फाईव जीचा पाळणा कोण हलवणार?

२३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


सतत काहीतरी वेगाने घडण्याच्या काळात आपण जगतोय. मोबाईल तंत्रज्ञानाने आपलं आयुष्यच बदलून गेलंय. येत्या काळात आपण फाईव जीच्या जमान्यात प्रवेश करू. म्हणजे फिफ्थ जनरेशन सुरू होईल. पण ही जनरेशन वापरात येण्याआधीच वादात अडकलीय. एकीकडे महासत्ता असलेली अमेरिका आणि दुसरीकडे महासत्तेच्या शर्यतीत आघाडी मिळवणारा चीन. यांच्या वादात मात्र इतर देश फसलेत.

आतापर्यंत आपण फोनच्या चार पिढ्या पाहिल्यात. फोनमधे सतत सुधारणा होत असल्या तरी काही सुधारणा क्रांतिकारी होत्या. आणि त्यातूनच नवीन पिढी जन्माला आली असं म्हणण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा तिसर्‍या पिढीपासून म्हणजे थ्रीजीपासून सुरू झाली. वनजी आणि टूजी नावं नंतर दिली गेली. एक पिढी साधारण ८ ते १० वर्षांची आहे.

रणगाड्यांवर ट्रान्समीटर आणि रिसिवर लावलं

मोबाईल फोनसाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे. रेडिओ लहरी, नेटवर्क आणि हँडसेट. रेडिओलहरींचं अस्तित्व मॅक्सवेल या शास्त्रज्ञाने गणिताच्या सहाय्याने १८६५ ला सिद्ध केलं. प्रकाश हा रेडिओलहरींचाच एक प्रकार आहे हे त्यांनी दाखवून दिलं. हर्ट्झ या जर्मन शास्त्रज्ञाने १८८८ ला प्रयोगशाळेत रेडिओलहरी निर्माण करून दाखवल्या. १८९५ मधे तर मार्कोनीने रेडिओलहरींमार्फत संदेश पाठवता येत असल्याचं दाखवलं.

या सगळ्या संशोधनानंतर रेडिओलहरींमार्फत दुतर्फी संवाद साधणं ही गोष्ट लगेचच आली. दुसर्‍या महायुद्धात जर्मनची रणनीती पायदळ, रणगाडे आणि विमानं यांच्या एकत्र संयुक्‍त हल्ल्यावर अवलंबून होती. त्यामुळे त्या सर्वांमधे समन्वय असणं अत्यंत गरजेचं होतं. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक रणगाड्यावर एक ट्रान्समीटर आणि रिसिवर बसवण्यात आलं होतं.

जास्त फ्रिक्वेन्सीच्या लहरी कुठे वापरतात?

आवाजासारख्या इतर लहरींप्रमाणेच रेडिओ लहरींची दोन लक्षणं आहेत. वॉल्युम आणि पीच. स्वर लहरी या कंपनसंख्येत म्हणजे फ्रिक्वेन्सीमधे किंवा लांबीमधे म्हणजे वेवलेंथमधे मोजल्या जातात. उदाहरण द्यायचं तर मुंबई ब या रेडिओ स्टेशनच्या प्रक्षेपणाची फ्रिक्वेन्सी सेकंदाला ५५८ हजार किलो हर्ट्झ एवढी आहे. तर लहरींची लांबी ५४० मीटर आहे. दोघांचा गुणाकार प्रकाशाच्या वेगाएवढा म्हणजे सेकंदाला साधारण ३ लाख किलोमीटर असतो.

रेडिओ प्रक्षेपणाच्या लहरी या मिडियम आणि शॉर्ट असतात. शॉर्ट वेवची लांबी काही मीटरच असते. आपण रेडिओवर खूपदा ऐकलंय की १०२.८ मेगाहर्टझ्वर आपण ऐकत आहाता हा हा कार्यक्रम. तर या लहरींची फ्रिक्वेन्सी काही मेगा म्हणजे दशलक्ष एवढी असते. तर हर्ट्झ म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी.

यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या लहरी वेरी हाय फ्रिक्वेन्सी अर्थात डब्ल्यूएचएफ आणि अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी अर्थात यूएचएफमधे आहेत. या लहरी टीवी आणि एफएम रेडिओ प्रक्षेपणासाठी वापरतात. याहीपेक्षा जास्त मोठ्या लहरी गीगा हर्ट्झ. गीगा म्हणजे अब्ज. या लहरी मायक्रोवेव, कॉर्डलेस फोन, मोबाईल, ब्लूटूथ, वायफायकरीता वापरल्या जातात.

हेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे एक माणूस म्हणून कृष्ण चरित्र समजून घ्यायचंय?

शून्य जी कसं होतं?

लहरींची फ्रिक्वेन्सी संख्या जितकी जास्त, तितकी जास्त माहितीची देवाणघेवाण होते. आणि माहिती पाठवायचा वेगही वाढतो. एकाचवेळी ट्रान्समीटर अधिकाधिक रिसिवरशी संबंध ठेवू शकतो. पण यावेळी कवरेज एरिया कमी होतो. दुसरा तोटा म्हणजे या लहरी भिंती, खोल्या यांसारख्या लहानसहान अडचणींमुळे कमजोर होतात. शिवाय प्रक्षेपण एका दिशेने होतं. त्यामुळे प्रक्षेपणाचं सामान अनेक पटींनी वाढतं.

मोबाईल फोनसाठी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क. नेटवर्कमधे अनेक सेल साईट्स किंवा प्रक्षेपण-ग्रहण केंद्रं म्हणजे ट्रान्सरिसिवर्स. ती दिलेल्या क्षेत्रात विखुरलेली असतात. आणि एकमेकांना तांब्याच्या तारांनी म्हणजेच केबलने किंवा ऑप्टिकल फायबरने जोडलेली असतात.

मोबाईल फोनशी असलेला साखळीतील शेवटचा दुवाच फक्‍त वायरलेस असतो. ७० च्या दशकाच्या शेवटी जपानमधल्या एनटीटी या कंपनीने पहिलं नेटवर्क चालू केलं. प्रक्षेपण आणि ग्रहण याकरता लागणारी मोबाईल फोनमधली साधनसामुग्री खूप बोजड असायची. साधारण एका फ्रिझएवढ्या आकाराची आणि वजनाची. त्यामुळे या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग हातात राहू शकतील अशा वैयक्‍तिक मोबाईल फोनसाठी होणं अशक्य होतं. म्हणूनच विनोदाने या तंत्रज्ञानाला शून्य जी म्हणतात.

पहिल्या पिढीतला मोबाईल विटेसारखा

आधुनिक मोबाईल फोनच्या कल्पनेला मोटोरोला या अमेरिकन कंपनीतल्या मार्टिन कूपर या अभियंत्याने जन्म दिला. त्याच्या टीमने १९७३ मधे कामाला सुरवात केली. मोबाईल फोनची कल्पना समूर्त व्हायला तब्बल दहा वर्ष लागली. जवळजवळ १० कोटी डॉलर खर्च झाले. मोबाईल फोनच्या धंद्यात त्या काळात उत्पन्‍न अर्थातच नव्हतं. तरी कंपनीने कळ सोसली. इथेच मोबाईल फोनच्या पहिल्या पिढीला म्हणजे वनजीला सुरवात झाली.

मार्टिन कूपरने बनवलेल्या पहिल्या हँडसेटचा आकार तब्बल दहा इंच बाय साडेसात इंच बाय अडीच इंच एवढा होता. तर वजन एखाद्या विटेसारखं सव्वा किलो. आणि त्या फोनला कुचेष्टेने ‘वीटच’ म्हणत. त्याची बॅटरी चार्ज व्हायलाच दहा तास लागायचे आणि ती जेमतेम अर्धा तासच टिकायची. आणि त्या काळच्या इतर कॉडलेस फोनप्रमाणे हा फोन होता. त्यामुळे त्यावर एसएमएसची सोय नव्हती.

माहिती प्रक्षेपणाचा वेग होता सेकंदाला जास्तीत जास्त २.४ किलोबाईट्स म्हणजे केबी एवढा होता. त्यावेळी सिनेमा डाऊनलोड करता आला असता तर या गतीने दोन तासांचा सिनेमा डाउनलोड व्हायला तब्बल सात आठवडे लागले असते.

टूजी आणि थ्रीजीची गोष्ट

टूजीची सुरवात युरोपमधल्या फिनलँडमधे १९९२च्या सुमारास झाली. फिनलँडमधला नोकिया ब्रँड अनेक वर्ष आघाडीवर होता. २जीचं तंत्रज्ञान डिजिटल होतं. त्यामुळे त्यात एसएमएस आणि एमएमएसची सोयसुद्धा होती. सुरवातीला माहिती प्रक्षेपणाचा वेग ५० केबी होता. नंतर तो २०० केबींपर्यंत पोचला. म्हणजे वनजीच्या शंभरपट वाढला. त्यामुळे दूर अंतरावरचे फोन आणि कॉन्फरन्स कॉल्स करणंही शक्य झालं.

२००० नंतर थ्रीजीचा आणि स्मार्टफोनचा जमाना आला. या सगळ्याची सुरवात जपानमधे झाली. फोनवर इंटरनेट आलं. वीडिओ कॉन्फरन्सिंग चालू झालं. मग स्काइप २००३ मधे आलं. आणि स्ट्रीमिंग वीडिओ येऊ लागले. आणि २००५ ला यूट्यूब आलं. ज्यावर असे असंख्य वीडिओ आपण बघतो.

माहिती प्रक्षेपणाचा वेग चालत्या वाहनात ३८० केबी आणि इतर ठिकाणी १ एमबी म्हणजे मेगाबाईट एवढा असतो. फोनच्या क्षेत्रात क्रांती आणणारा आयफोन २००७मधे अवतरला. याच काळात वायरलेस इंटरनेट म्हणजे वायफायला सुरवात झाली. २००३ ते २०१० दरम्यान अमेरिका आणि इराकमधे झालेल्या दुसर्‍या युद्धात अमेरिकी सैन्याने या तंत्राचा वापर केला होता.

हेही वाचा: मोदींना खलनायक करुन नेमकं काय साध्य होईल?

फोर जीने बदललं जग

प्रक्षेपणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला तो थ्रीजीमधे. आणि मग आला फोर जीचा जमाना. फोर जीची सुरवात २००९-१०मधे दक्षिण कोरियात झाली. दक्षिण कोरियाच्याच सॅमसंग गॅलक्सीने फोनच्या बाजारात धडक मारली. आणि पुढे समॅसंग गॅलक्सी सिरीज चालवली.

हल्‍ली लोकप्रिय असलेली अँड्रॉईड सिस्टम २००७मधे आली. पण ती अगदी आता आतापर्यंत आपला जम बसवत होती. ती वापरण्यात सॅमसंगने पुढाकार घेतला. फोर जीमधे सुधारणा होऊन आता प्रक्षेपणाचा वेग १०० एमबीपर्यंत पोचलाय. २०१८पर्यंत वायफायनेसुद्धा १०० एमबीपर्यंत मजल मारलीय.

इंटरनेट ऑफ थिंग्ज

फोर जी फोनने इंटरनेटबरोबर दोन्ही बाजूने संपर्क साधता येतोच. शिवाय गाडी, फ्रिजसारख्या इतर वस्तूंशीसुद्धा दोन्ही बाजूंनी संपर्क होतो. यातूनच इंटरनेट ऑफ थिंग्ज या संकल्पनेचा जन्म झाला. या कल्पनेचा विकास आणि फाईव जी यांचा अगदी घट्ट संबंध आहे.

सध्या व्हावे ही चिनी कंपनी फाईव जीमधे सगळ्यात लिडींग आहे. फाईव जी हे फोर जीच्या जवळपास १०० पट वेगवान आहे. २ तासांचा सिनेमा डाउनलोड करायला थ्रीजीमधे २६ तास लागतात. तर फोर जीमधे ६ मिनिटं आणि फाईव जीमधे अगदी ३.६ मिनिटं. आपण पाठवलेला सिग्‍नल आणि त्यावर येणारी प्रतिक्रिया यामधला वेळ काही मिलिसेकंद म्हणजे एक हजारांश सेकंद असेल. तर माणूस एखाद्या गोष्टीवर प्रत्यक्ष प्रतिक्रिया द्यायला साधारण १/१० सेकंद एवढा वेळ लावतो.

फाईव जी फ्रिक्वेन्सी संख्येच्या दोन श्रेणीमधे येणार आहे. एक २.४ गिगाहर्ट्झपर्यंत तर दुसरी ३५ गिगाहर्ट्झ. २.४ गिगाहर्टझ हे फोर जीच्या जवळपास असल्याने गरज पडल्यास आपण फोरथी आणि फाईव जी या दोघांमधे अदलाबदल करू शकतो. आणि दुसऱ्या श्रेणीतल्या प्रक्षेपणाचा वेग जास्त असेल. आणि त्याची उभारणीही अधिक गुंतागुंतीची असणार आहे.

चीनचं व्हावे फॉर्मात

सध्या फाईव जी प्रकल्पाच्या स्पर्धेत अमेरिकेतली एटी अँड टी, दक्षिण कोरियातली एसके. यासारख्या कॅरिअर कंपन्यांचा नेटवर्क बांधणीवर भर आहे. तर नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्या फोन तयार करण्यामागे लागल्यात. सॅमसंग कंपनीने गॅलक्सी एस १० हा ५जीशी कनेक्ट होण्याइतपत सक्षम असल्याचं म्हटलंय. पण यात सध्या चीनची व्हावे फॉर्मात आहे. ही कुठली कंपनी जिचं नावही दोन वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. आणि आज त्याचा बोलबाला आहे. व्हावे नेटवर्किंगचे पार्टस् बनवणारी कंपनी. जी फोनही बनवते.

गेल्या दशकात फोनचं उत्पादन २०१०मधे ३० लाख होतं. तर कंपनीने २०१८मधे २०.६ कोटी अशी मोठी मुसंडी मारली. या कंपनीची फाईव जीचे फोन आणि नेटवर्किंगचे पार्टस तयार आहेत. आणि २०२० मधे सर्व यंत्रणा चालू होईल.

आपण या कंपनीकडून शिकलं पाहिजे. व्हावेच्या १ लाख ८८ हजार कर्मचार्‍यांपैकी ७५ हजार रिसर्च अँड डेवल्पमेंटमधे कार्यरत आहेत. संशोधनावरचा त्यांचा खर्च वर्षाला १५.३ अब्ज डॉलर्स एवढा आहे. चीनने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर आरोप होतो की चीन अमेरिकेचं तंत्रज्ञान पळवतो. अमेरिकेच्या या आरोपावर चीनने प्रश्न केलाय की आता ५जी आम्ही कुणाकडून चोरलं.

हेही वाचा: खय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत

अमेरिकेची व्हावेवर बंदी

रशिया आणि इतर ५० देशांनी व्हावेशी काँट्रॅक्ट केलंय. अमेरिकेने मात्र व्हावेवर बंदी घातलीय आणि आपल्या मित्र राष्ट्रांनासुद्धा बंदी घालायचं आवाहन केलंय. अमेरिकेतल्या काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्हावेला सोडून फाईव जी आणायचं असेल तर २०२५ साल उजाडेल. तोपर्यंत रशिया आणि उत्तर कोरियासारखी शत्रू राष्ट्रं तंत्रज्ञानात अधिक प्रगत होतील. आणि तोपर्यंत चीन सिक्सजीसुद्धा चालू करेल.

मित्र राष्ट्रांची ‘करू की नको’ अशी परिस्थिती झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे राष्ट्रांनी व्हावेबरोबर केलेले करार रद्द करून अमेरिकेच्या बाजूने राहायचं ठरवलंय. असाच निर्णय इतर प्रगत राष्ट्रांनी घेतला तर ते चीनला भारी पडेल.

सध्या चीनची कॅनडाबरोबर जुंपली आहे. चीनचे इराणबरोबर व्यापारी संबंध आहेत. आणि हा अमेरिकेच्या दृष्टीने गुन्हा आहे. यामुळे कॅनडाने व्हावे कंपनीचे मालक रेन झेंगफेई यांची मुलगी आणि कंपनीची सीएफओ मेंग वानझोउ यांना अटकेत ठेवलंय. सध्या ही केस कॅनडाच्या कोर्टात सुरू आहे. पण चीनने रागाने कॅनडातून आयात होणार्‍या सर्व वस्तूंवर बंदी घातलीय. त्यामुळे कॅनडाही मोठ्या खड्ड्यात पडलाय.

सध्या ब्रिटन ब्रेक्झिटमधे अडकलाय. आणि अमेरिकेच्या या बंदीमुळे अधिकच गोंधळ उडालाय. एकतर आधी टेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर कितीतरी आठवडे पंतप्रधानांचाच पत्ता नव्हता. आता आलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे बदनाम आहेत. त्यातच वोडाफोनसारख्या कंपन्या व्हावेवरच्या बंदीत सहभागी होऊ नये असा दबाव सरकारवर टाकतायत.

कारण या कंपन्यांनी व्हावेच्या मदतीने फाईव जीमधे मोठी गुंतवणूक केली. या सर्व वादावादीत ब्रिटनच्या संरक्षण सचिव गॅविन विल्यमसनची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. नुकत्याच व्हावे संदर्भात झालेल्या युरोपियन युनियनच्या बैठकीत इतर देशांनी ब्रिटनला हाकलून लावलं.

खुद्द अमेरिकेतल्या अनेक कंपन्या या बंदीने हैराण झाल्यात. मुख्य म्हणजे बंदीचं कारण हे अगदीच थातुरमातुर देण्यात आलंय. ‘देशाच्या सुरक्षेला धोका संभवतो’ हे कारण दिलंय.

फाईव जीचा जन्म वादळी ठरणार

अमेरिकेने फोर जी तंत्रज्ञान जगाला दिलं तेव्हा कसा सुरक्षेचा प्रश्न आला नाही? खुद्द व्हावेने अनेक देशांना फोर जी तंत्रज्ञानावर आधारीत सर्व साधनं दिली. त्यांनाही हा सुरक्षेचा बागुलबुवा अजिबात पटत नाही. रेडिओलहरी विद्युतचुंबकीय असल्याने फाईव जीमधल्या चुंबकीय लहरी आरोग्यासाठी धोक्याच्या आहेत. असाही अपप्रचार चालू आहे. वास्तविक रेडिओ लहरीतला विद्युत आणि चुंबकीय भाग वेगळं होऊ शकत नाही.

प्रकाशाचा चुंबकावर किंवा चुंबकाचा प्रकाशावर परिणाम होत नाही. हे सगळ्यांनाच माहितीय. नुकतंच चीनने अंतराळात आतापर्यंत कुणालाही जमलेलं नाही असं अचाट कृत्य करून दाखवलं. ते म्हणजे चंद्राच्या नेहमी अदृश्य असलेल्या पृष्ठभागावर यान उतरवलं. चीनच्या मते, चीन किंवा एक बिगरगोरा देश पाश्चिमात्य देशांपुढे चाललाय. आणि हे अमेरिकेला बघवत नाही. वेळप्रसंगी आपणही इंटेल, अ‍ॅपल या कंपन्यांवर बंदी घालू अशी नुसतीच धमकी न देता चीनने त्या दिशेने पावलंही उचलण्यास सुरवात केलीय.

जगातले एक तृतीयांश आयफोन चीनमधे खपतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या बंदीचा अ‍ॅपलवर आणि अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल यात शंकाच नाही. या सगळ्यावरून एकूणच फाईव जीचा जन्म हा वादळी ठरणार असं दिसतंय.

हेही वाचा: 

मी देशभक्त का नाही?

दोनच कायद्यांचे अधिकार असूनही ईडी पॉवरफुल कशी?

टॉलस्टॉयची बायको मेल्यावर डायरीमुळे झाली जगप्रसिद्ध

लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?

(ग्रंथाली प्रकाशनाच्या शब्द रुची मासिक ऑगस्ट २०१९च्या अंकात प्रकाशित झालेल्या ५जी या लेखाचा संपादित अंश.)