शेरनी सिनेमातली खरी अवनी काय संदेश देते?

३० जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्‍यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे.

विकास आणि पर्यावरण यांच्यादरम्यान संतुलन राखणं खूपच गरजेचं आहे. पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडं आणि प्राणी जेवढे महत्त्वाचे, तेवढेच जंगलाच्या भरवशावर वर्षानुवर्ष वास्तव्य करणारा मानव जातीचा समूहही महत्त्वाचाय. थोडक्यात काय, तर विकास आणि पर्यावरण यांची योग्य सांगड घालून कृती करा, हा सर्वमान्य संदेश आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या डायरेक्टर अमित मसूरकर यांच्या ‘शेरनी’ या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वनसंवर्धन, वनसंरक्षण, वन्यजीवांचं संरक्षण आणि जंगलात वर्षानुवर्ष राहणार्‍या माणसांच्या वन्यजीवांशी असलेल्या संघर्षाची चर्चा सुरू झालीय. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात तीन वर्षांपूर्वी बंदुकीची गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक ‘अवनी टी १’ या वाघिणीवर आधारित हा सिनेमा आहे.

हेही वाचा: इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

२ वर्षात १४ हल्ले

मानव-वन्यजीव संघर्षात प्राण्यांच्या बचावासाठी नेहमीच अग्रेसर असलेले वन्यजीवप्रेमी, गावकर्‍यांना होणारा जंगली श्‍वापदांचा जीवघेणा त्रास, जंगलाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारलेले वन अधिकारी आणि मतांच्या राजकारणात तुटपुंज्या फायद्यासाठी स्थानिक राजकीय मंडळींची कटकारस्थानं यांचं जिवंत चित्र उभं करण्यात डायरेक्टर अमित मसूरकर यांना यश आलंय.

यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात फिरणार्‍या नरभक्षक वाघिणीला २०१८ ला राळेगाव तालुक्यातल्या बोराटी गावात ठार करण्यात आलं. ‘टी १’ किंवा ‘अवनी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या सहा वर्षांच्या वाघिणीने २०१६ पासून २०१८ पर्यंत १४ व्यक्‍तींवर हल्ले करून त्यांना ठार केलं. वाघीण हल्ला केल्यानंतर तिचं भक्ष्य फरफटत नेत असल्याने कधी शीर धडा वेगळं झालेलं आढळलं. तर कधी मृताच्या पायाचा लचका तोडल्याचं आढळलं.

आपल्या नऊ महिन्यांच्या दोन बछड्यांसह लपूनछपून फिरणार्‍या या वाघिणीच्या दहशतीखाली १७० किलोमीटर क्षेत्रातलं जंगलं, शेतशिवार आणि जवळजवळ १५ ते २० गावं होती. या परिसरात साधारणत: पाच हजारांहून अधिक लोक राहतात. एक तर त्या वाघिणीला जेरबंद करणं आणि दुसरं म्हणजे गावकर्‍यांचे मृत्यू रोखणं, हे मोठं आव्हान वन विभागासमोर होतं.

वन्यजीवप्रेमींचा खोटा आरोप

वाघिणीच्या शोधमोहिमेदरम्यान तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न करण्याचं वन विभागाने ठरवलं होतं. पण नाइलाज झाला तरच वाघिणीला ठार करण्यात येईल, यावरही वन विभागातल्या अधिकार्‍यांचं  एकमत झालं  होतं.

शोध मोहिम चालू असताना ग्रामस्थांना, बोराटी-वारूड मार्गावरच्या वाहनचालकांना ही वाघीण दिसली. ग्रामस्थांनी वन कर्मचार्‍यांना तशी कल्पना दिली आणि लगेच ट्रेकिंग टीमने आधी गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि मग मोहीम सुरू केली. वाघिणीला ज्यावेळी ठार केलं, त्यावेळी त्या टीममधे तीन वन कर्मचारी, एक शार्पशूटर कम शिकारी आणि एका वाहनचालकाचा समावेश होता.

वाघिणीची ओळख पटल्यानंतर टीममधल्या एका सदस्याने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला. पण वाघिणीने मागे जात पुन्हा हल्ला केला. यावेळी हे कर्मचारी जिप्सीमधे होते. तेव्हा स्वरक्षणासाठी शार्पशूटरने ८ ते ० मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात वाघीण जागेवरच ठार झाली. पण प्रशासनाने तिला पकडण्याचा प्रयत्नच केला नाही, तिला ठारच करण्यात आलं असा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला.

हेही वाचा: प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?

वाघिणीची भीती आणि रोषही

या वाघिणीला मारल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. वाघिणीला मारण्यासाठी वन विभागाला बरेच प्रयत्न करावे लागले होते. महागडे परफ्युम, ड्रोन, हत्ती, शिकाऊ कुत्री, शार्पशूटर तैनात केले होते. या कथेवर आधारित ‘शेरनी’ या सिनेमाची निर्मिती केलीय. गावकर्‍यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकारी विद्या विन्सेंट हिची भूमिका विद्या बालनने केलीय.

शासकीय अधिकार्‍यांमधे ती एकटीच महिला वन अधिकारी दाखवलीय. वन विभागातल्या जबाबदारीवर तिची पूर्ण निष्ठा आहे. वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवड असलेला, प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारा प्राध्यापक हसन नुरानी म्हणजे विजय राज याची वाघ वाचवण्याची तळमळ दिसते.

गावागावांत वाघिणीचा मुक्‍त संचार आहे. कित्येक गावकर्‍यांची जनावरं या वाघिणीनं फस्त केलीयत. गावकर्‍यांचेही जीव घेतले. त्यामुळे जंगलाजवळ शेती असलेल्या गावकर्‍यांमधे भीती आणि तेवढाच रोष आहे. वाघिणीला पकडा किंवा मारून टाका, अशी त्यांची मागणी आहे. वन विभागाची गाडी पेटवून वन अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत गावकरी हिंमत करतात.

जंगल आणि वन्यप्राणी हे दोन्ही वाचवत असताना गावकर्‍यांचंही संरक्षण झालं पाहिजे, या विचारांची विद्या विन्सेंट ही अधिकारी आहे. तर त्याचवेळी स्थानिक राजकारण्यांच्या दबावाला बळी पडणार्‍या बन्सल आणि नांगिया यासारख्या वरिष्ठ वन अधिकार्‍यांच्या सरकारी नोकरीतल्या मानसिकतेचं सिनेमातून उत्तम दर्शन घडवलंय. वाघिणीला मारण्यासाठी खासगी शिकारी असलेला शार्पशूटर रंजन राजहंस ऊर्फ पिंटूभय्या म्हणजे शरत सक्सेना याला परवानगी देऊन त्याच्याच मनाप्रमाणे मोहीम राबवा, असे आदेश देणारे वन अधिकारी दाखवलेत.

मग वन विभागाची काय गरज?

वेगाने होणार्‍या जंगलतोडीमुळे संरक्षित क्षेत्राभोवती वसलेल्या मानवी वस्त्यांमधून वाघासारखे वन्यजीव किंवा अन्य जंगली प्राणी शिरताना आढळतात. त्यातून मानव आणि वाघांमधे संघर्षाची कठीण परिस्थिती उद्भवते. खूप जास्त संख्येनं गुरं-ढोरं जंगलात चरायला नेणं, हेसुद्धा वाघांनी गावकर्‍यांवर हल्ला करण्याचं कारण ठरू शकतं. जंगलाच्या परिसरातील खेड्यांमधे पुरेसा चारा नसल्याने नाइलाजाने गावकर्‍यांना या गुरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जावं लागतं. तिथेच अनेकदा वाघ माणसांवर हल्ले करतात.

हा मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची यापेक्षाही अन्य वेगळी कारणं असू शकतील. पण प्रामुख्याने मनुष्यप्राणी हा त्या वाघांच्या भक्ष्याच्या आड येत असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होतात. यात गावकर्‍यांचं जगणं कठीण होतं. वाघांच्या हल्ल्यात गावकरी मृत्यूमुखी पडतात.

शार्पशूटर पिंटूभय्याच्या मदतीने त्या वाघिणीला गोळी घालण्यात येते, असं द‍ृश्य सिनेमात दाखवलंय. शिकारी आणि शार्पशूटर यांच्या मदतीने वाघांची हत्या करणे हा एकमेव पर्याय असू शकत नाही. यावर ‘टायगर को मारनाही सोल्यूशन था, तो फॉरेस्ट डिपार्टमेंट की क्या जरूरत है?’ असं वन अधिकारी विद्या विन्सेंटचा हा डायलॉग वन्यजीव संरक्षणाबद्दल खूप काही सांगून जातो.

हेही वाचा: साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

वन अधिकाऱ्यांचा वरदहस्त

वन विभागाच्या एका बैठकीत विद्या विन्सेंटला तिचा जुना सहकारी भेटतो. साईप्रसाद त्याचं नाव. सहा वर्षांपासून कोणत्याही प्रकारची बढती न मिळालेली विद्या विन्सेंट त्याला नैराश्यात दिसते. त्यावेळी साईप्रसाद म्हणतो, ‘फॉरेस्ट डिपार्टमेंट अंग्रेजोकी देन है। अंग्रेजोकी तरह काम करो। रेवेन्यू लाओ। ऑफिसर्स खूष तो प्रमोशन पक्‍का।’ अशा प्रसंगातून वन विभागाच्या आंतरिक कार्यपद्धतीवरही दिग्दर्शकानं प्रकाशझोत टाकलाय.

नरभक्षक वाघीण समजून शार्पशूटर असलेला पिंटूभय्या एका भलत्याच वाघावर नेम धरतो. तेव्हा त्याच्यासोबत असलेली एक महिला वनरक्षक त्याला सावध करते की, ‘आपने जीस शेर पर निशाना ताना है वह आदमखोर नहीं है। यह तो नर बाघ है। और हमे जो आदमखोर जानवर की तलाश है, वह मादा बाघ है।’

त्यावर तो अतिआत्मविश्‍वासी शार्पशूटर वनरक्षकाला खडे बोल सुनावतो. ‘अभी आप सिखाओगी हमे? कौन आदमखोर है और कौन नहीं? शेर की आँखे देखकर मै पहचान जाता हूँ की, वह आदमखोर है की नहीं?’ शार्पशूटर असलेल्या पिंटूभय्याचा हा अतिआत्मविश्‍वास म्हणजे वरिष्ठ वन अधिकारी, राजकीय नेते, मंत्री यांचा अशा लोकांवर कसा वरदहस्त आहे, हे दर्शवितो.

टायगर है तो पेड है

वाघिणीला सुरक्षित पिंजर्‍यात पकडून शार्पशूटरच्या गोळीपासून तिला वाचवण्यासाठी गावातलं होतकरू मुलांचं एक पथक तयार होतं. हसन नुरानी त्यांना वन्यजीवांचं महत्त्व समजावून सांगतो. तेवढ्यात त्या टीममधला एक तरुण मुलगा हसन नुरानीला म्हणतो की,

‘टायगर है तो जंगल है।
जंगल है तो बारीश है।
बारीश है तो पानी है।
पानी है तो पेड है।’

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वन्यजीव ते वृक्षसंवर्धन असा एकमेकांशी असलेल्या संबंधाची व्याख्या हा शालेय विद्यार्थी समजावून सांगतो. ‘जंगल बचाने है तो जानवरोसे दोस्ती करनी पडेगी।’ या हसन नुरानीच्या संवादाने ‘शेरनी’ या संपूर्ण चित्रपटाचा सारांशच दिग्दर्शकाने सर्वांपुढे ठेवला आहे.

हेही वाचा: 

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण