असाही एक पोल आहे, ज्यानुसार मोदींना सरकार बनवणं सोपं नाही

२० मे २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे.

एक्झिट पोल्सनी फिर एकबार मोदी सरकारचा राग आवळल्याने इतके दिवस गटांगळ्या खाणाऱ्या शेअर बाजाराने आज उसळी घेतली. जणू काही एक्झिट पोल काय सांगतात हे ऐकण्यासाठीच शेअर बाजारात उलाढाल करणारे एवढे दिवस वाट बघत बसले होते. या सगळ्यांची उत्सुकता एक्झिट पोल्सनी भागवली. यात भाजप प्रणित एनडीएची पुन्हा सत्ता येतेय, तर काँग्रेसच्या यूपीएच्या जागांमधे वाढ होतेय.

फिर एक बार मोदी सरकारचा कल

लोकसभा निवडणुकीचं सातही टप्प्यांतलं मतदान काल संपलं. त्याबरोबरच जवळपास सगळ्यांच चॅनलवर एक्झिट पोलही आले. कुणीकुणी तर दोन दोन जणांकडून पोल करून घेतले. या सगळ्यांत एक गोष्ट दिसली. ती म्हणजे, फिर एक बार मोदी सरकार हा ट्रेंड यंदा कायम राहणार आहे. काही जणांनी तर गेल्यावेळपेक्षा यंदा भाजप आघाडीला जास्ती जागा मिळणार असल्याचा दावा केलाय.

२३ मेला निवडणुकीचा निकाल येईल. पण कालचा दिवस एक्झिट पोलच्या नावावर राहिला. त्यामुळे सगळीकडे पोलपोलची चर्चा सुरू झालीय. या सगळ्यांमधे एक पोलने खळबळजनक आकडेवारी दिली. सगळ्यांनीच फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिल्याने या पोलकडे दुर्लक्ष झालं. हा पोल मोदी सरकारची झोप उडवणारा आहे.

हेही वाचाः देशभरातल्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात, ते इथे वाचा

प्रादेशिक चॅनलचा वेगळाच ट्रेंड

एबीपी न्यूज, रिपब्लिक, रिपब्लिक भारत, टाईम्स नाऊ, न्यूज १८, आज तक, इंडिया टीवी, न्यूज २४, सूदर्शन न्यूज, न्यूज नेशन, न्यूज एक्स या ११ न्यूज चॅनेलनी वेगवेगळ्या संस्थांनी केलेले एक्झिट पोल दाखवले. काही ठिकाणी प्रादेशिक न्यूज चॅनलनीही आपआपले पोल केले. प्रादेशिक चॅनलचे पोल हे नॅशनल पोलच्या उलट असल्याचंही समोर आलं. महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं, तर साम टीवी केलेल्या एक्झिट पोलमधे भाजप, शिवसेना युतीचं खूप मोठं नुकसान होतंय.

दहापैकी आठ पोलमधे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळतंय. रिपब्लिक सी वोटरच्या पोलमधे भाजप काठावरचं बहुमत पार करून २८७ जागांवर पोचेल, असं दिसतंय. पण सहा पोलमधे तर भाजप तीनशे पार करेल, असं म्हटलंय. तिघांनी भाजप आघाडीला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा वादा केलाय. तर एबीपीने एनडीएला काठावरचं बहुमत दिलंय. भाजपला २७७ तर काँग्रेसला १३० आणि इतरांना १३५ जागा मिळू शकतात, असा दावा केलाय.

न्यूज एक्सचा सर्वे भाजपची झोप उडवणारा

न्यूज एक्स आणि नेताचा असा एकमेव सर्वे आहे, ज्यात मोदी सरकारच्या हातून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी जाताना दिसतेय. न्यूज एक्स - नेताच्या पोलमधे भाजप आघाडीला २४२ तर काँग्रेसला १६२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यूपीतल्या सपा, बसपाच्या महागठबंधनलाही ४३ जागा दिल्यात. तर इतरांच्या खात्यात १२७ जागा जातील असा दावा केलाय.

या पोलनुसार, यूपीमधे भाजपला ३३, तर महागठबंधनला ४३ जागा मिळू शकतात. काँग्रेसच्या वाट्यालाही चार जागा येतील. गेल्यावेळी गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधे मिळून काँग्रेसला तीन जागा मिळाल्यात. पण न्यूज एक्सच्या पोलनुसार, या राज्यांमधे काँग्रेसच्या जागांमधे जवळपास ३३ जागा वाढताना दिसताहेत. तसंच तामिळनाडूमधे डीएमकेसोबतच्या आघाडीने युपीएच्या खात्यात ३१ पैकी २० जागा येतील.

हेही वाचाः एक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे

ममता बॅनर्जींनी एक्झिट पोल फेटाळले

हिंदी पट्ट्यात आपल्या जागा कमी होऊ शकतात, हे ओळखून यंदा भाजपने पश्चिम बंगालमधे खूप ताकद लावली. एक्झिट पोलच्या दाव्यानुसार भाजपच्या या मेहनतीला फळ येताना दिसतंय. या पोलमधेही भाजपला ११ तर तृणमुल काँग्रेसला २९ आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील.

पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सगळ्याच एक्झिट पोलचे दावे फेटाळलेत. त्यांनी आपल्या ट्विटमधे म्हटलं, 'एक्झिट पोलच्या गावगप्पांवर माझा विश्वास नाही. या गावगप्पांच्या माध्यमातून हजारो इवीएममधे फेरफार करण्याची मूळ योजना आहे. त्यामुळेच मी सगळ्या विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि निर्भीड होण्याचं आवाहन करते. आम्ही सगळ्यांनी मिळून ही लढाई लढली पाहिजे.'

हेही वाचाः 

निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज

कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली

महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?

भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी!