कस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही

११ एप्रिल २०१९

वाचन वेळ : १२ मिनिटं


गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख.

दक्षिण आफ्रिकेत मोहनदास करमचंदना काट्याकुट्यांची वाट सापडली.

गांधींची बायको असणं आपल्याला कितीला पडणार आहे हे कस्तुरबाईंना दक्षिण आफ्रिकेत समजलं.

गांधी आणि कस्तुरबाई दक्षिण आफ्रिकेत एकमेकांसमोर उभे ठाकले नी आस्ते आस्ते जवळ आले. आपापला विचारव्यूह निश्चित करत करत आणि एकमेकांचा अंदाज घेत घेत दोघांनी आपली स्पेस नक्की केली.

गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले नसते तर काय झालं असतं? काही नाही. राजकोट, पोरबंदरला वकिली करत राहिले असते आणि गबर झाले असते.

नुकसान कस्तुरबाईंचं झालं असतं. आफ्रिकेत मोलमजुरी करून कसंबसं जगणारे तमिळ, तेलुगू, बिहारी आणि उत्तर भारतीय ‘गिरमिटिये’ त्यांना भेटले नसते. गांधींना दक्षिण आफ्रिकेतले अभिन्न सहकारी कॅलनबॅख, पोलॅक, तसंच नामदार गोखले आणि चार्ल्स अ‍ॅण्ड्रूज यांचा स्नेह लाभला नसता. साम्राज्यवादाचे आणि वंशवादाचे धोके कळले नसते. छापखाना कसा चालवतात, पेपर कसा काढतात, गव्हाच्या डबल रोट्या कशा करतात, झाडांची छाटनी कशी करतात हे समजलं नसतं. तुरुंगवास घडला नसता.

हेही वाचाः कस्तुरबा आणि गांधीजी

गांधी काठियावाडला विटले होते. राजकोट-पोरबंदरचं दरबारी राजकारण, हांजीखोरी आणि लाचारी, तिथल्या लोकांची कलुषित मनं, कुटिल डावपेच हे सगळं त्यांना नकोसं झालं होतं. दक्षिण आफ्रिकेला व्यापार करणारे गुजरातेतले मेमण व्यापारी दादा अब्दुल्ला शेठ यांना एक विश्वासू वकील हवा होता. हे समजताच गांधी आपलं चंबूगवाळं घेऊन बोटीत जाऊन बसले. तीन वर्षांनंतर राजकोटला आले. कस्तुरबाई आणि आपल्या दोन मुलग्यांसह दक्षिण आफ्रिकेला परत गेले.

दक्षिण आफ्रिकेतल्या कस्तुरबाईंचा एक सुरेख फोटो आहे. त्या भारदस्त, गर्भश्रीमंत पारशी स्त्रियांप्रमाणे दिसतात. जॉर्जेटची साडी, पूर्ण बाह्यांचा पोलका नी पायात ष्टाँकिंग आणि बूट. डोळ्यांत मोगर्‍याच्या शुभ्र कळ्या.

दक्षिण आफ्रिकेत गांधींची वकिली उत्तम चालली होती. वर्षाला पाच, सहा हजार पौंडांची कमाई. टेबलावर बसून काट्या चमच्यांनी जेवायचं. मुलांचा सांभाळ करण्यासाठी एक इंग्रज गवर्नेस.

त्या काळात एक कारकून गांधींच्या घरी मुक्कामाला होता. तो दलित ख्रिस्ती होता. त्याचा शौच-कूप (चेंबर पॉट) स्वच्छ करावा लागायचा. ते काम गांधी स्वत: करायचे. शारीरिक मेहनत, स्वच्छता, आरोग्य, आहार असे त्यांचे निरनिराळे प्रयोग तेव्हा सुरू झाले होते आणि त्यांत कस्तुरबाईंचा सहभाग असायचा.

एकदा गांधींनी कारकुनाचा पॉट स्वच्छ करण्याचं काम बायकोवर सोपवलं. कस्तुरबाईंनी साफ नकार दिला. म्हणाल्या, ‘इतर पाहुण्यांचा चेंबर पॉट मी स्वच्छ करीन, पण लॉरेंस दलित आहे नी त्यात तो ख्रिश्चन. मला हे काम जमायचं नाही.’

शब्दाला शब्द वाढत गेला. गांधी आपला हट्ट सोडीनात. कस्तुरबाई ऐकीनात. रागाच्या भरात गांधींनी कस्तुरबाईंना ओढत ओढत घराच्या फाटकापाशी नेलं आणि ‘चालती हो’ म्हणाले.

कस्तुरबाईंच्या डोळ्यांतून गांधींच्याच शब्दांत सांगायचं तर ‘आसवांचे मोती’ गळत होते. म्हणाल्या, ‘तुम्हांला काही कळतं का? मी कुठं जाणार? ना इथं माझे आईवडील, ना नातेवाईक. काहीतरी वेडेपणा करू नका. दार लावा. लोकांनी पाहिलं तर.’

कस्तुरबाई कडक शब्दांत आपला निषेध नोंदवतात. तेसुध्दा परक्या देशात. गांधींच्या पुरुषी सत्तेला आव्हान देतात आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा नॉर्मल वागू लागतात. नेहमीप्रमाणे घरातली सगळी कामं करु लागतात.

आपल्या भूमिकेतला विसंवाद गांधींच्याही लक्षात आला असणार. अरेच्चा, एकीकडे आपण साम्राज्यखोर इंग्रजांच्या अनिर्बंध सत्तेशी भांडतोय आणि दुसरीकडे आपण बायकोवरच सत्ता गाजवतो़. आपलं यार चुकलंच!

कस्तुर आपली नवरेशाही सदासर्वकाळ मान्य करणार नाही हा विचारही त्यांच्या डोक्यात चमकून गेला असणार. बॅरिस्टर माणूस तो! त्या काळात मी माझ्या बायकोकडे ‘हिंदू’ नवर्‍यासारखा वागत होतो, अशी कबुली गांधींनी आपल्या आत्मचरित्रात दिलीये.

एक प्रसंग दागिन्यांचा आहे.

१९०१ मधे गांधींनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीयांनी त्यांचा आणि कस्तुरबाईंचा जाहीर सत्कार केला नी त्यांना पुष्कळ मौल्यवान भेटवस्तू दिल्या. दागदागिने वगैरे. कस्तुरबाईंना खास सोन्याचा हार नजर केला.

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

रात्रभर विचार केल्यावर सगळ्या भेटवस्तू परत करून टाकायच्या असं गांधींनी ठरवलं. सकाळी उठल्या उठल्या ते आपल्या दोन्ही मुलांशी बोलले. पोरवयातले हरिलाल आणि मणिलाल लगेच वडलांच्या बाजूचे झाले. मग त्यांनी कस्तुरबाईंकडे विषय काढला. त्या बिथरल्या. ‘नाही देणार या वस्तू परत,’ असं म्हणाल्या. दोघांत वाद झाला.

‘तुम्हांला दागिने घातलेले आवडत नाहीत म्हणून मी अंगावर एकही दागिना ठेवत नाही. पण माझ्या सुनांना दागिने लागतील त्याचं काय? मला ते पाहायला नको? राहिला या दोन मुलांचा प्रश्न. तर ते तुमच्याच चालीवर बागडणार. ते तुमच्या प्रभावाखाली आहेत.’

गांधी म्हणाले, ‘दागिन्यांची हौस असलेली मुलगी सून म्हणून आपल्याकडे येणार नाही. लहान वयात मुलांची लग्नं लावायची नाहीत असं आपण ठरवलंय. मोठेपणी त्यांचं ते पाहतील की.’

‘लहान वयात मनाला सुंदर गोष्टींचा शौक असतो. तुम्ही कसले माझ्या सुनांसाठी दागिने करणार? दोन्ही मुलांना तुम्ही साधुसंत करायला निघाला आहात,’ कस्तुरबाई रडत रडत आपलं म्हणणं मांडत होत्या. आसवांचे मोती कसले, डोळ्यांतून ठिणग्या बरसत होत्या.

मग बॅरिस्टर गांधींनी आपल्या भात्यातून एकदम कायदेशीर बाण काढला. ‘मी इथल्या भारतीयांची सेवा करत होतो. तेव्हा या भेटवस्तूंवर माझा हक्क की तुझा?’

हे ऐकून कस्तुरबाई चवताळून उठल्या. म्हणाल्या, ‘तुम्ही केलेल्या सेवेत माझादेखील वाटा आहे ना! मीसुद्धा रात्रंदिवस राबत असते. तुम्ही माझ्याकडून सगळी कामं करून घेता. आसवं गाळत गाळत मी सगळं करत असते. गुलामासारखी राबत असते मी.’

अखेरीस झालं गांधींच्याच मनाप्रमाणे. त्यांनी सगळ्या भेटवस्तू परत पाठवल्या. दोन्ही प्रसंगांत कस्तुरबाईंची भूमिका नैतिक दृष्ट्या चूक होती, असं गांधींना वाटलं असेल. पण कस्तुरबाईंचा मुद्दा अव्हेरून चालणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलं असणार. कस्तुरबाई म्हणत होत्या की मी माझ्या गतीनं माझी आत्मिक उन्नती साधणार आहे. मला वेळ द्या. गांधींना बायकोचं ऐकावं लागलं. उगाच नाही गांधी म्हणायचे की सत्त्याग्रहाचे पहिले धडे मी कस्तुरबाईंकडून शिकलो.

हेही वाचाः ७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?

या दोन प्रसंगांतून कस्तुरबाईंचं एक हृद्य रेखाचित्र आपल्यासमोर येतं. जीवनाला भिडण्याची दुर्दम्य इच्छा, करारी स्वभाव, लोकपरंपरेतून आलेलं उपजत, देशी शहाणपण आणि निरागस भावमयता असं आहे कस्तुरबाईंचं व्यक्तिमत्त्व. नजरेत भरतं ते त्यांचं रसरशीत माणूसपण.

गांधींना भव्य नी दुष्प्राप्य ध्येयांचा ध्यास होता. कस्तुरबाईंना आपल्या सुनांसाठी दागिने हवे होते. आस्ते आस्ते सगळे मोह गळून पडले. हीण गेलं, सोनं तेवढं राहिलं.

नवरा, बायकोचं नातं दुधावर यायला बराच काळ जावा लागतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. खूप धीरानं घ्यावं लागतं. परस्परांत विश्वास आणि आदर असावा लागतो. ‘तू किसी रेल सी गुजरती है/ मैं किसी पुल सा थरथराता हूँ,’ असं आंतडं पिळवटून काढणारं आणि त्याचप्रमाणे तारकांनी भरलेल्या आभाळाची श्रीमंती बहाल करणारं प्रेम कस्तुरनं मोहनदासला आणि मोहनदासनं कस्तुरला दिलं.

गांधींचं जे जे पटलं ते ते कस्तुरबाई स्वीकारत गेल्या. नाही समजलं, कळलं तिथं त्या आपल्या मर्यादेत राहिल्या. छोट्या, छोट्या गोष्टींचा हट्ट सोडला नाही. गांधींचं ब्रह्मचर्याचं व्रत त्यांनी पाळलं. पण चहा, कॉफीची सवय बरीच वर्ष राहिली. अनेकदा गांधीच त्यांना कॉफी करून द्यायचे. शेवटी शेवटी मात्र कस्तुरबाईंनी कॉफीचा मोह सोडला.

हेही वाचाः गांधीजी पुन्हा वायरल झालेत

आपल्या बायकोनं शिकावं, पुस्तकं वाचावीत, नवं ज्ञान मिळवावं ही गांधींची इच्छा कस्तुरबाई पुरी करू शकल्या नाहीत. त्यांना ते जमलं नाही. पण १९४२ मधे पुण्याच्या आगाखान तुरुंगात असताना गांधी आणि त्यांचे सचिव प्यारेलाल कस्तुरबाईंचे मास्तर झाले. मनुबेनबरोबर बसून गुजराती कविता, इंग्रजी, भूगोल, इतिहास हे विषय शिकावं लागायचं. लक्षात काही राहायचं नाही. आदल्या दिवशीचं दुसर्‍या दिवशी विसरायच्या. लाहोर ही कलकत्त्याची राजधानी असं बिनदिक्कत ठोकून द्यायच्या. मात्र गांधींबरोबर गुजराती कविता वाचायला त्यांना आवडायचं.

एकदा भोपाळच्या नवाबाकडे गांधी, कस्तुरबाईंचा मुक्काम होता. नवाबांचा एक खास अधिकारी दोघांच्या दिमतीला होता. कस्तुरबाईंना मध हवा होता. त्या अधिकार्‍याकडे गेल्या आणि ‘तुम्हांला हिंदी येतं काय?’ असं त्याला विचारलं. तो म्हणाला, ‘नाही येत.’ आपल्या मोडक्या, तोडक्या इंग्रजीत त्या त्याला हळूच म्हणाल्या, ‘फ्लॉवर, बी, हनी.’

तो अधिकारी हुशार गडी होता. तो पटकन् मधाची बाटली घेऊन आला.

आगाखान तुरुंगात भरपूर फावला वेळ असायचा. दुपारी सगळे कॅरम खेळायचे. कस्तुरबाईही त्यात सामील व्हायच्या. मीराबेन त्यांच्या भिडू. त्या कस्तुरबाईंसाठी सोंगट्या जिंकून आणायच्या. बा खुदकन् हसायच्या.

कस्तुरबाई आश्रमात कष्टाची कामं आवडीनं करायच्या. त्या गांधींपेक्षा जास्त कणखर होत्या. केव्हा केव्हा राग अनावर झाला की गांधी स्वत:च्या थोबाडीत मारून घेत. कस्तुरबाईंवर अशी वेळ कधी आली नाही. गांधींत एक स्त्री होती. कस्तुरबाईंत शंभर पुरुषांचं बळ होतं. म्हणूनच त्या गांधी नावाच्या महापुरात टिकून राहिल्या.

हेही वाचाः थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

महात्मा आणि बापू या दोन भूमिकांतला समतोल गांधींना साधता आला नाही हे कस्तुरबाईंचं दु:ख होतं. मुलांचे खास करून हरिलाल आणि मणिलाल यांचे हाल झाले. हरिलाल तर वडिलांशी वैर धरून बसला. हे कस्तुरबाईंना फार लागलं.

एकदा गांधी आणि कस्तुरबाई जबलपूर मेल गाडीनं प्रवास करत होते. कटनी स्टेशनाला गाडी लागली. खूप लोक आले. गांधींचा जयजयकार सुरू झाला. त्या गर्दीतून वाट काढत हरिलाल तिथं आला. आणि त्यानं ‘माता कस्तुरबा की जय’ असा नारा दिला. बापूंचं लक्ष गेलं. त्याचं उतरलेलं नि भकास रूप पाहून कस्तुरबा रडू लागल्या. हरिलालनं झोळीतून एक संत्रं काढलं आणि आपल्या आईला दिलं.

‘मला नाही का देणार संत्रं?’ गांधींनी विचारलं.

‘नाही. तुम्ही आज जे आहात ते माझ्या बामुळे,’ एवढं बोलून ‘माता कस्तुरबा की जय’ म्हणत म्हणत हरिलाल गर्दीत मावळला. मुलगा जेवला असेल की नाही या काळजीनं कस्तुरबाईंचा जीव कासावीस झाला होता.

आपल्यासमोर जे आलं ते आपलं मानावं नि जे गेलं ते जाऊ द्यावं या भारतीय जीवनसंस्कारातून कस्तुरबाईंनी बळ घेतलं.

हेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

सध्या आपण स्त्रीवादाचं पाश्चात्य मॉडेल स्वीकारलंय. ते स्त्रीला अँटिगनीच्या रुपात पाहतं. अँटिगनी ही विलक्षण बुद्धिमान, कणखर, संवेदनशील अन् मानी; पण कमालीची हट्टी मुलगी होती. तिला कुठलाच पर्याय किंवा समझोता मान्य नव्हता. अखेरीस आपल्या नादान निग्रहापायी ती संपते. परंतु तिच्या पराभवातच तिचं मोठेपण आहे. विचार, वाणी आणि व्यक्तिस्वातंत्र्याची देवता म्हणून तिला मान आहे.

वैष्णव परंपरेत वाढलेल्या कस्तुरबाईंना असा self righteousness आणि आत्यंतिक टोकाचा व्यक्तिवाद मानवला नसता. गांधींच्या विचारातदेखील पाश्चात्य व्यक्तिवादाला वाव नाही. ‘पीड़ पराई’ समजून घ्यायची तर अहं, व्यक्तिवाद आणि बालिश हट्ट करून चालत नाही.

निष्कारण पराभव का स्वीकारायचा? जे आहे त्याचीच व्यवस्थित मांडणी करावी. आपल्या लोकांच्या भल्याकरता झटावं. भारतातल्या लाखो साध्या, अल्पशिक्षित स्त्रिया असं जगताहेत. या जगण्यात कणखरपणा आणि कणवही आहे.

गांधींचं आपल्या बायकोवर निस्सीम प्रेम होतं. देवदासचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. प्रसूतीच्या वेळी डॉक्टर मिळेना तेव्हा गांधींनी एखाद्या कसबी सुईणीप्रमाणे कस्तुरबाईंचं बाळंतपण केलं.

वय वाढत गेलं तसे गांधी आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत मऊ झाले. लहानग्यांशी दंगामस्ती करू लागले. कस्तुरबाईंशी थट्टा-मस्करी चालायची. अनेकदा गांधी कस्तुरबाईंच्या केसातून हात फिरवायचे तर कधी त्यांच्या पिचक्या गालावर हलकी चापटी मारायचे. ते जेवायला बसले की कस्तुरबाई त्यांच्या शेजारी बसून असायच्या. त्यांच्याकडे एकटक पाहात.

दोघं आगाखान तुरुंगात स्थानबद्ध होते. तिथं गांधींच्या डॉक्टरांना कुणीतरी 29 आंबे पाठवले. त्या दिवशी डॉक्टरसाहेबांच्या लग्नाचा एकूणतिसावा वाढदिवस होता. कस्तुरबाईंनी गांधींना हळूच विचारलं, ‘आपल्या लग्नाला किती वर्षं झाली हो?’ गांधी खळखळून हसले नि म्हणाले, ‘चला. म्हणजे आता मीसुद्धा तुला आंबे पाठवायचे की काय?’

हेही वाचाः विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग १)

कधी कधी कस्तुरबाई गांधींना कानपिचक्या द्यायच्या. दलितांच्या विभक्त मतदारसंघाच्या प्रश्नावर गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केलं. कस्तुरबाई साबरमती तुरुंगात होत्या. ब्रिटिश सरकारनं त्यांना बापूंना भेटण्याची परवानगी दिली. त्या धावत-पळत येरवड्याला आल्या नि गांधींना पाहून म्हणाल्या, ‘पुन्हा सुरू झाल्या ना तुमच्या उचापती?. आता लवकर आटपा पाहू तुमचं उपोषण.’

एकेकदा कस्तुरबाईत मला लक्ष्मीबाई टिळक दिसतात. लक्ष्मीबाईंनी रेव्ह. टिळकांना समजून घेतलं. त्यांच्या थोरपणासमोर त्या विनम्र झाल्या; पण आपला स्वतंत्र बाणा सोडला नाही. कस्तुरबाईंनी आपल्या आठवणी लिहिल्या असत्या तर ‘स्मृतिचित्रे’ला एक गुजराथी मैत्रीण मिळाली असती.

गांधींच्या आश्रमात अनेक स्त्रिया राहायच्या. मीराबेन, प्रेमा कंटक, बीबी अम्तुस्सलाम, वगैरे. यांपैकी बर्‍याच स्त्रिया खाजगी दु:खानं हैराण असायच्या तर काही सतत आजारी असायच्या. बहुतेक सगळ्या शिकलेल्या नि आत्मभानानं तळपत होत्या. बर्‍याच जणींना गांधी सतत स्वत:साठी हवे असायचे आणि यावरून आश्रमात बरेच रुसवे-फुगवे सुरू असायचे. गांधी अशा स्त्रियांची दूरच्या आश्रमात किंवा गावात रवानगी करायचे; पण लांबलचक पत्रं लिहून त्यांची नियमित विचारपूस करायचे.

हेही वाचाः भवरलालजींनी माळरानावर साकारले गांधीविचार

एकीकडे असं सगळं सुरू असताना मधेच सरलादेवी प्रकरण उद्भवलं. सरलादेवी चौधुरानी या सुसंस्कृत, कलासक्त बंगाली स्त्रीकडे गांधी काही काळ-- खरं तर अगदी अल्प काळ-- आकृष्ट झाले होते. हा चित्तवेधक प्रवेश १९१९-१९२० या काळातला. सरलादेवींशी आपलं आध्यात्मिक मीलन व्हावं असं आपल्याला वाटतं, असं गांधींनी तेव्हा लिहिलं होतं. पण होतं सगळं फार संदिग्ध.

एका पत्रात ‘तुम्ही माझ्या स्वप्नात येता. तुम्ही शक्तीचं स्वरूप आहात,’ वगैरे मजकूर गांधींनी सरलादेवींना लिहिला होता, असं राजमोहन गांधी यांनी ‘मोहनदास’ या ग्रंथात नमूद केलंय.

महादेवभाई देसाई, सी.राजगोपालाचारी, गांधींचे एक नातलग मथुरादास त्रिकमजी यांनी बापूंची बरीच समजूत काढली. राजाजींनी आपल्या पत्रात ‘सरलादेवी आणि कस्तुरबा यांची तुलना होऊ शकत नाही’ असं गांधींना निक्षून सांगितलं. ‘कुठे सकाळचा सूर्य आणि कुठे घासलेटचा दिवा?’ असंही विचारलं.

अखेरीस गांधींच्या मुलानं, देवदासनं वडिलांना सवाल केला- ‘तुमच्या अशा वागण्यामुळे आईच्या मनाला किती यातना होतील याचा विचार केलाय काय?’ हे ऐकल्यावर गांधींनी सरलादेवी प्रकरणावर पडदा पाडला.

हे सगळं पाहून कस्तुरबाईंच्या मनाला चरे पडले असतील. आपल्या नवर्‍याची बौद्धिक भूक आपण भागवू शकत नाही याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडतो आहोत आणि एवढ्यापुरतं का होईना पण नवर्‍याला आपण नकोसे झालो आहोत, असं त्यांना वाटलं असेल. हे एका अर्थी रिजेक्शन होतं. कस्तुरबाईंना ते सगळं क्लेशदायक झालं असणार; पण या मुद्यावरून त्या गांधींकडे सर्वांसमक्ष कधी तणतणल्या नाहीत. कुणाकडे हा विषय काढला नाही. आतली घुस्मट कधी दाखवली नाही. आपली डिग्निटी सोडली नाही.

हेही वाचाः अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

एकदा सेवाग्रामात कस्तुरबाई आजारी पडल्या. गांधी न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांची विचारपूस करायचे. एके दिवशी या क्रमात खंड पडला. कस्तुरबाई रुसल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी बापू आपल्या पत्नीच्या कुटीत दाखल झाले. त्या घुम्मच होत्या.

‘कसं वाटतंय तुला?’ गांधींनी विचारलं.

‘तुम्हांला कशाला पर्वा माझी? तुम्ही महात्मा ना? तुम्हांला सगळ्या दुनियेची काळजी. मी पडले बापडी,’ कस्तुरबाईं घुश्शात म्हणाल्या.

‘तुलासुद्धा मी ‘महात्मा’ वाटतो?’ गांधींनी हसत हसत कस्तुरबाईंना विचारलं आणि त्यांच्या केसातून हात फिरवू लागले.

पण कैकदा गांधींच्या ‘महात्मापणा’चे चटके कस्तुरबाईंना बसायचे. अशा वेळी त्या गप्प बसायच्या नि नवर्‍याची बोलणी ऐकून घ्यायच्या. एकदा त्यांचा मुलगा रामदास प्रवासाला निघाला. कस्तुरबाईंनी त्याला खाऊचा डबा करून दिला. ते पाहून गांधी चिडले. म्हणाले, ‘आश्रमातली सगळी माणसं आपल्याला सारखीच आहेत. मग रामदासचे असे लाड कशाला करायचे?’

कस्तुरबाईं म्हणाल्या, ‘आश्रमातल्या सगळ्यांना मी आपलं मानतेच, पण रामदास हा माझा पोटचा गोळा आहे.’ यावर गांधी त्यांना आणखी बरंच बोलत होते. त्या गप्प ऐकत होत्या. एरवीदेखील त्या फार बोलत नसत. ‘बस एक चुप-सी लगी है, नहीं उदास नहीं’ एवढंच होतं कस्तुरबाईंचं म्हणणं. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी १९०६ मधे ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं. हा त्यांचा एकतर्फी निर्णय होता. तो त्यांनी कस्तुरबाईंना कळवला. तेव्हादेखील त्या एक चकार शब्द बोलल्या नाहीत.

हेही वाचाः महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

मौनापुढे ब्रह्मांडही डळमळतं म्हणतात. गांधी आयुष्यभर कस्तुरबाईंच्या मौनापुढे नम्र होते.

एकेकदा वाटतं की गांधींनी सगळं अवघड करून टाकलं होतं. इतकं टोकाला कशाला जायचं? चमचमीत खाऊ नका; साधं, पौष्टिक अन्न घेत चला एवढं म्हटलं तरी चाललं असतं. गांधी एकदम अ-स्वादव्रताची थोरवी सांगू लागले. आश्रमात बिनमिठाचं, बिनतिखटाचं जेवण असायचं. मीठ-मसाल्याशिवाय भोपळ्याची भाजी मिळमिळीत लागायची. घशाकडे अडकायची. ती खाल्ल्यावर काही स्त्रियांचं पोट बिघडायचं.

एकदा काही स्त्रियांनी बापूंच्यी अळणी, मिळमिळीत भोपळ्यावर गरब्याचं गाणं रचलं नि ते खणखणीत स्वरात गाऊन दाखवलं. या निषेध-गीतात कस्तुरबाई सामील झाल्या होत्या. मग बापूंनी भोपळ्याबद्दलचे नियम बरेच शिथिल केले.

कस्तुरबाई सोज्वळ आणि सोशिक होत्या, पण गिळगिळीत नि पिळपिळीत नव्हत्या. जो सोसतो तो आतून टणक होतो हे सत्य कस्तुरबाईंच्या जगण्यात मुरलं होतं. ‘साहिब बीबी और गुलाम’मधली ‘छोटी बहू’ (मीनाकुमारी) सोसून सोसून दुबळी होते नि अखेरीस कोलमडून पडते. ‘मदर इंडिया’तली ‘राधा’ (नर्गिस) जेवढं सोसते तेवढी जास्त कणखर होते.

गांधी १९१८ च्या जुलैत डिसेंट्रीनं खूप आजारी होते. बरेच औषधोपचार झाले, पण फारसा फरक पडत नव्हता. निर्जंतुक अंडी खा, असं डॉक्टरनं सुचवलं. गांधींनी ठाम नकार दिला. इंजेक्शनला नको म्हणाले. गाईचं दूध तरी प्या ही डॉक्टरांची सूचनादेखील त्यांनी फेटाळून लावली. गाईच्या दुधावर तिच्या वासराचाच हक्क आहे, असं ते म्हणायचे. दरम्यान, त्यांची तब्येत ढासळत होती. गांधी निरवानिरवीचं बोलू लागले.

हेही वाचाः अशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं

कस्तुरबाई हवालदिल झाल्या. अगदी निकराच्या क्षणी त्यांना बकरीच्या दुधाचा पर्याय सुचला. त्यांनी गांधींची बरीच समजूत काढली. अखेरीस गांधींनी पेलाभर बकरीचं दूध घेतलं. आणि दुखण्यातून बरे झाले. अखेरपर्यंत शेळीचं दूध घेत होते.

बायकोच्या आग्रहाला आपण बळी पडलो कारण मनात जगण्याची, जनसेवेची जबरदस्त ओढ होती, असं गांधींनी नंतर म्हटलं. या प्रसंगावर थोर पत्रकार आणि गांधींचे चरित्रकार लुई फिशर यांनी ‘द लाइफ ऑफ महात्मा गांधी’ या आपल्या रसाळ ग्रंथात फार मार्मिक भाष्य केलंय. फिशर म्हणतात:

Gandhi feared neither man nor government, neither prison nor poverty nor death. But he did fear his wife. Perhaps it was fear mixed with guilt; he did not want to hurt her; he had hurt her enough

आपण कस्तुरबाईंना चांगलं वागवलं नाही, अशी कायम रुखरुख गांधींना होती. ११ ऑगस्ट १९३२ ला आपल्या मुलाला, रामदासला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात-

‘मी तुमच्या आईकडे जसं वागलो तसं तुम्ही कुणीही आपल्या बायकोकडे वागू नये. ती माझ्यावर रागावू शकत नव्हती, पण मी तिच्यावर पुष्कळदा संतापायचो. मी स्वत:ला भरपूर स्वातंत्र्य बहाल केलं, तेवढं तिला दिलं नाही.’

थोर माणसं- बहुतेक पुरुष आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना वाईट वागणूक देतात असा एक समज सुशिक्षित वर्गात आहे. तो निराधार नाही. ललित लेखकांना आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांना हा विषय फार आवडतो.

परंतु कर्तृत्व, थोरपणा हे अलौकिक गुण लिंगभेद मानत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ‘माझी आई गायनात थोर होती, पण माझ्या वाट्याला आईची माया फारशी आली नाही. करारी, कठोर अशी तिची प्रतिमा होती. तीत ती अडकली,’ असं विख्यात गायिका केसरबाई केरकर यांच्या मुलीनं, सुमन काजी यांनी एकदा मला सांगितलं होतं.

हेही वाचाः ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

तुकारामांच्या संन्यस्त वृत्तीचा त्यांच्या बायकोला मनस्ताप झाला हे खरं असलं म्हणून तुकारामहाराजांचं श्रेष्ठपण तसूभरदेखील कमी होत नाही. हेच गांधी किंवा केसरबाईंबद्दल खरं आहे. थोरपण हे आख्खं पॅकेज असतं. ते तसंच्या तसं स्वीकारावं लागतं. कस्तुरबाईंनी गांधी नावाचं पॅकेज विनातक्रार स्वीकारलं.

दुसरं, समानतेचं मूल्य मानणार्‍या सामाजिक चळवळींत थोरपणाला जागा नसते. एकाला थोरपण बहाल का करावं? अन् समजा केलं तर तो/ती इतरांवर अन्याय करणारच नाही याची गॅरंटी काय हे आजचे प्रश्न आहेत. तेव्हा हल्लीचे नियम लावले तर गांधी-कस्तुरबाई हे काय गौडबंगाल होतं ते आपल्याला समजणार नाही.

हल्लीचा आणखी एक विचार. समाजाचं भलं करण्यात वेळ, पैसा आणि शक्ती घालवण्यापेक्षा माणसानं आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घ्यावी असा मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे तयार झालाय. हा तद्दन स्वार्थी विचार जागतिकीकरणानंतर सुशिक्षित, बुद्धिवादी मध्यमवर्गीयांत बराच लोकप्रिय आहे.

खरं तर आजचा मध्यमवर्ग आपल्या मुलाबाळांपुरतंच पाहात असतो. आपल्या कुटुंबाला भरपूर नी महागड्या सुखसोई मिळाव्यात, आपली पुढची पिढी परदेशात शिकावी म्हणून अहोरात्र झटत असतो. तरीही दुभंगलेल्या आणि दु:खी कुटुंबाच्या संख्येत वाढच होतेय. कैक घरांत आई-वडील आपल्या मुलांसमोर हतबल झालेले असतात. असं का होतंय?

कस्तुरबाईंनी फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार केला असता तर गांधींचं एकही मोठं काम उभं राहिलं नसतं.

गांधी आयुष्यभर प्रत्येक मनुष्यात देव शोधत होते.

कस्तुरबाई आयुष्यभर गांधींतल्या माणसाशी लपंडाव खेळत होत्या.

दोघं सुखी झाले.

हेही वाचाः जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा लेख साप्ताहिक साधनाच्या ताज्या अंकात आलाय.)