नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख.
विज्ञान प्रयोग म्हटलं की साहित्याने भरलेली प्रयोगशाळा आणि धीरगंभीर चेहरा असलेला विज्ञान शिक्षक असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. परंतु जिथे हे दोन्ही नाही, केवळ आहे ते आपल्या अवतीभवती सहज उपलब्ध असणारे फुगे, खिळे, कागद, पेनातील कांडी पृष्ठ, प्लास्टीक बॉटल, वाळू, सायकल स्पोक, बारीक ट्यूब, छोटी रोपटे, इंजेक्शन, पाणी, तोंडाला लावायचे पावडर असं बिनाखर्चिक साहित्य. या साहित्यातून आपणास माहिती होते विज्ञानातली विविध रहस्य तेपण शिक्षकाकडून नाही तर चक्क महापालिकेच्या शाळेत वर्गात सर्वात मागे बसणाऱ्या बालगोपालांकडून. आणि हे सारं घडतं रस्त्यावर. आपला विश्वास बसत नाही ना, पण हे सत्य आहे.
गेल्या २२ वर्षांपासून नागपूरातील उत्तर अंबाझरी मार्गावर हा अपूर्व विज्ञान मेळावा भरतो. नागपूर महापालिका शाळांमधले बॅक बेन्चर्स विद्यार्थी पायाभूत विज्ञानातल्या अनेक संकल्पनामागची कारणमीमांसा उपस्थितांना सांगतात. तेपण बिनखर्चिक साहित्यच्या माध्यमातून. या अद्भूत आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याचे जनक आहे विज्ञानश्री सुरेश अग्रवाल.
हेही वाचाः तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
१९९६ मधे सुरेश अग्रवाल यांची ओळख केवळ एक लॉटरीविक्रेता एवढीच होती. मात्र आज त्यांना अनेक भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि अनेक शास्त्रज्ञ तसंच मान्यवर हे विज्ञानश्री सुरेश अग्रवाल या नावाने ओळखतात. छत्तीसगड सरकारने सुरेश अग्रवाल यांचं विज्ञानातलं योगदान बघून त्यांना विज्ञानश्री ही पदवी बहाल केली. नागपूरात त्यांना सर्व ‘बाबुजी’ या टोपणनावाने हाक मारतात.
२२ वर्षापूर्वी अग्रवाल नागपूरातल्या वेगवेगळ्या ग्रंथालयात जाऊन विज्ञानातले शोध आणि त्यावर आधारित माहितीचा अभ्यास करायचे. दुसरे लोक मात्र विज्ञान सोडून इतर निरर्थक विषयांवर चर्चा करत बसायचे. मात्र हा व्यक्ती हताश न होता आपल्या मनात विज्ञान विषयातील भूक त्या पुस्तकांमधून भागवायचा.
त्यानंतर विज्ञानातील अनेक क्लिष्ट संकल्पना घरगुती आणि परिसरात आढळणाऱ्या बिनखर्चिक आणि अल्पखर्चिक साहित्याद्वारा मुलांना समजून सांगायचे. विद्यार्थी जुमत गेले. नंतर शिक्षकही जमू लागले आणि आज असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्यूकेशन ही संस्था उदयास आलीय.
शिक्षक फार तर चित्र किंवा प्रतिकृती द्वारा विज्ञान विषय समजावून सांगतात. जीवशास्त्रात तर हे हमखास होतं मात्र या अपूर्व विज्ञान मेळाव्यात रस्त्यावर ह्र्दय, डोळे, किडनी, लिवर मेंदू हे प्रत्यक्ष हातात घेवून त्यातील बारकावे जाणून घेता येतात.
सोबतच आपण चंद्राची एकच बाजू का पाहू शकतो? पूर्ण चंद्र ३० दिवसानंतर का दिसतो? चंद्र आणि सूर्य एकाच आकाराचे का दिसतात? ऋतू का असतात? उत्तरायण आणि दक्षिणायण म्हणजे काय? ऑप्टीक फायबरची निर्मिती, केवळ पेन्सिल आणि चुंबकाचा सहाय्याने बुलेट ट्रेन कशी धावते? हवेचा दाब, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व, उर्जा, प्रकाश आदी घटकावर आधारित असंख्य प्रयोग प्रत्यक्षात हाताळायला मिळतात.
पाणबुडी बनवणं, हायड्रोमीटर, हवेत प्रकाश, नाविन्यपूर्ण टीवी, पाण्यात जळणारी मेणबत्ती, निकामी ट्यूब लाईटपासून प्रकाशनिर्मिती, अग्निशामकाची निर्मिती, संगीतावरील प्रकाश, कमी तापमानावर पाणी तापविणे हे प्रात्यक्षिक हे विद्यार्थी सादरीकरण करत असतात.
इथे एक दोन नाही तर तब्बल दोनशेहून अधिक प्रयोग साकारले जातात. हे सर्व प्रयोग गमतीजमतीच्या माध्यमातून ‘चला विज्ञानाशी मैत्री करुया’ या एका उद्दिष्ट अंतर्गत तयार करण्यात आलेत. हा विज्ञान मेळावा दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जातो.
यंदा हा मेळावा दिनांक २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत हिंदी राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी मार्ग, रामदास पेठ इथे होतोय. गेल्यावर्षी ही प्रदर्शनी अनुभवाला छत्तीसगडमधल्या बस्तर आणि दंतेवाडा इथले दीडशे विद्यार्थी आले होते.
आतापर्यंत या मेळाव्याला भारतरत्न शास्त्रज्ञ डॉ सीएनएन राव, पद्मविभूषण प्रो. यशपाल, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ विमान बसू, अनुज सिन्हा, प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार, सोनम वांगचूक आदींनी या अपूर्व विज्ञान मेळाव्याला भेट दिलीय.
हेही वाचाः बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
नागपूर इथे पाच दिवस चालणाऱ्या या मेळाव्याला दरवर्षी २५ हजारहून अधिक विज्ञानप्रेमी भेट देत असतात. हे यश बघून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकारने आपापल्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हे प्रयोग राबवले. यासाठी सुरेश अग्रवाल आणि त्यांच्या टीमला निमंत्रण देण्यात आलं होतं. आतापर्यंत नागपूर, ठाणेसह राज्याबाहेर छत्तीसगड, मध्य प्रदेश, कलकत्ता, भुवनेश्वर आदी ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे, संशोधन वृत्तीला चालना देणे या हेतूने हा मेळावा आयोजित केला जातो. यंदा साध्या सोप्या गोष्टीतून विज्ञान शिकण्याची संधी मिळण्यासाठी डू ईट युवरसेल्फ अर्थात स्वतः करा आणि शिका अंतर्गत २५ प्रयोगाचे स्टाँल राहणार आहेत.
या सर्व प्रयोगांची दखल केंद्र सरकारने घेतलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरात लवकरच राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षण केंद्र निर्माण होणार आहे. या केंद्राचे प्रमुख सुरेश अग्रवाल हे असणार आहेत.
अपूर्व विज्ञान मेळाव्यात महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांसह विज्ञानातील विविध विषयांवर अगदी छोट्या छोट्या साहित्यातून क्लिष्ट प्रयोग सोप्या पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी राज्याबाहेरील तज्ञ व्यक्तीसुद्धा सहभागी होतात. कलकत्ता, अलाहाबाद, बंगळूरू यासारख्या शहरांमधून विज्ञानप्रेमी मंडळी इथे येऊन विद्यार्थ्यांना विज्ञानातल्या गमतीजमती उलगडून दाखवतात.
या अपूर्व विज्ञान मेळाव्यातून प्रेरणा घेवून महापालिका शाळेतल्या शिक्षिका ज्योती मेडपिलवर, पुष्पलता गावंडे, दीप्ती बिष्ट यांनी लॅब इन कॅरीबॅग नावाचा उपक्रम राबवला. तीन वर्षापूर्वी राज्यातील माध्यमिक विज्ञान शिक्षकांसमोर प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयोग सादर केला होता. यंदाही या अपूर्व मेळाव्यात डू इट युवरसेल्फ अंतर्गत २५ विविध प्रयोगांचे दालन सुरू करण्यात आलेत.
२००६ पासून नागपूर महापालिकाच्या शिक्षिकासुद्धा या अपूर्व मेळाव्यात सक्रियपणे सहभागी होताहेत. यामधे दीप्ती बिष्ट, पुष्पलता गावंडे, ज्योती मेडपिलवार, नीता गडेकर, नीलिमा अढाऊ, मनीषा मोगलेवार, नीता गडेकर, वंदना चव्हाण, छाया कौरासे, सुनीता झरबडे, संगीता कुळकर्णी यांचा समावेश समावेश आहे. ज्योती मेडपिलवार, पुष्पलता गावंडे, दीप्ती बिष्ट या शिक्षिका राज्य शालेय शिक्षण विभागातील पाठपुस्तक मंडळ अंतर्गत विज्ञान विषय अभ्यास मंडळाच्या सदस्या आहेत. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय प्रशिक्षण तज्ञ म्हणूनही भूमिका निभावतात.
विज्ञानातील सोपे सोपे प्रयोग सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावेत म्हणून सुरेश अग्रवाल यांनी कुठलाही व्यावसयिक दृष्टीकोन न बाळगता हा मेळावा सुरु केला. ज्या प्रमाणात हा अनुभव सर्वत्र पोचायला हवा होता तेवढा तो न पोचल्याने त्यांच्या सहकार्यांनी हे प्रयोग पुस्तक स्वरुपात लेखनबद्ध केले. हिंदी भाषेत ‘घरेलू सामग्री से विज्ञान प्रयोग’ करे आनंद ले और सीखे या शीर्षक खाली ते या मेळाव्यात उपलब्ध असतात. शिवाय युट्यूबवर ५०० प्रयोगांची मालिका science with suresh agrawal या नावाने कुठलीही जाहिरात न जोडता उपलब्ध आहे.
हेही वाचाः
भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट
महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट
(लेखक हे अमरावतीचे रहिवासी असून माध्यम आणि शिक्षण अभ्यासक आहेत.)