फ्रॅक्चर्ड फ्रिडम : ४० वर्ष संघर्षात आणि १० वर्ष तुरुंगात घालवणाऱ्या कोबाड गांधींची गोष्ट

२६ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.

ह्युमन टच असलेल्या किंवा लीगल सिस्टमवर भाष्य करणाऱ्या  किंवा रिवॉल्युशनरी कार्यकर्त्याचा जीवनपट मांडणाऱ्या सिनेमाचं कथानक फिकं पडावं असं कोबाड गांधी यांचं आयुष्य! तसं खरंतर 'चक्रव्यूह'मधे प्रकाश झा यांनी ओम पुरींच्या माध्यमातून कोबाड गांधींच्या जीवनावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पण, कोबाड गांधींचं खरं आयुष्य ‘Truth is stranger than fiction' म्हणतात ना, तसं आहे.

लंडनमधे भोगला तुरूंगवास

काय आयुष्य आहे या माणसाचं? दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू पारशी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. वडील ग्लॅक्सो या जगप्रसिद्ध कंपनीचे संचालक. देहरादूनच्या डून स्कूलमधे ते शिकले. संजय गांधी, कमलनाथ, नवीन पटनायक हे त्यांचे वर्गमित्र.

नंतर मुंबईत सेंट झेवियर्समधे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर कोबाड गांधी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधे जातात. चार्टर्ड अकाऊंटन्सी शिकतात. उच्चपदावर नोकरी लागण्याची हमी घेऊनच भारतात परत येतात. वडील ग्लॅक्सोचे डायरेक्टर असल्यानं तशीही नोकरी सहज लागण्याची स्थिती होती. पण लंडनमधे घडलेल्या एका घटनेनं या माणसाचं आयुष्यच बदललं.

साऊथ एशियन विद्यार्थ्यांना तिथं वर्णद्वेषावरून त्रास दिला गेला. त्याचा विरोध म्हणून तारूण्यात असलेल्या कोबाड गांधींनी तिथल्या साऊथ एशियनांच्या वस्त्यांमधे निदर्शनं केली. परिणामी तीन महिन्यांचा तुरुंगवास झाला.

कोबाड गांधी या पुस्तकात सांगतात, ‘वर्णद्वेषाचं स्तोम आणि त्याला चिकटलेली वसाहतिक मानसिकता यावर लंडनमधे बरंच वाचलं. मला त्याचं उत्तर मार्क्सवादात सापडलं. मी मार्क्सवाद वाचत गेलो आणि त्याबाबत सहानुभूती वाढत गेली.

हेही वाचा: आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

विद्रोही विचारांचं वळण

कोबाड मुंबईत परतले आणि वडलांच्या ओळखीवर सहज लागू शकत असलेली नोकरी न करता, ते धारावी फिरले. तिथं काम केलं. वरळी नाका इथल्या मायानगरमधल्या लोकांचे प्रश्न जाणून घेऊ लागले आणि त्यांच्यासाठी भांडू लागले.

हा सगळा काळ कधीचा, तर १९७२-१९७३ चा. म्हणजे, याच दरम्यान महाराष्ट्रात दलित पँथर आकार घेत होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव काळा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला गेला. या काळात विद्रोही विचारांचं वारं जोमानं वाहत होतं. त्यात मुंबईतल्या दलित वस्त्यांमधे दिवसभर फिरणारा, संवेदनशील कोबाड गांधी हा तरुण विद्रोही विचारांकडे वळला नसता, तरच नवल!

पुढे ते प्रयोम म्हणजे प्रोग्रेसिव युथ मूव्हमेंटशी जोडले गेले. जनशक्तीशी संबंधित ही संघटना होती. यातून कोबाड गांधी साम्यवादी विचारांकडे वळले आणि साम्यवादानं भारावूनही गेले. पण त्यांना इथलं वास्तव माहीत होतं.

वास्तवाचं आंबेडकरी उत्तर

मुंबई सोडून ते आणि त्यांची जोडीदार अनुराधा गांधी नागपुरात गेले. तिथं शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवू लागले. वरळी सी फेसला अलिशान घर असलेले कोबाड गांधी अडीचशे-तीनशे स्केअर फूटाच्या घरात राहू लागले. विचारांसाठी त्यांनी केलेला हा त्याग होता.

पण आधी म्हटलं तसं, त्यांना इथल्या वास्तवाची जाण होती. म्हणूनच, ते सत्तरीच्या दशकातल्या साम्यवादी वर्तुळाचा जातवास्तवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगतात, तो आजही तितकाच लागू होतो, असं म्हणायला काही हरकत नाही.

कोबाड गांधी म्हणतात, 'तेव्हा जातीचा प्रश्नचा सगळ्या प्रकारच्या मार्क्सवादी लोकांकडून तिरस्कराच केला जायचा. मार्क्सवादी विचारांचा कणा असलेल्या वर्ग संघर्षाच्या प्रश्नाला फाटा फोडणारा म्हणून त्याकडे पाहिलं जायचं.’

स्वत: या वर्तुळात असताना त्यांनी केलेलं हे विश्लेषण आहे. पण, कोबाड गांधी पुढे नमूद करतात की, ‘इथल्या वास्तवाला आंबेडकर हे उत्तर आहे. आंबेडकरांनंतर काहीसं दुर्लक्षित झालेल्या दलितांच्या प्रश्नांना दलित पँथरनं खऱ्या अर्थानं राजकीय अजेंड्यावर नेलं,’ असं कोबाड गांधी म्हणतात.

हेही वाचा: अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

वय झालं तरी खटले सुरूच

मला या माणसाचं कौतुक यासाठी वाटतं की, ते स्वत: साम्यवादी विचारांचे आहेत. विशेषत: भारतातले साम्यवादी जातवास्तवाकडे कानाडोळा करणारे चिवट असतात. पण कोबाड गांधी यांनी जातवास्तव मान्य केलं तसंच त्यावरची आंबेडकरांची मांडणी समोर ठेवली. या पुस्तकात याच अनुषंगाने कॉ. शरद पाटील यांचा उल्लेख येतो.

१९७२-१९७३ पासून पुढे ४० वर्ष शोषित-वंचितांच्या न्यायहक्कांसाठी रानोरानी भटकणाऱ्या कोबाड गांधींना २००८ ला अटक झाली. युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाला. देशातल्या सहा राज्यांमधल्या सात तुरुंगांमधे त्यांना बंदिस्त राहावं लागलं. दिल्लीतल्या तिहार जेलमधे जास्त काळ म्हणजे जवळपास सहा-सात वर्ष ते राहिले. २०१९ च्या ऑक्टोबरमधे ते तुरुंगातून बाहेर आले. अजूनही खटले सुरूच आहेत. आता त्यांचं वयही झालंय आणि बऱ्याच आजारांनीही घेरलंय.

ते त्यांच्यावरच्या एक एक करत गुन्ह्यांमधून बाहेर पडतायत. देशभरात एकूण १८ खटले त्यांच्यावर सुरूयत. या खटल्यांच्या निमित्ताने १० वर्षांच्या तुरुंगातल्या काळात त्यांना आलेले विविध अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेत.

तुरूंगात पाहिलेलं जग

तिहारमधल्या कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवी वेदना सांगताना, ते अफजल गुरुपासून सुधींद्र कुलकर्णींपर्यंत त्यांच्या तुरुंगातल्या सहकैद्यांबाबतचे अनुभव सांगतात. त्यांची निरीक्षण क्षमता कमालीची कौतुकास्पद वाटते. झारखंडमधला तुरुंग असो, आंध्र प्रदेशमधला असो किंवा आणखी कुठल्या राज्यातल्या तुरुंगात असो, त्यांनी तिथली स्थितीही या पुस्तकात अगदी सखोल सांगितलीय.

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपातून १० वर्ष तुरुंगात घालवलेल्या या अत्यंत हुशार माणसानं तुरुंगातून पाहिलेलं जग, तिथल्या कैद्यांचं भावविश्व, एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करताना प्रशासनाचा हलगर्जीपणा, कोर्टाची दिवसेंदिवस चालणारी प्रक्रिया आणि या सगळ्यात त्यांना आधार देणारे कुटुंबीय, वकील, मानवाधिकार कार्यकर्ते या सगळ्यांचा उल्लेख पानापानावर येतो.

हेही वाचा: गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

पोलिसही नरमले

कोबाड गांधी भावनिक होतात, ते अनुराधा गांधी यांच्याबद्दल सांगताना. आदर आणि प्रेम या दोन्ही भावना त्यांच्या शब्दातून दिसतात. अनुराधा गांधी यांचा मृत्यू शोषित-वंचितांसाठी काम करतानाच झाला. त्यांच्या इतकी उत्तम कार्यकर्ती नव्हती, असं ते अभिमानानं नमूद करतात.

दिल्लीत त्यांची चौकशी करताना अनुराधा गांधींबद्दल पोलिसांनी विचारलं तेव्हा कोबाड गांधींच्या डोळ्यात अश्रू आले आणि तेव्हा ते पोलीसही नरमले. त्यांनी त्यापुढे कधी अनुराधा गांधींबद्दल विचारलं नाही, असं ते सांगतात.

या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल लिहिलंय. डून स्कूलमधल्या आठवणी सांगितल्यात. लंडनमधल्या शिक्षणाबद्दल लिहिलंय. तिथून आल्यानंतर मायानगरमधल्या झोपडपट्टीतल्या कामाबद्दल लिहिलंय. दलित चळवळींबद्दल लिहिलंय. नक्षलवादी-माओवादी चळवळींबद्दल लिहिलंय. भारतातील डाव्यांबद्दल लिहिलंय.

भारतातल्या तुरुंग-पोलीस-न्याय व्यवस्थेबद्दल लिहिलंय. भारताच्या आर्थिक वाटचालीबद्दल लिहिलंय, स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दल लिहिलंय. आपल्याला आश्चर्य वाटावं इतकं सारं या ३०० पानांमधे कोबाड गांधी यांनी एका उत्तम फ्लोमधे लिहिलंय.

हेही वाचा: आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह?

स्वतःचं घरही नाही

या माणसाने दहा-वीस खंड लिहिले पाहिजेत, असं वाटून जातं. इतकं काही सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे. पण त्यांनी आवरत घेऊन, स्पेसिफिक आणि फ्लोनुसार लिहिण्यावर भर दिलाय.

शेवटी ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे प्रसंग सांगतात, तेव्हा ते वाचून डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात, शोषित-वंचित-कामगार-मजुरांसाठी काम करण्यात ४० वर्ष घालवली, त्याची शिक्षा की काय म्हणून मला १० वर्ष तुरुंगात राहावं लागलं. आता बाहेर आलो, तर राहण्यासाठी स्वत:चं छत सुद्धा नाही. आधार कार्ड किंवा कुठलंही सरकारी कागदपत्र नाही.

हे वाचून डोळे पाणावतात. आपण किती निष्ठूर आहोत, याची जाणीव होते आणि मन खात राहतं. ज्यांच्यासाठी त्यांनी ऐशोआरामी आयुष्य त्यागलं त्या लोकांनी तरी किती त्यांना आधार दिला? अर्थात, हा प्रश्न कोबाड गांधी विचारत नाहीत.

ते सांगतात, कधीही न ओळखणारे बरेच जण या काळात मदतीसाठी पुढे आले. फली नरीमन, रेबेका जॉन यांच्यापासून देशातले मोठमोठे वकील त्यांच्यासाठी उभे राहिले. आर्थिक मदतीसाठी डून स्कूलमधले वर्गमित्र पुढे आले. असे बरेच चांगले आणि सकारात्मक क्षण नोंदवून ते पुढे जाऊ पाहतात. 

बहिणीच्याच छताचा आसरा

कोबाड गांधी आता वांद्रे इथल्या त्यांच्या बहिणीकडे राहतात. या पुस्तकात पत्नी अनुराधा गांधी यांचा जितक्या प्रेम आणि आदराने उल्लेख येतो तितकाच त्यांच्या बहिणीचा येतो. बहिणीने दिलेली साथ ते विसरत नाहीत. आणि आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांच्या बहिणीच्याच छताचा आसरा कोबाड गांधींना आहे.

शोषित-वंचित-कामगारांसाठी जगणं पणाला लावलेल्या कोबाड गांधींचं आयुष्य संपत आलं, पण त्यांच्यावरचे खटले संपले नाहीत. ते सुरूच आहेत. कोरोनामुळे ते थांबलेत, इतकंच. वय मात्र आता त्यांच्या हातात नाही. जुन्या आठवणींमधून ते भावनिक होतात. इतकं सोसूनही अजूनही न्यायहक्कांसाठीची त्यांच्यातली तळमळ शब्दा-शब्दांमधून दिसते आणि ते वाचून आपण निशब्द होतो.

हेही वाचा: 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा