जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?

११ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?

जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी संध्याकाळी अमळनेर इथं कार्यकर्ता मेळावा सुरू होता. इतक्यातच काही कार्यकर्ते घोषणा देऊ लागले. जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झालं.

नेमकं काय झालं?

भर स्टेजवरच जिल्हाध्यक्ष वाघ यांनी डॉ. पाटील यांच्यावर हल्ला चढवला. बालेकिल्ल्यातच आपला नेता संतापल्याचं बघून वाघ समर्थकांनीही पाटील यांच्यावर हात साफ करून घेतला. त्यांना खाली लोळवत लाथाबुक्यांनी ठोकून काढलं. काहीजणांनी तर पाटील यांना मारण्यासाठी जोडेही हातात घेतले. मग प्रकरण वाढत असल्याचं बघून मंचावरच असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली.

पण तोपर्यंत वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी पाटील यांचं नाक फोडलं होतं. हा सगळा प्रकार सुरू असताना स्टेजवर एक पोलिस अधिकारीही होता. पण हे सगळं बघून स्टेजवरचा हा पोलिस अधिकारी कावरंबावरं फिरत होता. हा सगळा प्रकार अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. याचे वीडिओही आता सोशल मीडियावर वायरल झालेत. टीवीवाल्यांनाही हे वीडिओ चालवलेत.

वाघ समर्थकांच्या हाणामारीत आपल्या नाकाला मार लागल्याचं माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तसंच आपणही वाघ यांना दोनचार लाथा घातल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे भाजपचे राज्यातले संकटमोचक म्हणून वावरणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हतबल होतं या सगळ्या प्रकाराचा निषेध केला. स्मिता वाघ यांनी पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय.

भाजपचे पुढारी कशामुळे आले हातघाईवर?

आतापर्यंत आपण कार्यकर्त्यांमधल्या फ्रीस्टाईल हाणामाऱ्या, हातसफाईचे प्रकार बघितलेत. पण जळगाव भाजपमधला वाद आता पुढाऱ्यांच्या हाणामारीपर्यंत पोचलाय. यावरून भाजप जळगावमधे किती असंतोष खदखदत होता, याचा अंदाज येऊ शकेल. 

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

भाजपने राज्यातले जवळपास सगळीकडचेच उमेदवार जाहीर केले. पण जळगावचा उमेदवार मात्र काही केल्या जाहीर होत नव्हता. पण शेवटी विधानपरिषदेतल्या आमदार आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची बायको स्मिता वाघ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे त्यांनी थेट पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल बंडाचा झेंडा फडकवला. वाघ यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.

पाटील यांची नाराजी सुरू असताना वाघ मात्र दणक्यात प्रचाराला लागल्या. शंभरेक गावं पालथी घातली. दोघंही गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपसाठी काम करताहेत. वाघ दाम्पत्याने सुरवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलंय. नंतर त्यांना भाजपमधे पाठवण्यात आलं. हे सगळं नेटवर्क वाघ दाम्पत्यांनी कामाला लावलं.

तिकीट कापाकापीच राग जिव्हारी

स्मिता वाघ रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत उमेदवारी भरायलाही गेल्या. पण वाघ यांनी काही उमेदवारी भरली नाही. चांगला मुहूर्त नसल्याने आज अर्ज भरला नसल्याचं सांगितलं. पण प्रचार थांबला नव्हता. तेवढ्यात पक्षाच्या आमदारांनी वाघ यांची उमेदवारी बदलण्याची मागणी सुरू केली. 

हेही वाचाः भाजपच्या जाहीरनाम्यातून काय समोर आलंय?

तितक्यात उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आला. अखेरच्या क्षणी स्मिता वाघ यांचं अधिकृत तिकीट कापण्यात आलं. चार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधे आलेले चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वाघविरोधी गोटातून जल्लोष करण्यात आला.

या सभेला डॉ. बी. एस. पाटील उपस्थित होते. याआधी पाटील यांनी भाजपच्या नेत्या स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पाटील यांना या सभेतून बाहेर पाठवावं, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांना हटवण्यात आलं नाही. त्यानंतर हा राडा घडला.

हा असंतोष सगळ्या उत्तर महाराष्ट्रातच

रावेर वगळता खान्देशमधल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघात भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तिथे दोनचार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली. धुळ्यामधे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात भाजप आमदार अनिल गोटे यांनीच बंडखोरी करत अर्ज भरलाय.

हेही वाचाः माजी खासदारांच्या पेन्शनवर होतोय अव्वाच्या सव्वा खर्च

नंदूरबारमधे निष्ठावंत कार्यकर्ते सुहास नटावदकर यांच्या मुलीने विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्याविरोधात अर्ज भरलाय. रावेर मतदारसंघातही उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू होती. पण माजी मंत्री आणि मातब्बर नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रावेर मतदारसंघातली संभाव्य बंडखोरी आणि भाजपमधली मोठी फूट टळली.

जळगावात वाघ यांच्या उमेदवारी बदलण्यावरून खान्देशातली भाजपची नामुष्कीच चव्हाट्यावर आली. दुसरीकडे महायुतीतला भाऊ असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारात निष्क्रीय राहण्याची भूमिका घेतलीय. शिवसेनेचे नेते स्टेजवर दिसताहेत. मात्र कार्यकर्त्यांनी प्रचारापासून पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

एका पक्षातले तीन गट एकमेकांविरुद्ध

आतापर्यंत खडसे यांच्या नेतृत्वात काम करणारी जळगावमधली भाजप राज्यात सत्ता आल्यावर तीन गटांमधे विभागली गेलीय. खडसे गटासोबतच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही आपल्या गटाला भक्कम करून घेतलं. या दोघांसोबतच पालकमंत्री म्हणून आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या समर्थकांचा नवा गट तयार केला. या गटबाजीत कधाकाळी खडसे समर्थक असलेल्या वाघ दाम्पत्याचा विरोधी गटाने जुना हिशोब चुकता केला. खडसेंचं पक्षातलं मूल्य कमी झाल्याने वाघ दाम्पत्याने महाजन यांना जवळ केलं होतं.

हेही वाचाः नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?

आज वाघ समर्थकांच्या हाणामारीत नाक फुटलेले अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील हे खडसे समर्थक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी खासदार ए. टी. पाटील यांनी वाघ यांच्या उमेदवारीविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी एक सभा बोलावली होती. त्या सभेत माजी आमदार पाटील यांनी आमदार स्मिता वाघ यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचं बोललं जातंय.

अमळनेरच्या भाजप कार्यकारिणीत आपल्या समर्थकांची वर्णी न लागल्याने डॉ. पाटील बऱ्याच काळापासून वाघ यांच्यावर नाराज आहेत. ही नाराजी दूर व्हावी म्हणून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी नवीन कार्यकारिणीची नियुक्तीच स्थगित केली होती.

आणि झाकून ठेवलेलं कोंबडं आरवलं

त्यामुळे आजच्या सभेपासून डॉ. पाटील यांना दूर ठेवण्याची मागणी वाघ समर्थकांनी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या नाराजीतच आजच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरवात झाली. डॉ. पाटीलही स्टेजवर होते. त्याचवेळी वाघ आणि डॉ. पाटील यांच्यात बाचाबाची झाली. काही क्षणातच वाघ यांनी पाटील यांच्यावर हात साफ करून घ्यायला सुरवात केली. आणि जळगाव भाजपमधलं इतके झाकून ठेवलेलं कोंबडं कॅमेऱ्यापुढे आरवलं.

लोकसभेचं पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या ११ एप्रिलला आहे. राज्यातल्या सात मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश आहे. या मतदानाआधीच भाजपमधला हा वाद जगजाहीर झालाय. आजवर फक्त विरोधी पक्षांतला बेबनाव टीवीवर यायचा. पण जळगावमधल्या आजच्या प्रकारने भाजपमधली अनागोंदीही चव्हाट्यावर आलीय. 

इतके दिवस ही अनागोंदी मॅनेज करण्यात यश आलेल्या भाजपवर ऐन मतदानाच्या तोंडावर नामुष्की ओढवलीय. याचा राज्यभरातल्या पक्षाच्या कामगिरीवर वाईट परिणाम होईल. विरोधी पक्षांतल्या लोकांना पक्षात आणण्याबद्दल एकदा गिरीश महाजन ‘लाथ घालेन तिथे पाणी काढेन’ असं म्हणाले होते. पण आपल्या जिल्ह्यातचं त्यांच्यासमोर लाथ मारण्याचे पक्षांतर्गत प्रयोग होत आहेत.

हेही वाचाः सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?