छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म फाटाफूट करणारा नव्हता

२० डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.

आजकाल जो तो उठतो आणि शिवरायांच्या नावाचा स्वतःच्या सोयीनुसार वापर करतो. नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती, त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला' असं म्हणून शिवरायांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवराय हिंदुत्ववादी कधीही नव्हते. छत्रपती शिवरायांची नीती- धोरणं, त्यांच्या आयुष्यातल्या घटनांनी आपण शिवरायांचा हिंदू धर्म कोणता होता हे जाणून घ्यायला हवं.

आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विज्ञानवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन असणारा राजा भारताच्या इतिहासात दुसरा दिसत नाही. आपल्या देशात अनेक धार्मिक, शूर-वीर, पराक्रमी, मुत्सद्दी, राजे-महाराजे होऊन गेले पण शिवाजी महाराजांसारखा वास्तववादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कुणाकडेच नव्हता हे त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकलं की लक्षात येतं. महाराज काही अंशी धार्मिक असतीलही पण ते धर्मांध किंवा धर्मवेडे कधीच नव्हते म्हणजेच ते हिंदू  होते पण हिंदुत्ववादी नव्हते.

हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

पोथ्या-पंचांगांना फाटा

शिवाजी महाराजांनी कोणतंही काम करताना कधीच पोथ्या-पंचांग, मुहूर्त पाहिले नाही. काम कितीही महत्वाचं, जोखमीचं असलं तरी ते शुभ-अशुभ वेळेची वाट बघत बसले नाही. त्यांचा मुहूर्त ठरायचा तो त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांवरून. अनेक लढाया, चढाया, गड-किल्ले त्यांनी अत्यंत अशुभ मानल्या जाणार्‍या अमावास्येच्या रात्रीच जिंकलेत.

त्यामुळं नेहमी मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ पाहून प्रत्येक काम करणार्‍या पेशव्यांना त्यांची टीचभर पेशवाई सुद्धा टिकवता आली नाही. तर कधीही मुहूर्त-काळ-वेळ न पाहता प्रत्येक काम करणार्‍या इंग्रजांचं अर्ध्याहून जास्त जगावर राज्य होतं.

महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म पालथा म्हणजे पायाकडून झाला होता. ही पंचांग-ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत अशुभ घटना होती. पण महाराजांनी हा पालथा जन्मला म्हणजे दिल्लीची पातशाही पालथी घालेल असं बोलून घडलेल्या घटनेचा सकारात्मक अर्थ लावला. हे अशुभपण टाळण्यासाठी कसलंही धार्मिक अनुष्ठान, होम-हवन, पूजा-विधी साधी औपचारिकता म्हणूनही केलं नाही.

धर्मांतराला असाही पाठींबा

औरंगजेबाच्या छळानंतर नेताजी पालकर धर्मांतरासाठी तयार झाले. त्यांची सुंता करून त्यांना मुस्लिम धर्म स्विकारायला लावला. यावेळी त्यांचं नामकरण मुहम्मद कुलीखान असं करण्यात आलं आणि महाबतखानासोबत काबुलकडे रवाना करण्यात आलं.

पुढे नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात परत आले. तेव्हा महाराजांनी धर्म मार्तंडांच्या विरोधाला न जुमानता नेताजींना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेतलं. याचप्रमाणे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या जबरी धर्मांतरानंतर महाराजांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेतलं. इतकंच नाही तर त्यांचा मुलगा महादेव याला स्वतःची मुलगी सुद्धा दिली.

या दोन्ही घटनांच्या वेळी महाराजांनी धर्मपंडितांना असहाय्य धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा मूळ हिंदू धर्मात घेण्यासाठी काही तरतूद आहे का अशी विचारणा केली. अशी कुठलीही तरतूद, सोय किंवा विधी आपल्या धर्मात नसल्याचं धर्मगुरूंनी सांगितलं. त्यावर शिवाजी महाराजांनी तशी तरतूद नव्याने लिहण्याचे आदेश दिले. त्या धर्मगुरूंना पालकर आणि निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं लागलं.

हेही वाचा: शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

धर्मांतर आजच्या काश्मीर प्रश्नापर्यंत

आजच्या काळावर असलेला धर्माचा जबरदस्त पगडा पाहता १६ व्या शतकातला महाराजांचा धर्मांतराचा निर्णय क्रांतिकारी आणि दूरदर्शीपणाचा वाटतो. ते वाटण्याचं कारणही तसंच आहे. भारत इंग्रजी राजसत्तेच्या अधिपत्याखाली असताना जम्मू काश्मीरचे तत्कालीन महाराजा रणबीरसिंह यांच्याकडे मुघलांच्या काळांत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेले राजौरी, पुंछ आणि श्रीनगर भागातले पंडित आले.

त्यांनी महाराजा रणबीरसिंहांकडे मूळ धर्मात परतण्यासाठी दया याचना केली. त्यावेळी महाराजा रणबीरसिंहांनी तत्कालीन धर्मपंडीतांकडे याची चौकशी केली आणि त्यांनी नकार दिला. राजा रणबीरसिंहसुद्धा धर्मपंडीतांच्या निर्णयाविरुद्ध गेले नाहीत.

त्या जबरीने धर्मांतरण करण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्याच बंधूंच्या सल्ल्याने परत हिंदू करून घेतलं नाही. त्याचंच फळ देश अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याच्या रूपाने भोगतोय. धर्मांतर न झालेल्यांचे २ लाख वंशज आज दिल्ली आणि परिसरात निर्वासित म्हणून जगत आहेत. कलम ३७० हटवल्यानंतरही ते परत जायला तयार नाहीत.

चुकीच्या रूढी-परंपरांना तिलांजली

१६ व्या शतकात अनेक जुन्या रूढी-परंपरांपैकी एक महत्त्वाची पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सती जाणं. १६६४ला शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊंनी त्या काळच्या रूढीनुसार सती जाण्याचा निर्णय घेतला. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला.

या सर्व रूढी-परंपरा थोतांड असून तुमच्या सती न जाण्यानं विपरीत, अनिष्ट, अशुभ असं काही घडणार नाही, स्वराज्याला तुमची गरज असल्याचं शिवरायांनी जिजाऊंना पटवून दिलं. अशाप्रकारे आपल्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून त्यांनी धर्मातल्या आणखी एका गैरप्रथेला तिलांजली दिली. जिजाऊ सती गेल्या नाहीत त्यामुळेच त्या पुन्हा छत्रपती शंभूराजेंसारखे दुसरे छत्रपती घडवू शकल्या.

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

सर्व गुन्हेगार सारखेच

स्वराज्यनिर्मिती करत असताना शिवरायांनी कसलाही जातीधर्म पाळला नाही. देव-धर्म टिकावा म्हणून कुणाशी झगडले नाही. एखाद्यानं मंदिर तोडलं, देवतांचा अपमान केला, मूर्ती फोडली, पूजा-हवनात विघ्न आणलं, परंपरा पाळल्या नाही म्हणून कुणाला साधी शिक्षा केल्याचीही इतिहासात नोंद नाही. पण स्त्रियांचा अपमान, बलात्कार केला म्हणून अनेकांना कठोर शिक्षा केल्याचं शिवचरित्रावरून आपल्या लक्षात येतं.

मग तो शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या देसाईनीचा विनयभंग करणारा सखूजी गायकवाड असो की गावातल्या मुलीवर बलात्कार करणारा रांझ्याचा पाटील असो. समोरचा गुन्हेगार आपला सरदार, मंत्री आहे म्हणून महाराजांनी कधीच त्याला पाठीशी घातला नाही. आता हाथरस बलात्कार प्रकरणात रात्री अडीच वाजता पीडितेचं शव जाळलं जातं. कठूवा बलात्कार प्रकरणात आरोपींच्या समर्थनात भगवा आणि तिरंगा ध्वज घेऊन मोर्चा निघतो.

कुलदिपसिंग सेंगर सारख्या बलात्कारी आमदाराला संपूर्ण पाठिंबा देणारे हिंदुत्ववादी कुणापासून लपून राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असे कडक आदेश देणारे शिवाजी कुठे आणि शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारून टाकणारे, ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर तोंडातून दिलीगिरीचा एक शब्दही न काढणारे हिंदुत्ववादी कुठे?

धार्मिकता आणि धर्मांधतेतला फरक

अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याने अनेक मंदिरं तोडली, मुर्त्या फोडल्या पण मुस्लिम अफजल अशी नासधूस करत आहे म्हणून शिवाजी महाराज लगेच बेभान होऊन त्याच्यावर चालून गेले नाहीत. महाराज धार्मिक असतीलही पण धर्मांध किंवा धर्मवेडे नव्हते. त्यांना माहित होतं की आपण जिवंत राहू तर धर्म जिवंत राहील, देव जिवंत राहील. असा वास्तववादी विचार करणारे त्याकाळचे एकमेव राजे म्हणजे राजा शिवछत्रपती.

अफजलखानाला मारला तो मुस्लिम होता म्हणून नाही तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून. जावळीचा चंद्रराव मोरे मराठा होता म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारला. ब्रम्हहत्येचं पाप लागेल म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा मुलाहिजा महाराजांनी केला नाही. त्यालाही मारला तो ब्राम्हण होता म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणूनच. जो स्वराज्याचा शत्रू तोच आपला शत्रू, मग तो कुठल्याही जातीधर्माचा असो त्याला माफी नव्हती.

शिवरायांच्या अंगरक्षकांत आणि सैन्यात मुस्लिम होते. आज देशाचे हिंदुत्ववादी प्रधानमंत्री म्हणतात, 'वो अपने कपडोंसे पहचाने जा सकते है।' शिवरायांनी आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी गडांवर मशिदी बांधून घेतल्या. हिंदुत्ववाद्यांचं सरकार असलेल्या गुजरातमधे आता मांसाहारावर बंदी आणण्याचा घाट घातला जातोय.

हेही वाचा: लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

दैवापेक्षा कर्तृत्व मोठं

औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी मिर्झाराजे जयसिंगांवर सोपवली. मिर्झाराजांनी शिवाजी राजांचा पराभव व्हावा म्हणून ४०० ब्राम्हण पंडितांद्वारे कोटीचंडी यज्ञ केला. बगलामुखी आणि कालरात्री देवीचं अनुष्ठान मांडलं. शिवरायांच्या जीवनात पावलो-पावली अनेक संकटं आली. अनेक जीवघेणे, सर्वस्व पणाला लागणारे महाभयंकर प्रसंग आले. पण शिवरायांनी ही सर्व संकटं नशिबावर, दैवावर न सोडता स्वकर्तृत्वाने त्यातून यशस्वीपणे वाट काढली.

आपल्यावरची सगळी संकटं टाळण्यासाठी महाराज कधीच होम-हवन करत बसले नाही किंवा काशीला जाऊन गंगा स्नान करून कॅमेर्‍याच्या साक्षीने पूजा अर्चा केली नाही. त्यांनी जाणलं होतं जे करायचंय ते स्वतःलाच करावं लागेल. त्यांनी हिंदुत्ववाद्यांप्रमाणे आपल्या शस्त्रांना कधी लिंबू-मिरची बांधली नाही. शिवरायांनी आयुष्यात फक्त आपल्या रयतेसाठी काम केलं. त्यांचा देवा-धर्मापेक्षा स्वकर्तृत्वावर अढळ विश्वास होता.

हे काम करताना त्यांनी रयतेचा धर्म बघितला नाही. त्यांनी वोटबँक नाही तर स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं तयार केली. स्वराज्यात प्रत्येकासाठी सारखे नियम होते. त्यावेळी माणसाकडं माणूस म्हणून बघितलं जायचं. हिंदू-मुस्लिम-दलित-सवर्ण म्हणून नाही. परकीयांची चाकरी करणारी ही मिर्झा जयसिंगांची वारसदार हिंदुत्ववादी जमात कुठं आणि स्वराज्यासाठी परकीयांशी प्रखर लढा देणारे शिवराय कुठं?

फाटाफूट करणारे वारसदार नाहीत

शिवरायांचा हिंदू धर्म हा मानवतावादी होता. सर्वसामान्य रयतेची काळजी वाहणारे, जात-पात-धर्मभेद न पाळणारे समानतावादी, वास्तववादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे शिवराय हे एकमेव राजे होते. अशा राजांचे अनुयायी म्हणवून घ्यायला आपण पात्र आहोत की नाही याचा विचार आज प्रत्येकाने करायला हवा.

दुसर्‍या धर्माचा द्वेष करणारी, जातीभेद-धर्मभेद पाळणारी, नशिबावर विश्वास ठेवणारी, अंधश्रद्धा-कर्मकांड मानणारी, मुहूर्त शोधणारी, जनतेला खोटं बोलून फसवणारी, धर्माच्या आधाराने देशाला विभागणारी हिंदुत्ववादी जमात शिवाजी महाराजांचे अस्सल वारसदार कदापि असूच शकत नाही हे शिवरायांच्या नावाने वोट मागणार्‍यांनी कधीही विसरू नये.

हेही वाचा: 

दगलबाज शिवाजी : भाग २

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?