प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल

०७ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं.

लोकसभेचा निकाल आल्यापासून विरोधक अक्षरशः कोमात गेलेत. अनेकांनी सोशल मीडियावरूनही सावरासावर केलीय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अजून राजीनाम्याच्याच मुडमधे आहेत. योगेंद्र यादव यांनी तर थेट काँग्रेस मेली पाहिजे, असा विचार मांडला. दुसरीकडे काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने भाजपने आणखी पुढे मजल मारलीय. काँग्रेसच्या मरणाचा विचार सुरू असतानाच कर्नाटकमधून एक न्यूज आलीय.

हेही वाचाः नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

कर्नाटकमधे भाजपचा पराभव

गेल्या २९ मेला कर्नाटकमधे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झालं. ३१ मेला त्याचा निकाल आला. लोकसभेत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेससाठी हा निकाल दिलासा देणारा आहे. कारण राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस-जेडीएसला लोकसभेत कशाबशा केवळ दोनच जागा जिंकता आल्या. दुसरीकडे भाजपने २५ जागांवर बाजी मारली. पण आता भाजपसाठी बॅड न्यूज आहे.

आठ महापालिका, ३३ नगरपालिका आणि २२ नगरपंचायती यांच्या १३६१ वॉर्डांसाठी हे मतदान झालं. यामधे ५६२ जागा जिंकत काँग्रेस अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे भाजपला केवळ ४०६ आणि जेडीएसला २०२ जागा मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारमधे एकत्र असलेल्या काँग्रेस आणि जेडीएस यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली. दोघांच्या जागांची बेरीज केल्यास ती पार पावणे आठशेपर्यंत जाते.

पालिका निवडणुकीत काँग्रेसला ४२, तर भाजपला २९ टक्के मतं मिळाली. लोकसभेत भाजपला ५१ तर काँग्रेसला ३१ टक्के मतं मिळाली होती. विशेष म्हणजे २२ पैकी केवळ दोन पालिकांमधेच भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलाय. इतर जवळपास सर्वच ठिकाणी पराभवाचं तोंड बघावं लागलंय.

पालिका निकालाचा मेसेज काय?

या सगळ्यांतून एकच मेसेज आहे. तो म्हणजे, प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं. पण तेव्हाच जेव्हा समोर नरेंद्र मोदी नसतील. कारण अशा निवडणुकीत मोदींना निवडून द्यायचा मुद्दा प्रचारात नसेल तर निवडणूक लोकल प्रश्नांभोवती केंद्रीत राहिल. लोकल मुद्दे हा अजूनही विरोधी पक्षांच्या हाती असलेला हुकुमचा एक्का आहे. पण हा एक्का मोदी मॅजिकपुढे प्रभावी ठरत नसल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसलं.

लोकसभेत भाजपने उमेदवाराला निवडून द्या म्हणण्याऐवजी मोदींना मदत देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे उमेदवार कोण आहे, तो कुठल्या जातीतून आलाय, त्याने आधी काय काम केलंय, काम केलं नाही यासारखे महत्त्वाचे मुद्दे मागं राहिले.

मोदी मॅजिक सक्रिय नसताना म्हणजेच गेल्या पाच वर्षांत लोकसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला अनेकदा हरवलंय. एवढंच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधेही भाजप उमेदवाराला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

गेल्या चार वर्षांतली आकडेवारी काय सांगते?

द क्विंट या वेबपोर्टलच्या एका आकडेवारीनुसार, २०१४ ते २०१८ या काळात जवळपास सगळ्यांच विधानसभांसाठी निवडणूक झाली. यामधे भाजपने १०.५ कोटी मतांसह ११७८ जागा मिळवल्या. दुसरीकडे काँग्रेसला ८.४ कोटी मतं आणि ८५९ जागा मिळाल्या. इथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगला दणका बसला होता.

या सगळ्या आकड्यांवरून भाजप विधानसभा निवडणूक जिंकत नंबर १ पार्टी बनलीय. पण त्याचवेळी काँग्रेसही खूप मागे नाही, हे स्पष्ट होतं. तसंच प्रत्यक्ष लढतीत मोदी मॅजिक असेल तरच भाजपचा जलवा चालतो. या मॅजिकशिवाय भाजपसाठी मोदी हैं तो मुमकीन हैं हा नारा देता येत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या या निकालाने स्पष्ट केलीय.

आता महाराष्ट्रात होणार चाचणी

महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीआधी काही जिल्ह्यांत ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. वर्धा जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यात काँग्रेसला यश आलं. स्थानिक मुद्द्यांवर झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकण्याची कमालही काँग्रेसने केली. पण आठेक दिवसांनी झालेल्या लोकसभेच्या मतदानात लोकांनी आपला कौल भाजप उमेदवाराला दिला.

पण काँग्रेसपुढे सर्वांत मोठं आव्हान निवडणुकीचा प्रचार स्थानिक प्रश्नांभोवती कायम ठेवण्याचं आहे. हा फॉर्म्युला अवलंबून भाजपचं आव्हान पेलवण्यात काँग्रेसला किती यश मिळतं, हे सहा महिन्यांतच कळणार आहे. दिवाळीत महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणातही विधानसभेची निवडणूक आहे.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर राज्य सरकारविरोधात लोकांमधे विशेषतः शेतकऱ्यांमधे नाराजीचा सूर आहे. दुष्काळानेही यंदा लोकांची परीक्षा घेतलीय. तसंच आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजातही रोष आहे. यासारखे लोकल मुद्दे लावून धरत मोदी मॅजिक निष्प्रभ ठरेल यासाठी काँग्रेस कशी फिल्डिंग लावते त्यावरचं सगळं यशापयश अवलंबून आहे.

हेही वाचाः 

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका