'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

२५ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.

इल्जाम नावाचा सिनेमा. साधारण १९८० च्या दशकातला. लालभडक शर्ट, तसलीच पॅण्ट आणि त्याच रंगाची एक आडवी पट्टी डोक्यावर लावलेला गोविंदा उघड्या शर्टाची चेन वर करतो. हातातले काळ्या रंगाचे लेदर ग्लोव घट्ट करतो. आणि संपूर्ण जोशात नाचू लागतो. अगदी पाठीवर झोपून पाय गोलाकार फिरवणं ही अवघड स्टेपही खुबीने करतो. रात्री उशीरा रस्त्यावर चाललेला त्याचा हा जोशिला डान्स पाहण्यासाठी आसपासचे लोक चक्क झोपेतून जागे होतात. मग गोविंदाचं गाणं सुरू होतं. ‘आय एम ए स्ट्रिट डान्सर.’

या गाण्यावरून मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चीही आठवण येते. अमेरिकेत त्याच काळात लोकप्रिय होत असलेला ब्रेकडान्सिंग हा नृत्यप्रकार मिथुनदा आणि गोविंदा यांनीच बॉलिवूडमधे आणला. पुढे जावेद जाफरी ते प्रभूदेवा या डान्सरनी त्याला बॉलिवुडी तडकाही दिला. त्या काळात अनेकांनी त्यांच्या या स्टाईलची कॉपी केली असेल. आता ही कॉपी पुढे चालू ठेवली असती तर त्यांना आज ऑलिंपिकमधे जायची संधी मिळाली असती. कारण, ब्रेकडान्सिंग या नृत्यप्रकाराला खेळाची मान्यता मिळाली असून त्याचा समावेश आता थेट ऑलिंपिकमधेच करण्यात आलाय.

हेही वाचा: नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?

तरूणांना खेळाकडे आकर्षित करायचंय

दर चार वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या जातात. मागची ऑलिंपिक २०१६ मधे रिओ डी जानेरो या ब्राझीलमधल्या शहरात झाली होती. आता ४ वर्षांनी म्हणजे २०२० मधे ऑलिंपिक होणं अपेक्षित होतं. पण कोरोना वायरसने सगळं वेळापत्रक उलटंपुलटं केलं. आता त्या २३ जुलै २०२१ मधे जपानमधल्या टोकियोत होईल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे २०२४ मधे फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं.

अशातच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती म्हणजे आयओसीनं ऑलिंपिकमधे ब्रेकडान्सिंगचा खेळ म्हणून समावेश करायचं ठरवलंय. २०२१ ला टोकियोमधे होणाऱ्या स्पर्धेत या खेळांचं पदार्पण होईल. त्यानंतर म्हणजे २०२४ पासून या खेळाची स्पर्धा भरवून जिंकणाऱ्याला सुवर्ण पदक वगैरेही दिलं जाणार आहे. ब्रेकडान्सिंगसोबतच रॉक क्लाइंबिंग आणि सर्फिंग याही खेळांचा ऑलिंपिकमधे समावेश केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून तरुणांचा खेळाकडचा कल कमी होताना दिसतोय. त्यामुळे अशा नव्या, लोकप्रिय खेळांचा समावेश केल्याने तरूणांना आकर्षित करणं सोपं जाईल म्हणून आयओसीने हे तीन खेळ ऑलिंपिकमधे आणण्याचा निर्णय घेतलाय. रॉक क्लाइंबिग आणि सर्फिंग या खेळांना खेळ म्हणता येतं. पण ब्रेकडान्सिंग हा डान्सचा प्रकार असूनही खेळात समाविष्ट होण्याइतका लोकप्रिय कसा झाला यामागचा इतिहास फारच रंजक आहे.

संगीतातल्या ब्रेकवरचा डान्स

ब्रेकिंग म्हणजे तोडणं किंवा थांबणं. संगीतात एक धून सुरू असताना ती मधेच थांबवायचं. गाण्याचं रेकॉर्डिंग किंवा सीडी मागे पुढे करायची. संगीतातल्या या ब्रेकवर डान्स केला म्हणून त्याचं नाव ब्रेकडान्स म्हटलं गेलं. आणि हा डान्स करणारे लोक म्हणजे ब्रेकर किंवा बी बॉईज आणि बी गर्ल्स.

या ब्रेकर्सला आपल्या डान्सला ब्रेकडान्सिंग म्हटलेलं आवडत नाही. या डान्समधला ठराविक भाग समोर आणून ते किती सोप्पं आहे असं दाखवणाऱ्या मीडियाच्या कावेबाजपणामुळे या डान्सला ब्रेकडान्सिंग हे नाव मिळालं. त्यांच्या मते या डान्सला बी बॉईंगी किंवा ब्रेकिंग असं म्हणावं. ऑलिंपिकमधेही याला खेळ म्हणून मान्यता देताना त्याचं नाव ब्रेकिंग असंच ठेवण्यात आलंय.

डान्समधे प्रामुख्याने चार गोष्टी असतात. टॉपरॉकिंग, डाऊनरॉक, पॉवर मुव्स आणि फ्रिझेस. टॉपरॉकिंगमधे उभं राहून तालावर पाय थिरकवायचे असतात, तेही एकदम स्टाईलमधे. या उलट डाऊनरॉकमधे जमिनीवर तालात सगळं शरीर फिरवायचं असतं. हात, पाय किंवा डोकं यांचा वापर करून असा डाऊनरॉक करणं ही तर ब्रेकर्सची खासियतच आहे. तसंच, पॉवर मुव्समधे अतिशय वेगाने तालाच्या बरोबरीने शरीराची हालचाल अपेक्षित असते. तर इतकं पटापट हालणारं शरीर अचानक एका जागी स्थिर थांबवलं तर त्याला फ्रिझ केलं असं म्हटलं जातं.

या चारही स्टेपचं मिश्रण ब्रेकिंगमधे ठळकपणे दिसतं. पण या पलीकडेही ब्रेकिंगमधे अनेक प्रकारच्या स्टेप्स केल्या जातात. त्यासाठी ड्रमच्या तालाचं प्रचंड ज्ञान लागतं. नुसतं तेवढंच नाही तर त्याबरोबर आपल्या मनावर आणि शरीरावरही ताबा लागतो. शिवाय, हे बी बॉईस किंवा बी गर्ल्स कधीही ठरवून ब्रेकिंग करत नाहीत. तसा तो ठरवताच येत नाही.

बहुतेक वेळा या डान्समधे जुगलबंदी केली जाते. समोरच्या ब्रेकरचा डान्स पाहून आपण काय पद्धतीनं स्टेप्स घ्यायच्या आणि त्यात आपला ठसा कसा उमटवायचा हे ठरवायचं असतं. त्यामुळे उत्स्फुर्तपणे जसा ताल चालू असेल, जसा मूड असेल तसा डान्स केला जातो.

हेही वाचा: आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

अभिव्यक्तीचं नवं माध्यम

या सगळ्या डान्सचं स्वरूप आज इतकं व्यवस्थित दिसतं की एखाद्या मोठ्या डान्सरने हा प्रकार शोधून काढला असेल असं वाटतं. पण खरंतर, हा डान्स प्रकार एका लोक चळवळीतून पुढे आलाय. कुठल्या स्टुडिओमधे किंवा सिनेमाच्या दृश्यातून हा डान्स प्रकार पुढे आलेला नाही. तर चक्क रस्त्यावर नाचणाऱ्या लोकांनी तो जगभरात पोचवलाय.

१९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या ब्रोन्क्स नावाच्या छोट्या उपनगरात त्याची सुरवात झालीय. हा डान्स करणाऱ्या लोकांकडे तेव्हा सन्मानाने पाहिलं जात नव्हतं. कारण, ते लोक होते आफ्रिकन अमेरिकन आणि पुर्तो रिकन. ही सगळी अमेरिकेतली कृष्णवर्णीय माणसं.

१९७० ला अमेरिकेत मोठी आर्थिक मंदी चालू झाली. न्यूयॉर्क शहरही यात अडकलं होतं. त्यात उत्पादनातली घट आणि ब्रॉन्क्स एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे शहराची अर्थव्यवस्था खाली घसरत होती. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिथल्या गौरवर्णीय मध्यमवर्गीय लोकांनी न्यूयॉर्ककडे धाव घेतली.

हे लोक निघून गेल्यावर मागे उरलेल्या आफ्रिकन अमेरिकन, पोर्तू रिकन आणि कॅरेबियन स्थलांतरितांच्या हाताला काम उरलं नाही. गरिबीनं गुन्हेगारी, हिंसेत वाढच झाली. गँगस्टरच्या टोळ्या तयार होऊ लागल्या. बनियनवर फिरणारी, साध्या लोखंडाचे दागिने, हातात, गळ्यात चैनी घालणारी ही तरूण पिढी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करू पाहत होती.

सामाजिक विषमतेत खालच्या पायरीवर असल्यानं मंदीचा सगळ्यात मोठा फटका या कृष्णवर्णीय लोकांनाच बसला होता. नव्या संधीची दारं बंद झाली. अशात स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी हे तरुण रस्त्यावर उरतले. नाचू लागले, गाऊ लागले. गौरवर्णीय सोडून गेल्यावर त्यांच्या मोकळ्या पडलेल्या इमारती या तरूणांनी काबीज केल्या. त्याला तिथं ब्लॉक म्हटलं जातं. या ब्लॉकमधे त्यांच्या पार्ट्या सुरू झाल्या. आणि या पार्ट्यांमधे हिप हॉप कल्चरचा पाया उभारला गेला.

हिंसेची जागा ब्रेकिंगला

यातले काही तरूण डीजे म्हणून काम करत होते. संगीताचं नवीन तंत्रज्ञान त्यांच्या हाती होतं. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून गाण्याचं रेकॉर्डिंग मागं पुढं करून, त्याला ब्रेक लावून एकच गाणं तासन्तास वाजवता यायचं. मग मोकळ्या ब्लॉकमधे हे डीजे आणि त्या ब्रेक संगीताला बोल देणारे, ईमसिंग करणारे एमसी म्हणजे रॅपर्स यांनी हिप हॉप संगीत तयार केलं. या संगीतावर नाचण्यासाठी कार्डबोर्डाचं स्टेज उभं राहिलं. आणि शहरातल्या भिंती या ग्राफिटी रंगवायचा कॅनव्हास झाल्या.

डीजे, रॅप, ब्रेकिंग आणि ग्राफिटी या चार गोष्टीतून उभं राहिली ती हिप हॉप संस्कृती. १९७० मधल्या आफ्रिकन अमेरिकनांची ही संस्कृती. ब्रेकिंग हा त्यातला एक भाग. हिपहॉपचं संगीत आणि रॅपचे बोल यावर करायचा हा नाच. स्वतःच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीबद्दलचा सगळा राग या डान्समधून निघू लागला. मनातून ‘ब्रोक’ झालेले तरूण ‘ब्रेक’डान्स करणार ना!

अमेरिकेतल्या गुंडाच्या गँगमधे तर हिंसेची जागा या ब्रेकिंगनं घेतली. दोन टोळ्यांमधलं शत्रुत्व मारामारीने जपण्याऐवजी ही मंडळी ब्रेकिंग करून एकमेकांवर कुरघोडी करू लागली. दोन टोळ्यांमधल्या दोन ब्रेकर्सची जुगलबंदी चालायची. एकापेक्षा एक भारी स्टेप प्रत्येक ब्रेकर करायचा.

हेही वाचा: कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?

मायकल जॅक्सननं घडवली क्रांती

डीजे हर्क याने या हिपहॉप संस्कृतीची सुरवात केली असं म्हटलं जातं. गाण्याचं रेकॉर्डिंग केलेल्या सीड्या मागे पुढे फिरवून, गाण्याला ब्रेक देता येतो हे जमैकन संगीताच्या प्रभावातून त्याला कळालं होतं. त्यानेच यमक जुळणारे शब्द वापरून या ब्रेक संगीताला बोल दिले. त्यातून रॅप तयार झाला.

ब्रेकिंग करणारे तरुण आपल्या भारी स्टेप ब्रेक संगीत आल्यावर करण्यासाठी राखीव ठेवायच्या. डीजे कधीही सीडी मागे फिरवून ब्रेक संगीताची सुरवात करायचा. ते सुरू झालं रे झालं की एखादा ब्रेकर गोलाच्या मध्यभागी येऊन हेडस्पिनिंग वगैरे करून दाखवत असे. डोकं जमिनीवर असताना त्याच्या आधारावर गिरक्या घेणं हे फारच इंटरेस्टिंग होतं. सुरवातीला अशाच काही स्टेप ब्रेकर्स करत होते. नंतर मात्र त्यात भर पडत गेली.

झुलू किंग, द ब्रेकिंग क्र्यू असे ब्रेक डान्सिंगचे बँडही तयार झाले. त्यांनी ब्रेकिंगचा इतिहास घोकला आणि डान्स प्रकार अमेरिकेत सगळीकडे पोचवला. १९७० च्या शेवटाला सगळे डिस्को ब्रेकिंगने भरून गेले. १९८० च्या सुरवातीला तर मीडियाकडून ब्रेकिंग म्हणजे ब्रेकडान्सिंग उचलून धरलं गेलं. हिप हॉप संगीत आणि ब्रेकिंग जगभर पोचलं ते मायकल जॅक्सनमुळं. मूळ आफ्रिकन वंशाच्या या डान्सरनं ब्रेकिंगच्या अनेक नव्या पद्धती शोधल्या. त्याच्या मूनवॉककडे पाहून तर आपण आजही डोळे मोठे करतो.

बॉलिवूडवर आहे ब्रेकिंगची जादू

दोन दशकं म्हणजे सुमारे २० वर्ष ब्रेकिंगचं भूत तरुणांच्या डोक्यावर होतं. दुसरा कोणताही डान्स प्रकार त्यांना आपला वाटत नव्हता. या ब्रेकिंगनं इतकं वेडं करून सोडलं होतं की हॉलिवूडमधे त्यावर अनेक सिनेमे निघाले. अल्बम निघाले. मालिका निघाल्या. पुस्तकं लिहिली. त्यावरचं साहित्य रचलं गेलं. वीडियो गेम्सही बनवले गेले. अगदी आजही ब्रेकिंगसाठी लोक आयुष्य पणाला लावतात. रॅपर होण्यासाठी आपलं असलं नसलेलं करियर सोडून देतात.

आज हिप हॉप संगीत जगभरात पोचलंय. ब्राझील, कंबोडिया, कॅनडा, रशिया, साऊथ कोरिया, जपान, फ्रान्स आणि चीनमधेही ब्रेकिंगची क्रेझ आहे. भारतातल्या तरूणांनाही ब्रेकिंग फार आपलं वाटत आलंय. ब्रेकिंगचा परिणाम आजही बॉलिवुडवर दिसतो. आज हे ब्रेकिंग टीवीवरचे गेम शो आणि एबीसीडीसारख्या सिनेमातून परत आलं. गली बॉय सिनेमा असो किंवा हनी सिंग, बादशाह यांचे अल्बम असोत, हिप हॉप कल्चरची जादू आजही बॉलिवूडवर कायम आहे.

या सिनेमांचं, हनी सिंगचं अनुकरण करणाऱ्या लहान मुलांना, तरूणांना प्रोत्साहन दिलं जात नाही. असं विक्षिप्त नाचत बसल्याने करियर होणार आहे का, असं विचारलं जातं. आता या प्रश्नाचं हो असं उत्तर देता येईल. भारतीय वंशाच्या करम सिंगकडे याचं उदाहरण म्हणून पाहिलं जातंय. २०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत ब्रिटनकडून तो ब्रेकिंगच्या स्पर्धेत उतरणार आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तो ब्रेकिंग करतोय. त्यासारखीच करियरची आणि त्याबरोबरीनं अभिव्यक्तीची नवनवीन दारं आता जगभर मोकळी होत राहतील.

हेही वाचा: 

जमाना मीमचा आहे!

नेपाळमधल्या सत्तासंघर्षामागचं कारण काय?

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?

तुमचा फेसमास्क WHO नं सांगितल्यासारखा आहे का?