शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

०१ मे २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जिथे शाहिरांच्या पोवाड्यांनी मोठं कार्य केलं. हे शाहीर केवळ शाहीर नव्हते, तर त्यावेळेच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीचे भाष्यकार होते, लढ्यातले बिनीचे शिलेदार होते. कॉ. डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यासारख्या नेत्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात शाहिरांनी जागल्याची भूमिका पार पाडली. 

शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर या शाहिरांनी साम्यवादी तत्त्वज्ञान आपल्या शाहिरीद्वारे जनमानसात रुजवतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उडी घेतली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा मराठी जनतेच्या अस्मितेचा हुंकार, आपले मतभेद विसरून सत्ताधार्यांतविरोधात सर्वजण एकजुटीने लढले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विचारवंतांबरोबरच शाहीरही सहभागी झाले. तसंच सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचं महत्त्वाचं काम शाहिरांच्या पोवाड्यांनी केलं. 

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जिथे सारे पक्ष एकत्र आले. कॉ. डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यासारख्या नेत्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात शाहिरांनी जागल्याची भूमिका पार पाडली. ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडणाऱ्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तेवत ठेवला. पोवाड्यांच्या, लोकगीतांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीतले घोटाळे, बेकायदेशीर गोष्टी, माझी मुंबई, शेटजीचं इलेक्शन असे कितीतरी तमाशे त्या काळात गाजले.

अखंड महाराष्ट्राचं स्वप्न अधुरं राहिलं 

जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना।
गाऊ उंचावूनी माना। घेऊ तानावर ताना॥

यासारख्या कवनांनी सभेतील वातावरणच बदलून जाई. अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख यांच्यावर साम्यवादाचा विलक्षण पगडा होता. अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकरांचे अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही. आजही महाराष्ट्र कर्नाटकची सीमा धुमसतेय.

मुळात संयुक्त महाराष्ट्राचं रान पेटवणारे अमर शेख, अण्णाभाऊ आणि गवाणकर ही त्रिमूर्ती आजच्या तरुण पिढीला किती माहीत आहे, त्यांच्या कार्याचा वेध घेणारा धडा कोणत्या अभ्यासक्रमात आहे, असा सवाल विचारला जाऊ शकतो. यांनी तर वीज आणि माईकशिवाय लाखोंच्या सभा घेतल्या. आणि त्या सभा ग्रामीण आणि शहरी भागात गाजविल्या. पण त्यांच स्वप्न अधुरंच राहिलं. 

हेही वाचा: बशीर मोमीन – कवठेकरः कोंबड्या विकण्यापासून जीवनगौरव पुरस्कारापर्यंत 

संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ

‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोली चालली पुढे
एक भाषकांची होय संगती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’

हे गीत फक्त नाही, तर शब्दांचे निखारे अमर शेख यांच्या तोंडून निघालेत. संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ लिहिला आत्माराम पाटलांनी आणि फार मोठ्या ताकदीने गायिला अमर शेख आणि अण्णाभाऊ साठेंनी. हा गोंधळ असा 

संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा। खुशाल कोंबडं झाकून धरा॥
हे द्विभाषिकाचा दुतोंडी कावा। उडतोय माझा डोळा डावा॥
साडेतीन कोट सिंहाचा छावा। पकडाया मांडलाय पिंजरा नवा॥
वळिखलं आम्ही जवाच्या तवा। शाहीर साद गेली गावो गावा॥
हे भले बेल्लारी बेळगाव। पंढरी पारगाव। बोरी उंबरगाव। 
राहुरी जळगाव। सिन्नरी ठाणगाव। परभणी नांदगाव।
वऱ्हाडी वडगाव शिरीचा बस्तार। भंडारा चांदा। 
सातारा सांगली। कारवार डांग। अन् मुंबई माऊली॥
हे ऊठ, माझ्या शाळांच्या शाळकरा। शाळकरारं। 
संग घे शेतकरी कामगारा॥
आर उठा ए शेतकरी कामकरी, शाळकरी माळकरी, 
दर्याचं सारंग, वल्हकरी डोलकरी, 
जंगलाचं राजं, रानकोळी मोलकरी, 
आगरी भंडारी, कुंभार लोहार, ब्राह्मण नि सुतार, 
कॉलेजचं कुमार, उठा इतिहास राखून धरा 
खुशाल कोंबडं झाकून धरा॥

दिल्लीच्या तख्ताला धडक देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेखांनी ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडली.

हेही वाचा: सारं काही समष्टीचा एल्गार

संयुक्त महाराष्ट्राचे वारे संचारतात तेव्हा

‘जग बदल घालूनी घाव, मला सांगून गेले भीमराव’, असं म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वसामान्यांच्या जीवन संघर्षाची चूड पेटविणारे हे जनसामन्यांमधील असामान्य प्रतिभावंत. ज्यांनी जगणं, जगण्यामागच्या वेदना आणि जगण्यामागचं तत्त्वज्ञान शब्दबद्ध केलं. ज्यांनी विश्वारूपी गणाला सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आवाहन केलं. लोककलेच्या क्षेत्रातील तमाशा आणि त्यातले गण, गवळण, बतावणी आदी लोकशैलींना मुरड घालून त्यात नव्या युगाचा आशय भरला. असे युगप्रवर्तक शाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे.

या चळवळीत शाहीर आत्माराम पाटील, शाहीर लीलाधर हेगडे, वसंत बापट, जंगम स्वामी यांचंही कार्य मोलाचं होतं. त्या काळातल्या नेते आणि शाहीर यांच्या अंगात जणू संयुक्त महाराष्ट्राचे वारे संचारलेले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या पोवाड्यांची निर्मिती ही त्या काळातल्या लोकसाहित्य शारदेच्या मंदिरातली मोठी उपलब्धी.

पोवाडा म्हणजे ऐतिहासित दस्तावेज

पोवाडा हा प्रांगणीय लोककला प्रकार असून, वीरश्रीयुक्त कीर्तिगान म्हणजे पोवाडा होय. पोवाडा ही प्रामुख्याने कथन परंपरा असून, तिचा प्रारंभ लोककथा गायनातून आणि लोककथा कथनातून झाला. पोवाडा ही अतिशय नाट्यपूर्ण कथन परंपरा आहे. त्यात पोवाडा सादर करणारा शाहीर हा श्रोत्यांना त्या पोवाड्याच्या प्रसंगांमधे कळत नकळत सामील करून घेत असतो. तो केवळ सादरीकरण करत नाही, तर त्याच्या सादरीकरणाचे स्वरूप हे वक्ता, श्रोता संवादाचं असतं.

पोवाड्यातील नायक, खलनायक यांचा संघर्ष, सुष्ट, दुष्ट प्रवृत्ती, कथेचा आरंभबिंदू, संघर्षबिंदू आणि कथेला कलाटणी देणारे घटक आदींचा अंतर्भाव पोवाड्यामधे होतो. जीवनातील नाट्यपूर्ण घडामोडींचे दर्शन पोवाड्यात होते. पोवाड्यामधे पारंपरिक कथांचं मोठं भंडार असतं, त्यात लोककथा आणि लोकगीतांचा समावेश असतो, स्थानिक इतिहासाचा समावेश असतो. पोवाडा हा एकजीनसी प्रकार. पोवाडा हा इतिहास आणि त्याचे समकालीन संदर्भाचा एक उत्तम पुरावा म्हणून मांडण्यात येतात. 

गतसंदर्भ हा चांगला पुरावा मानला जात नाही. ऐतिहासिक प्रसंगात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या लोकांकडून किंवा अन्य लोकांकडून त्या ऐतिहासिक प्रसंगाबद्दल लिहून घेतलं असेल, तर ते उत्तम पोवाडे म्हणून ओळखले जातात. स्थळ, काळ आणि नावांच्या संदर्भात बखरीसारखा ऐतिहासिक दस्तावेज हा प्रमाण मानला जात नाही. त्याउलट पोवाडे हा अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून स्वीकारला जातो. 

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

पोवाडा शब्द मूळचा उर्दू

विशिष्ट लढ्यातले योद्धे, त्यांची नावं, त्यांचा शस्त्रसाठा, त्यांची रणनीती यांचे दर्शन पोवाड्यांमधून होतं. पोवाड्यामधे समकालीन संदर्भ असतात. याची प्रचिती १८०६ मधल्या एका पोवाड्यातून येतं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या या पोवाड्यात साड्यांची नावं येताना विलायत, कलकत्ता आणि बंगालचा पितांबर अशा साड्यांच्या विविधतेचा उल्लेख केलेला आहे. सिंध, काश्मीर, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आदी राज्यांत पोवाडा हा कथागान प्रकार अस्तित्वात आहे. 

पोवाडा सादर करतात ते शाहीर. शाहीर हा शब्द शायर या उर्दू शब्दापासून मराठीत आलेला आहे. शायरचा अपभ्रंश होऊन शाहीर झाला, असे मत शाहीर कुंतिनाथ कर्के यांनी मुलाखतीत व्यक्त केलं. आपल्या शाहिरीच्या अंदाजात ओघवत्या भाषेत त्यांनी या परंपरेची माहिती दिली ती अशी- शायर म्हणजे कवी आणि शाहीर म्हणजेही कवीच. जो शाहिरी लिहितो आणि ती सादर करतो तो शाहीर. शाहिरी म्हणजे वीररसपूर्ण काव्य प्रकार. पोवाडा शाहिरीतला महत्त्वाचा भाग आहे. पोवाडा हा शब्द मूळचा संस्कृत आहे. प्र-वद- म्हणजे मोठ्याने बोलणे, सांगणे, जाहीर करणे. ‘प्रवाद’ पासून ‘पवाड’ आणि ‘पवाड’पासून ‘पोवाडा’ हा शब्द रूढ झाला आहे. 

पोवाड्याची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आद्य शाहीर आगिनदास किंवा अज्ञानदास यांच्यापासून सुरू झाली. अज्ञानदासाने अफजलखानाच्या वधाचा पोवाडा सर्वप्रथम लिहिला. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर राजसभेत सर्वप्रथम डफाच्या साथीनं गाऊन दाखवला, सादर केला. येथून वीररसपूर्ण पोवाड्याचा प्रारंभ झाला. आगिनदासांनंतर शिवकाळातील आणखी एक शाहीर म्हणजे तुळशीदास, ज्याने तानाजीचा पोवाडा लिहिला. परंतु, पोवाडा हा शब्द संतसाहित्यात दिसतो. ‘तुझ्या यशाचे पोवाडे गाती वाडे कुडे’ आणि ‘पोवाडा तुवा केला गंधर्वासी’ हे उल्लेख संतसाहित्यामधे दिसतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात पोवाडा बदलला गेला

स्वातंत्र्यपूर्व काळात सिद्राम बसप्पा मुचाटे, शाहीर शंकरराव निकम, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट, शाहीर पिराजीराव सरनाईक, खाडीलकर, नानिवडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी शाहिरांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात १८५७ ते १९४७ पर्यंत सहभागी झालेल्या शूरवीरांवरील, राष्ट्रपुरुषांवरील पोवाडे रचले. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, हुतात्मा बाबू गेनू अशा अनेकांवर नंतरच्या काळात पोवाडे रचले गेले. 

१९३० च्या सुमारास शाहिरीवर विशिष्ट राजकीय प्रणालींचा प्रभाव पडला आणि हा प्रभाव संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतरही कायम राहिला. हिंदू महासभा, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पक्ष, काँग्रेसप्रणीत आघाडी, शाहू, फुले, आंबेडकरवादी चळवळी यांचा फार मोठा प्रभाव शाहिरीवर पडला. पण या सर्व राजकीय प्रणालींमधे शाहिरी विभागली गेली. गोंधळ, जागरण, भराड यासारखी विधिनाट्यं. लळीत, भारूड, दशावतार, बोहाडा यासारखी भक्तिनाट्यं. पोवाडा, शाहिरीसारख्या प्रबोधनपर लोककला पोवाडा, लावणी, तमाशा, खडीगंमतसारखं वैभव आहे. हे लोकसंचित आहे. गोंधळी, भराडी, बहुरूप्यांनी छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदवी स्वराज्य जागृतीचं आणि हेरगिरीचंही काम केलं होतं.

विधिनाट्य आणि भक्तिनाट्याच्या स्वतंत्र परंपरेप्रमाणेच ‘तमाशा’ या विशुद्ध रंजन परंपरेने मराठी लोकसंस्कृतीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. तमाशापूर्व कलगीतुर्यााच्या आध्यात्मिक शाहिरीने तसेच नंतरच्या काळातल्या प्रबोधनात्मक शाहिरीने म्हणजेच राष्ट्रीय शाहिरीने इथलं लोकमानस घडवलं. लिंगायत, कोष्टी समाज हा प्रामुख्याने कलगीतुर्याषची आध्यात्मिक शाहिरी सादर करायचा. दांगट शाहिरांची स्वतंत्र गानसरणी शाहिरीकलेत ठसा उमटवून गेली आहे. 

हेही वाचा: शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

आणि लावणीला सुरवात झाली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आगिनदास, तुळशीदास आदी शाहिरांचा यथोचित गौरव झाला आहे. हातात चांदीचा तोडा आणि बसायला घोडा देऊन शाहिरांचा राजदरबारी गौरव झाला आहे. कविराज शिवभूषण यांचेही उदाहरण सर्वपरिचित आहे. पेशवाईत तर तंत शाहिरांची झळाळती मांदियाळीच होती. राम जोशी, सगनभाऊ, होनाजी बाळा, प्रभाकर, हैबती आदी शाहिरांनी आध्यात्मिक कूटरचनेसोबत शृंगारिक लावण्याही रचल्या. 

उत्तर पेशवाईत विलास आणि शृंगाराचा अतिरेक झाला, असा प्रवाद आहे. संत, पंत आणि तंताचे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उभारणीत अपूर्व आहे. इ.स. १८४३ मधे विष्णुदास भावे यांनी सांगली मुक्कामी ‘सीतास्वयंवर’ नाटकाच्या रूपाने मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. याच कालखंडात मराठी भूमीत तमाशा रुजला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या शतकाच्या प्रारंभी लावणी रचना होतहोती. पण १८५० च्या सुमारास सांगलीजवळील भिलवाडी गावी उमाबाबूंनी ‘मोहनाबटाव’ हा वग रचला आणि हाच काळ तमाशाचा उदयाचा काळ मानला जातो. 

लोककला या स्थळ, काळ संवादी आणि परिवर्तनशील असल्याने स्थळ, काळाची स्पंदनं एखाद्या टीप कागदासारखी टिपून घेत लोककलांच्या आशय आणि शैलीत १९६० नंतर आजपर्यंत अनेक प्रकारची परिवर्तनं झालीत. लोककलांचे विश्व  बदललं. त्यांच्यातील स्वाभाविक आविष्कारांची जागा नियोजनबद्ध इव्हेंटनं घेतलीय. 

मूळचे एखाद्या लोकदैवतेचे उपासक असणारे लोककलावंत आता अर्थार्जन करणारे झालेत. लोकसंगीत लौकिक संगीत आणि लोकप्रिय संगीत झालं. तमाशाचं लोकनाट्य झालंय. जागरण, गोंधळासारखी विधिनाट्यं अनुक्रमे वाघ्या मुरळी नृत्य आणि गोंधळ नृत्य झालेय. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, मनोरंजन माध्यमांचा प्रपात यामुळे लोककलांचं अंतरंग बदललं आहे. परिवर्तन हा जर युगधर्म असेल, तर त्यातून लोकसाहित्य आणि लोककला तरी कशा सुटणार?

(लेखक लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. हा लेख दैनिक पुढारीतून साभार.)