'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.
पंधरा महिन्यांपूर्वी ’कोरोना भगाव’चा कार्यक्रम देशवासीयांना टाळ्या-थाळ्या वाजवायला लावून सुरू करणार्या आपल्या प्रधानमंत्रींनी आता 'लशीचे मनावर घ्या,' असं आवाहन जनतेला केलंय. ’कोरोना’च्या तिसर्या लाटेचं संभाव्य संकट आणि लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडियो कार्यक्रमातून लसीकरणासाठी आवाहन करताना, 'कोरोना वायरस बहुरूपी आहे. तेव्हा महामारी संपली असं समजण्याची चूक करू नका,' असा इशाराही दिलाय.
या बदलाला देशातल्या कोरोना बळींच्या संख्येने ३ लाखाचा आकडा ओलांडल्यावर आलेलं शहाणपण म्हणता येत नाही. कारण कोरोना वायरसला 'बहुरूपी' म्हणणारे स्वत:ही तसेच आहेत. म्हणूनच ’विज्ञान’युक्त लसीकरणाचा आग्रह धरताना त्यांनी ज्योतिषशास्त्राचं थोतांड चर्चेला आणलंय.
'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'ज्योतिषशास्त्रा 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्यात ज्योतिषशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांबद्दलचं व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाईल. 'ज्योतिषशास्त्र हे अवैज्ञानिक असल्याने हा अभ्यासक्रम रद्द करावा,' अशी मागणी विज्ञान प्रचार-प्रसाराचं काम करणार्या संस्था-संघटना करतायत.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून 'ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते ’छद्म विज्ञान’ आहे. ग्रह-तार्यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्या विज्ञान शाखेला ’खगोलशास्त्र’ म्हणतात. त्या शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार, आकाशातल्या ग्रह तार्यांचा माणसाच्या जगण्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचं प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा 'ज्योतिष' अभ्यासक्रम रद्द करावा अशी मागणी केलीय.
ही मागणी योग्य आणि विज्ञान प्रसाराचा आग्रह धरणाऱ्या भारतीय संविधानाला धरून आहे. अशाच प्रकारचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय २००१ मधे भाजप आघाडीच्या वाजपेयी सरकारनेही घेतला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. हा विरोध करण्यात ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांचाही समावेश होता. भारतीय वंशाचे ’नोबेल’ पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ वी. के. वेंकटरामन यांनी ज्योतिषशास्त्राची तुलना ’छद्म’ विज्ञानाशी केलीय.
हेही वाचा: चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता
'छद्म' विज्ञान म्हणजे, विज्ञानासारखी मांडणी करून केलेली फसवणूक! यात ज्योतिषशास्त्र ’क्रमांक एक’ वर आहे आणि ते विविध प्रकारे जगभर आहे. या सार्यांचा उद्योग आकाशातल्या ग्रह-तार्यांवर असतो. त्यातही भारतीय ज्योतिष्यांनी आपली उंची वाढवण्यासाठी भटी शेंडी लावल्याने आकाशात नसलेले ’राहू-केतू’ हे काल्पनिक ग्रह जन्मकुंडलीत आणलेत. ते ’कालसर्पयोग’ बनून म्हणजे ज्याची जन्मकुंडली तयार केली आहे त्या जातकाला नारायण-नागबळी विधीसाठीचं गिर्हाईक बनवतात.
याशिवाय, शनीची साडेसाती, २२ कोटी किलोमीटर लांब असलेल्या मंगळाची कडक बाधा, हातावरच्या गुरू-बुध-शुक्राचा दुबळेपणा दाखवणाऱ्या रेषा, चिन्हं, उंचवटे जाळ्या आहेत. शुभ अशुभ दिवसाचं, मुहूर्ताचं खूळ आहे. वास्तुशास्त्र, नाडी माहात्म्य, जपजाप्य- मंत्रमाहात्म्य यांचे उपाय तोडगेही आहेत. या सगळ्या बनावट उद्योगांसाठी ’मास्टर ऑफ आर्ट’ ज्योतिषी बनवून मोदी सरकार लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशावर हात मारणारे खिसेकापू आणि दरोडेखोर तयार करणार आहेत का?
छत्रपती शिवरायांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या चरित्राची नटव्या-नाटकी शब्दांत विटंबना करणाऱ्या कथित शिवशाहीर ब. मो. पुरंदरेंना 'महाराष्ट्रभूषण पुरस्कार' देऊन फडणवीस सरकारने त्याच्या नालायकीला सरकारमान्य केलं. तोच प्रकार मोदी सरकार राष्ट्रीय युनिवर्सिटीतून ज्योतिषशास्त्राचा मास्टर डिग्रीचा अभ्यास राबवून नकली विज्ञानाला' सरकार मान्यता देऊन करतंय.
२,००० कोटी रुपये खर्चून तयार केलेलं भारताचं चांद्रयान चंद्रावर पोचलं नाही. ते पोचणार नाही, असं भाकित देशातला एकही ज्योतिष करू शकला नाही. तिथं मोदी सरकारने तयार केलेले मास्टर्स ज्योतिषी लोकांच्या कुंडल्या मांडून, हस्तरेषा पाहून त्यांच्यावर आकाशातल्या ग्रहतार्यांचा प्रभाव किती पडतो, याचा काय डोंबलाचा अभ्यास करणार आणि त्यांचं भविष्य सांगणार?
आईवडील, पूर्वजांचे गुण-दोष अपत्यात उतरतात. तसं, 'चंद्रसूर्यादी ग्रहांवरून येणार्या लहरींचे ठसे गर्भातून बाहेर येताना अर्भकाच्या मृदू शरीरावर उमटतात आणि त्याच्यात काही शारीरिक आणि बौद्धिक दोष जन्मत:च निर्माण करतात!' या गृहीतकावर ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभाय. पण, चंद्रसूर्यादी ग्रहतार्यांच्या प्रकाशलहरींचा कोणताही परिणाम अर्भकावर होत नाही, हे विज्ञानाने सिद्ध केलंय.
कारण सूर्याचा प्रकाश आपणापर्यंत आठ मिनिटांनंतर पोचतो. इतर ग्रहतार्यांच्या प्रकाशलहरी आपल्यापर्यंत पोचायला शेकडो वर्ष लागतात. अशा परिस्थितीत ग्रहतार्यांचे प्रभाव, परिणाम माणसाच्या जीवनावर कसा होणार?
हेही वाचा: तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
ग्रहताऱ्यांचे असे कोणतेही परिणाम होत नाहीत, हे इयत्ता तिसरीच्या पुस्तकात शिकवायचं आणि ’एमए’ला त्याच्या उलटं शिकवायचं, हा मोदी सरकार पुरस्कृत उफराटेपणा आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा देशी बाणा दाखवला जातो. तोही खोटा आहे. कारण १२ राशी आणि जन्मकुंडलीतल्या १२ घरांत लोकांना गिर्हाईक बनवणारं ज्योतिषशास्त्र हे भारतीय नाही. १२ राशी ही ग्रीक कालगणना पद्धत आहे. भारतीय कालगणना ही २७ नक्षत्रांवर आधारित आहे.
राशीला आलेल्या ग्रहांचा इष्ट-अनिष्ट परिणाम अनिवार्य किंवा अटळ असतो, असं ज्योतिषीही मान्य करत नाही. तसा इतिहास नाही. तरीही भय, अज्ञान, अगतिकता यामुळे लोक ज्योतिष्यांचे 'गिर्हाईक' बनतात. अरिष्ट टाळण्यासाठी, ग्रहशांती करण्यासाठी तोडगे-विधी करतात.
थोरले माधवराव पेशवे यांना क्षयरोगाने मृत्यूच्या दाढेत लोटलं. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी मृत्युंजय मंत्राचा गजर अखंड चालू ठेवण्यासाठी शेकडो ब्राह्मण नियुक्त केले होते. तरीही, त्यांच्या मंत्रजागराला न जुमानता मृत्यूने माधवरावांना ओढून नेले!
दुसरं महायुद्ध गाजवणारा जर्मनीचा ’हुकूमशहा’ हिटलरचा ज्योतिषावर नितांत विश्वास होता. त्याने आपल्या दिमतीला पाच प्रख्यात ’ज्योतिर्भास्कर’ बाळगले होते. त्यापैकी एकाला त्याला स्वत:चेच भविष्य न समजल्यामुळे इंग्लंडच्या हेरांनी पळवून नेलं. उरलेले चार हिटलरला सल्ला द्यायला तत्पर होते. पण त्यांच्या सल्ल्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही, असंच इतिहास सांगतो.
आपला संपूर्ण पराभव होऊन शत्रूच्या हातात सापडण्याची नामुष्की टळावी, यासाठी हिटलरने स्वत:ला स्वत:च्या हाताने पेटवलेल्या भडाग्नीत जाळून घेतलं. हा निर्घृण प्रकार टाळण्यासाठी ग्रहांची अनुकूल स्थिती मिळवण्यात ज्योतिष्यांना यश मिळालं नाही. चौघांपैकी एका ज्योतिष्याला तर हिटलरच्याच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधे मृत्यू आला.
हिटलरचा विश्वासू मित्र हिमलर याचाही ज्योतिषशास्त्रावर गाढ विश्वास होता. त्याने हिटलर जगजेता व्हावा, यासाठी ’मंत्र-तंत्रज्ञ’ अशा चोवीस ज्योतिष्यांवर चमत्कारिक सहाय्याचं काम सोपवलं. त्यातल्या एका ज्योतिष्याने इटलीच्या नकाशावर 'सिद्धिलंबक' ठेवला. त्या लंबकाच्या डोलण्याने हिटलरच्या यशाची खात्री दिली होती. पण भविष्य उलटं फिरलं.
हेही वाचा: हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?
राजर्षी शाहू महाराजांकडे भविष्यकथन करण्यासाठी एक नामवंत ज्योतिषी आला. शाहूराजांनी त्याला दोन दिवसांच्या कडक उपासाचा आणि चाबकाच्या फटक्यांचा पाहुणचार दिला. तो टाळण्यासाठी ज्योतिषी गयावया करू लागला. शाहूराजांनी त्याला सुनावलं, ‘दोन दिवसांनी तुझ्यावर कोणतं संकट कोसळणार आहे, ते तुला ज्योतिषशास्त्राने समजत नाही. तू काय माझं भविष्य सांगणार? लोकांना फसवण्याचे धंदे बंद कर!'
ज्योतिषशास्त्राचा खोटेपणा शाहूराजांनी कृतीतून सप्रयोग उघडा पाडला. '१९६४ ला तिसरं महायुद्ध होणार', '२००० ला जगबुडी होणार', त्याआधी 'हिमालय वितळणार', अशी भविष्यकथनं नामवंत ज्योतिष्यांनी केली होती. ती खोटी ठरली. 'गांधीजींची हत्त्या होणार', 'कॉम्प्युटरवरून कुंडल्या निघणार', 'टीवीवरून ज्योतिष सांगितलं जाणार', 'जगाला लॉकडाऊन करणारी कोरोना महामारी येणार', याबद्दल सावधानतेचा इशारा देणारं भविष्य जगातल्या एकाही ज्योतिष्याने कथन केलेलं नाही. ही शास्त्रात ’उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक’ ठरवणारीच चलाखी आहे!
लग्नासाठी जन्मपत्रिकचे ३६ गुण जुळवण्याच्या बहकाव्यातून वर्ण्य जाती व्यवस्थेची तुच्छता ज्योतिषशास्त्रातून पोसली जाते. उच्च जातीतल्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा आणि कनिष्ट जातीतल्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीचा एकएक गुण जुळणीत कमी होतो. अशा जातिभेद घट्ट करणाऱ्या शास्त्राचं भविष्य हे त्याच्या इतिहासासारखंच खोटं ठरणार. हे असंख्य पुराव्यांनिशी स्पष्ट झालंय.
'आकाशातल्या आणि कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह श्रेष्ठ असतो,' अशी खात्री लोकांना देण्याची आज आत्यंतिक गरज असताना मोदी सरकार मात्र राष्ट्रीय युनिवर्सिटीतून मास्टर्स ज्योतिषी तयार करत आहे. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.
हेही वाचा:
इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट
(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या ताज्या अंकातील संपादकीय आहे)