नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ३० मेला दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पहिल्याच फटक्यात तब्बल ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. जवळपास सगळ्याच राज्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न झालाय. अमित शहा आणि एस. जयशंकर यांच्या एंट्रीने तर सगळ्यांनाच चकित केलंय.
गुरुवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात एका भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी समारंभ झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या ५७ सदस्यांना शपथ दिली. पंतप्रधानांसह २४ कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले नऊ राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी समारंभाने दोन ब्रेकिंग न्यूज दिल्या. एक म्हणजे भाजपाध्यक्ष अमित शहा मंत्री होणार. येत्या सहाऐक महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांत विधानसभा निवडणूक आहे. हे ध्यानात घेऊन शहा आणखी काही काळ अध्यक्षपदी राहणार असं म्हटलं जातं होतं. पण शपथविधीला काही मिनिटं शिल्लक असताना शहा मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं.
गेल्या सरकारमधे ज्येष्ठ मंत्री असलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी यावेळी स्वतःला मंत्रीपदापासून दूर ठेवलं. तसंच रेल्वेमंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनाही मंत्रीपद मिळालं नाही. अशावेळी ज्येष्ठ, अनुभवी लोकांची कमतरता मोदी सरकारला भासणार होती. अमित शहांना मंत्रिमंडळात घेऊन मोदींनी ही कमतरता दूर केलीय, असं दिसतंय.
हेही वाचाः भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं विश्लेषण
यंदाच्या शपथविधी सोहळ्यातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कुठली असेल, तर ती माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांचा मंत्रिमंडळात समावेश. अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पण जयशंकर यांचं नाव अचानकच समोर आलं. जयशंकर हे मोदींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
गेल्या पाच वर्षांत मोदींनी स्वतःच इंटरनॅशनल डिप्लोमसीत लक्ष घातलं. त्यातून सुषमा स्वराज केवळ मानवतावादी दृष्टीकोनातून ट्विटरवर लोकांना मदत करण्यापुरत्याच उरल्या. पण आता जयशंकर यांना मंत्रिमंडळात घेऊन मोदींनी येत्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध हाताळण्यासाठी डिप्लोमसीवर विशेष भर असणार असल्याचं स्पष्ट केलंय.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या मते, यामधे ९ मंत्र्यांचं वय हे पन्नाशीच्या घरात आहे. तसंच ५० ते ६० वयोगटातले १७ मंत्री आहेत. तर ६० आणि ७० या वयोगटामधे सर्वाधिक २९ मंत्र्यांचा समावेश आहे. ३५ वर्षांचे कैलाश चौधरी हे सर्वांत कमी, तर ७२ वर्षांचे रामविलास पासवान हे सर्वांत ज्येष्ठ मंत्री ठरलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्या मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी रक्ताला वाव मिळाल्याचं म्हटलंय.
गेल्यावेळच्या जवळपास ४० टक्के मंत्र्यांना यावेळी संधी मिळाली नाही. सुरेश प्रभू, राधामोहन सिंह, मेनका गांधी, जयंत सिन्हा, अनंतकुमार हेगडे, सतपाल सिंह आणि रामकृपाल यादव, राजवर्धनसिंह राठोड यांना यावेळी डच्चू मिळालाय.
हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?
ओडिशाच्या बालासोर सीटवरून निवडणूक जिंकलेल्या प्रतापचंद्र सारंगी यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मीडियातले लोक ओडिशाचे मोदी अशी त्यांची ओळख सांगताहेत. गरीब कुटुंबातून आलेले सारंगी २००४ आणि २००९ मधे आमदारही राहिलेत. २०१४ मधे लोकसभेसाठी उभे होते. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलंय. त्यातूनच पांढरी दाढी, डोक्यावर वाढलेले केस, सायकल आणि बॅग अशी ओळख असलेल्या सारंगी यांना संधी मिळालीय. सारंगी यांच्या रूपाने सोशल मीडियावरचा वायरल चेहरा आपल्या मंत्रिमंडळात ठेवण्याचा राजकीय चाणाक्षपणा मोदींनी दाखवला.
मंत्रिमंडळातले केवळ ५ सदस्य लखपती आहेत. त्यांच्याकडे एक कोटीहून कमी मालमत्ता आहे. तर ५७ पैकी ५२ मंत्री करोडपती आहेत. १३ लाख मालमत्ता असलेले प्रतापसिंह सारंगी हे सर्वात कमी मालमत्ता असलेले मंत्री आहेत. तर हरसिमरत कौर बादल या सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्याकडे २१७.९ कोटी रुपये एवढी मालमत्ता आहे.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक ९ जणांनी शपथ घेतली. त्याखालोखाल महाराष्ट्र ७, बिहार ६ आणि मध्यप्रदेशमधून पाच जणांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातून खासदार राज्यसभेवर गेलेले केरळ भाजपचे नेते वी. मुरलीधरण यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.
कर्नाटक ४, राजस्थान ३, गुजरात ३, हरियाणा ३, पंजाब २, झारखंड २, पश्चिम बंगाल २ आणि छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, तेलंगणा, गोवा, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश तसंच हिमाचल प्रदेश या राज्यांतून प्रत्येकी एकाला मंत्रीपद मिळालंय. मोठं राज्य असलेल्या तामिळनाडू, आंध्र प्रदेशला मात्र मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.
हेही वाचाः
नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?
यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं
भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा