ऑस्करच्या आयचा घो!

२८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं.

उत्तर प्रदेशातल्या हापुड या दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असूनही दुर्गम झालेल्या जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकीन बनवणारं मशीन लावण्यात आलंय. हे मशीन आल्याने तिथे काय घडलं, याचा वेध पिरीयड, एण्ड ऑफ सेटेन्स या डॉक्युमेंट्रीत घेण्यात आलाय. ओरिजनल पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनाथम यांचं सॅनिटरी पॅड मशिन लावल्यावर हापुडमधे महिलांचं आयुष्य नक्की बदललं का? जिथे महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलणंच वर्ज आहे. या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळालंय. 

काय आहे डॉक्युमेंट्रीत?

अजूनही बाईला 'त्या' दिवसात बाहेर बसवलं जातं असं हे गाव. तिथे मशीन आलं. त्यापासून बनवलेल्या सॅनिटरी पॅडचा वापर गावातल्या बायकांनी केला का?  मासिक पाळीविषयी असलेले टॅबू, समज-गैरसमज, सामाजिक बदल असं सर्वकाही या डॉक्युमेंट्रीत आहे.

बरं या फॅक्टरीत काम करायला कोण महिला तयार होईना. महिला इथे तोंड लपवून येऊ लागल्या. आपण इथे काम करतो हे कुणाला समजायला नको, असं त्यांना वाटत होतं. नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंट्री उपलब्ध आहे. २५ मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीत तिथल्या महिलांचे बाईट आहेत. त्या पिरीयडवर बोलायला तयार नाहीत. मग हळूहळू बदल कसा झाला, याचा वेध ही शॉर्ट सबजेक्ट डॉक्युमेंट्री घेते.

विषय भारतीय असला तरी ही काही भारतीय डॉक्युमेंट्री नाही. ती अमेरीकन प्रोडक्शन आहे. 'पिरीयड. एण्ड ऑफ सेंटेन्स' ची दिग्दर्शिका रायका झेहतब्जी अमेरिकन इराणी आहे. ती लॉस एंजलिसमधे राहते. या डॉक्युमेंट्रीचे एक दोन नाही, तर जवळपास ४० प्रोड्युसर आहेत. त्यापैकी दोन नावं भारतीय आहेत. पहिलं आहे मंदाकिनी कक्कर आणि दुसरं आहे गुनीत मोंगा. या दोघीही 'शिक्या एंटरटेन्मेन्ट' या प्रोडक्शन हाऊसशी संबंधित आहेत.

पुरस्कार मिळाल्यावर अभिनंदनाचा वर्षाव

गुनीत सिनेमाच्या जगासाठी नवीन नाहीत. त्या भारतीय सिनेमे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमधे घेऊन जातात. ऑस्कर घोषित झाला तेव्हा गुनीतवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तो गरजेचा ही होता. आपण सर्वजण ऑस्करमधे भारतीय कनेक्शन शोधतो आणि एखादं भारतीय नाव आलं की जयघोष करतो. आता पुढचे काही दिवस 'आपणही ऑस्कर मिळवला' असं छातीठोकपणे आपण सांगत बसू.

पण इथं एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ऑस्कर हा जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार नाही. तो सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला पुरस्कार सोहळा आहे. गुनीतचं अभिनंदन करायला हरकत नाही. पण मसान, लंच बॉक्स, गँग्ज ऑफ वासेपूर, हरामखोर सारख्या सिनेमांची निर्मिती करणाऱ्या गुनीतला भारतीय प्रेक्षकांनी देशात साथ दिली असती तर त्यापेक्षा चांगलं झालं असतं.

हे सगळे सिनेमे भारतात प्रदर्शित झाले. पण प्रेक्षकांनी त्याला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले हे सिनेमे बॉक्स ऑफीसवर आपटले. मोठं आर्थिक नुकसान झालं. तरीही त्या थकल्या नाहीत. सिनेमांची निर्मिती करतच राहिल्या.

भारतीय सिनेमाला हॉलीवूड बाधा

परदेशातल्या लोकांनी चांगलं म्हटल्याशिवाय आपलं साहित्य, सिनेमे, नाटक आपल्याला का आवडत नाहीत. भारतात भाषा आणि विषयांची विविधता आहे. इतकी जगातल्या कुठल्याही देशात नाही. तरीही आपण आपल्या भाषेतले सिनेमे बघत नाही. आता टीवीवर तामिळ सिनेमांचा सुळसुळाट झाला. त्यामुळे तामिळ आणि तेलुगुच्या हिरोंचा भाव वाढलाय. पण तेही कमर्शियल सिनेमे आहेत. त्यांना हॉलीवूडची बाधा झालेली असते.

यापेक्षाही कितीतरी चांगले सिनेमे मल्याळम, बांग्ला, उडिया भाषेत बनतात. पण आपण भारतीय किती सिनेमे थिएटरमधे जाऊन बघतो? भोजपुरी सिनेमा लाऊड आहेत. पण मलेशियात निरहुआचं मोठं मार्केट आहे. जपानमधे रजनीकांतच्या सिनेमांना गर्दी होते. रशियात आजही मिथुन, शाहरुख खानचा सिनेमा चालतो. आमीर खानने चीनमधे आपलं मार्केट तयार केलंय. असं असताना हे भारतात मात्र आपण आपल्याच भाषेतल्या सिनेमांना का नाकारतो हे समजत नाही.

पाश्चिमात्य सिनेमांचा एवढा प्रभाव का?

ऑस्कर मिळाला म्हणजे तो जगातला सर्वात चांगला सिनेमा हा एक गोड गैरसमज आहे. ऑस्करच्या पलिकडे खूप मोठं जग आहे. ऑस्कर हा जवळपास ६,३०० मतांचा पुरस्कार आहे. अकादमीच्या सदस्यांची ही संख्या आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रिया खूप मजेशीर असते. यामुळेच एखादा सिनेमा आणि अभिनेत्याचं नाव ऑस्कर पुरस्काराशी जोडलं जाणं हे फार भूषणावह नक्की नाही, हे इथं सांगणं गरजेचं आहे.

आपल्या पुरस्काराची हाईप करुन जगभरात आपलं फिल्म मार्केट तयार करण्यात हॉलीवुडवाले यशस्वी झालेत. हे इथे ध्यानात घेणं गरजेचं आहे. आतातर अकॅडमीने सिनेमाचं मार्केट वाढतंय हे लक्षात आल्यावर बॉलीवुडकरांना आपला सदस्य बनवायची प्रक्रिया हाती घेतलीय. गेल्यावर्षी जगभरातल्या ९२८ सदस्यांना आमंत्रण देण्यात आलं. त्यामधे भारतातून शाहरुख खान, माधुरी दीक्षित, तब्बू, सौमित्र चॅटर्जी, नसीरुद्दीन शाह, माधबी मुखर्जी यांची नावं आहेत.

दर्जा जागतिक पण प्रेक्षक दोन

२०१५ मधे बर्लिनमधे असताना आपला स्टोरीटेलर डायरेक्टर नागेश कुकनूरला भेटलो होतो. त्याचा लक्ष्मी हा सिनेमा चांगलाच आपटला होता. भारतातल्या फ्लेश माफियांवरची ही गोष्ट प्रचंड प्रभावी होती. पण आपल्या देशात चालली नाही. परदेशात ती अनेक फिल्म फेस्टीवलमधे गेली. तिथं नागेशचं कौतुक झालं.

२०१५ मधे तो बर्लिनला 'धनक' हा सिनेमा घेऊन आला होता. फक्त तीन शो होते. तीनही हाऊसफुल्ल. राजस्थानी म्युजिकवर बर्लिनकर नाचले. पण भारतात हा सिनेमा रिलिज झाला आणि अगदी तिसऱ्याच दिवशी गायबही झाला. आता नेटफ्लिक्सवर आहे.

तुंबाड, शीप ऑफ थिसीस हे सिनेमे बनवायला ५६ इंचापेक्षाही मोठी छाती लागते. घरदार गहाण ठेवून सहा सहा वर्षे हे सिनेमे बनवले जातात. जागतिक दर्जाचे असतात आणि बघायला दोन माणसंही जात नाहीत. हे किती दिवस चालणार माहीत नाही. मराठीतही अनेक सुंदर सिनेमे आले आणि गेले. ७० च्या दशकात जब्बार पटेल आणि विजय तेंडुलकर या जोडीनं बर्लिन, वेनिस, कार्लोवीवॅरी सारखे फिल्म फेस्टीवल गाजवले. 

मग हातात असलेलंही गमवू

हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू भाषेतले सोडले तर आसाममधे कोण सिनेमे बनवतात, ओडिशातला कुठला दिग्दर्शक नक्की काय करतोय, काय प्रयोग करतोय याची आपल्याला माहिती नसते. सरकार आपल्या देशातला सिनेमा परदेशात घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न करतंय. पण देशात जिथे या सिनेमाचं मार्केट आहे तिथे प्रेक्षकच थिएटरमधे आला नाही, तर काय घंटा भारतीय सिनेमा वाढणार!

आता नेटफ्लिक्स, अमेझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे भारतीय प्रादेशिक भाषा आणि त्यात बनलेल्या सिनेमांना चांगले दिवस आलेत. पण मंजिल अभी दूर है. त्यामुळे प्रेक्षकांनी हॉलीवुडच्या बाजारवादाला बळी न पडता आपल्या अस्सल भारतीय सिनेमाला चांगली साथ दिली, तर प्रादेशिक भाषेतला किंवा हिंदीतला प्रयोगशील सिनेमा टिकेल. उगाच ऑस्करच्या मागे राहिलो तर जे आहे तेही आपण गमावून बसू, अशी भीती आहे.
 

(लेखक आंतरराष्ट्रीय सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या फेसबूक पोस्टचं संपादित रूप. )