संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

२६ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


संत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे.

वारकरी संप्रदायाचे पहिले संत, आद्य अभंगकार, वारकरी कीर्तनाचे उद्गाते संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म २६ ऑक्टोबर, १२७० चा! 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' म्हणत त्यांनी दक्षिणेकडच्या कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू आणि उत्तरेकडच्या गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाबची यात्रा केली. आंतरभारती एकतेचा पाया रचला. 'आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म' अशी घोषणा करत नवा काळाला साजेल असा आचारधर्म, संप्रदाय स्थापन केला. 

या लोकोत्तर राष्ट्रीय संतांची तिथीप्रमाणे येणारी ७५० वी जयंती योगायोगानं आजच्या संविधान दिवशी म्हणजेच २६ नोव्हेंबर, २०२० ला येतेय. आदर्श मानवी मूल्य जोपासणारा, लोकाभिमुख शासन प्रशासनाची निर्मिती आणि सार्वभौम अशा एकसंध राष्ट्रभावनेचा विकास करणारा महाग्रंथ म्हणजे भारतीय संविधान! राष्ट्रनिर्माणाची तत्त्व आणि जे मूलभूत अधिकार संविधानानं दिले, त्यांचा उद्घोष संत नामदेवांच्या अभंगवाणीत आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात सातशे वर्षांपूर्वीपासूनच पहायला मिळतो, तेव्हा आश्चर्य वाटतं.

संविधानातली अभिव्यक्ती संतांच्या अभंगवाणीत

वैदिक धर्म आणि हेमाद्री पंडिताच्या 'चतुर्वर्गचिंतामणी' सारख्या ग्रंथात एका वर्षात करायला हव्या अशा सुमारे बाराशे व्रतांचं कर्मकांड सांगितलं होतं. सामान्य स्त्री, पुरुषांची केलेली ही कोंडी फोडायचं काम वारकरी संप्रदायाने केलं. 'वेदशास्त्रवचन चुकल्या अवचिता, गोसावी जी होता दंडावया' अशी त्या काळाची परिस्थिती असताना 'नको योग याग, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध, पाठ करा।।' असा सर्वांना सोपा वाटेल असा उपासना मार्ग सांगणारे संत नामदेव होते.

ज्या काळात सगळं अध्यात्म संस्कृत भाषेत होतं, त्याकाळात मराठी या लोकभाषेत आग्रहाने अध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम संत नामदेव, संत ज्ञानदेवांनी केलं. स्वतःचे परंपरेपेक्षा वेगळे असणारे विचार धाडसाने आणि आग्रहानं मांडले. त्याची किंमतही मोजली. संविधानात ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलंय, त्याचा उत्तम अविष्कार आपल्याला नामदेवादी वारकरी संतांच्या अभंगवाणीत दिसतो. 

संविधानाच्या प्रास्ताविकेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, उपासना आणि श्रद्धा यांचं स्वातंत्र्य सांगितलंय. संत नामदेव, ज्ञानदेव, तुकारामांनी त्यांच्या काळात या गोष्टींचा जोरदार पुरस्कार केला होता. 'हिताच्या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःख निरसू तेणे। एकमेका करू सदा सावधान नामी अनुसंधान सुटी नेदूं।।' ही नामदेवांची एकाग्रता होती. 'सर्वांभूती समदृष्टी हेचि भक्ती गोमटी। ' असं त्यांचं सांगणं होतं. 'शुद्ध करी मन, समता धरी ध्यान, तरीच बंधन तुटेल रे।' असा त्यांचा आग्रह होता.

हेही वाचा : सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

स्त्री, पुरुष समता वारकरी विचारात

संविधानातल्या सामाजिक समतेच्या विचाराला साजेसं आचरण संतांनी स्वतः केलं होतं. म्हणूनच शिंपी, सोनार, माळी, कुंभार, महार, कुणबी, ब्राह्मण आणि स्त्रिया यांना वारकरी संप्रदायात 'संधीची समानता' होती. नामदेवांनी दासी असणाऱ्या जनाबाईला मार्गदर्शन करून संत होण्याइतका अधिकार प्राप्त करून दिला होता. देवाशी भांडणारी, देवाला शिव्या देणारी बंडखोर कीर्तनकार जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' म्हणवते.

भक्तीचा दोर गळ्यात टाकून मी पंढरीचा चोर धरला आहे, असं म्हणते. 'हातामधे टाळ, खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी? ' असा प्रश्न विचारत भक्तीच्या मार्गावरून चालते. तेव्हा भारतीय संविधानानं सांगितलेलं स्त्री, पुरुष समानतेचं तत्त्व पंढरपूरात शेकडो वर्षांपूर्वीच रुजलेलं दिसू लागतं. त्यामुळेच आज हजारो स्त्री, पुरुष मोठ्या विश्वासाने वारीतून चालत जाताना दिसतात. 

भेदभावाला विरोध करणारा व्यवहार

संत नामदेवांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चोखामेळाला वारकरी संप्रदायात घेणं, शिष्य म्हणून स्वीकारणं आणि संत म्हणून सर्वांनी त्याला मान्यता देणं, ही अभूतपूर्व घटना होती. 'अस्पृश्यता नष्ट करणं' हे मूलभूत तत्त्व संविधानानं स्वीकारलं. मात्र या तत्त्वाचा वस्तुपाठ संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी घालून दिला. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ।।' म्हणणारे चोखामेळा समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात.

आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडतात. याच चोखोबांचा मंगळवेढा इथं गावकुस बांधताना दरड अंगावर कोसळून मृत्यू होतो. दगडमाती खाली गाडलेल्या अस्पृश्याचा मृतदेह कोण वर काढणार? कोण त्याचे अंत्यसंस्कार करणार? नामदेवांना हे समजतं तेव्हा ते स्वतः तिथं जातात. चोखोबांच्या अस्थी शोधून पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात या संताची समाधी उभी करतात.

एका सुप्रसिद्ध मंदिराच्या दारात अस्पृश्य समजलेल्या संताची समाधी हे क्रांतिकारक पाऊल म्हणावं लागेल. भारतीय संविधान कायद्यासमोर सर्व समान असं सांगते. सर्वांना समान न्याय आणि संरक्षण सांगते. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देते. परंतु असा आदर्श व्यवहार संतांनी त्यांच्या काळात केला होता, याची नोंद घ्यावी लागेल.

नामदेवांचं वर्तन द्रष्ट्या समाजपुरुषाचं

'जाती नाही त्याची कायसी पंगती' असं ज्या काळाचं सामाजिक वास्तव होतं, त्या काळात शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, स्त्रिया यांना आत्मविश्‍वास देण्याचं काम नामदेवांनी केलं. संन्याशाची पोरं म्हणून धर्मसभेनं ज्यांचं ब्राह्मणत्व नाकारलं, चांडाळ म्हटलं, त्या ज्ञानेश्वरादी भावंडांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यांच्या प्रज्ञेला, प्रतिभेला प्रतिष्ठा मिळवून केली. 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।' असे सांगून या ग्रंथाला वारकरी संप्रदायाचा आधारग्रंथ बनवलं. हे नामदेवांचं वर्तन द्रष्ट्या समाजपुरुषाचं होते.

संत नामदेवांना आपण स्वीकारलेल्या कामाचं ऐतिहासिक महत्त्व माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतः अभंगवाणी लिहिली. इतर संतांना लिहायला लावली. त्याचे सामूहिक भजन सुरू केलं. अभंगांचा अर्थ सामान्य भाविकांना नेमकेपणाने कळावा म्हणून वारकरी कीर्तन सुरू केलं. वारकर्‍यांचा आचारधर्म स्पष्ट केला. शुद्ध आचरणाला महत्त्व दिलं. 'परदारा परनिंदा परधन परपीडन। सांडूनी भजन हरीचे करा।।' असं सांगितलं. ही तत्त्व भारतीय संविधानालाही अभिप्रेत आहेत. आजही बहुसंख्य वारकऱ्यांचा आचारधर्म हाच आहे.

हेही वाचा : खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?

डोळस श्रद्धेची मांडणी केली

संत नामदेवांनी सख्यभक्तीचं नवं साधन रूढ केले. परमेश्वराला सखा मानलं. कधी त्याला आईच्या रूपात पाहिलं. त्याच्याशी लटकं भांडण केलं. जवळीक साधली. हे करता करता भक्तीने भगवंताला आपल्याकडे खेचता येतं, हे लोकांच्या मनात बिंबवलं. इतर कर्मकांड, अंधश्रद्धा, भक्तीचा बाजार आणि ते भरवणारे मध्यस्थ भटजी पुरोहित यांनाही नाकारलं. 'ब्रह्म जाणाति स ब्राह्मण:।' असं म्हणून स्वतःचं श्रेष्ठत्व मिरवणाऱ्या, टिळा टोपी घालून सोंग दाखवणाऱ्या, चावळी वटवट करणाऱ्यांना बाजूला केलं.

भारतीय संविधानाने श्रद्धा मान्य केलीय, पण अंधश्रद्धा नाकारली. संत नामदेवांनीही कर्मकांडाला नकार देऊन डोळस श्रद्धेची मांडणी केली. संत नामदेवांनी आपल्या काळात दक्षिण आणि उत्तर भारतात पाच तीर्थयात्रा केल्या. पहिली तीर्थयात्रा संत ज्ञानदेवांच्या आग्रहानं उत्तरेत केली. यानिमित्ताने त्यांच्यात झालेली चर्चा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीच्या उद्धाराचा सुवर्णबिंदू होता. हे संतांची दृष्टी अधिक व्यापक करणारं होतं.

नामदेवांची उत्तर भारतात हजारो मंदिरं

भक्तिमार्गाची सुस्पष्ट मांडणी या काळात झाली. पुढे नामदेवांनी पुन्हापुन्हा भारतभ्रमण करून आपल्या नव्या भक्तिमार्गाचा प्रचार, प्रसार केला. ते दीर्घकाळ पंजाबमधल्या घुमान इथं राहिले. त्यांनी उत्तरेत निर्गुण मताची पायाभरणी केली. पुढे संत नामदेवांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शीख धर्माची स्थापना झाली. आजही पंजाबी माणूस 'बाबा नामदेवजी महाराज' म्हणून नामदेवरायांसमोर नतमस्तक होतो.

'गुरुग्रंथसाहिब' मधे संत नामदेवांची ६१ पदांचा आदरपूर्वक समावेश आहे. संत कबीर, संत नरसी मेहता अशा संतकवींवर नामदेवांचा मोठा प्रभाव आढळतो. पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, जम्मू , गुुजरात अशा सगळ्या उत्तर भारतात संत नामदेव या एकमेव वारकरी संताची हजारो मंदिरं आढळतात. हा त्यांचा राष्ट्रीय पातळीवर पोचलेला प्रभाव म्हणता येईल.

भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीयाला भारतभर मुक्त फिरण्याचं, कुठंही रहायचं, स्थायिक व्हायचं स्वातंत्र्य दिलंय. संतश्रेष्ठ नामदेवांनी मुस्लीम राजवटी सत्तेवर असताना असं स्वातंत्र्य मिळवलं. आपल्या विचार, कृती आणि बोलण्यातून शेकडो वर्ष सर्व भारतीयांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं. त्यांच्या या कामाचा आजच्या संदर्भात विचार होणं काळाची गरज आहे.

हेही वाचा : 

संविधान म्हणजे काय रे भाऊ!

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर