युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?  

०५ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


माणसांचं तसंच शहरांचंही. शहरांनाही आधुनिकतेचा साज चढवताना आपल्या जुन्या वैभवाच्या खुणा जपायला आवडतात. लाखोंची पोशिंदा असलेली मुंबईही त्याला अपवाद नाही. ट्राम ही त्यातलीच एक मुंबईची ओळख. एकेकाळी लोकप्रिय परंतु आता स्मृतिपटलावरून पुसली गेलेली ही ट्राम शहरात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हा स्मरणरंजनाचा प्रवास!

कही बिल्डिंग, कहीं ट्रामें, कहीं मोटर, कही मिल...

मिलता है यहाँ सबकुछ, मिलता नही दिल...

१९५०च्या दशकातल्या मुंबईचं अचूक वर्णन करणाऱ्या गाण्याच्या या ओळी, ‘सीआयडी’ सिनेमातल्या. ७० वर्षांनंतरच्या, म्हणजे आजच्या मुंबईचं वर्णन करायचं झालं तर ते असं करावं लागेल,

कहीं टॉवर, कहीं मेट्रो, कहीं मोनो, कहीं मॉल...

काळाच्या या झपाट्यात मुंबईने अनेक जुन्यापुराण्या खुणा आजही जपल्यात. जसं की मुंबईच्या जीवनवाहिनीचा लोकलचा अखेरचा थांबा असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिकेची इमारत, क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट परिसरातल्या ब्रिटिशकालीन इमारती आणि काय काय आणि किती किती. असं असलं तरी अभिमानाने मिरवाव्यात अशा आठवणी काळाच्या या ओघात नष्ट झाल्या, हेही तितकंच खरं.

अभिमानाने मिरवाव्यात अशा अनेक आठवणींपैकी एक म्हणजे मुंबईतली ट्राम सेवा. हेरिटेज अर्थात वारसा दर्जा प्राप्त झालेल्या ट्रामची सेवा पुन्हा सुरू करण्याविषयी मुंबई महापालिकेसह बेस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विचार करतंय. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केलेत.

मुंबई आणि ट्रामचं नातं

ट्राम आणि मुंबईचं नातं तसं खूप जुनं आहे. मुंबईत ट्रामची कल्पना पुढे आली १८७१ मधे. त्याआधी घोडागाड्यांची चलती होती. आदल्या वर्षी म्हणजे १८७० मधे लंडनमधे घोड्याच्या ट्रामगाड्यांना सुरवात झाली होती. हाच प्रयोग मुंबईतही करून पाहू, म्हणून इंग्रजांनी घोड्याच्या ट्रामगाड्या सुरू करण्याचे ठरवलं. त्यानुसार १८७३ मधे बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. ९ मे १८७४ ला मुंबईच्या रस्त्यावर पहिली ट्रामगाडी धावली.

सुरवातीला कुलाबा-क्रॉफर्ड मार्केट-पायधुणी आणि बोरीबंदर-काळबादेवी-पायधुणी या दोन मार्गांवर ट्रामगाडी धावू लागली. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या या ट्रामगाड्यांना त्या काळात लोकांनी खूप विरोध केला. त्यामुळे ट्रामगाड्यांना सुरवातीच्या काळात अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र हळूहळू ट्रामगाड्यांना होणारा विरोध मावळून ट्रामगाड्या गर्दीने फुलू लागल्या.

कुलाबा ते पायधुणी या प्रवासासाठी त्या काळात तीन आणे लागायचे. किफायतशीर सेवा म्हणून लोकांनी ट्रामगाड्यांवर शिक्कामोर्तब केलं. घोडागाड्यांचा धंदा बसल्याने त्यांनी ट्रामगाड्यांना विरोध सुरूच ठेवला. ट्रामच्या रुळांवर माती, छोटे दगड ठेवून ही सेवा विस्कळीत करण्याचे त्यांचे उद्योग सुरूच होते. १८७४ ते १९०५ या कालावधीत ससून डॉक, वाडी बंदर, लालबाग, जेकब सर्कल, कर्नाक बंदर, धोबी तलाव, जेजे हॉस्पिटल, ग्रँट रोड या भागांपर्यंत ट्रामचा विस्तार झाला.

वीजेवरची ट्राम

१९०५ मधे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी अर्थात बेस्टची स्थापना झाली. बेस्टने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेऊन विजेवर चालणाऱ्या ट्रामगाड्या मुंबईत आणायचं ठरवलं. ७ मे १९०७ ला विजेवर चालणाऱ्या पहिल्या ट्रामगाडीचं उद्घाटन झालं. पालिका मुख्यालय ते क्रॉफर्ड मार्केट एवढाच या ट्रामगाडीचा प्रवास होता. विजेवरच्या या ट्रामगाडीलाही लोकांनी विरोध केला. नंतर मात्र या ट्रामगाड्यांची विश्वासार्हता वाढीस लागून लोकांनी तिचा स्वीकार केला.

गरिबांना परवडणाऱ्या ट्रामनेही मग कात टाकली. १९२० पासून दुमजली ट्राम मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या. ट्रामची धाव दादरपर्यंत गेली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ते दादर या ट्रामगाडीच्या प्रवासासाठी दीड आणे लागायचे त्या काळात. दादरपर्यंत आलेली ट्राम नंतरच्या काळात माटुंग्यापर्यंत धावू लागली. माटुंगा म्हणजे त्या काळी शहराचं टोक होतं. तिथे त्या काळात फारशी वस्ती नव्हती. मात्र  वीजेटीआय, पारशी वसाहत यांच्या उभारणीनंतर तिथे लोकांची वर्दळ वाढू लागली आणि ट्रामचीही.

ट्रामगाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्या अधिकाधिक रस्त्यांवर धावतील, अशा पद्धतीने महापालिका प्रयत्न करू लागली. तोपर्यंत प्रवासाची साधनं वाढू लागली होती. बग्ग्या, बस, लोकल, टॅक्सी, खासगी वाहनं यामुळे ट्राम हळूहळू मागे पडू लागली. आणि ३१ मार्च १९६४ ला ट्रामगाडीने मुंबईचा निरोप घेतला.

ट्राम आणि आजची मुंबई

‘ट्रामगाड्यांचं मुंबईत पुनरागमन’, हे बातमीचा मथळा म्हणून खूप आनंददायी आहे. परंतु जमिनीवरच्या वास्तवाचा विचार करता ते कितपत सत्यात उतरेल याबाबत साशंकता आहे. मेट्रो, मोनोच्या भाऊगर्दीत ट्राम कितपत टिकाव धरेल, हे आताच सांगणं कठीण आहे. परंतु तरीही एक मात्र खरं की किफायतशीर आणि प्रदूषणरहित प्रवासाचं साधन म्हणून मुंबईत ट्राम नक्कीच स्वागतार्ह ठरेल.

सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. शिवाय पर्यटकांचं आकर्षणही ठरू लागतील ट्रामगाड्या. आताच्या घडीला ट्रामचं भारतातलं अस्तित्व फक्त कोलकात्यापुरतंच मर्यादित आहे. मात्र, पुरेशा देखभालीअभावी तिची आबाळ चालू आहे, ही बाब अलाहिदा.

युरोप आणि ट्राम

युरोपात जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड, स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ग्रीस, इटली या देशांमधे ट्राम हेच सार्वजनिक वाहतुकीचं मुख्य आणि महत्त्वाचं साधन आहे. तिथल्या अनेक शहरांमधे लोक ट्रामनेच प्रवास करतात. लोकांमधेही ट्रामगाड्या प्रचंड लोकप्रिय आहेत. आणि पाश्चिमात्यांना जे जे प्रिय ते ते आपण जवळ करत असतो. मग, ट्राम का नाही?