स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

०३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात.

भारतात क्रिकेट हा धर्म झालाय. भारतीय संघ जिंकला की देशभर उत्सवाचं वातावरण असतं. पराभूत झाला की शोककळा पसरते. क्रिकेटपटू इथं दैवतासारखे पूजले जातात. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातो. त्यांच्या जाहिराती बघून वेगवेगळी प्रॉडक्ट खरेदी केली जातात. कुणामुळे संघ हरलाच तर त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. घरावरही हल्ला केला जातो. क्रिकेटमधे एवढा आकंठ बुडालेला दुसरा देश नाही.

भारताचा क्रिकेट बोर्ड श्रीमंत म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या मोसमात सगळीकडे त्याचीच चर्चा असते. महत्वाचा सामना सुरू असला तर टीवीसमोरची गर्दी वाढते. रस्ते ओस पडतात. इथली सर्व प्रसिद्धी माध्यमं क्रिकेटला अधिक महत्व देतात. क्रिकेट, क्रिकेट, फक्त क्रिकेट हे इथं आता चांगलंच मुरलंय. मध्यंतरी भारतीय संघातही आरक्षण आणा, दलित खेळाडू खेळवा, अशी मागणी झाली होती. 

राजपुत्र फक्त बॅटिंग करायचे

अभ्यासकांनी यावर संशोधन केलं. माहिती गोळा केली. १९९० पर्यंत भारतीय संघात उच्चवर्णांचं वर्चस्व कायम होतं. असा निष्कर्ष विद्वानांनी काढलाय. साधारणपणे १९७० पर्यंत तर भारतीय संघातल्या अकरापैकी आठ किंवा नऊ जण उच्चवर्णीय असायचे. उरलेले दोघे, तिघे ब्राह्मणेतर किंवा अन्य धर्मीय असायचे. उच्चवर्णांनीच भारतीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवल्याचं तोपर्यंत दिसून आलं.

ब्रिटीश आणि भारतातल्या राजघराण्यांनी या खेळाचा परिचय सामान्यांना करून दिला. राजघराण्यात दलित, आदिवासी असण्याचा प्रश्नच नव्हता. पण राजे, महाराजांनी आश्रय दिलेल्यांमधे हा खेळ लोकप्रिय होत गेला. शीख, मुसलमान यांनीही हा खेळ स्वीकारला. पारशांनीही क्रिकेटमधे गती आणि रुची दाखवली.

भारतातल्या राजे-महाराजांनी क्रिकेट खेळण्यात आघाडी घेतली होती खरी; पण गंमत म्हणजे हे सगळे राजपुत्र फक्त बॅटिंग करायचे. आपण भारतीय क्रिकेटमधले राजपुत्र बघितले तर ते सगळे बॅट्समन होते असं दिसतं. त्यापैकी एकही जण बॉलर नव्हता. हा योगायोग नाही. तेव्हा क्रिकेट हा बॅट्समनचा खेळ समजला जायचा. साहजिकच भारताने जे बॅट्समन दिलेत ते बहुतेक सगळे उच्चवर्णीय होते आणि आजही बहुसंख्य आहेत.

ब्राह्मणांसाठी क्रिकेट खेळ सोयीचा होता 

क्रिकेटकडे ब्राह्मणवर्ग आकर्षित होण्यामागची कारणं जरा वेगळी आणि अचंबित करणारीही होती. एक म्हणजे हा खेळ असा आहे ज्यांत खेळाडूंचा एकमेकांना फारसा स्पर्श होत नाही. हॉकी, फूटबॉल या खेळांत खेळाडूंचा वारंवार स्पर्श होतो. या अशा खेळांमधे उच्चवर्णीय आणि ब्राह्मण यांची सद्दी आढळत नाही. दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांचा भरणा या खेळांमधे आढळतो.

ब्राह्मण अस्पृश्यता पाळण्याएवढे कर्मठ होते तेव्हा साहजिकच क्रिकेटचा खेळ सोयीचा वाटला. थेट कुणाला स्पर्श होत नसल्याने त्यांना तो आपलासा वाटला असणार. दुसरं कारण म्हणजे यात शारीरिक क्षमता खूप लागत नाही. बॅटिंग करताना त्या संघातले दुसरे बॅट्समन बसून असतात. हा एक फायद्याचा भाग झाला. बॅटिंगमधे तंत्रशुद्धता आणणं अवघड काम असतं. 

ताकदीने फटके मारत बसण्याऐवजी चेंडू व्यवस्थित ढकलूनही धावा मिळतात. रवी शास्त्री या दृष्टीनं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. राहुल द्रविडनंही डोकं वापरून बॅटिंग केली आणि आपला दबदबा निर्माण केला, हे विसरून चालणार नाही. ब्राह्मण ताकदीसाठी ओळखले जात नसत. त्यांना शारीरिक क्षमता अधिक पणाला लावावी लागणार नाही असा हा क्रिकेटचा खेळ सर्वच दृष्टीने म्हणून सोपा वाटत गेला.

हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

फिल्डिंगचं काम हमालीसारखं

क्रिकेटमधे निव्वळ बॅटिंग नसते. बॉलिंग आणि फिल्डिंग करावी लागते. पूर्वीच्या काळात फिल्डिंग करणं कुणी गंभीरपणे घ्यायचंच नाही. ही क्रांती तशी अलीकडची आहे. भारतात एकनाथ सोलकरने ती घडवली. तो माळ्याचा मुलगा. गरीब. इतरांचा सराव चालायचा तेव्हा फटके जवळ आल्यावर चेंडू पकडून फेकायच्या हौसेतून त्याचं क्रिकेट मूळ धरून राहिले. 

तेव्हा फिल्डिंग हा हमालीचा भाग समजला जायचा. बॉलिंगसाठीही घाम गाळावा लागायचा. या दोन्ही विभागांना ब्राह्मणांनी इतर जातींवर सोपवलं होतं. बॅटिंगमधे ब्राह्मण अधिक आढळण्याचं त्यामुळे आश्चर्य वाटत नाही. स्वातंत्र्याच्या आसपास नोकरदार वर्ग होता आणि त्यात पुन्हा ब्राह्मण वर्ग अधिक होते.

आता कुठं ब्राह्मणेतर खेळाडू दिसतायंत

शहरात क्रिकेट चांगलंच फुलत गेलं. खेडापाड्यात ते पसरत गेलं अलिकडे. भारतीय संघात एका विनोद कांबळी आणि डोडा गणेशचा अपवाद वगळता एकही दलित खेळाडू कधी दिसला नाही, हे सत्य आहे. बाळू पालवणकर हा खूपच प्रतिभावान क्रिकेटपटू स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईची मैदानं गाजवून होता. पण त्याकाळात भारतीय संघ नव्हता. मुंबईतच नाही तर चेन्नई, कोलकाता इथंही परिस्थिती वेगळी नव्हती. तिथं अय्यंगार आणि भद्रलोक यांचीच क्रिकेटमधे सद्दी होती.

आता हे चित्र बदलतंय. वेगवेगळ्या भागांतून आज संघात क्रिकेटपटू येताहेत. त्यामुळे ब्राह्मणेतर, मागास वर्गातले खेळाडू आता दिसू लागलेत. पण यामागे आणखी एक वेगळं कारण आहे. आता क्रिकेट निव्वळ मनोबलाचा खेळ राहिलेला नाही. शारीरिक क्षमतेची कसोटी घेणाराही खेळ झालाय. वाढत्या वन-डे आणि ट्वेंटी, ट्वेंटी षटकांच्या प्रकाराने क्रिकेटपटूना जबरदस्त शारीरिक क्षमता ठेवावी लागते. हल्ली फिल्डिंग तर चपळाईनं करावं लागते.

क्रिकेट म्हटलं की मांसाहार आलाच

बॅटींग करताना ताकदीने फटके मारावे लागतात. बॉलिंग विलक्षण वेगाने करावी लागते. वारंवार सामने असतात. लागोपाठ असतात. वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे परिस्थितीशी, हवामानाशी, खाण्यापिण्याशी जुळवून घ्यावं लागतं. कमालीची शारीरिक तंदुरुस्ती टिकवावी लागते. इथं ब्राह्मण कमी पडतात. मजबूत, टणक, पीळदार असतात, त्यांचाच निभाव लागतो.

व्यायाम, कसरतीमधे टाळाटाळ करून चालत नाही. आहारात तडजोड करावी लागते. शाकाहाराला सोडचिट्ठी द्यावी लागते. सचिन तेंडूलकर पट्टीचा नॉनवेजिटेरियन आहे. तो दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकलाय. त्यामागच्या अनेक कारणांपैकी हेही एक आहे.

श्रीनाथचं उदाहरण या दृष्टीनं देता येईल. तो पक्का शाकाहारी होता. एक वेळ तो जगातला सर्वांत वेगवान शाकाहारी बॉलर म्हणून ओळखला जात होता. सततच्या क्रिकेटनं त्याची दमछाक व्हायला लागली. त्याच्या दुखापती, आजार वाढले. शेवटी नाईलाजाने त्याने मांसाहार करायला प्रारंभ केला आणि त्याची कारकीर्द लांबली.

हेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

खेळातही वर्णद्वेषाचा शिरकाव

फक्त भारतातच नाही तर इतर देशांतही भेदांवरून क्रिकेट ढवळून निघालंय. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे यांच्या संघात आधी गोलंदाजांचं वर्चस्व होतं. संख्येनं कमी होते, पण श्रीमंत असल्यानं खेळ त्यांनाच परवडायचे. शिवाय वर्णभेदही घट्ट होता. दक्षिण आफ्रिकेला वर्णद्वेषापायी क्रिकेट जगतानं वाळीत टाकण्याची शिक्षाही दिली. नेल्सन मंडेला यांच्या क्रांतीनं तिथं फरक पडला.

दक्षिण आफ्रिकेमधे मोकळे वारे वाहायला लागले. तरीही अगदी आतापर्यंत तिथे वर्णद्वेष निवळला नाही. हॅन्सी क्रोनिए दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता. तेव्हा गोरेच खेळाडू संघात होते. तिथल्या नेत्यांनी उठाव केला. कृष्णवर्णीय खेळाडूंची निवड करायची मागणी होऊ लागली. क्रोनिए, डोनाल्ड या गोऱ्या खेळाडूंनी बंद करायची धमकी दिली होती.

आपण क्रिकेट सोडून देऊ, संघात दोन, तीन कृष्णवर्णीय खेळाडू हवेत हा आग्रह आपण कधीच मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. ओमर हेनरी, हर्षेल गिब्स, मरवाया एन्टिनी असे कृष्णवर्णीय खेळाडू चमकायला लागले, तेव्हा या गोऱ्यांनाही माघार घ्यावी लागली होती.

भारतीय वंशाचे खेळाडू इतर संघात

झिम्बाब्वेमधे आधी गोरे खेळाडूच निवडले जायचे. कृष्णवर्णीय मुगाबे सत्ताधारी झाल्यावर हा माणूस गुंड प्रवृत्तीचा असल्यानं तो गोऱ्यांची घरंदारं, मळे जाळत सुटला. तिथली परिस्थिती अराजकाची झाली. याविरुद्ध हेनरी ओलोंगा आणि एंडी फ्लॉवर या एक कृष्णवर्णीय तर दुसरा गोरा यांनीच आवाज उठवला. त्यांनी २००३ च्या ऐन विश्वचषक स्पर्धेत दंडाला काळी फित बांधण्याचे धाडस दाखवलं.

परिणामी त्यांना देश सोडून जावे लागे. झिम्बाब्वे उलटसुलट वर्णद्वेषाच्या आग्रहाने आज कमकुवत बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात हल्ली इतर वर्णाचे खेळाडू दिसू लागलेत. त्यांच्यातला एन्ड्रू सिमोंडस हा कृष्णवर्णीय होता. गिलेस्पी आदिवासी तर आता आता उगवलेला ख्वाजा हा पहिला मुस्लीम खेळाडू या संघात दिसतो. भारतीय वंशाचे खेळाडू त्यांच्या संघात दिसू लागलेत. जितेन पटेलसुद्धा त्यांचा संघात आहे. पण हे प्रमाण अत्यल्प आहे.

हेही वाचा: मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

क्रिकेटसाठी थेट धर्म बदलला

पाकिस्तानमधे तर दुहेरी, तिहेरी जातीयवाद आहे. तिथं मुस्लिमेतर खेळाडूंना स्थान मिळणं कठीण जातं. हिंदू खेळाडू सहसा आढळत नाही. दानिश कनारिया काही काळ संघात होता, पण त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होऊन त्याची कारकीर्दच धोक्यात आली. युसुफ योहाना हा ख्रिस्ती. चांगली फलंदाजी करायचा. पण त्याने पाक संघात जम बसवण्यासाठी आणि नेतृत्व करायला मिळण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला.

युसुफ योहाना ‘मोहम्मद युसुफ’ बनला. तेव्हाच त्याची स्वप्नं पूर्ण झाली. पठाणांचंही एक वेगळं स्थान आहे. शहीद आफ्रिदी, युनिस खान आणि आधीचा इम्रान खान यांनी पठाणांचा दणका दाखवल्यानं सरहद्दीवरच्या पश्तुूंकडे पाकिस्तान अपेक्षेने पाहू लागला आहे.

पण आता बदल घडतोय

वेस्ट इंडीजमधे बहुतेक कृष्णवर्णीय खेळाडू दिसतात. म्हणजे तिथं वंशभेद, वर्णभेद नसेल हा आपला समज; पण तो चुकीचा आहे. तिथं भारतीय वंशाच्या खेळाडूंना खूप झगडावं लागतं. लॉइड रिचर्डस, रॉबर्टस जेव्हा जगभर दरारा गाजवून होते तेव्हा ते भारतीय वंशाचा खेळाडू शक्यतो संघात येऊ द्यायचे नाहीत. रॉबर्टस संघाचा प्रशिक्षक झाल्यावर तो खुशाल भारतीय वंशाच्या खेळाडूंचा उल्लेख ‘कुली’ म्हणून करायचा.

चंदरपाल, शारवान, रामदिन आणि आताच्या नवा तारा रामनरेन यांनी विंडीज संघाला आधार दिल्यावर या भारतीयांकडे बघण्याची सर्वांची नजर बदललीय. क्रिकेटचे जनक म्हणवणाऱ्या इंग्लंडमधे प्रदीर्घ काळ गोऱ्यांचं वर्चस्व होतं. पण आता त्यांच्या संघात वेगवेगळ्या देशांतून आलेल्या खेळाडूंचा भरणा झालाय. दक्षिण आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज मधलेही इंग्लंड संघात दिसू लागलेत. मॉंटी पानेसर आणि समित पटेल हे त्यांचे फिरकी बहाद्दर भारतीय वंशाचे आहेत.

हेही वाचा: 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी 

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास 

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो? 

पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारी नज्म हिंदूविरोधी का ठरवली जातेय?

(मुक्त शब्द मासिकात प्रसिद्ध झालेल्या मूळ लेखाचा हा संपादित अंश आहे.)