हैदराबादेतल्या पोलिस एन्काऊंटरवर टाळ्या वाजवणाऱ्यांनी एकदा हे वाचावं

०६ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज.

‘जेव्हा केव्हा ते मुलींकडे वाईट नजरेनं बघण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्या मनात खाकी वर्दीतले काही वेडे लोक येतील आणि आपल्याला ठोकतील, अशी भीतीची भावना येणं खूप गरजेचं आहे. ना अरेस्ट करायची गरज ना केसची टांगती तलवार, ताबडतोब निकाल लागेल.’

हा सिंघम सिनेमातला अजय देवगनच्या तोंडचा डायलॉग. सिनेमा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा संघर्ष यांचा काही संबंध नसतो, हे आपल्याला माहीत आहे. थिएटरमधून बाहेर पडलं की तसं आपण बोलूनही दाखवतो. पण आपण सिनेमात बघत होतो, तोच सीन आज भल्या पहाटे घडला. हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणात अटकेत असलेल्या चारही संशयित आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर म्हणजेच खात्मा केला.

पोलिसांनी तपासासाठी चारही संशयित आरोपींना भल्या पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी नेलं. आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सीन रिक्रिएट करायचा होता. पण सीन रिक्रिएट करतानाच या आरोपींनी पळून जाण्याचा, पोलिसांकडंची हत्यारं हिसकावण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला एन्काऊंटर करावं लागलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सगळेजण हैदराबाद एन्काऊंटरमधल्या पोलिस आयुक्त सी. जे. सज्जनार यांना सिंघम म्हणू लागलेत.

सोशल मीडियावर तर सज्जनार यांचं प्रचंड कौतुक होतंय. सिनेमातल्या अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यासारखा रिअल लाईफमधला हिरो म्हणून सज्जनार यांचे फोटो वायरल झालेत. आपल्याला सरकारची नाही तर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे, असं म्हणत या एन्काऊंटरच समर्थन होतंय. दुसरीकडे या सिंघमछाप एन्काऊंटरवर काही गंभीर आक्षेप घेतले जाताहेत. आक्षेप घेणाऱ्या फेसबूकवरच्या काही निवडक प्रतिक्रियांचा संपादित अंश इथे देत आहोत.

हेही वाचाः १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

मग तुम्ही द्या फाशी, करा एन्काउंटर म्हणाल?

लेखक मंदार काळे यांनी खूप मार्मिक, परखड शब्दांत एन्काऊंटर प्रकरणावर भाष्य केलंय. ते लिहितात, एन्काउंटर योग्य की अयोग्य हा मुद्दा मी जरा बाजूला ठेवतो. गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका मुलीवर अत्याचार झालाय आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झालाय हेही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केलाय हेही नक्की. आता प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण?

१. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्‍यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती?

म्हणजे 'हे ते नव्हेत' असा दावा मी करतोय, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्‍यांना सीनियर केजीत जाण्यासाठी शुभेच्छा. दावा ज्याने केला, सिद्ध त्यानेच करायचा असतो. प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही विरोधी मत असणारे हा बिनडोक तर्क आहे. प्रश्न हा फक्त प्रश्नच असतो, विरोधी दावा नसतो.

२. पोलिसांनी सांगितलं म्हणजे हे तेच गुन्हेगार असणार असा तुमचा दावा असेल तर आजवर पोलिसांच्या प्रत्येक दाव्यावर आपण विश्वास ठेवला होता असं शपथपत्र लिहून देऊ शकाल काय?

आणि तसं नसेल तर पोलिस आणि न्यायालयांच्या बाहेर आपण नक्की कशाच्या आधारे हेच गुन्हेगार होते हे मान्य केलं हे जरा सांगाल काय?

३. 'निदान काहीतरी तर झालं ना? उगाच फाटे का फोडताय?’ म्हणणार्‍यांना प्रश्न.

उद्या असाच एखादा गुन्हा घडला आणि नेमके तुम्ही त्या गुन्ह्याच्या आसपास होतात. याचा फायदा घेऊन म्हणा की दिशाभूल झाल्याने म्हणा, पोलिसांनी तुम्हाला आरोपी म्हणून पकडलं आणि फेसबुकी कालव्याच्या दबावाने तुमचा एन्काउंटर केला तर तो ही न्याय्यच असेल. मग तेव्हा तुमच्याप्रमाणेच आम्ही ’काहीतरी तर झालं ना? का फाटे फोडताय?’ असं स्वत:लाच बजावून सांगू. चालेल ना?

४. आणखी पुढचे म्हणजे स्वसंरक्षणार्थ झालेल्या मारामारीच्या धुमश्चक्रीत तुमच्या हातून तिसर्‍याच व्यक्तीचा खून झाला. ती व्यक्ती समजा एखाद्या समाजाची अध्वर्यू, एखाद्या सत्तापिपासू पक्षाची कार्यकर्ती, एका मोठ्या गटाची वंदनीय किंवा नेता होती. यामुळे भरपूर गदारोळ झाला म्हणून पोलिसांनी तुमचा एन्काउंटर केला तर तुम्हाला तो न्याय्यच वाटेल? इथे तुमच्या हातून गुन्हा घडलाय हे निर्विवाद, मग कशाला चौकशी वगैरे, टाका टपकावून असा तुमचा तर्क लागू पडतो हे निदर्शनास आणून देतो.

’अनावधानाने घडलेला गुन्हा आणि हेतुत: केलेल्या गुन्ह्याची तुलना कशी करता?’ या प्रश्नाला सोपं उत्तर आहे. तुमचा गुन्हा अनवधानाने झालाय हे तुम्ही म्हणताय. ज्यांचा माणूस मेला ते तुम्ही हा गुन्हा हेतुत:च केलाय असं म्हणत आहेत. आणि ते संख्येने अधिक आहेत. मग बहुमताच्या पॉप्युलर न्यायाने त्यांचं बरोबर आहे ना? थोडक्यात मी ही हेतुत: केलेल्या गुन्ह्यांचीच तुलना करतोय, असा माझा दावा आहे.

आता जसं ’इतक्या लोकांना वाटतं की त्यांनीच प्रियांका रेड्डींवर अत्याचार आणि खून केला. ते काय चूक आहेत का?’ म्हणून हेच ते चौघे, मारा त्यांना असं जितक्या ठामपणे म्हणत आहात, तितक्याच ठामपणे तो गटही तुम्ही आमचा माणूस हेतुत: मारला म्हणून तुम्हाला ताबडतोब ठार मारण्याची मागणी करतोय, असं समजा.

हैद्राबादमधे बलात्कार आणि खून हे दोन्ही हेतुत: झालेत हे उघडच आहे. पण तुम्ही केलेला खूनही हेतुत:च केलाय असं पोलिसांनी बहुमताला खूष करण्यासाठी नोंदवलंय. माध्यमांकरवी आलेल्या बातम्यांमधून माहिती घेतलेल्या, तिसर्‍याच गावात बसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही तुम्ही हेतुत:च खून केला असंच वाटतंय. माझ्या न्यायप्रियतेचं प्रदर्शन घडवण्यासाठी ’तुम्हाला ताबडतोब फाशी द्यावी’ अशी मागणी करणारी पोस्ट मी फेसबुकवर टाकलीय.

तुम्ही आज तथाकथित एन्काऊंटरचं समर्थन ज्या मुद्द्यांवर करत आहात ते सारे मुद्दे इथे तंतोतंत लागू आहेत हे निदर्शनास आणून देतो. अजूनही ‘द्या फाशी, करा एन्काउंटर’ असाच तुमचा निर्णय आहे का?

५. ’मग काहीच करायचं नाही का?’ या प्रश्नाला ‘काहीतरीच करुन काहीतरी केल्याचा कांगावा नक्की करायचा नाही.’ एवढंच उत्तर तूर्त तरी माझ्याकडे आहे.

सोयीच्या वेळी न्यायव्यवस्थेचा आदर करा म्हणून कांगावा आणि आमचं डोकं भडकलं की 'कॉल द डॉग मॅड अ‍ॅंड शूट हिम’देखील चालेल. अशा वृत्तीने वागणार्‍यांना त्यांच्या देवाने लवकर सद्बुद्धी द्यावी.

काहीतरी वाईट घडलंय आणि त्याबद्दल मला कित्ती कित्ती राग आलाय याचा प्रदर्शन करण्यासाठी न्यायव्यवस्थाबाह्य हत्येचं समर्थन करणं मी खुनाइतकंच घोर पातक समजतो. कारण त्याने व्यवस्थेला धाब्यावर बसवणार्‍यांना बळ मिळतं.

हेही वाचाः सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

न्यायव्यवस्था असताना असं व्हायला नको

लेखक, मुक्त पत्रकार प्रतिक पुरी यांनी देशात न्यायवस्था आहे. असं असताना आपण एन्काऊंटर टाळायला हवं अशी भूमिका मांडत एन्काऊंटर प्रकरणावर बोट ठेवलंय. ते लिहितात, डॉ. प्रियंका रेड्डीच्या मारेकऱ्यांना आज पहाटे पोलिसांनी मारलं. हे ठरवून केलेलं हत्याकांड होतं यात शंका नाही. मला व्यक्तिशः याचा आनंद झालेला नाही. पण त्याचं दुःखही झालं नाही. मी अस्वस्थ आहे. त्या बलात्काऱ्यांना फाशीच मिळायला हवी यावर मी आजही ठामच आहे. पण ती अशा पद्धतीने नाही. देशात न्यायव्यवस्था आहे आणि तिला टाळून हे व्हायला नको होतं. त्यानं चुकीचा संदेश जाईल.

न्यायालयात एखादा खटला चालतो तेव्हा त्यात केवळ न्याय दिला जात नाही तर त्या घटनेचं संपूर्ण निरीक्षण, परीक्षण केलं जातं. काय चुका घडल्या, का घडल्या, त्या कशा टाळता आल्या असत्या, त्यासाठी काय करता येईल याची न्यायालयं चौकशी करतात. त्यानुसार संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येतात. निकाल हा यासाठीच सविस्तर दिला जातो. ज्यांत या सर्व गोष्टींचा समावेश असतो. ती एक केस स्टडीही असते, पुढच्या खटल्यांसाठीही ती मार्गदर्शक असते.

या सर्व गोष्टी टाळल्या जातात तेव्हा मनात संशय निर्माण होतो. यात राज्य सरकार, पोलिस यंत्रणा आपली जबाबदारी ढकलून मोकळे होतील. आणि या निर्णयाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतील. मीडियानं ते सुरू केलंच आहे. लोकांनाही त्याचा आनंद होतोय. पण काही दिवसांनी हे सारं विसरलं जाईल. हे व्हायला नको आहे.

आपल्याला एक तात्कालिक न्याय नकोय तर कायमस्वरूपी उपाययोजना हवी आहे. ज्यात सर्व यंत्रणांवर निश्चित जबाबदारी असेल. आणि त्या आरोपींसोबतच त्या यंत्रणेतील बेजबाबदार लोकांनाही शासन मिळेल. आपण रानटी लोक नाही. आपल्याकडे संविधान आहे आणि काही व्यवस्था आहेत. त्यांचा आदर केला जायलाच हवा. 

आम्हाला न्याय हवाच आहे, पण तो अशा पद्धतीचा नको. कारण जेव्हा एक बलात्कार घडतो तेव्हा त्याला केवळ ते आरोपी जबाबदार नसतात. सर्व व्यवस्थाही जबाबदार असतात, समाजही जबाबदार असतो.

हेही वाचाः बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

पोरीचा बाप म्हणून मनाला सुखावणारी बातमी

मुक्त पत्रकार राहुल बोरसे लिहितात, हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या आरोपींचा एन्काऊंटर झालाय. एका पोरीचा बाप म्हणून ही बातमी मनाला सुखावणारी आहे. पण हे एन्काऊंटर जनक्षोभला शांत करण्यासाठी केलं गेलं असेल तर ते भयानक आहे. त्याऐवजी फास्टट्रॅक न्यायालयात सुनावणी घेऊन शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी केली असती तर अजून आनंद वाटला असता.

आता हे मत अनेकांना आक्षेपार्ह वाटू शकतं. साहजिक आहे. लोकांच्या मनात असलेला राग तीव्र आहे. त्यामुळे माझ्या मताचा राग येणंही स्वाभाविक आहे. पण भाजप नेता असलेल्या कुलदीप सेंगरने केलेल्या बलात्काराच्या बाबतीत हाच न्याय लावला गेला नाही. त्यात तर त्या मुलीच्या बापाचा पोलिसांनीच केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाय. अगदी काही दिवसांपूर्वी घडवून आणलेल्या अपघातात तर तिच्या नातेवाईक आणि वकिलाचाही मृत्यू झालाय.

चिन्मयानंद प्रकरणही तसंच आहे. शिक्षणासाठी आलेल्या तरुणींचं लैंगिक शोषण करणारा भाजप नेता आहे म्हणून त्याला अटकही न करणारे मुख्यमंत्री योगी आजही भाजपचे स्टार नेते आहेत. 

यावर कडी म्हणजे आसिफावर मंदिरात झालेला बलात्कार. त्यात तर मी येईपर्यंत त्या मुलीला जिवंत ठेवा, असं पोलिस अधिकारी म्हणाला होता. आठ वर्षांच्या त्या मुलीवर कितीतरी दिवस बलात्कार केला गेला. एकाने तर मेरठहून आपल्या मित्राला बलात्कार करण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ भाजपच्या बुळ्या नेत्यांनी तिरंगा घेऊन मोर्चादेखील काढला. त्यावेळी कित्येक टुकार निव्वळ ती मुस्लिम होती म्हणून आरोपींची पाठराखण करत होते.

या बलात्काराच्या काही ठळक घटना आहेत. पण यातल्या आरोपींचा एन्काऊंटर झाला नाही. कदाचित यांच्या बाबतीत जनक्षोभ कमी पडला असावा. मुळात जनक्षोभ वाढला तरी एन्काऊंटर करण्यात यावा या मताचा मी नाही. आपलं काम चोखपणे बजावलं नाही की एन्काऊंटरसारखे पर्याय डोळ्यासमोर येत असावेत.

हैदराबादच्या घटनेत जनक्षोभ उसळत असतानाच उन्नावमधे पुन्हा एकदा एका बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना समोर आलीय. आता जनक्षोभ परत ऊसळेल का हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि उसळला तरी त्याला न्याय मिळेल का? की रोज मरे त्याला कोण रडे म्हणून जनक्षोभ शांत होईल?

मुळात अशा आरोपींनी बलात्कार करून त्या मुलीला, महिलेला जिवंत जाळून टाकणं, इतपत हिंमत कशी येत असावी? की आपण सगळं मॅनेज करू शकतो किंवा सगळं मॅनेज होऊ शकतं हा संदेश व्यवस्थित खोलपर्यंत पोचलाय? जनक्षोभ तर काय अशा घटनांविरोधात उठतच असतो. काहीवेळाने शांतही होतो हे समजण्याइतके ना नेते खुळे आहेत ना प्रशासन. पण त्याला शांत करणं एन्काऊंटर हा पर्याय नसतो हेही तितकंच खरं.

कारण जनक्षोभ फक्त बलात्कार करणाऱ्यांविरोधातच असतो असंही नाही. तो राजकीय नेत्यांविरोधातही असतो. हीच सवय लागली तर मग कोणीही कशासाठीही या पर्यायाचा वापर करेल. जनक्षोभचं नाव पुढे करून आपले इरादे साध्य करेल.

हेही वाचाः #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

अराजकाच्या दिशेने वाटचाल

पत्रकार अलका धुपकर लिहितात, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी एक घटना समोर आलीय. हैदराबादमधल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी ठार मारलं. या घटनाबाह्य, बेकायदेशीर कृत्याचं समर्थन होतंय. म्हणजे अराजकाच्या दिशेने आपली समाज म्हणून वाटचाल सुरू आहे.

पोलिसांवर जबाबदारी होती फॉरेन्सिक आणि इतर पुरावे जमा करण्याची. हे आरोपी न्यायालयासमोर गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले नव्हते. कायदा अशा पद्धतीने हातात घेणं ही झुंडशाही आहे. अत्यंत चुकीचा पायंडा पाडला गेलाय. याचा निषेध झाला पाहिजे. जी माणसं याचं कौतुक करतायत ती लोकशाहीवादी नाहीत. अशा लोकांच्या मताला किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी ठरवावं.

तर सर्वसामान्यांचेही एन्काऊंटर घडतील

कवी रामप्रसाद वाव्हळ लिहितात, पोलिसांच्या पिस्तुलाने न्याय देण्याची हीच पद्धत चिन्मयानंद, सेंगर, नित्यानंद, आसाराम आणि सभागृहात बसलेल्या बलात्कारी आमदार, खासदार अशा बड्या धेंडांच्या बाबतीत वापरली जाईल काय?

खैरलांजी, उन्नाव, कठुआ अशा हजारो प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अभय दिलंय. आरोपींना अभय देणाऱ्या पोलिस यंत्रणेला एका प्रियांका रेड्डी प्रकरणावरून हिरो बनवायचं का, हा प्रश्न आहे. सामान्य जनतेच्या बाबतीत पोलिस किती निर्दयी वागतात हे आपल्याला माहीत आहेच. न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास कमी होणं परवडणारं नाही. उद्या हेच पोलिस छोट्या मोठ्या प्रकरणातही खोटे गुन्हे निश्चित करून सर्वसामान्यांचे एन्काऊंटर घडवून आणणार नाहीत हे कशावरून?

हेही वाचाः 

द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

जेएनयूवर हल्ला ही देश ताब्यात घेण्याची तयारी!

आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

मुलामुलींना 'लिव इन रिलेशनशीप'मधे राहावंसं का वाटतं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?