ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी?

१३ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

आरोग्य विमा ही आता महत्वाची गरजच झाली आहे असं म्हणावं लागेल. दिवसेंदिवस वाढणारी महागाई पाहता हात आणि तोंड यांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येतात. त्यात घरात कुणाचं मोठं आजारपण आलं तर आरोग्यसेवांचा, हॉस्पीटल्सचा खर्च परवडत नाही. त्यामुळेच घरातल्या प्रत्येकाचा विमा काढून घेणं फायद्याचं असतं. त्यातही घरातल्या जेष्ठांवर हॉस्पीटल गाठण्याची वेळ सारखी येऊ शकते. अशावेळी तात्काळ ट्रिटमेंट मिळणंही गरजेचं असतं. तेव्हा जेष्ठांसाठीच्या आरोग्य विम्याचा विशेष विचार केला पाहिजे. 

घरातील ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना काही गोष्टींचं आकलन करणं गरजेचं आहे. या माध्यमातून आपल्याला अचूक पॉलिसी घेणं सोपं जाईल. आयुष्यभर कुटुंबासाठी झिजल्यानंतर निवृत्तीनंतरचे क्षण निवांत, आनंदात आणि समाधानात जावेत, असं प्रत्येक ज्येष्ठाला वाटत असतं. यासाठी ते प्रयत्नशीलही असतात. निवृत्तीनंतरचं जीवन सुखदायक जाण्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवतात. यानुसार देश-परदेशातल्या पर्यटन, लग्न-समारंभ, घर खरेदी, मोटार खरेदी तसंच औषधोपचार या गोष्टींचा विचार केला जातो.

इथं उपचाराचा विचार केल्यास आजारपणावरून आपल्यावर कोणताही आर्थिक ताण येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आरोग्य विम्याच्या माध्यमातून या गोष्टींचा निपटारा होऊ शकतो. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा घेताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. कंपन्यांच्या भूलथापांना बळी न पडता, अचूक पॉलिसीची निवड करताना आपलं कौशल्य पणाला लागतं. 

आरोग्य चांगलं असलं तरी विमा पाहिजेच

तरुणपणाच्या काळात बहुतांश मंडळी आरोग्य विम्याकडे लक्ष देत नाहीत. कारण संस्थेकडून किंवा कंपनीकडून आरोग्य विम्याची सुविधा दिली जाते. मात्र निवृत्तीनंतर हेल्थ इन्शुरन्सचं कवच संपुष्टात येतं. अशा वेळी विम्याची खरी गरज भासते. म्हणूनच इर्डा संस्थेनं विमा कंपन्यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत आरोग्य विमा काढण्याची मुभा द्यावी, अशी सूचना दिलीय.

या आदेशानुसार जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकास आरोग्य विमा देण्यास नकार दिला जात असेल, तर त्याला नकाराचं कारण लिखित स्वरूपात द्यावं लागणार आहे. याशिवाय कोणतीही विमा कंपनी वय जास्त आहे असल्या कारणावरून विमा देण्यास नकार देऊ शकत नाही. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या टीपीएसमधे बदल करण्याची मुभा दिली आहे.

हेही वाचा : अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?

आरोग्य विमाच्या पाच टिप्स

आरोग्य विमा उद्योगात प्रत्येक विमा कंपन्यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी पॉलिसी सारखीच असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा पॉलिसी करताना पाच गोष्टींवर लक्ष देणे गरजेचं आहे –

१) विमा कवच : आपण जेवढं अधिक कवच घ्याल, त्याप्रमाणात विमाधारकांचा फायदा होईल. अर्थात त्याचा थेट संबंध हा विमा हप्त्याशी असतो. काही कंपन्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किंवा भरती होण्यापूर्वी खर्चाव्यतिरिक्‍त आणखी काही सुविधाही प्रदान करतात. या कंपन्या कन्झ्यूमेबल अलाऊन्स, अलाऊन्स फॉर कम्पेनियन, डोमिसिलीयरी हॉस्पिटलायजेशन, डायलिसीसलादेखील कवच देतात. त्यामुळे अधिकाधिक कवच कसे मिळेल, याचा विचार करायला हवा. 

२) पूरक विमा : काही पॉलिसीत आपल्याला मूळ एसआयच्या शंभर टक्के निधीपर्यंतच्या विमा रक्कमेला रिचार्ज करण्याचा पर्याय मिळतो. काही कंपन्या आपल्याला एक ते तीन वर्षांच्या काळासाठी पॉलिसी देतात. मात्र आपल्याला परवडणारी आणि पूरक ठरणारी विमा योजना निवडावी.

ज्येष्ठांसाठीच्या काही पॉलिसीत पेमेंटबाबत काही नियम असतात. दाव्यातली काही रक्कम पॉलिसीधारकाला भरण्यास सांगितलं जातं. इर्डाच्या मते, प्रि-इन्शुरन्स मेडिकल तपासणीच्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम ही ज्येष्ठ नागरिकांना परत दिली जाते. हे सर्व तपासून चांगली डिल करणार्‍या पॉलिसीची निवड करावी.  

३) नूतनीकरणासाठी कमाल वय : प्रत्येक कंपनीचे नियम वेगळे असतात. मात्र काही कंपन्या लाईफ लाँग रिन्यूअलचा पर्यायदेखील देतात. त्यामुळेच पॉलिसी घेताना तो पर्याय निवडावा. 

४) पूर्वीचे आजारपण किंवा वेटिंग पिरीयड : अनेक कंपन्या सध्याच्या आजारपणासाठी एक वेटिंग पिरीयड निश्‍चित करतात. या कालावधीत त्या आजारपणाला कवच दिलं जात नाही. त्यासाठी जेवढं कमी वेटिंग पिरीयड असेल, तेवढं चांगलं असतं. जर आपल्याला पूर्वीपासूनच एखादा आजार असेल, तर पॉलिसीच्या वेटिंग पिरीयडनंतरच त्याला कवच दिलं जाईल.

५) दाव्याची प्रक्रिया : कोणत्याही वयात दाव्याची प्रक्रिया ही सुलभ आणि सुटसुटीत असणं गरजेचं आहे. पॉलिसी काढण्यापूर्वी दाव्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. परिणामी दाव्यासाठी अधिक वेळ जाणार नाही किंवा वारंवार त्याचा फॉलोअप घेण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा : 

एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?

सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?

((हा लेख दैनिक पुढारीच्या ९ डिसेंबरच्या अंकात पुर्वप्रकाशित झाला आहे))