धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


शिकागो इथं सव्वाशे वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत दिलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. यानंतर २७ ऑगस्ट १९३३ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत अध्यक्षीय भाषण दिलं. महाराजांनी आपल्या भाषणात धर्म सर्वसुलभ करण्यासाठी काहीएक मूलभूत मांडणी केली. सयाजीरावांच्या या ऐतिहासिक भाषणाचा हा संपादीत अंश.

या महापरिषदेचे अध्यक्ष म्हणून जो मान तुम्ही मला दिला त्याची मला पूर्ण जाणीव आहे.

हा मान म्हणजे माझी सनातन मातृभूमी आणि सर्व धर्माचीच साक्षात मातामही अशी जी हिंदमाता तिचाच सन्मान होय, असं मी समजतो. मी स्वत: अनेक वेळा पणजोबा झालेलो आहे. तेव्हा मी आपल्याला जे सांगेन, ते दीर्घकालीन आयुष्याच्या अनुभवावरून सांगेन.

हल्लीचे युग अंत:क्षोभाचे आणि अंदाधुंदीचे आहे; पण तसेच ते स्थित्यंतराचे आणि जागृतीचेही आहे. लॉर्ड आयर्विन यांनी आम्हाला हिंदुस्थानात सांगितल्याप्रमाणे सांप्रतकाळी आपल्या सर्वांच्या अंत:करणात परिवर्तन होण्याची जरूरत आहे. ही जरूर केवळ हिंदुस्थानालाच आहे असं नाही. भौतिकशास्त्रांनी सध्या एका दृष्टीने जगाचं एकीकरण केलंय खरं; पण सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या त्याचे तुकडेही पडलेले आहेत. अशा स्थितीत धर्माला जगाचे आध्यात्मिक आणि म्हणूनच सांस्कृतिक ऐक्य साधता येईल किंवा नाही, हा सध्या मुख्य प्रश्न आहे.

आकर्षक पर्यायाने बोलायचे तर असं म्हणता येईल की, सध्या मनुष्यप्राणी हा अधिक छानछोक किंवा चवचाल झाला आहे, तो अधिक सभ्य किंवा भारदस्त होईल काय, हा प्रश्न आहे. ज्या नवीन परिस्थितीत तो येऊन पडला आहे तिला अनुकूल होईल अशा प्रकारे त्याला आपल्या मनाचा कोश बदलता येईल काय? जगातील वस्तुजातीच्या वाढत्या मूल्यपरिमाणानुरूप तो स्वत: उन्नत होऊ शकेल काय? सर्वांत दूर असलेल्या ग्रहाचे वजन आणि त्याचा विग्रह त्याला करता आला तरी ज्या ग्रहावर - ज्या पृथ्वीवर तो राहतो, त्यात त्याला संघटना करता येईल की काय? 

स्फूर्ती आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्याला धर्माची जरुरी आहे; पण जर या कामी त्याला धर्मामुळे अडचण व्हावयास नको असेल, तर त्या धर्माचीच पुनर्रचना झाली पाहिजे. त्यासाठी धर्माला जे कायदेकानूंचे दुर्बोध स्वरूप सध्या आलेलं आहे ते नष्ट करून आधुनिक लोकांना तो सुबोध होईलसा करणं आणि मग त्यात जे पोकळ अवडंबर माजलं आहे तेही नाहीसं करून आजकालच्या मंडळींना तो आदरणीय वाटेलसा करणं, या दोन्ही गोष्टी आज आवश्यक नाहीत का? 

जगातील सर्व मोठ्या धार्मिक चळवळींचा प्रारंभ धर्माच्या अशा मूल्य परिवर्तनानेच आणि धर्माला सर्वसुलभ करण्यानेच होत असतो. गौतम बुद्धाने आपल्या वेळच्या ब्राह्मण धर्मात जे परिवर्तन घडवून आणले ते त्या धर्माच्या सर्वसुलभ अंगावर सर्व भर देऊन आणि धर्मचर्चेसाठी प्राकृत लोकांची भाषा वापरूनच घडवून आणलं. आजही धर्मातील कितीतरी व्याख्या बदलून नव्या करण्याची वेळ आली आहे.

परमेश्वर सच्चिादानंदस्वरूप आहे, अशी परमेश्वराची उत्कृष्ट व्याख्या हिंदुस्थानात प्रचलित आहे; परंतु या ‘सच्चिदानंद’ शब्दाचा अर्थ मात्र पुढं इतक्या अंशइंद्रिय गूढवादाच्या दृष्टीने लाविला गेला, की त्यामुळे परमेश्वरातला मानवसुलभ अंश निकृष्ट दर्जाचा ठरला आणि सर्वसाधारण बुद्धीच्या मनुष्याने तर त्या अर्थापुढे अजिबात हातच टेकले. हा प्रकार टाळण्यासाठी आपण चार गोष्टींचे मन:पूर्वक प्रतिपादन केले पाहिजे.

पहिली गोष्ट अशी की, परब्रह्मस्वरूप परमेश्वर या जगात दिक्कालांच्या बंधनातच अवतीर्ण होतो. दुसरी गोष्ट ही की, आपण ज्या जगात राहतो ते जग सत्यस्वरूप आहे. तिसरी गोष्ट इतकीच की, जगाचे हे स्वरूप ओळखू शकणारे मानवी मन हे तत्त्वत: जगनियंत्याच्या मनासारखेच आहे. म्हणजे त्या मनात कवीची कल्पकता आणि गणिताची शास्त्रीयता आहे आणि यांच्या पलीकडची चौथी गोष्ट म्हणजे आपला जो आनंद, जो आत्मानंद, तोच ब्रह्मानंद, तोच परमेश्वराचा आनंद होय आणि आपले जे दु:ख तेच परमेश्वराचेही दु:ख होय. अशा रीतीने ईश्वर हा सत् म्हणजे सत्यस्वरूप चित् म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे सुखमय आहे आणि जन ही त्याची वेशभूषा आहे. म्हणजे ‘एकोऽहं बहुस्याम्’ इत्यादी परब्रह्मच्या विचारस्फुरणाचे आणि विश्वनिर्मिती करताना परमेश्वराला जो आनंद होतो, त्यांचेच व्यक्त स्वरूप हे जग आहे. म्हणून या जगाला माया अथवा भ्रम मानणे म्हणजे परमेश्वराची नालस्ती करण्यासारखे आहे.

सर्व हिंदूलोक शंकराचार्याप्रमाणे सर्वस्वी मायावादी नाहीत आणि गूढवादीही नाहीत, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जडवादी चार्वाकही आमच्यात झालेले आहेत आणि वास्तववादीदेखील कितीतरी झालेले आहेत. आमच्याकडे वूलवर्थ टॉवरसारखे प्रचंड बांधकाम नसले तरी ग्वाल्हेरचा किल्ला आणि दिल्लीची मशीद आमच्या देशात आहे. डॉलर नाण्याची सुवर्णप्रतिमा आम्ही पूजीत नसलो तरी आमच्या तांब्याच्या पैशाची चर्चा की, कीर्तनभक्ती आम्ही पुष्कळच करतो. हिंदी लोक मूळचे खरोखर व्यावहारिकच आहेत; पण फाजील सूक्ष्मतेच्या नादी लागून त्यांनी आपल्या व्यवहारी बुद्धीचा विपर्यास करून घेतला आहे; परंतु गौतम बुद्ध, श्रीकृष्ण, गांधी यांच्यासारख्या सामान्य परिस्थितीतल्या महात्म्यांनी आणि कबीर, तुकाराम, तुळशीदास यांच्यासारख्या विनम्र वृत्तीच्या साधुसंतांनी आमची व्यवहारबुद्धी-जिला तुम्ही इकडे Horse sense अथवा अश्वबुद्धी म्हणता ती आम्हाला पुनश्च आणून दिली.

सूक्ष्मतेच्या बिकट जंगलातून आम्हाला प्रत्यक्ष व्यवहाराच्या धोपट राजमार्गावर आणून सोडले आणि मानवी सामर्थ्यांची शक्याशक्यता आणि सौंदर्य आम्हाला पटवून दिले. युद्ध-कबीरादी व्यावहारिक ध्येयवादी हेच हिंदुस्थानाचे आदर्श होत. 

भारतीय नीतिधर्मशास्त्राची थोरवी दोन गोष्टींमुळे पटते, एक त्या शास्त्राने चार वर्ण अथवा चार आश्रम यांची कल्पना रूढ केली. यामुळे आणि दुसरं, त्याने प्रत्येक वर्णाचे अथवा आश्रमाचे कर्तव्यही स्पष्ट ठरवून दिले, यामुळे; परंतु मायावादावर भलताच भर दिला गेल्यामुळे ब्राह्मणवर्णाच्या स्वार्थीपणामुळे, लवचिक वर्णव्यवस्थेच्या जागी ताठर जातिभेद माजल्यामुळे आणि ‘जगन्मिथ्या’ वाद्यांच्या आणि उपाध्याय वर्गाच्या वरचष्म्यामुळे आमचा हा थोर आचारधर्मसुद्धा पुढं मूर्खपणाचा ठरला. आज धर्मशास्त्राला सर्वच नीतिशास्त्रे असा सवाल टाकीत आहेत की, एका चांगुलपणाहून अधिक खरे असे जगात काय आहे? सेवेच्या भावनेहून, परार्थसाधनेहून अधिक खरे पुण्यप्रद, अधिक महनीय असे जगात काय आहे?

‘असक्तो ही आचरन कर्म पर आप्नोति पुरुष:’ - म्हणजे निष्कामपणाने आपलं ऐहिक कर्तव्य मनुष्याने करणं याचंच नाव ईश्वरप्राप्ती करून घेणं होय, असं भगवद्गीता सांगते. या तत्त्वाप्रमाणे वागणाऱ्या पुरुषांनीच जगाची उन्नती केलेली आहे आणि त्याला सुंदर निर्भय - अकुतोभय - असं करून ठेविले आहे. गीता आणि गौतम बुद्ध टाहो फोडून सांगत आहेत की, आपण मात्र आपल्या तृष्णेपायी सुंदर जगाचा विध्वंस करीत आहोत. 

भौतिकशास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्रज्ञ, शिल्पशास्त्र, समाजसुधारक आणि धर्मद्रष्टे हे लोक या नव्या सृष्टीचे निर्माते आहेत. सृष्टीकर्त्या परमेश्वराचे ते एकापरीने जोडीदारच आहेत; पण स्वार्थ, जातिद्वेष, संकुचित देशाभिमान आणि लोभ या दुर्गुणाचे मूर्तिमंत पुतळे असणाऱ्या लोकांनी जगात सर्वत्र गोंधळ माजवून दिला आहे. 

तरीही, एक नवंच जग, नवीनच सृष्टीरचना निर्माण होत आहे, हे निश्चित. ईश्वर त्याच उद्योगात आहे; पण ईश्वर हा लोकसत्ताक राज्यातल्या राजासारखा असल्यामुळे त्याला या कामी लोकांच्या आपल्या मदतीची अपेक्षा आहे. मदत घ्यावयाची ती सरदार, असामदार, पुरोहित इत्यादी वर्गासारख्या मिरासदार लोकांकडूनच, असा देवांघरी नियम नाही. मदत करण्याची ज्यांची तीव्र इच्छा आहे, सेवेची भावना आहे, तेच देवाचे सरदार - शिलेदार. ‘जो सर्वांत मोठा आहे तो सर्वांचा सेवक बनू द्या.’ उत्कृष्ट सेवक हा सर्वांहून मोठा असतोच असतो. 

आजचा काळ गुणकर्मानुसार व्यक्तीचं महत्त्व ठरविण्याचा आहे आणि हे महत्त्व, ‘मदायत्तं तु पौरुषं’ प्राप्त करून घेण्याचा व्यक्तिमात्राचा हा हक्क हिरावून घेणारी आजची वर्णव्यवस्था मूळ सुरू झाली तेव्हा अशी गंभीर घोषणा करण्यात आली की, सर्व वर्ण हे विराट पुरुषाच्या देहापासून निर्माण झालेले आहेत. अर्थात एकमेकांच्या उपयोगी पडण्याकरिताच पुरुषसूक्तांतला मंत्रघोष प्रत्येक वैष्णवपंथीय देवपूजा करीत असतो; पण या मंत्रातील कोमल काव्य कालांतराने रुक्ष गद्य बनले आणि अधार्मिक आणि अनैतिक आचारांना या मंत्राचा दैवी आधार देण्यात येऊ लागला. ब्राह्मणवर्ण हा विराटपुरुषाचे मुख होय असे हा मंत्र स्पष्ट म्हणत असताना, त्याचा अर्थ मात्र असा करण्यात आला की, ब्राह्मण हे विराटपुरुषाचे डोके किंवा मेंदूच होय.

मूळ सूत्राचा अर्थ इतकाच आहे की, समाज हा एखाद्या सेंद्रिय प्राण्यासारखा आहे आणि त्याने सर्व अवयव त्याच्या धारण पोषणाला सारखेच उपयोगी आहेत; परंतु सांप्रतकाळी, काही स्वाभाविक; पण बऱ्याच अस्वाभाविक कारणांनी वाढलेल्या, आपल्या ताठर जातिभेद पद्धतीशी या अर्थाचे गोत्र जुळत नाही. एवढ्या सबबीवर त्या अर्थाचाच त्याग आपण केला आहे; पण आता आमचीही अशी इच्छा आहे की, आमच्यातील कोणत्याही मुला-मुलीला सर्वोच्च दर्जा प्राप्त करून घेण्यास कोणतीही अडचण असू नये. पाय हाताला किंवा मेंदू हृदयाला म्हणू शकेल का की मला तुझी जरूरत नाही? कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसून सर्वजण सारखेच सेवक आहेत.

हल्ली सर्व जगभर पहा, नीतीचे नवे आदर्श धर्मांना आव्हान देत आहेत. म्हणून जो धर्म नीती निरपेक्ष असेल तो कल्याणप्रद नसून हानिकारकच आहे. तरीही मनुष्यप्राण्याला धर्माची आवश्यकता ही आहेच आणि त्यामुळे धर्म ही वस्तू जिवंत राहील हे नक्की. कारण मनुष्यप्राणी हा स्वभावत:च धार्मिक आहे आणि स्वभावावर काही औषध नसतेच. जगात खरोखर ईश्वर नसला, धुंडून कुठे सापडला नसला, तर मनुष्य त्याला निर्माण करील. मनुष्यप्राणी हा असाच स्वभावत: चौकसही आहे, जगाचे आदिकारक वस्तुत: काहीदेखील नसले तरी ते हुडकून काढण्याची प्रबळ इच्छा त्याला गप्प बसू देणार नाही. 

परंतु धर्म ही वस्तू या प्रकारच्या शोधाशोधीपलीकडची आहे. जीवनाचा आधार सापडावा म्हणून फोडलेला टाहो, जिवाला लागलेली वास्तविकतेची आणि एकनिष्ठ किंवा श्रद्धा यांची तहान म्हणजे धर्म होय. साधा, बलवान, उदार आणि प्रशांत असा धर्म मनुष्याला हवा आहे. स्वत:चा विसर पाडील, स्वत:च्या विचार-विकारांना कुंठित करील अशी समर-हाक माणसाला नेहमी हवी असते. 

चालू काळातले आपल्या पुढचे अत्यंत महत्त्वाचे असे बहुतेक दोनच प्रश्न आहेत. एक देशादेशात शांतता राखणं आणि दुसरा बेकारीचं निवारण करणं. म्हणून लढाई, लोभ आणि कायदेशीर लूट, दारिद्य्र आणि बेकारी यांच्या मुळाशी घाव घालण्याचं काम धर्म करू शकेल काय? वैज्ञानिक आणि धार्मिक असलेल्या मानवाच्या हातून या एका पृथ्वीग्रहाची तरी सुयंत्रित व्यवस्था होईल काय? सर्व मानवजातीचे हित डोळ्यांपुढे ठेवून जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीची, कच्च्या मालाची समभाग वाटणी त्या मानवाला करता येईल काय? ही वाटणी त्याला करता आली तरच त्याला जगात शांतता प्रस्थापित करता येईल आणि लाखो भुकेकंगाल बेकारांना कामावर लावता येईल, एरवी नाही.

येशू ख्रिस्तांच्या महावाक्याचाच उल्लेख इतका वेळ मी केला. कारण सर्व धर्म ख्रिस्ताला पूज्य मानतात आणि प्रभूप्रार्थना, आशीर्वचने आणि गतपुत्राची कथा हे बायबलातील भाग सर्व धर्मांना पटण्यासारखेच आहेत. प्रसंगोपात्त सांगितलेले उपदेशाचे चार शब्द, व्यक्तिहिताची आणि समष्टिकल्याणाची तयारी, कोणत्या धर्मात नाही? ख्रिस्ती धर्माप्रमाणे इतर सर्व धर्मातही या गोष्टी आहेत याची जाणीव सर्वांना आहेच. बायबलातील हे प्रसंग आम्हा हिंदू धर्मीयांना आमच्या सत् - चित् - स्वरूपाच्या सनातन पण नित्य - नूतन शोधाची आठवण करून देतात. अर्थात् हे सत् - स्वरूप पाहण्याचा सोहळा भोगावयाचा तो एखाद्या अतर्क्य अतिंद्रिय शक्तीने नव्हे तर ‘याचि देही, याचि डोळा’ भोगून घेतला पाहिजे, असं आम्ही स्वत:ला नित्य बजावीत असतोच. 

अहिंसेवर आम्ही भर देतो. अहिंसेची व्याख्या आम्ही आता उजळून घेतली आहे खरी; पण बायबलमुळे अहिंसेचीही आठवण आम्हाला पुन्हा होते आणि पटते की द्रव्यापकर्षण आणि तेजोभंग हे प्रकारसुद्धा हिंसेतच जमा करण्यासारखे आहेत आणि जो केवळ अहिंसेचे पालन करतो तो नव्हे, तर जो प्रत्यक्ष सत्कर्मे आचरून दाखवितो तोच खरा सच्छील होय. उष्ण मानवी गुणांची पारख उत्कृष्टपणे करणाऱ्या चीनलासुद्धा आता गरीब लोकांची आठवण होऊ लागली आहे आणि बंधुत्वाची स्वत:ची कल्पना विस्तृत करावीसे वाटू लागले आहे. म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे चार समुद्राच्या आतलेच लोक चिनी लोकांचे बंधू ठरत होते; पण आता सगळीकडेच सर्व लोक चीनच्या मते भाऊभाऊच आहेत; पण चीनमधला अंमलदारवर्ग, हिंदुस्थानातला ब्राह्मणवर्ग आणि दुसरीकडचे भांडवलवाले आणि साम्राज्यवादी लोक यांना या विश्वबंधुत्वाचा विसर पडला आहे.

वास्तविक या विश्वबंधुत्वामुळे आपले बहुतेक प्रश्न सुटण्यासारखे आहेत. एकाच परमेश्वराची आपण लेकरे असल्याने समान पितृत्व तर आपल्याला आहेच. निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा, एकाच हाडामासाची अशी सर्व राष्ट्रे निर्माण केली आहेत आणि धार्मिक लोकांची समजूत अशी आहे की, सर्व राष्ट्रांना तीच महाशक्ती शेजारीशेजारीही बनवू पाहत आहे. म्हणून आपला शेजारी कोण आहे याची जाणीव आपल्याला हवी.

ख्रिस्ताचे म्हणणे असे की, जो आपल्याशी शेजारधर्माने वागेल तोच आपला शेजारी. बुद्ध म्हणे की, जो आर्यत्याने वागतो तोच खरा आर्य होय. कन्फयूशियसच्या मते खऱ्या सद्गृहस्थाला कोणत्याही समाजात परक्यासारखे वाटत नाही. या सर्व वचनांपासून आपण बोध घ्यावा, अशी आज वेळ आली आहे. बी पेरावयाचे ते सत्कारणी लागावं म्हणून देव जोराने जमीन नांगरीत आहे. त्याच्या नांगराचा फाळ जमिनीत खोल जात आहे. सगळी रचना तो नवीन करीत आहे. त्याचा हेतू हा की, धर्माला आलेली ग्लानी दूर होऊन त्याने पुन्हा टवटवीत व्हावे, युद्धाने वर काढलेले डोके नष्ट व्हावे आणि कुटुंबाप्रमाणे सर्व विश्व हे एक व्हावे. 

ही विश्वधर्मपरिषद भरविण्यात तुम्ही सुज्ञपणा आणि दूरदर्शीपणा दाखविला आहे. प्रत्येक धर्माने आपल्यात इष्ट ती सुधारणा आता करावी आणि राष्ट्राचे बरे करण्यासाठी प्रत्येक धर्माने आपल्या भांडारातल्या जुन्या इलमा आता बाहेर काढाव्या. आज आपल्याला ज्या वृत्तीची अत्यंत जरूर आहे तिचे वर्णन एका चिनी मूळवाद्याने 25 शतकापूर्वीच इतकं उत्कृष्ट करून ठेविले आहे की, त्यावर मात होणे कठीणच.

ते वर्णन असं : ‘आपल्यामध्ये चळवळ असावी; पण जबरदस्ती नसावी, आपण पिकवावे, पण त्यावर मालकी हक्क गाजवू नये, इतरांना आपण मार्ग दाखवावा, पण त्याच्या नाकात वेसण घालू नये.’ ही वृत्ती खरोखर मोठी उदार किंवा ख्रिश्चन आहे आणि अशा ख्रिश्चन किंवा उदार वृत्तीशीच आम्ही हिंदवासीयांचे नाते स्वभावत: विशेष जडते असं आमचं म्हणणं आहे. आम्ही कबूलच करतो की, ‘तुमचा धर्म अधिक सोपा आणि चांगला करा.’ असे येशू ख्रिस्ताने आम्हाला आव्हानच देऊन ठेवलं आहे. 

स्वत:ला ख्रिस्तानुयायी म्हणविणाऱ्या तुम्ही लोकांनी सुद्धा ख्रिस्तानुयायी नसणाऱ्या लोकांपासून अवश्य तो बोध घ्यावा. तो बोध अ-ख्रिस्ती लोकांतल्या मोठमोठ्या प्राचीन तत्त्वज्ञांपासून किंवा धर्मोपदेशकांपासूनच नव्हे, तर आशिया खंडातील हल्लीच्या नवयुगप्रवर्तकांपासूनही तुम्ही घेण्यासारखा आहे. अज्ञान, स्वार्थ आणि जडवाद या सर्व मानवजातीच्या शत्रूंशी झगडण्यासाठी आपण सौजन्याने आणि बंधुभावाने एकी करू या. धर्माची स्वरूपे भिन्न-भिन्न दिसत असली तरी धर्म ही वस्तू तत्त्वत: एकच आहे. 

ईश्वरनिर्मित सृष्टीची आपण सेवा केली तर आपण ईश्वराचे मित्र आणि जोडीदारच ठरतो. असे एकमेकांचे ओझे आपण एकमेकांनी सहन केले तर आपण परमेश्वराच्या आनंदस्वरूपातही समभागी होतोच.

परमेश्वराचा सदैव जयजयकार असो.

हेही वाचाः

सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ