मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?

०३ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास.

रंगरंगिल्या मुंबापुरीत नव्याने येणाऱ्या प्रत्येकाला बॉलीवूडची जादू, चौपाट्यांची गडबड, गेटवे ऑफ इंडिया ते लोकलमधली गर्दी आणि नॅशनल पार्क ते शेअर बाजारातली चांदी, सगळं पाहायचं असतं. सगळ्यांची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याची ताकद असणारं हे घाईगडबडीचं महानगर श्रद्धाळू भाविकांनाही नाराज करत नाही.

मुंबादेवी, महालक्ष्मी या मुंबईच्या कुलदेवता, हाजीअलीचा दर्गा, मोत माऊली अर्थात माऊंट मेरीची जत्रा आणि कान्हेरीचा बौद्धस्तूप असं सगळ्यांसाठी सर्वकाही आहे इथे. तरीही या श्रद्धास्थानांच्या कितीतरी पट भक्तीचा महापूर वाहतो तो प्रभादेवीच्या कॅडल रोडवर. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर मुंबईचं आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या सिद्धिविनायकाचं मंदिर मोठ्या दिमाखात उभं आहे.

कधीही सिद्धिविनायकाच्या देवळात चक्कर मारली की त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. अधिकृत आकडेवारीच द्यायची झाली तर दररोज ३२ ते ३५ हजार भाविक मंदिरात येतात. रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी हीच संख्या सहज दुप्पट होऊन जाते. दर मंगळवारी एक ते दीड लाख जण सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात. तर अंगारकी चतुर्थीला हीच संख्या किमान २० लाख तरी असतेच.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

सिद्धिविनायकाची आख्यायिका

आज सिद्धिविनायक लोकप्रियतेचे असे उच्चांक मोडत असला तरी अगदी सत्तरच्या दशकाआधीपर्यंत श्रींचं दर्शन अगदी सहज होऊन जायचं. आरतीलाही सात आठ डोकी कशीबशी असत. देवळात दिवसाही अंधार असायचा. आताचं आलिशान देऊळ अस्तित्वात आलं ते १९९४ साली. तोपर्यंत हे देऊळ म्हणजे हळूहळू हातपाय पसरणारी गुलाबी रंगाची एक मध्यम आकाराची घुमटी होती.

एक आख्यायिका सांगते की प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबाला स्वप्नात दृष्टांत मिळाला. त्यानुसार एका तळ्यातली सिद्धिविनायकाची मूर्ती त्यांनी शोधली आणि मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केली. पण सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत वेबसाईटनुसार आगरी समाजाच्या देऊबाई पाटील यांच्या सांगण्यावरून सिद्धिविनायकाचं देऊळ बांधण्यात आलं आणि मूर्तीही घडवण्यात आली. देऊबाई या स्वतः निपुत्रिक असल्यामुळे आपल्यासारखं दुःख इतरांना मिळू नये म्हणून त्यांनी हा गणपती स्थापन केला. मंदिराच्या स्थापनेच्या तारखेची नोंद आहे, १९ नोव्हेंबर १८०१.

स्थापनेपासूनच प्रभादेवीच्या पाटलांचा हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. साधारण विसाव्या शतकात भाविकांची गर्दी वाढली असावी कारण या मंदिराच्या मालकीवरून पाटील कुटुंबाचा वाद कोर्टात गेला. विश्वाला न्याय देणारा हा सिद्धिविनायक १९३२ सालापासून एकविसाव्या शतकापर्यंत कोर्टकज्ज्यात अडकला. चार वर्षात कोर्टाने त्यावर सरकारी विश्वस्त नेमला गेला. पण प्रत्यक्ष कारभार हाकत होता पुजारीच. त्याआधी या उजव्या सोंडेच्या जागृत गणेशाची पूजा शेतकरी कुटुंबाकडूनच होत होती.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष २: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

टीका केल्यामुळे माधव गडकरींना तुरुंगवास

गोविंद फाटक नावाच्या पुजाऱ्याने या बेवारस मंदिरातून बरीच माया जमा केल्याचे आरोप सत्तरच्या दशकात आचार्य अत्रेंच्या `मराठा`ने केलेत. तो वारसा गोमंतकीय दैनिकांचा पाया रचणारे माधव गडकरी यांनी चालवला. त्यांनी `मुंबई सकाळ`मधून ऐंशीच्या दशकातले मंदिराचे विश्वस्त युसूफ देसाई यांच्या कारभाराची लक्तरं काढली. हे देसाई तेव्हाचे मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांचे साडू होते. त्या टीकेमुळे गडकरींना तुरुंगवासही भोगावा लागला. पण शेवटी त्यांचा लढा यशस्वी झालाच.

१९८० मधे सरकारने वेगळा कायदा करून श्रीसिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट स्थापन केला. त्यानुसार न्या. म. द. कांबळींच्या अध्यक्षतेत पहिली विश्वस्त समिती स्थापन करण्यात आली. त्यासोबत एक सरकारी अधिकारी दैनंदिन कारभारासाठी नेमण्यात आला.

सरकारी समितीने कारभार हाती घेतला तेव्हा ८५ लाख रुपये देवस्थानात जमा होते. त्यानंतर पहिल्याच महिन्याचे उत्पन्न दीड लाख होते. याचा अर्थ ८० सालीच हे मंदिर श्रीमंत होते. सरकारी नियंत्रणानंतर या पैशाचा विनियोग तुलनेने चांगला होऊ लागला. जागतिकीकरणाच्या बदलांनुसार हा विश्वविनायक बदलू शकला तो त्यामुळेच.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

ऐंशीच्या दशकात सेलिब्रिटी वलय

ऐंशीच्या दशकातच एक महानायक विनायकाकडे मदतीसाठी याचना करत आला. त्यामुळे सिद्धिविनायकाचीच लोकप्रियता वाढली. कुली सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चनला जीवघेणा अपघात झाला. जया बच्चनने नवस केला. तो त्यांनी सहकुटुंब येऊन फेडला. एक अमिताभवेडा तर थेट सूरतहून सिद्धिविनायकापर्यंत उलटा चालून आला होता. तेव्हापासून सेलिब्रेटी आणि सेलिब्रेटींसोबत देशभरातले जगभरातले भाविक सिद्धिविनायकाकडे येऊ लागले.

संजय दत्त बॉम्बस्फोट खटल्यामुळे आला. तसाच सलमानही आला. लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर यांचं तर हे श्रद्धास्थान आहेच. पण आजकाल सनी लिऑन आणि राखी सावंतही इथे येऊन आध्यात्मिक समाधान मिळाल्याचे बाईट देतात.

काही वर्षांपूर्वी सिद्धिविनायकामुळे पूर्ण झालेल्या मनोकामनांवर एक सिनेमा आणि एक टीवी सिरियल तयार करण्यात आली होती. पण त्याची वेगळी गरज नसल्यामुळे कुणी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. आज सिद्धिविनायक इंटरनेटवर आहेत, मोबाईलवर आहेत, सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय आहेत. प्रत्यक्षातही हे मंदीर सदैव गजबजलेलं असतं. त्यात तरुणांचा, कॉर्पोरेटी कर्मचाऱ्यांचा, व्यावसायिकांचा भरणा मोठा असतो.

बिग बींना पाडली नवी प्रथा

मुलं जन्मल्यावर त्यांना एकदा सिद्धिविनायकाच्या पायावर घालण्याची मुंबईकरांची प्रथाही जन्मली आहे. शिवाय ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नानंतर अमिताभ सहकुटुंब आपल्या जुहूतल्या घरापासून वीस, बावीस किलोमीटर चालत आला होता. तेव्हापासून सोमवारी रात्रभर चालत हजारो भक्तगण मंगळवारी सकाळी सिद्धिविनायकाला पोचतात. त्यात प्रेमी युगुलांची आणि तरुणांच्या ग्रुपचीही संख्या मोठी असते. एरवीदेखील सिद्धिविनायक हा प्रेमीजनांच्या भेटीचं एक लाडकं ठिकाण आहेच.

९० ते ९४ या चार वर्षांत आजचं देखणं मंदिर उभं राहिलं. यात श्रींचा सुंदर आणि समृद्ध गाभारा आहे. वरच्या मजल्यांवर कारभाऱ्यांची कॉर्पोरेट कार्यालयं आहेत. तसंच दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांसाठीचे विसावे, प्रसाद बनवण्याचं स्वयंपाकघर आणि गडकरींच्या आग्रहावरून सुरू करण्यात आलेले सुसज्ज ग्रंथालय आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे.

पण हा मुलामा लावल्यानंतर काही काळात उतरला होता. त्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. हायकोर्टाने मंदिराच्या उत्पन्नातून होणाऱ्या मदतवाटपासाठी स्पष्ट नियम बनवायला लावल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप बऱ्यापैकी थांबलेत. ट्रस्टमुळे दरवर्षी लाखो गरजूंना आरोग्य आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांची मदत होते. आपत्तींमधे ट्रस्ट सढळ हाताने मदत करताना दिसते.

ट्रस्टने डायलिसिस सेंटरदेखील उभं केलंय. त्याचा फायदा रूग्ण मोठ्या प्रमाणात घेत आहेत. तरीही मंदिर समितीवर झालेल्या नेमणुका या बहुतांश राजकीय असतात. त्यामुळे मदतीमधे आपापल्या माणसांसाठी पक्षपात होत असल्याचे आरोप होतच असतात.

हेही वाचाः 

पुढच्या वर्षी लवकर आलाय माघी मोरया

'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली