असा असेल जेफ बेजोस यांचा अंतराळ प्रवास

१२ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुढच्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर चक्क अंतराळात फिरायला चाललेत. त्यांच्या खासगी ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या रॉकेटमधून हा जगावेगळा प्रवास होईल. या रॉकेटमधे बेजोस आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क असतील. शिवाय, एका जागेसाठी लिलावही सुरूय. जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या अंतराळात प्रवासाची सगळीकडेच चर्चा रंगलीय.

रिटायरमेंटनंतरचे सगळ्यांचे प्लॅन ठरलेले असतात. त्यातला महत्त्वाचा प्लॅन असतो फिरणं. तीर्थयात्रा करायची, वैष्णोदेवीला जायचं किंवा फार फार तर परदेशी फिरून यायचं, युरोप अमेरिका बघून यायचं वगैरे प्लॅनिंग रिटायरमेंट जवळ आली की सामान्य माणसं करायला लागतात. पण जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा प्लॅन काय असेल याच्या आजपर्यंत आपण फक्त कल्पना रंगवत होतो. पण जेफ बेजोस यांनी याचं आयतं उत्तर आपल्याला दिलंय. रिटायर झाल्यावर त्यांच्या खासगी कंपनीच्या यानाने ते अंतराळात जाणार आहेत.

जेफ बेजोस ऍमेझॉनचे संस्थापक आहेत. ७ जूनला त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक वीडियो पोस्ट केला. या वीडियोत ते २० जुलैला अंतराळात जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. ‘तुम्ही अंतराळातून पृथ्वी पाहता तेव्हा तुम्ही आतून बदलून जाता. ते दृश्य तुमचं या ग्रहाशी असलेलं, मानवतेशी असलेलं नातंच बदलून टाकतं. ती एक पृथ्वी असते.’ असं त्यांनी या वीडियोत म्हटलंय. त्यांच्या या अंतराळ प्रवासाची फार चर्चा रंगलीय.

श्रीमंत व्यक्तीचं मोठं ऍडवेंचर

१९९४ ला जेफ बेजोस यांनी ऍमेझॉनची स्थापना केली होती. तेव्हा ऑनलाईन पुस्तक विक्री एवढंच त्याचं स्वरुप होतं. त्यानंतर एक एक गोष्ट वाढत जाऊन ई कॉमर्सचा मोठा डोलारा उभा राहिला. त्यातूनच पुढे ओटीटी प्लॅटफॉर्मचीही सुरवात झाली. सगळं जग कोरोना साथरोगात होरपळून निघत होतं तेव्हा जेफ बेजोस यांच्या श्रीमंतीत २.४ कोटी डॉलर्सची वाढ झाली. फोर्ब्स मासिकानं त्यांना ‘आधुनिक इतिहासातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती’ अशी उपाधी दिलीय.

ते ५ जुलैला ऍमेझॉनच्या सीईओ पदावरून निवृत्त होणार आहेत. त्यांची जागा अँडी जेसी घेतील. निवृत्तीनंतर १५ दिवसांनी म्हणजे २० जुलैला बेजोस अंतराळाच्या प्रवासाला निघणार आहेत. 'मला या फ्लाइटमधून जायचंय कारण मी आयुष्यभर याची वाट पाहिलीय. मी ५ वर्षांचा असल्यापासून अंतराळात जायचं स्वप्न पाहतोय. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऍडवेंचर मला माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रासोबत, माझा भाऊ मार्कसोबत करायचंय,’ असं बेजोस यांनी या वीडियोत म्हटलंय.

हेही वाचा: चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

न्यू शेफर्डची सफर

पैसे घेऊन लोकांना अंतराळाची ट्रीप घडवून आणणं म्हणजे स्पेस टुरिझम. यात इलॉन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी, रिचर्ड ब्रॅनसोन यांची वर्जिन गॅलेक्टिक अशा अनेक कंपन्या स्पेस टुरिझमचं स्वप्न उराशी बाळगून काम करतायत. यात बाजी मारलीय ती जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीनं. २००० साली बेजोस यांनी या कंपनीची स्थापना केली होती.

पृथ्वीच्या कक्षेच्या जवळपास १०० किमी बाहेर अंतराळ सुरू होतं. आणि हे १०० किमीचं अंतर कापण्यासाठी ब्लू ओरिजिनकडून न्यू शेफर्ड या यानाचा वापर होणार आहे. अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेफर्ड यांच्या नावावरून या यानाचं नाव ठेवण्यात आलंय. ऍलन शेफर्ड हे अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन नागरिक होते.

चहा कॉफीही मिळणार

या न्यू शेफर्डला दोन चाकं आहेत. एखाद्या कॅप्सुल किंवा ट्यूबप्रमाणे त्याचा आकार असेल. एकावेळी सहा माणसांना घेऊन जाण्याची क्षमता यात असेल. मुख्य म्हणजे मोठ्या खिडक्या असणारं हे पहिलं यान असेल. प्रवाश्यांना बाहेरचं व्यवस्थित पाहता येईल. प्रत्येकासाठी स्वतंत्र खिडकीही असेल.

पायलट वगैरे प्रकार या कॅप्युलला लागत नाहीत. वर्टिकल म्हणजे उभ्या उभ्याच ते टेक ऑफ करतं. त्यानंतर त्यामागं असणारी चाकं आणि रॉकेटचा भाग गळून पृथ्वीवर पडेल. आणि अंतराळ फिरून झाल्यावर पॅरेशुटचा वापर करून कॅप्सुल लँड होईल.

ही पुन्हा पुन्हा वापरता येणारी कॅप्सुल असल्याने असल्याने स्पेस टुरिझमसाठी सोयीस्कर पडेल. आतमधून संपूर्ण प्रेशराईज असल्याने प्रवाश्यांना स्पेस सूटचीही गरज पडणार नाही. मस्त रेलून बसायला लेदरच्या खास सीट्स यानात लावल्यात. चहा कॉफी देण्याचीही सोय आहे.

हेही वाचा: गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग

फक्त ११ मिनिटांचा प्रवास

याआधी ब्लू ओरिजिनने न्यू शेफर्ड कॅप्सुलच्या अंतराळात १५ फेऱ्या केल्यात. पण यापैकी कोणत्याही फ्लाइटमधे कुणीही माणूस गेलेला नव्हता. २० जुलैला पहिल्यांदाच माणसांना घेऊन ही कॅप्सुल जाणार आहे. बेजोस आणि त्यांचा भाऊ मार्क यांच्यासोबत जाणारे उरलेले चौघं कोण असतील ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

पण सध्या यातल्या एका जागेसाठी लिलाव सुरूय. ब्लू ओरिजिनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ३२ कोटी डॉलर या किमतीला बोली सुरू झालीय. १२ जूनपर्यंत ही बोली चालेल. त्यानंतर ही किंमत बेजोस यांच्याच क्लब फॉर द फ्युचर या संस्थेला देण्यात येईल.

या तिसऱ्या माणसाला ४ दिवसांचा सुखद अनुभव मिळेल. प्रत्यक्ष अंतराळात जाण्याआधी टेक्सासमधल्या कंपनीच्या साईटवर तीन दिवसांचं ट्रेनिंग होईल आणि त्यानंतर २० जुलैला यान निघेल. पण गंमत म्हणजे, हा प्रवास फक्त ११ मिनिटांचा असणार आहे. कॅप्सुल वर जाऊन, अंतराळ फिरून खाली येईपर्यंत फक्त ११ मिनिटांचा वेळ लागेल. यातली फक्त तीन मिनिट अंतराळात जातील.

सुरक्षेचं काय?

न्यू शेफर्डच्या याआधी १५ फ्लाइट्स झाल्यात. याचा अर्थ हे रॉकेट व्यवस्थित टेस्ट केलेलंय. त्यात स्वतः जेफ बेजोस चाललेत. त्यांच्या भावालाही ते घेऊन जातायत. म्हणजेच ते बऱ्यापैकी सुरक्षित असणारच. शिवाय, सीएनबीसी या अमेरिकन न्यूज चॅनेलमधे स्पेस रिपोर्ट म्हणून काम करणारे मायकल शेट्झ सांगतात, ‘हे आत्तापर्यतचं सगळ्यात सुरक्षित स्पेस क्राफ्ट असेल. हे रॉकेट पूर्णपणे पृथ्वीचं ऑर्बिट ओलांडून जाणार नाहीय. ऑर्बिटच्या बाहेर जाऊन, अनेक दिवस हजार मैलांचा प्रवास करून हे परत येणार नसल्याने धोका अजून कमी होतो.

सगळं व्यवस्थित पार पडलं आणि जेफ बेजोस या रॉकेटमधून ११ मिनिटांचा का होईना पण अंतराळात फेरफटका मारून पुन्हा सुखरुप पृथ्वीवर परतले तर मानवी इतिहास बदलून टाकणारी ही घटना असेल. यानंतर न्यू शेपर्डमधून अंतराळात जाण्यासाठी कोणता श्रीमंत व्यक्ती किती पैसे मोजेल याचा अंदाजही लावता येणार नाही.

हेही वाचा: 

पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो