जगातल्या पहिल्या संत कान्होपात्रा स्मारकाची संघर्षकथा

२१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


संताची भूमी असलेल्या मंगळवेढ्यात आता संत कान्होपात्रा महाराजांच्या पाऊलखुणा शोधणं सोप्पं काम नाही. पण आता संत कान्होपात्रा महाराजाचं जगातलं पहिलं स्मारक झालंय. एका कानड्या कर्नाटकू प्राध्यापकाने हे स्मारक उभं केलंय. पण हे काही एका दिवसात घडलं नाही. त्यामागची ही गौरवाची, कौतुकाची आणि मनाला चटका लावणारी स्टोरी.

‘कानड्या कर्नाटकू’ विठ्ठलाचं मराठी मातीशी खूप जुनं नातं आहे. हे कर्नाटकू नातं रोज बहरतंय. बागडतंय. फुलतंय. असाच एक कर्नाटकी प्राध्यापक सध्या मंगळवेढ्याच्या मातीत रुजलाय. अर्थशास्त्रात रमणाऱ्या या प्राध्यापकाला इथल्या मातीने लळा लावलाय. प्राध्यापकानेही इथल्या संत साहित्यातच आपल्या जीवनशास्त्राचा ‘अर्थ’ शोधलाय. या सगळ्यांमागची स्टोरी फार कौतुकाची, गौरवाची, अभिमानाची आहे.

कुणालाही हेवा वाटावा अशी संतभूमी

महाराष्ट्रातलं ज्वारी कोठार कुठंय? या एमपीएससीच्या प्रश्नाचं उत्तरंय मंगळवेढा. सोलापूर जिल्ह्यातलं तालुका. सोलापूरपासून ५४ किलोमीटर आणि दक्षिण काशी असलेल्या पंढरपूरपासून २३ किलोमीटरवर असलेल्या मंगळवेढ्याची जमीन काळीभोरर्र आहे. आता पंचवीसेक हजार लोकसंख्या असलेलं मंगळवेढ्याच्या या मातीने अनेक संत दिले. त्यामुळे ही संतांची भूमी. थोर संतांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. 

संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत गोपाबाई, स्वामी समर्थ, संत बसवेश्वर महाराज, बाबा महाराज आर्वीकर, संत बागडे महाराज मारोळी, माचणूर सिताराम महाराज असे अनेक थोर संत या मातीत होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचेही पाय इथल्या मातीला लागले. शिवाजी महाराज चार दिवस इथं मुक्कामीच होते. कुणालाही हेवा वाटावा अशी ही भूमी.

संत वारसा जपणारी स्थळं

या संतभूमीचं दर्शनासाठी लोकांचा रोज राबता असतो. तीर्थक्षेत्री येणारा श्रद्धाळू असो, अभ्यासक असो किंवा पर्यटक असो त्याची एक अपेक्षा असते. ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण जात आहोत, तिथल्या सर्व स्थळांना, मंदिरांना भेट देणं. श्रद्धेनं माथा टेकवणं, अभ्यास करणं, संशोधन करणं किंवा नवं काय मिळतं ते शोधणं. ही स्मारकं टाईम मशीनसारखी असतात. काही क्षणांकरिता का होईना ती आपल्याला त्या त्या युगात, काळात घेऊन जातात.

तशी ती ठिकाणी मंगळवेढ्यातही आहेत. बस स्टँडवर उतरल्यावर जवळच संत दामाजी महाराजांचा पुतळा दिसतो. बाजुला त्यांचं स्मारक, मंदिर आहे. पुढे गावात जाताच काही अंतरावर एका चौकात संत चोखोबा महाराजांचं स्मारक आहे. मात्र गावात संत कान्होपात्रा महाराजांच्या विशेष अशा कुठल्याच पाऊलखूणा दिसत नाहीत. जे आहे ते एक छोटंस मंदिर. तेही १९७७ मधे शनिवारपेठ भागात राईबाई कवडे या माउलीने बांधलंय. दीड कान्होपात्रा महाराजांची दीड फूट उंची मूर्ती होती. पाचेक वर्षांपूर्वी तिथे आता दोन फूटाची मूर्ती बसवण्यात आलीय. त्या तिथे पूजा वगैरे करायच्या. आजही तिथे नियमित पूजा वगैरे विधी होतात.

खंतवेड्या प्राध्यापकाची गोष्ट

आता हीच खंत दूर झालीय. याकामी हात लागलेत मराठी संतपरंपरेच्या प्रेमात पडलेल्या एका कर्नाटकू प्राध्यापकाचे. मंगळवेढा-डोंगरगाव रस्त्यावर एकविरा माळाजवळ या प्राध्यापकाने स्वबळावर हे स्मारक उभारलंय. या संतप्रेमीचं नाव आहे, प्राचार्य आप्पासाहेब पुजारी.

मातृभाषा कन्नड होती, मराठी जुजबीच येत होतं. मात्र इतिहास, प्राचीन शिलालेख वगैरेंचा दांडगा अभ्यास आप्पासाहेबांना आहे. अनेक ग्रंथ, हस्तलिखितं, कात्रणं यांचा मोठा ठेवा त्यांच्याकडे आहे. संत चोखोबा महाराजांच्या अभंग आणि चरित्राचं संपादन त्यांनी करावं अशी मंगळवेढेकर ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली. त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली. इथूनच त्यांना मराठी संतसाहित्याची गोडी लागली.

अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या आप्पासाहेबांचे या विषयातली आतापर्यंत कन्नड, मराठी आणि इंग्रजीतून ११ पुस्तकं आलीत. ‘पाणी आणि पाण्याचं अर्थशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. या जिव्हाळ्यापोटी ते आजही यावर विविध प्रयोग, संशोधन, लेखन यासोबत व्याख्यानं देतात.

निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी म्हणून महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. भरपूर काम करता यावं म्हणून, आपली नोकरी आठ वर्ष आधीच सोडली. शेतकऱ्यांसाठी विविध व्याख्यानं, कार्यशाळा आणि शिबिरांचं आयोजन ते करतात. यासाठी त्यांनी आपल्या ‘रायगड’ या घरात खास बांधलेल्या मोठ्या हॉलमधे सोय केलीय. मार्गदर्शन करण्यासाठी ते विविध क्षेत्रांतले एक्स्पर्टस बोलवतात.

काम काही पुढं जाईना

अख्ख शिक्षण कानडीत झालेले  प्राचार्य आप्पासाहेब पुजारी गेल्या ३० ३५ वर्षांपासून मंगळवेढ्यात राहतात. मंगळवेढ्याजवळच्या एका कॉलेजवर ते प्राध्यापक होते. त्यांच्यासारख्या अभ्यासू आणि जिज्ञासू व्यक्तीला या गोष्टीच जाणीव होती. गावात संत कान्होपात्रा महाराजांच एक स्मारक व्हावं, असं त्यांना मनोमन वाटत होतं. यातूनच २००६ मधे एक समिती स्थापन झाली. मात्र २००६ ते २०१४ या काळात या स्मारकाच्या कामाला गतीच मिळाली नाही. आप्पासाहेबांचे प्रयत्न मात्र सुरूच होते.

मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ३५ व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले अप्पासाहेब सध्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ट्रस्टी आहेत. पण संत साहित्य हा त्यांच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय. संत साहित्यातल्या वेगवेगळ्या संशोधनासाठी ते अनेक वर्ष प्रवास करतायंत. सगळीकडे फिरत असताना त्यांना आपल्या मंगळवेढ्यातच संत कान्होपात्रा महाराजांचं स्मारक नसल्याची खंत बोचत होती. म्हणून त्यांनी तन, मन, धन यासोबतच स्वतःचा पूर्णवेळ देत संत कान्होपात्रा महाराजांच्या स्मारकाच्या कामाला वाहून घेतलं.

स्मारकाच्या विचाराने त्यांना झपाटलं होतं. दिवसरात्र त्यांच्या डोक्यात हाच विचार असायचा. एका अर्थाने स्मारकाचं लेआऊटचं या काळात त्यांच्या डोक्यात तयार होत होतं. या सगळ्या प्रोसेसबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘संतांना त्यांच्या केवळ मूर्तीवरून, चित्रांवरून जाणून घेता येत नाही. संतांचे अभंग, लेखन आणि त्यांचं कार्य ही त्यांची जिवंत स्मारकं असतात. त्यांचं साहित्य ही त्यांची अस्सल अभिव्यक्ती असते. या अभंगातून, त्यांच्या साहित्यातून आपल्याला त्यांचा सहवास मिळू शकतो.’

लोकांच्या आस्थेचा, चेष्टेचा विषय

आप्पासाहेब गावात संत कान्होपात्रा महाराजांचं स्मारक तयार करणार आहेत, याची सर्वत्र चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरवात तर सोडाच, पण साधी जागाही मिळत नव्हती. सरकारनेही जमीन दिली नाही. आप्पासाहेबांकडे माणूस भेटायला आला, की स्मारकाची चौकशी करायचं. यात कुणी श्रद्धेने आणि आस्थेने विचारपूस करणारं असायचं. तर कुणी खोडसाळपणे, डिचवायचं म्हणूनही त्यांना मुद्दाम विचारायचे. 

या सगळ्याने आप्पासाहेब अधिकाधिक निराश व्हायचे. खचायचे. शुन्यात नजर लावून उगीच कुठंतरी बघत राहायचे. आपल्या डोळ्यादेखत नवऱ्याची ही अवस्था शकुंतलाताईंना बघवत नव्हती. त्या माउलीला हे सगळं बघून रडू यायचं. पण या माउलीने खचून न जाता आपल्या नवऱ्याला खंबीर साथ द्यायचा निर्धार केला. 

बायकोने दाखवला नवा मार्ग

शकुंतलाताईंनी बँकेत जमा असलेले पैसे आणि काही दागिने या स्मारकासाठी देण्याचा विचार नवऱ्याला बोलून दाखवला. यातून एक नवा मार्ग सापडला. शकुंतलाताईंचं हे वागणं ऐकून, बघून थोरांची आठवण येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाईचं, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या जीवनात डॉ. विमलाबाईंचं मोठं योगदान आहे. शकुंतलाताईंनीही आपल्या नवऱ्याच्या कामात निव्वळ खारीचा वाटाच उचलला नाही, तर नवा मार्ग दाखवला.

आप्पासाहेबांचा भाचा गजानन घारगे यांची मंगळवेढ्याजवळ सव्वा गुंठा जमीन होती. त्यांनी या संत कार्यासाठी आप्पासाहेबांना हात दिला. स्मारकासाठी जागा हीच सगळ्यात मोठी अडचण होती. तीही आता सुटली. २०१७ ला राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांच्या हाताने या स्मारकाचं भूमिपूजन झालं. ऑगस्ट २०१८ मधे प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली.

पंढरपूरचे मूर्तिकार मंडेवाले यांच्याकडून संत कान्होपात्रा महाराजांची अत्यंत आकर्षक मूर्ती बनवून घेतली. कोणतंही कर्मकांड न करता, फुलांच्या ओंजळींनीच त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली, हे विशेष. आप्पासाहेबांनी आज याच जमिनीवर स्वतःच्या खिशातून जवळपास साडेआठ लाख रूपये खर्चून स्मारक उभं केलंय. आता मंगळवेढ्याला येणाऱ्या प्रत्येकाला या स्मारकातून संत कान्होपात्रा महाराज समजून घेण्याची सोय झालीय.

अभंगरूपी कान्होपात्रा महाराज भेटीला

ही तर केवळ सुरुवात झाली. आप्पासाहेब म्हणाले, ‘लोकांनी इथं येऊन या मूर्तीला नमस्कार किंवा पूजा करून जावं आणि समाधानी व्हावं, असं काही मला वाटत नाही. आणि अशाने कुणी समाधानीही होत नाही. संत कान्होपात्रा महाराजांनी केलेलं प्रासादिक आणि विद्वत्तापूर्ण लिखाण, त्यांची मांडणी, अभिव्यक्ती, त्यांची प्रतिभा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अभ्यासून ते अंगीकारले पाहिजेत.’

सकल संतगाथेत संत कान्होपात्रा महाराजांचे २३ अभंग आहेत. आप्पासाहेबांनीही मोठ्या मेहनतीने चार अभंग शोधून शोधून काढलेत. हे सर्व २७ अभंग त्यांनी ग्रॅनाईटमधे सुवर्णाक्षरांनी कोरून घेतले. हे अभंग कोरल्यामुळे ते खरोखरच ‘अभंग’ झालेत. याविषयी आप्पासाहेब म्हणाले, की कुणी हे अभंग आपल्या मोबाईलमधे, कॅमेऱ्यात फोटोरूपात नेतील. कुणी लिहून नेतील. इथे आल्यावर कुणीतरी या अभंगांवर चर्चा करेल. कोणत्या ना कोणत्या रूपाने का होईना अभंगरूपी कान्होपात्रा महाराज सर्वांपर्यत पोचल्या पाहिजेत.

संत कान्होपात्रा महाराजांच्या २७ अभंगांनी आणि आकर्षक मूर्तीने नटलेल्या या स्मारकाचं कार्तिकी पौर्णिमेला २३ नोव्हेंबर २०१८ ला लोकार्पण झालं. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांची मोठी मुलगी भगवती महाराज सातारकर, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, मराठी संतांचे भारूड सातासमुद्रापार पोचवणाऱ्या भारूडकार चंदाताई तिवाडी यांची यावेळी उपस्थिती होती. वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवरही आले होते.

आता मिशन ‘संतदर्शन’

आप्पासाहेब, शकुंतलाताईंच्या कुटुंबातले लोकही हे सगळा स्वप्नसोहळा बघण्यासाठी आवर्जून आले होते. सुप्रिया पुजारी, सुलोचना पुजारी, गजानन घारगे, ज्योतीबा पुजारी, प्रचिती घारगे, आराध्या पुजारी, पार्थ घारगे यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय केली. 

हे कान्होपात्रेचं मंदिर असण्याऐवजी स्मारक म्हणूनच लोकांपर्यंत पोचावं असा वारंवार उल्लेख प्राचार्य आप्पासाहेब पुजारी करतात. ही सुरवात आहे. ‘संतदर्शन’ नावाचं भव्य आणि परिपूर्ण ग्रंथालय येत्या कार्तिकी पौर्णिमेपर्यंत त्यांना इथे सुरू करायचंय. महाराष्ट्रातील सगळ्या संतांचं साहित्य, त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य इथे उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजीतील संत साहित्य, हस्तलिखितं अभ्यासकांना आणि संशोधकांना इथे उपलब्ध होतील.

यावेळी बोलता बोलता आप्पासाहेबांनी एक सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले, ‘आग लागली की, सगळे आगीकडे पळतात. मात्र यातला कुणीच ती आग विझवू शकत नाही. ते उगच आगीजवळ गर्दी करतात. अडचणी आणतात. मात्र या उलट आगीच्या विरूद्ध दिशेने, पाण्याच्या दिशेने जे जातात, तेच आग विझवू शकतात आणि विझवतातही.’

घेई कान्होपात्रेस हृदयात

जग पुढे पुढे जात असताना आपण मागे संतसाहित्याकडे का वळतोय, हे समजून घेणं गरजेचं आहे. संतसाहित्य हे ‘टाळकुटं’ साहित्य मुळीच नाही. असं म्हणणंचं चुकीचं आहे. आजच्या संपूर्ण समाजव्यवस्थेला, कुटुंबव्यवस्थेला आणि आयुष्याला आकार देणारं संतसाहित्य हे सार्वकालिक आहे. चिरंजीव आहे. अभंग आहे.

संत कान्होपात्रा महाराजांचं असं कुठलंच स्मारक जगाच्या पाठीवर नव्हतं. संत कान्होपात्रा महाराजांनी म्हटलंय, ‘मोकोलूनी आस, जाहले उदास। घेई कान्होपात्रेस हृदयात’. प्राचार्य पुजारी यांनी त्यांना आपल्या हृदयात घेतलं. सगळ्या जगानेही संत कान्होपात्रा महाराजांना आपापल्या हृदयात घ्यावं, ही अपेक्षा ते बोलून दाखवतात. आप्पासाहेबांनी हे स्मारक उभारून एक वारसाच पुढच्या पिढ्यांच्या हाती दिलाय.