दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

०९ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं.

विधानसभेच्या गरमागरम वातावरणात मंगळवारी शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र सामनाला सविस्तर मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ठाकरे यांनी भाजपसोबतची युती ही शिवसेनेने केलेली एक तडजोड असल्याची कबुली दिली. त्यावरून अनेकांनी शिवसेनेला डिवचलं, टीका केली. मुलाखत देऊन सविस्तर भूमिका मांडली.

आता शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यात ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा झाल्यावर ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार होते. म्हणजेच युतीत शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत गेल्यावर उद्धव ठाकरे यांचं हे पहिलंच भाषण होतं.

हेही वाचाः भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!

युतीबद्दल काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात पार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पपासून ते महाराष्ट्रातला शेतकरी अशा मुद्यांना हात घेतला. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी येऊ घातलेली विधानसभा निवडणूक होती. पदरात कमी जागा पडत असतानाही आपण भाजपसोबत युती का केली, याचं स्पष्टीकरण दिलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, युती म्हटलं की तडजोडी आल्याच. या तडजोडींबद्दल ठाकरे यांनी दोन दिवसांआधी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला सविस्तर मुलाखत देऊन आपली भूमिका मांडली होती. 

मेळाव्यात ते म्हणाले, ‘युती म्हटली की तडजोडी आल्याच. युतीमुळे महाराष्ट्रीतल्या काही जागा शिवसेनेकडून सुटल्या आहेत. त्या सर्व मतदारसंघांत शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलंय. अहोरात्र मेहनत घेतलीय. त्या सर्व शिवसैनिकांची मी माफी मागतोय.’

ठाकरे तडजोडीचं कारण सांगताना म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील बोलले होते, आमची अडचण समजून घ्या. आम्ही तुमची अडचण समजून घेतली. तुम्ही आता महाराष्ट्राची अडचण सोडवा. आम्ही आहोत तुमच्यासोबत.’ पण भाजपची अडचण काय हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

स्वबळ हे वास्तव नसल्याचं भान

गेली पाच वर्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेतला वाटेकरी असून शिवसेनेने एका विरोधी पक्षाचीच भूमिका घेतली. त्यामुळे महाराष्ट्राला विरोधी पक्षांची राजकारण बघायला मिळालं नाही. आपल्या भाषणातही ठाकरे यांनी येत्या काळातही आपल्याला सत्ता हवी असल्याचं सांगितलं.

ठाकरे म्हणाले, ‘मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि उद्याही शिवसेना सत्तेत राहणार. सत्ता तर मला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.’ सध्या तरी शिवसेनेची स्वबळावर सत्ता येऊ शकत नाही, या वास्तवाची जाणीवच ते बोलून दाखवत होते. त्यामुळेच ठाकरे आता कोणत्याही परिस्थिती सत्तेत राहण्याची भाषा करू लागलेत.

उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याला संबोधित केलं. पण त्यांच्या भाषणाला काही तूरळक वेळाच उपस्थितांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. नाहीतर शिवाजी पार्कच्या मैदानावर निरव शांतता होती.

हेही वाचाः किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळली, तुम्हाला तिसरा हप्ता मिळाला?

मैत्री आणि वैरही उघडउघड करतो!

लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी भाजपने आपल्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही दगाफटका होऊ शकतो. यावरून युतीतला संभाव्य तेढ लक्षात घेऊन ठाकरेंनी युती केलीय. आता दगाफटका करायचा नाही, असं शिवसैनिकांना सांगितलं.

लपूनछपून काहीही करणारी शिवसेना नाही. आम्ही मैत्री आणि वैरही उघडउघड करतो, असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी येणारी निवडणूक महत्त्वाची आहे. एकदिलाने आणि प्रामाणिकपणे युतीचं काम करूया आणि महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकवूया, असं आवाहन केलं.

सत्ता येते, जाते. पण डोक्यात सत्ता जायला नको. कारण डोक्यात सत्ता गेली की आपल्याला रस्त्यावरच कुत्रंही विचारत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही मला हीच गोष्ट सांगितलीय, असं सांगत अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला.

आश्वासनांचा पाऊस

विधानसभेच्या मतदानाला आता बारा दिवस राहिलेत. शिवसेनेचा वचननामा अजून जाहीर व्हायचाय. पण उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातच काही लोकप्रिय आश्वासनांची घोषणा केली.

ठाकरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर मला शेतकरी कर्जमुक्त करायचाय. पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. एका रुपयात झुणका भाकरीसारखंच आता १० रुपयांत पूर्ण थाळी जेवण देणार. तीनशे युनिटपर्यंतचा वीजवापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करू. एक रुपयांत प्राथमिक आरोग्य चाचण्या करण्याची केंद्र महाराष्ट्रात सुरू करणार.’

भाजपसोबत युती झालेली असतानाही शिवसेनेने स्वबळावर आश्वासनांचा पाऊस पाडला. शिवसेनेकडे कुठली खाती येणार हे जाहीर नसतानाही ठाकरे यांनी कृषी, ऊर्जा, आरोग्य यासारख्या खात्यांसंदर्भातल्या घोषणा केल्या. त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यास आपली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसू शकते.

हेही वाचाः 

शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?

भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ

आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?