संजय गांधींनी खरंच पंतप्रधान असलेल्या आईला थापड मारली होती?

२३ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी.

आणीबाणी म्हटलं, की सगळ्यात आधी संजय गांधी यांचं नाव डोळ्यासमोर येतं. नसबंदी, मीडिया सेन्सॉरशीप, झोपडपट्ट्या जमीनदोस्त करून दिल्लीचं सुशोभीकरण यासारख्या वादग्रस्त निर्णयांसोबतच संजय गांधी आणखी एका किस्स्यामुळे आजही चर्चेत आहेत.

तो किस्सा म्हणजे, एका डिनर पार्टीवेळी संजय गांधींनी आपली आई तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना थापाडात मारल्याचा. यासंबंधी एका अमेरिकन दैनिकात आलेल्या बातमीने जगभरात एकच खळबळ उडाली होती. डिनर पार्टीला उपस्थित असलेल्यांपैकी आजवर कुणीही या किश्श्याला दुजोरा दिला नाही. इंदिरा गांधी आणि संजय गांधी या मायलेकाच्या नात्याचा विषय आली की पहिल्यांदा नजरेसमोर येतो, तो हाच किस्सा.

पुलित्झर पुरस्कारप्राप्त पत्रकार लुईस एम सिमंस यांनी ही बातमी दिली होती. द वॉशिंग्टन पोस्टचे दिल्लीतले बातमीदार असलेल्या लुईस यांना आणीबाणीतल्या रिपोर्टिंगसाठी भारत सोडून जावं लागलं होतं. या सगळ्यांविषयी लुईस यांनी स्क्रोल डॉट इन या इंग्रजी वेबपोर्टलला इमेलवर मुलाखत दिली. यामधे लुईस यांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही विस्ताराने सांगितलंय. या मुलाखतीचा हा संपादित अंश.

हेही वाचाः इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

द वाशिंग्टन पोस्टमधे तुमची एक बातमी आली होती. त्यात सुत्रांच्या हवाल्याने एका डिनर पार्टीवेळी संजय गांधी यांनी आपली आई इंदिरा गांधी यांना सहा वेळा थापाड मारली. ही घटना आणीबाणीच्या घोषणेनंतर कितव्या दिवशी झाली होती आणि संजय यांच्या या वागण्यामागचं कारण काय?

थापाडीत मारण्याची ही घटना आणीबाणी लागू होण्यापूर्वी एका खासगी डिनर पार्टीमधे झाली होती. ही घटना कळाल्यावर मी काही इतरांसारखं लगेच बातमी केली नाही. ही बातमी मी राखून ठेवली होती. या घटनेला चाळीसेक वर्ष झाली. त्यामुळे मला संजय गांधींच्या वागण्यामागचं नेमकं कारण आता तर आठवतही नाही. 

या घटनेला ४० वर्ष झाली. ज्या लोकांनी तुम्हाला या घटनेची माहिती सांगितली, त्यांनी तुम्हाला हा किस्सा सांगण्यासाठीच कॉन्टॅक्ट केला होता, की नेहमीच्या चर्चेवेळी तुम्हाला हे कळलं?

आमची नेहमीप्रमाणे चर्चा सुरू होती. मला माझ्या दोन सोर्सनी ही घटना सांगितली. हे दोन्ही सोर्स एकमेकांच्या ओळखीतले होते. दोघंही पार्टीत होते. विशेष म्हणजे यापैकी एक गृहस्थ तर आणीबाणी लागू होण्याच्या एक दिवस आधी माझ्या घरी आले होते. त्यांनी मला आणि माझ्या बायकोला चर्चेदरम्यान हा किस्सा सांगितला. दुसऱ्या सोर्सने या किस्स्याला दुजोरा दिला. संजय गांधी आणि त्यांच्या आईच्या नातेसंबंधांविषयी चर्चा सुरू असताना हा किस्सा मला कळाला.

ज्येष्ठ पत्रकार कूमी कपूर यांनी आपल्या ‘द इमरजेंसी : अ पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकात म्हटलं, की ही बातमी जंगलात भडकलेल्या एखाद्या आगीसारखी सगळीकडे पसरली होती. सेन्सॉरशिपमुळे भारतीय पेपरमधे मात्र ही बातमी आली नव्हती. दुसरीकडे, तुमच्या बातमीची मात्र जगभरात दखल घेतली गेली, त्याचं तुम्हाला कधी आश्चर्य नाही वाटलं?

मला यात काहीच आश्चर्याचं वाटलं नाही. कारण भारतीयांना गॉसिपिंग आवडतं हे मी ओळखून आहे. ही बातमी जगभरातल्या मीडियामधे खूप चालली. न्यूयॉर्कर मॅगझिनने तर या विषयावर प्रतिष्ठित पत्रकार वेद मेहता यांचा एक लेखच छापला होता.

कपूर यांनी तर या बातमीच्या खरेपणावरच संशय व्यक्त केलाय.  सुत्रांचं नाव जाहीर न करणं आणि या बातमीला अजून कुणीही उघडपणे दुजोरा दिला नाही, हे यामागचं कारण असू शकतं. खरंच तुमचे हे सोर्स विश्वसनीय होते? डिनर पार्टीत असलेल्यांपैकी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने या प्रसंगाला दुजोरा दिला होता का? या बातमीबद्दल कधी तुम्हाला खंत वाटली?

सुत्रांची विश्वसनीयता बिनतोड होती आणि आजही आहे. या दोघांशिवाय मी इतर कुणाचीही मुलाखत घेतली नाही. आणि मला ही बातमी लिहिल्याबद्दल कधीही खंत वाटली नाही. या मायलेकांचा भारतीयांवर खूप मोठा प्रभाव होता. अशावेळी त्यांच्या या अजब नात्यावर या बातमीने नवा प्रकाश टाकला, असं मला वाटतं.

आणीबाणी उठल्यावर  आणि १९७७ मधे इंदिरा गांधी यांची सत्ता गेल्यावर तुम्ही कधी आपल्या सुत्रांनी भेटलात? भेटला असाल तर त्यांच्यासोबत काय बोलणं झालं?

मी त्यांना आणीबाणीपूर्वी, त्या काळात आणि नंतरही वेळोवेळी भेटत आलोय.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

थापड मारल्याची बातमी दिल्यामुळे तुम्हाला भारत सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं. असं काही होईल, याची तुम्हाला कल्पना होती?

मला निव्वळ देश सोडून जायला सांगण्यात आलं नव्हतं तर तसा चक्क आदेशच काढण्यात आला होता. मला पाच तासांची नोटिस मिळाली होती. आणि यामागंचं कारण, थापड मारल्याची बातमी नव्हती, तर दुसरीच बातमी होती. भारतीय सैन्यदलातल्या काही अधिकाऱ्यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय आणि त्या काळात इंदिरा गांधींची वागणूक काही बरी नव्हती, असं मला सांगितलं होतं. यासंबंधीच्या बातमीवरून मला नोटिसविनाच अटक झाली होती. बंदुकधारी पोलिसांनी मला घरातून थेट इमिग्रेशन ऑफीसवर नेलं.

तिथल्या एका अधिकाऱ्यांसोबत माझ्या अनेकदा भेटीगाठी व्हायच्या. त्यानेच मला सांगितलं, की दिल्लीहून जाणाऱ्या पहिल्या विमानाने मला रवाना केलं जाणार आहे. यामागचं कारण विचारल्यावर त्याने लगेच दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर, त्यानंतर कानांवर आणि मग शेवटी तोंडावर ठेवले.

पाचेक तासांनी अमेरिकी दुतावासातल्या एका अधिकाऱ्याने मला एअरपोर्टवर नेलं. तिथं कस्टमच्या अधिकाऱ्याने माझ्याजवळच्या डझनभर वह्या जप्त केल्या. अनेक महिन्यांनी मला त्या परत मिळाल्या. वहीत जिथं जिथं नाव लिहलेली होती, त्या खाली लाल रेघा मारलेल्या होत्या. नंतर मला कळालं, की यापैकी अनेकांना जेलमधे डांबण्यात आलंय. यातूनच मी, कुठलीही संवेदनशील बातमी करताना नाव न लिहण्याचा धडा घेतला. मला बँकॉकला जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं. तिथल्या एका हॉटेलवर मुक्कामी असताना मी थापाडात मारल्याच्या घटनेची बातमी लिहली.

तुमची कधी श्रीमती गांधी किंवा संजय गांधी किंवा गांधी घराण्यातल्या कुणाशी गाठभेट झालीय? त्यांना भेटल्यावर आपल्याला काय वाटलं?

आणीबाणीनंतर मी श्रीमती गांधींना भेटलो. त्यावेळी त्यांची सत्ता गेली होती. मोरारजी देसाई सरकारने मला पुन्हा बोलवून घेतलं होतं. त्यावेळी एका ब्रिटीश पत्रकारालाही भारताबाहेर हाकलून देण्यात आलं होतं. मी श्रीमती गांधींची मुलाखत घेत होतो, त्यावेळी हा पत्रकारही तिथं होता. आम्हाला भारताबाहेर काढण्याचं कारण विचारल्यावर इंदिरा गांधींनी यामागे आपण नसल्याचं सांगितलं होतं. थापड मारल्याच्या घटनेबद्दल मी त्यांना काहीच विचारलं नाही. माझ्यात तेवढी हिम्मतच नव्हती.

आणीबाणीनंतर मी एका खासगी डिनर पार्टीला गेलो होतो. राजीव गांधी आणि त्यांची बायको सोनिया गांधीही तिथं होतं. पार्टीला डझनभर लोक होते. याच दरम्यान, एका व्यक्तीने थापड मारल्याची बातमी लिहिणारा पत्रकार मीच असल्याचं सांगितलं. राजीव गांधींही मान डोलावत हसले. सोनिया गांधी रागावलेल्या दिसल्या. दोघंही काहीच बोलले नाहीत. संजय गांधीशी माझी कधीच भेट झाली नाही.

हेही वाचाः 

नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल

पंतप्रधान इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि...

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?