी प्रेमाचा इतिहास आणि इतिहासातलं प्रेम एवढंच आजच्या दिवशी घोळवलं जातं. पण आता हा इतिहास जपताना पुढे बघायचीही वेळ आलीय.
कोलाज डॉट इन या आमच्या फिचरोत्सवात प्रेमाला फारच महत्त्व आहे. आम्ही आमच्या कामावर प्रेम करतो. किंवा प्रेमासाठीच काम करतो, असं म्हणा ना! त्यामुळे प्रत्येक वॅलेंटाईन आमच्यासाठी खास असतो. आणखी आणखी प्रेम करण्यासाठी. आणखी आणखी काम करण्यासाठी.
मागच्या वर्षी प्रेमाचे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून ‘कोलाज’ने प्रेमाचा कोलाज एकसंध बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रेमाची प्रेमळ बाजू समोर आली. प्रेम गुन्हा म्हणून समोर येतं तेव्हा काय करायचं याविषयीही आमच्या लेखकांनी लिहिलं. त्याच्या मागच्यावर्षी कोलाजचा वॅलेंटाईन सतरंगी होता. एलजीबीटीक्यू या समुदायातल्या लोकांचं प्रेम पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे आपल्यासारखं ‘सेमच असतं’ हे सांगण्याचा हा प्रयत्न होता.
हेही वाचा: प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का
आता आणखी पुढे पाहताना यावर्षी नव्या पिढीचं प्रेम पहायला हवं. आज प्रेमाची परिभाषा बदललीय. व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्यात. माणसांच्या चेहऱ्यांपेक्षा त्यांनी पाठवलेल्या स्माईलीवरून त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा हा काळ आहे. हे चुकीचं की बरोबर. फायद्याचं की तोट्याचं हा विचार करत बसण्यात आता पॉईंट नाही. कारण बदल आधीच घडला आहे. घडतो आहे आणि घडत राहणार आहे.
मग आपण काय करायचं? हे समजून घ्यायचं. कसं? ही तरूण पिढी नेमकी कशी आहे याचा विचार करून. त्यांचं नेमकं म्हणणं काय हे वाचून. यासाठी त्यांच्या शब्दांमागे लपलेली त्यांची डोळ्यांची भाषाही समजून घ्यायला हवी.
ही नवी पिढी फार वेगळी आहे. सगळे म्हणतात त्याप्रमाणे त्यांना काहीही आयतं वगैरे मिळालेलं नाही. तेही संघर्ष करतायत. मागच्या पिढीपेक्षा तो वेगळा असेल. पण अस्सल आहे! त्यांचं प्रेम नुसतं अंगचटीला येण्यापुरतंही मर्यादीत नाही. तो त्यांच्या प्रेमाचा फार महत्त्वाचा भाग आहे हे खरंच! पण व्यवस्थेचा साचा तोडत प्रेम करण्याची हिंमतही या नव्या पिढीत आहे.
ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है
किती खरंय हे! प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. प्रेमात बरंच काही गमावण्यासारखं असतं. तसंच हातचं काहीतरी सुटतंही राहतं. तरूण पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यात त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. पण तरीही आम्ही मागे हटत नाही.
हेही वाचा: आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!
‘इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी थे इंसान काम के’ गालिब म्हणतो. पण नवी पिढी इश्क करत असतानाही काम करते. करिअर करते. ट्रेकिंग करत डोंगदऱ्या पालथ्या घालते. आंदोलनं करते. समर्थनं देते. मतं मांडते. प्रेम करण्याची, ते व्यक्त करण्याची आणि प्रेम असेल तर त्याची जबाबदारी घ्यायचीही हिंमत ठेवते.
अच्छा इश्क
अच्छे लोगों के बस की बात नहीं
जिन के पास इश्क होता है
बहुत कुछ नहीं होता उन के पास
शायर नोमान शौक म्हणतात. मग तरुण पिढीकडे प्रेम असताना त्यांच्या हातातून नेमकं काय सुटतं? हे शोधण्याचाच प्रयत्न नव्या पिढीचं प्रेम या लेखमालेत आम्ही केलाय.
हॅप्पी वॅलेंटाईन!
हेही वाचा:
आजची पिढी कमिटमेंट देते, पण अडकून पडत नाही