आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच

१६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.

तुम्ही हसत असाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. तुम्ही रडत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. आनंद देणारे सीन दुःखाचेही असू शकतील. आता सगळं काही संपून जाणार आहे, असं वाटत असतानाच काहीतरी नव्याने सुरू होणार असल्याची चाहुलही लावेल. आनंद आणि दुःख दोन्ही साखर आणि मिठासारखं एकमेकांत मिसळून आपल्यासमोर ठेवणारा असा सुंदर सिनेमा अनेक वर्षांनंतर आपल्या शहरात आलाय. सिनेमाचं नाव आहे, द स्काय इज पिंक.

आभाळ गुलाबी असतं हे काही आपल्यासाठी नवं नाही. पण आभाळ फक्त गुलाबी किंवा फक्त निळं नसतं. कधी कधी हेच आभाळ पिवळसरसुद्धा होतं. कधी पांढरंशुभ्र तर कधी लालभडकसुद्धा होतं. कधीतरी तर सोनेरीसुद्धा!

लहानपणी शाळेत गेल्यावर कधी चित्र काढताना आभाळ रंगवलंय? आपण ते नेहमी निळ्या रंगांचं रंगवतो. त्यामुळे फक्त निळ्या रंगाचा विचार करून आभाळ समजून घेता येतं या गैरसमजात आपण असोत. पण आपण हा सिनेमा बघताना फक्त सिनेमा बघत नसतो. थिएटरमधे असतानाही आपण बाहेरच्या जगात असतो. आभाळ फक्त निळ्या रंगाचं असतं असं सांगणारं हे बाहेरचं जगं आहे.

नजरेची परीक्षा बघणारा कॅमेरा

राजकारणाबद्दल अवाक्षरही न काढता आपल्या आसपासचं राजकारण समजून घेण्याची ताकद हा सिनेमा आपल्याला देतो. हा सिनेमा ज्यांनी पाहिलाय ते पुढचे अनेक दिवस त्यातून बाहेरच येणार नाहीत. सिनेमा पाहिल्यावर आपलं जगणं शाळेतल्या आभाळासारखं फक्त निळ्या रंगाचं असायला हवं होतं, असं वाटू लागतं.

सिनेमातली गोष्ट आहे जुन्या दिल्लीतल्या एका हिंदू कुटुंबाची. त्यांच्या घराच्या छतावरून जामा मशिद दिसत असते. या मशिदीमागं मुस्लिम लोक राहतात, असं दिसतं. पण खरंतर तिथे फक्त मुस्लिम लोक राहतात, असं नाही. सिनेमाचा कॅमेरा इथं आपली नजर किती तीक्ष्ण आहे हे तपासून पाहत असतो.

सिनेमातल्या एकाएका धक्क्यातून सावरत असतानाच मूस म्हणजेच आदिती चौधरी आपला धर्म बदलते. तिच्या नवऱ्याचा धर्म दुसरा असतो. तिच्या मित्रमैत्रिणींचा धर्मही तिच्या धर्माहून वेगळा असतो. आभाळाचे रंगही वेगवेगळे असतात ना तसं.

हेही वाचा ः स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?

धर्म पर्सनल असतो

सिनेमा जिच्याभोवती फिरतो ती आयशा चौधरी. तिच्या जीवघेण्या आजारासाठी लंडनमधली लोक मोकळ्या मनानं दान देतात. तेव्हाही त्यात फक्त भारतीय नसतात. बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानचेही नागरिक तिला पैसे पुरवतात.

उपचारासाठी १ लाख २० हजार पाउंड इतक्या रकमेची गरज असताना अडीच लाख पाउंड दान देताना ते आईचा धर्म कोणता आणि बाबांचा धर्म कोणता याची फाजील चौकशी करत बसत नाहीत. संपूर्ण सिनेमात धर्माचा ओझरता उल्लेखही दिसत नाही. तेव्हा धर्म किती पर्सनल असून शकतो हे या सिनेमातून उमगतं. आपल्या रोजच्या जगण्यातही असंच असतं की! धर्म रोजच्या जगण्यात दिसतसुद्धा नाही. पण राजकारणात त्याचं अस्तित्व सतत जाणवत राहतं.

आईबापाचं वेगळं रूप

मृत्यू किती स्वाभाविक असू शकतो आणि आपल्या मुलीच्या आजारपणाबाबत तिला सगळ्या आजाराची स्पष्ट कल्पना देणारे आई वडीलसुद्धा किती तार्किक विचार करू शकतात, हे या सिनेमातून समोर येतं. हे आजारी लेकरूसुद्धा स्वतः डॉक्टर असल्यासारखं आपलं आजारपण समजावून घेतं. आपल्या लेकराच्या आजारपणाचा एका आईवर काय परिणाम होतो, बापावर काय परिणाम होतो याचं जिवंत चित्र इथं रेखाटण्यात आलंय.

ही गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आजवरच्या जगण्याचा संघर्ष आहे.जन्मतःच किंवा जन्माच्या अनेक वर्षांनंतर बाळाला होणारा जीवघेणा आजार त्याच्या आईबापाचं वेगळंच रूप समोर आणतो. हे वेगळं रूप आभाळाचा रंग निळाच असतो असं मानणाऱ्या आईबापांपेक्षा फार फार वेगळं असतं.

हेही वाचा ः इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते? 

भारावून टाकणारा प्रसंग

या सिनेमात दाखवलेलं कुटुंब सुखवस्तू वर्गातलं आहे. सधन, सुसंस्कृत असं हे कुटुंब. पण तरीही दक्षिण दिल्लीसारख्या पॉश ठिकाणी राहणारी मुलगी आदिती चौधरी लग्नानंतर चांदणी चौकात राहायला जाते. काही वर्षांनंतर पुन्हा चार चांगले दिवस येतात. मोठं घर मिळतं. खायची प्यायची चंगळ सुरू होते. संसारवेलीवर दोन फुलं उमलतात. मुलं मोठी झाल्यावर एकदा आदिती आपल्या सासरच्या घराच्या छतावर मुलाला घेऊन जाते. आणि ती भूतकाळात कुठे आणि कशा परिस्थितीत राहायची याची आठवण मुलाला सांगते. हा प्रसंग आपल्या सगळ्यांना भारावून टाकणारा आहे.

हा सिनेमा पाहिल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त नम्र झालोय आणि माझ्यात काही चांगले बदल झालेत, असं वाटतंय. अनेक दिवसांनंतर बासु चॅटर्जी यांचा सिनेमा पाहिल्यासारखं वाटतंय. शोनाली बोस या एक दर्जेदार फिल्ममेकर आहेत. त्यांचं सगळं जगणंच इतरांविषयी वाटणाऱ्या आस्थेच्या भावनेनं उजळून निघालंय. त्यामुळेच त्यांच्या कॅमेराच्या प्रत्येक फ्रेममधे रसरशीत जगणं दिसून येतं.

त्यांचा ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ हा सिनेमाही जरूर बघण्यासारखा आहे. एका दिग्दर्शकाचा प्रवास आपल्याला यातून समजतो. शोनाली बोस यांच्या सिनेमांचं नाव इंग्लिशमधे असलं तरी त्यातल्या पात्राचं जगणं हिंदी असतं, पंजाबी असतं, बंगाली असतं. चांदणी चौक आणि दक्षिण दिल्लीचं असतं. दोन प्रेम करणाऱ्यांच्या एकत्र येण्याचं असतं.

हेही वाचा ः मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

स्टारडममुळे प्रियांकावर अन्याय

सिनेमा पाहून थिएटरच्या बाहेर आल्यावर आपल्या एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवावा. लाइफ पार्टनर निवडीबाबत लावलेला चष्मा पुसून स्वच्छ करावा. आणि कुणाची आठवण आली तर लगेचच त्याला फोन करावा. प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांनी स्वतःला आदिती चौधरी आणि नीरेन चौधरी यांच्या भूमिकेत अगदी बुडवून घेतलंय. दोघंही आपल्या भूमिकेत विरघळून गेलेत. हे फारच सुंदर!

गेल्या काही काळात लग्नाच्या आणि गॉसिपच्या बातम्यांपर्यंतच मर्यादित राहिलेल्या प्रियांकाचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.प्रियांकाला स्टार बनवून आपण तिच्या अभिनयावर मोठाच अन्याय केलाय. आदिती चौधरी ही भूमिका प्रियांका स्वतः जगलीय. त्यामुळे या सिनेमात ती अभिनय करतेय असं वाटतच नाही. प्रियांका आणि फरहान दोघंही त्यांच्या भूमिकांशी एकरूप होऊन गेलेत.

फरहानचं शानदार काम

लंडनमधे गेलेली प्रियांका फरहानसोबत पाच दिवस अबोला धरते तेव्हा चांदणी चौकाच्या गल्ल्यांमधे राहणारा फरहान तिच्यासाठी लगेच लंडनला येतो. सिनेमाच्या शेवटी फरहान प्रियांकाला सोडून जातो, तेव्हा प्रियांका अचानक त्याच्यासाठी परत येते. आयुष्यात भावनांना आवर घालता आला पाहिजे.

डोकं शांत होईल, राग कमी होईल, तेव्हा जे प्रेम आपल्याला मिळालंय तेच ज्याने दिलंय त्याला द्यावं हीच गोष्ट हा सिनेमा आपल्याला सांगतो. फरहानचं काम शानदार आहे. हे सगळं वाचताना एखाद्याला वाटेल की सिनेमात आयशा चौधरीची भूमिका साकारलेल्या झायरा वसीमला मी विसरतोय. तर तसं अजिबात नाही. आयशाची भूमिका निभावणाऱ्या झायरानंही फार भारी काम केलंय.

पण, एक मिनिट. हा लेख म्हणजे काही सिनेमाचं परीक्षण नाही. खरंतर या सिनेमाचं परीक्षण होऊच शकत नाही असं मला वाटतं. फक्त सिनेमाचा आधार घेऊन तर नाहीच नाही. हा सिनेमा म्हणजे नीरेन आणि आदिती चौधरी यांच्या जीवनाची खरी कहाणी आहे. आणखी अशा अनेक खऱ्या कहाण्या या सिनेमात फिरताना आपल्याला दिसतात.

हेही वाचा ः द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज 

कॅमेरामागेही एक आई आहे

आदिती चौधरी या भूमिकेच्या रूपात जे आव्हान एक आई पेलत असते तेच आव्हान सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या आईनं, शोनाली बोसनंही पेललंय. कॅमेऱ्यासमोर आपल्या मुलीसाठी हुंदके देत रडणाऱ्या आईच्या भूमिकेतल्या आदितीला शूट करताना दिग्दर्शक आई तिच्या मृत मुलाच्या आठवणींतून जात असेल. पडद्यावरची रडणारी आई पाहून कॅमेरामागची ही आईसुद्धा रडत असेल.

पण आपण आईलाच नेहमी रडताना का दाखवतो? त्यामुळे सिनेमा समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी दिग्दर्शक शोनाली बोस हिला समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय ना सिनेमा बघता येतो ना त्यावर परीक्षण लिहिता येतं.

आधुनिक समाजातल्या या दोन आयांच्या कहाणीमधे आपण पुरुष असहाय्यपणे उभे आहोत. आयुष्यातून बाहेर काढून टाकलेल्या एखाद्या पात्राप्रमाणे. या सिनेमाचं दिग्दर्शन करता येणं ही जशी साधीसुधी गोष्ट नाही तसंच हा सिनेमा बघता येणं हीसुद्धा फार मोठी गोष्ट आहे.

सिनेमात आयशाचा भाऊ ईशान हासुद्धा तिच्यासारखाच ताऱ्यांच्या जगात हरवलेला एक मस्त मुलगा आहे. तो अशा वेगळ्याच विश्वात रमत असला तरी आयशाच्या आजारपणात मात्र तो तिची भरभरून साथ देतो. आपल्या आईचा आणि बहिणीचा संघर्ष समजून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. त्यातही स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवून आपलं जगणं जगत असतो.

शोनाली बोस यांच्यासाठी ईशान हे फक्त एक पात्र नाही. त्या पात्रात तिला नक्कीच तिचा मुलगा दिसत असणार. त्यांच्या स्वतःच्या मुलाचं नावंही त्यांनी ईशान ठेवलं होतं. हा ईशान एका अपघातात गेला. पण आयशाचा भाऊ म्हणून तिचा हा मुलगा परत पडद्यावरच्या या दुनियेत परतलाय.

हेही वाचा ः सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

मुलाच्या आठवणींना उजाळा

चितगाव हा सिनेमा पाहिलाय? या सिनेमाच्या शेवटी एक गाणं आहे. आपण यू ट्यूबवर हे गाणं ऐकू शकतो. चितगाव सिनेमाचा दिग्दर्शक वेदब्रतो पाईन म्हणजे शोनाली बोस यांचा नवरा फारच गुणी माणूस आहे. त्यांच्या नावावर सिनेमामधल्या वेगवेगळ्या प्रयोगांचे अनेक पेटंट्स रजिस्टर्ड आहेत.

वेदब्रतो यांनी घेतलेल्या काही मुलाखतीसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यात राज्यसभा टीवीसाठी घेतलेली इरफान साहेबांची मुलाखत आणि नासाच्या स्टार वैज्ञानिकांसोबतच्या गप्पागोष्टी या कार्यक्रमांचा उल्लेख करावाच लागेल. चितगावमधल्या म्युझिकमुळे आणि त्यात आवाजाचा जो वेगवेगळ्या प्रकारे वापर केलाय त्यामुळे चितगाव भारतातल्या सगळ्यात अद्भुत सिनेमांपैकी एक आहे, असं मी नेहमी म्हणतो.

चितगाव सिनेमाची गोष्ट तर भन्नाट आहेच. चितगाव सिनेमातल्या या शेवटच्या गाण्यातून वेदब्रतो पाईन त्यांच्या मुलाची आठवण सांगतायत. मुलगा गमवल्याचं त्यांचं दुःख गाण्यातून दिसतं. ईशान या गाण्याच्या शब्दाशब्दांत दिसत असतो.

खुल गया नया द्वार है। ईशान की झंकार है।
दे सलामी आसमां, हौसलों में धार है।
ईशान है वो निशा, जहां जिंदगी, जहां रौशनी गीत है।
ईशान है वो सुबह जहां ख़्वाब है, उम्मीद है जीत है।

हेही वाचा ः मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

सिनेमामागे लपवलेल्या गोष्टी वाचता आल्या पाहिजेत

आता द स्काय इज पिंकमधला ईशान तुम्ही बघा. शोनाली बोस यांनी आपल्या मुलाला नवं जीवनदान दिलंय असंच त्यातून वाटतं. सिनेमाच्या शेवटी आयशानंतर ईशान पाईन हे नाव पडद्यावर झळकतं. एखादा कवी आपल्या कवितेत आपलं खासगी आयुष्य लपवून ठेवत त्याचं प्रतिबिंब असणाऱ्या कितीत्तरी गोष्टी लिहित असतो. पण ज्याला कवितेसोबतच कवी कळतो तोच चांगला वाचक बनू शकेल. सिनेमा वाचण्यासाठी तुम्हाला दिग्दर्शकाने लपवलेल्या गोष्टी वाचता आल्या पाहिजेत.

आपल्या मुलाचा मृत्यू आपल्या कॅमेरातून दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडणारे हे आईवडील आयुष्याच्या दोन किनाऱ्यांवर उभे आहेत. स्काय इज पिंकमधे जसं आनंदाचे आणि दुःखाचे अश्रुं एकाच थेंबातून बाहेर पडतात. या दोन अश्रूंप्रमाणेच हे आईबाप आणि त्यांच्या मुलाची आठवण एकमेकांत मिसळून गेलेत. हे आईबाप वेगळे झाले असतीलही पण त्यांच्या जगण्याच्या आठवणी वेगळ्या नाहीत.

तुम्ही द स्काय इज पिंक नक्की बघा. आसमंताचे वेगवेगळे रंगही बघा. कारण आसमंताचा रंग गुलाबीही असू शकतो. थॅंक्यू शोनाली बोस! सिनेमा बघून झाल्यावर तुम्हाला याच शोनाली बोसला मिठी मारावीशी वाटेल.

हेही वाचा ः 

उषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली 

काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन