चला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया!

०५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.

नवरात्र हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा उत्सव. देशभरात ९ दिवस हा सण उत्साहानं साजरा केला जातो. घराण्याच्या कुलदेवतेचं देवत्व अधिक प्रभावी व्हावं, तिची घरादारावरची, कुटुंबावरची कृपा कायम राहावी म्हणून हा सण साजरा केला जातो.

नऊ दिवस देवीचा जागर होतो. देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी रात्री गरबा खेळला जातो. गाणी लावली जातात. तरूण मुलंमुली दांडिया खेळतात. रात्रीचा उपवास सोडण्यासाठी अन्नपदार्थांची चंगळ-मंगळ असते. नुसती धमाल!

नवरात्र हा विशेष म्हणजे महिलांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा एक सण आहे. नवरात्रीतल्या नऊ रंगांनी तर या उत्साहात नवे रंग भरलेत. हे नऊ दिवस, नऊ रंगांचे पोशाख घालण्याचा ट्रेंडच एखाद्या प्रथेप्रमाणे नवरात्रीशी जोडला गेलाय. याची एक मजेशीर गोष्ट आहे.

नवरंगी ट्रेंड आला कुठून?

खरंतर, नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे घालणं ही काही कुठलीही प्रथा नाही. नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसून, दागदागिने घालायचे आणि त्याचे फोटो काढून ते वायरल करायचे असा नवा ट्रेंड काढून आत्ताच्या काळात या  सणामधे मार्केट फंडा घुसवण्यात आलाय. आता नऊ दिवस रोज एकएका रंगाचे कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधनं वापरून महिला मस्तपैकी नटतात.

ऑफिस, कॉलेज, ट्रेनपासून अगदी गल्लोगल्ली नवरात्रीचे नऊ दिवस मुलींसोबतच चाळीशी पन्नाशीतल्या महिलाही फॉलो करताना दिसतात. त्यासाठी नवरात्रीचा सण जवळ आला की त्या त्या रंगाचे कपडे आणि त्यावर मॅचिंग गोष्टी घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. या सगळ्यात कपडे, दागिने बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या दुकानदारांची मस्त चंगळ असते!

हेही वाचाः बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक

रंगाचा असाही अर्थ! 

नवरात्रीच्या या रंगांचा वेगळाच अर्थ लावत सामाजिक संदेश देणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियात फिरताहेत. या पोस्टमधे लाल, काळा, पिवळा असे रंग नव्हते, तर नवरात्रीच्या दिवसात महिलांचा सन्मान करायला शिकवणारे हे रंग होते. पहिला रंग स्त्री भ्रूण हत्या थांबण्याचा. दुसरा रंग मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा, तिसरा रंग मुलीच्या शिक्षणाचा असे हे नऊ दिवसांचे नऊ रंग.

पुण्यात समाजबंध नावाची संस्था चालवणाऱ्या सचिन आशा सुभाष या तरूण मित्राने हीच थीम घेऊन यंदाचा नवरात्री उत्सव साजरा करायचं ठरवलंय. त्यासाठी सचिन रोज सकाळी एक पोस्टर त्याच्या वॉट्सअप आणि इतर सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर करतो. त्या त्या दिवशीच्या रंगाचं महत्व सांगणारा छोटासा मजकूर या पोस्टरमधे लिहिलेला असतो.

समाजबंध संस्था मोठ्या ब्रॅंड्सचे सॅनिटरी नॅपकिन्स न परवडणाऱ्या मुलींसाठी कापडी पॅड स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचं काम करतते. यासोबतच, मुलींना मासिक पाळीसंबंधीचं योग्य शिक्षण देणं आणि समाजमनात मासिक पाळीसंबंधीच्या अंधश्रद्धांचं जाळं झटकण्याचं महत्वाचं काम सचिन करतो.

महिलांच्या सन्मानाचा विचार

सचिनचं हे काम हीच त्याच्यासाठी देवीची पुजा आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण सचिन एवढ्यावरच थांबत नाही. ज्या स्त्रीची देव्हाऱ्यात आरती केली जाते त्याच बाईवर कुणीही अन्याय करू नये यासाठी सचिननं हा उपक्रम चालवलाय.

गेले सहा दिवस सचिन एक पोस्टर आपल्या सोशल मीडियावरून शेअर करतो. या मजकुरात पाच, सहा ओळी लिहिलेल्या असतात. त्या दिवशीच्या रंगाचं नेमकं महत्व काय हे या छोट्याशा मजकूरात खूप अर्थपूर्ण पद्धतीनं लिहिण्यात आलंय. याविषयी सचिन म्हणतो, ‘वाचणाऱ्याने निदान एक दिवस त्यात सांगितलेल्या गोष्टीवर विचार करावा म्हणून मी हा उपक्रम चालू केलाय.’

‘सोशल मीडियावर सगळ्यांना लहान लहान वाचायचं असतं. खूप मोठे संदेश वाचायला कोणाला वेळ नसतो. म्हणूनच बाईला सन्मान द्यावा यासाठी लोकांना ज्या ९ गोष्टी कळणं गरजेच्या आहेत त्या पाच ते सहा ओळीत, पोस्टर्सच्या माध्यमातून पोचवण्याचा मी प्रयत्न करतो,’ असं सचिनने कोलाजशी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

मोजक्या शब्दांत मांडणं अवघड

सचिन ज्या गोष्टी सांगतो त्याला खरंतर खूप मोठे राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. बाईला दुय्यम का मानलं जातं हे समजून घेण्यासाठी अनेक सिद्धांतांचा, पुस्तकांचा अभ्यास स्त्रीवादी लोक करत असतात. हा अभ्यास अफाट असतो.

पण हा सगळा अफाट अभ्यास फक्त पाच ते सहा ओळीत बसवण्याची जादू सचिनने साधलीय. त्यामुळे त्याला जे म्हणायचंय ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं यासाठी सचिनने अगदी थोड्या शब्दांत केलेली ही पोस्टर्स फारच भारी आहेत. त्यामुळेच ती सोशल मीडियात वायरल झालीत.

हेही वाचाः मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?

धार्मिक भावना न दुखावण्याची काळजी

उद्याचा रंग कोणता, त्यात काय लिहायचं, कसं लिहायचं या सगळ्याचा सचिन आणि त्याची बायको शर्वरी आदल्या रात्री बसून विचार करतात. पोस्टरचं डिझाइन कसं करायचं, त्यावर काय संदेश लिहायचा, जो संदेश लिहायचाय त्याची सध्या गरज काय अशी सगळी चर्चा दोघं मिळून करतात. आणि मग कुठला रंग घ्यायचा हे ठरलं की त्याबद्दल थोडक्यात कसं लिहिता येईल हे ठरवतात.

‘पोस्टरवर काय लिहायचं हे ठरवताना लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत ना याची आम्ही फार काळजी घेतो,’ असं सचिन सांगतो. पोस्टरवर चांगल्या हेतूने काही लिहिलं गेलं आणि त्याचा भलताच अर्थ निघाला तर हे पोस्टर्स काढण्याची, या रंगांना वेगळा अर्थ देण्याची मूळ संकल्पना मागे पडून उलट धार्मिक भावना दुखावल्यानं सोशल मीडियावर त्यांची संस्था ट्रोल होऊ नये, याची ते फार काळजी घेतात.

दिवसभाराची कामं झाली की रात्री दोघं पोस्टर तयार करण्याचं काम करायला बसतात. देवीची जशी रोज आरती केली पाहिजे तसं हे काम दोघं रोज करतात. चर्चा करून, रंग काय निवडायचा हे ठरवून त्याचं पोस्टर बनवण्यापर्यंत दोनएक तास सहज खर्च होतात. त्यातच त्यांना देवावरची आपली श्रद्धा पूर्ण झाल्यासारखं वाटतं.

बाई म्हणजे माणूस

देवी म्हणजे स्त्रीचं प्रतिक. त्यामुळे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना. घरातली बाई मुलांचा अभ्यास घेते तेव्हा सरस्वती असते. बाहेरून पैसे कमवून आणते तेव्हा लक्ष्मी असते आणि कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर हीच बाई दुर्गेचा अवतार धारण करून राक्षसाला मारूही शकते, असे मेसेजेस आपण नवरात्रीच्या काळात वॉट्सअप, सोशल मीडियावरून फिरवतो. वाचतो.

पण या सगळ्यांपेक्षा सचिन चालवत असलेला उपक्रम खूव वेगळा आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. तो वेगळा आहे, कारण या उपक्रमातून बाईला देवी किंवा दासी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्याला लोकांकडून अपेक्षेहून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याचाच मेसेज त्याला अनेक ग्रुपवर फिरताना दिसतोय.

या नवरात्रीतला पहिला रंग स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा आहे. दुसरा रंग मुलीचा जन्म साजरा करण्याचा. तिसरा रंग आहे मुलीच्या लग्नाऐवजी तिच्या शिक्षणावर खर्च करण्याचा, चौथा रंग आहे बाईबरोबरच पुरुषांनीही घरकाम शिकण्याचा. पाचवा रंग स्त्रीच्या मासिक पाळीचा सन्मान करण्याचा होता.

हेही वाचाः लिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत

दसऱ्याला पुरुषसत्तेचा रावण मारूया

आजचा सहावा रंग आहे, महिलांना हे जग सुरक्षित वाटावं यासाठी प्रयत्न करण्याचा. सचिनची नऊ पोस्टर्स म्हणजे स्त्री सन्मानाची एका उभ्या रांगेतली दारं आहेत. पहिलं पोस्टर, म्हणजे पहिला रंग उलटल्यावर दुसरा उलटायचा, मग तिसरा उलटायचा असं करत करत शेवटच्या नवव्या रंगाकडे जायचं. आणि हा नववा रंग असणार आहे बाई माणूस म्हणून बघण्याचा.

स्त्री देवी आहे म्हणून तिचा सन्मान करावा, त्यापेक्षा स्त्री ही इतर माणसांसारखीच एक माणूस आहे. आणि इतरांना जसा जगण्याचा अधिकार असतो आणि जसा चांगलं जगण्याचा अधिकार असतो तसा बाईला आहे म्हणून तिची भ्रूणहत्या करायची नाही, तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार करायचा नाही असं बाईचं चित्र उभारण्याकडे सचिनच्या या पोस्टर्सचा कल आहे.

प्रत्येक रंगांसोबत सचिन माणसातल्या एकएका पुरुषसत्ताक वृत्तीचं सीमोल्लंघन करायला सांगतो. वासनांध नजरांपासून ते बुसरटलेले विचार आणि गैरसमजांचं सीमोल्लघंन करण्याचं आवाहन सचिनने केलंय. आता येत्या दसऱ्याला पुरुषसत्तेच्या या रावण्याच्या बेंबीत आपल्याला बाण मारायचाय. त्यासाठी आपलं आपलं धनुष्य नव्हे सॉरी, पोस्टर तयार ठेवूया!

समाजबंधच्या या कामाशी स्वतःला जोडून घेण्यासाठी आपण ७७०९४८८२८६ या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतो.

हेही वाचाः 

ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 

चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

आईचं बदललेलं रुप: चार भिंतीतली आई ते स्मार्ट मॉम

हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

मुलामुलींना 'लिव इन रिलेशनशीप'मधे राहावंसं का वाटतं?

तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई