श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे लोकवर्गणी गोळा न करता गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्ष झाली. १९९३ च्या शताब्दी वर्षात नि त्यानंतर देणग्यांमधूनच इतका अमाप पैसा मिळू लागला, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही.
पुण्यात १८५७ नंतरच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सुधारणांचे वारे जोमाने वाहू लागले. त्यात पुढे राष्ट्रीय विचारांचे प्रवाह निर्माण झाले. यातून अनेक चळवळी निर्माण झाल्या. महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यात सक्रिय होते. लोकमान्य टिळकांनी 'होमरूल' स्वराज्याची चळवळ हाती घेतली होती.
लोकसंघटन आणि लोकप्रबोधनाशिवाय स्वराज्याचं स्वप्न साकार होणार नाही, याची जाणीव लोकमान्यांना होती. पुण्यातील काही समाजधुरीणही या दृष्टीने विचार करत होते. १८९२ च्या सुमारास या समाजधुरीणांची टिळकांबरोबर बैठक झाली. या बैठकीत कृष्णाजीपंत खासगीवाले यांनी ग्वाल्हेरमधे त्यांनी पाहिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती दिली.
लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना स्वराज्याकरता जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे माध्यम योग्य ठरेल, असा विश्वास या बैठकीस उपस्थित असलेल्या सार्यांनाच वाटला. या बैठकीस पुण्यातील एक प्रसिद्ध 'नगरशेठ' दगडूशेठ हलवाई उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन १८९२ मधे पुण्यात पाच सार्वजनिक गणपतींची स्थापना केली आणि पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली, ज्याचा प्रसार पुढे महाराष्ट्रात आणि देशात सर्वत्र झाला.
१८९२ च्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादानंतर लोकमान्य टिळकांनी 'केसरी'तून लोकांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुढे येण्याचं जाहीर आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या कोतवाल चावडीजवळील बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे गणेशोत्सव सुरू केला. हा उत्सव सुरू करताना त्यावेळी त्यांनी लोकवर्गणी गोळा केली नव्हती.
हेही वाचा: बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत
१८९३ मधेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. दुर्देवाने त्यावर्षी आलेल्या प्लेगच्या साथीत दगडूशेठ यांचा मुलगा दगावला आणि ते दुःख सहन न होऊन तीन-चार महिन्यातच त्यांनीही या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी या गणपतीची व्यवस्था पेठेतल्या लोकांकडे सोपवली आणि खऱ्या अर्थाने हा गणपती 'सार्वजनिक' झाला.
विशेष म्हणजे, त्यावेळी हा गणपती 'बाहुलीच्या हौदाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध होता. 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती' या नावाने तो खूप नंतर प्रसिद्ध झाला. खरंतर पुण्यात गणपतीची काही प्राचीन मंदिरं आहेत. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत, त्याचं अस्तित्व पूर्वीपासून आहे. सोमवार पेठेतलं त्रिशुंड गणपतीचं मंदिरही प्राचीन आहे. या मंदिरात शिल्पसौंदर्य आजही पाहता येतं आणि आज सारस बागेचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला 'तळ्यातला गणपती' तर पेशवाईत भूषण मानला जातो.
तरीही सुमारे १२० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला 'बाहुलीच्या हौदा'चा गणपती अर्थात 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई' गणपती आज पुण्याची एक ओळख बनलाय. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विश्वात या मंडळाने निर्माण केलेलं स्थान. गेल्या शंभर वर्षात पुण्यात आकाराला आलेल्या वेगवेगळ्या चळवळींमधे या मंडळाची भूमिका महत्त्वाची ठरलीय.
१९५२ मधे या गणपतीची व्यवस्था सुवर्णयुग तरुण मंडळाच्या हाती सोपवण्यात आली. त्यातून या गणपतीचं आजचं स्वरूप विकसित झालं. या मंडळामधे तात्यासाहेब गोडसे होते. त्यांनी दीर्घकाळ या मंडळाची धुरा वाहिली. त्यांचं सामाजिक सांस्कृतिक भान, त्यांची कल्पकता आणि त्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन, आज या गणपतीचा सर्वत्र जो बोलबाला आहे, त्यासाठी कळीच ठरलं.
तात्यासाहेब गोडसेंबरोबर दत्तोबा चव्हाण, लक्ष्मणराव जमदाडे, गजानन केदारी आदी मंडळी होती. १९५२ च्या सुमारास या गणपतीची सार्वजनिक वर्गणी साधारण ३५० रुपये जमायची. ती पुढच्या दहा, बारा वर्षात पाच हजार रुपयांपर्यंत पोचली. १९५२ मधे या गणेश मूर्तीच्या अंगावर ४२ पदरी पंचधातूची कंठी आणि हातात सोन्याचा मुलामा असलेली चार कडी होती.
१९६७ मधे या गणपतीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्यावर्षी मंडळाने परिश्रमपूर्वक २५ हजार रुपये वर्गणी जमवली होती. मग काळ बदलला. त्यापुढचा टप्पा आला.१९९३ मधे शताब्दी साजरी होताना देणग्यांमधूनच इतका निधी उपलब्ध होऊ लागला होता, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही.
गेल्या अंदाजे पंधरा-वीस वर्षांतल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आज दगडूशेठ हलवाई गणपतीचं कायमस्वरूपी मंदिर पुण्यामधल्या बुधवार पेठेत फरासखाण्याजवळ उभं राहिलंय. देणग्या आणि तत्सम उत्पन्न कोट्यवधींच्या घरात आहे. आजची गणपतीची मूर्ती सर्वांगाने सुवर्णमंडित आहे. एका अर्थाने हा गणपती शब्दशः श्रीमंत झालाय.
हेही वाचा: आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी
थोडं मागे वळून पाहिलं तर असं दिसतं की १९६१ चा पानशेतचा पूर आणि १९६५ ची धार्मिक दंगल हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कठीण प्रसंग होते. पानशेत पुराच्या प्रसंगात मदत कार्यात सुवर्णयुग मंडळाचा सहभाग लक्षणीय ठरला. तसंच दंगलीनंतरच्या काळात पुण्यात धार्मिक सलोखा स्थापित करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.
१९६७ मधे सुवर्ण महोत्सवानंतर शंकराप्पा शिल्पी या शिल्पकाराने जुन्या मूर्तीच्या फोटोवरून नवी मूर्ती तयार केली. या गणेश मूर्तीच्या पोटात ताम्रपटावर सिद्ध केलेलं यंत्र बसवण्यात आल्याचं सांगितलं जातं. आज हीच मूर्ती अस्तित्वात आहे. होम हवन, जपजाप्य, मंत्रपठण, अथर्वशीर्ष पठण असे धार्मिक उपचार सातत्याने केले जाऊन या मूर्तीत पावित्र्य जपलं जातं, असं सांगण्यात येतं.
या गणपतीवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गणेशोत्सवात खास या गणपतीच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर देश आणि देशाबाहेरुनही भाविक येत असतात. दर्शनासाठी मोठ्या रांगा, श्रींच्या चरणी वाहिलेल्या अगणित नारळांचे ढीग हा पुणेकरांच्या चर्चेचा विषय होतो. आता अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्रशस्त मंदिरामुळे बाराही महिने या गणपतीच्या दर्शनाची सोय झालीय.
दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला या मंदीराच्या परिसराला अक्षरशः यात्रेचं स्वरूप येतं. अतिशय गजबजलेल्या भागात हे मंदिर असल्याने वाहतुकीची कोंडी हमखास होते. अलीकडच्या काळात दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या मंदिराचा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. काही वर्षांपूर्वी या मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंगमधे कमी शक्तीच्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे सध्या तिथली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.
सामाजिक कार्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट स्थापन करण्यात आलाय. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. मावळ आणि मुळशी तालुक्यात आदिवासी गावांसाठी फिरता दवाखाना, देवदासींच्या मुलींसाठी संगोपन केंद्रं, वीटभट्टी कामगारांसाठी दगडूशेठ गणपती नगरची स्थापना, वृद्धाश्रम हे काही ठळक उपक्रम सांगता येतील.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे तसेच हिवाळ्यात शरद ऋतूमधे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानांचं आयोजन आणि विविध उपक्रमांतून पुण्यातच सांस्कृतिक पर्यावरण कायम राखण्याचं काम करण्याबाबतही हे मंडळ प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जातं. एकूणच पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्याही सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात या गणपतीने मानाच स्थान मिळवलंय, हे निश्चित.
हेही वाचाः
देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)