अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

०५ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला.

हेडिंग वाचून डोकं चक्रावलं असेल ना. पण, हे खरंय. वनडे क्रिकेट आणि त्यातूनच जन्माला आलेल्या टी २० क्रिकेटमुळं टेस्ट मॅच अनपॉप्युलर झाली. त्याच वनडे क्रिकेटचा जन्म टेस्ट मॅचमधल्या  सलग तीन दिवस चाललेल्या पावसाच्या खेळामुळे हतबलतेतून झालाय. या वनडे क्रिकेटनं आज पन्नाशी गाठली. १९७१ मधे याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली होती. पण या मॅचची कहाणी काही वेगळीच आहे.

मुळात ही टेस्ट मॅच होती. मॅचच्या आधी पहिले तीन दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. अशा परिस्थितीत अंपायर मॅच रद्द करतात पण, त्यांनी मॅच रद्द न करता प्रत्येकी ४० ओवरची मॅच खेळवली. याचीच नोंद नंतर इतिहासातला पहिली वनडे मॅच म्हणून झाली. यात इंग्लंडनं ३९.४ ओवरमधे सर्वबाद १९० धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या बदल्यात ३४.६ ओवरमधे पूर्ण केलं होतं.

भारतीयांनी दिला वनडेला जन्म

पहिला आंतरराष्ट्रीय सामना अपघातानं जन्मला. तरी यापूर्वीही जगभरात वनडे मॅच अगदी मर्यादित ओवरचे होत्या. क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमधे झाला त्यामुळे इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता आहे. असं असलं तरी या क्रिकेटमधे सध्या तगडा प्रतिसाद मिळणारा, क्रिकेटचं अर्थकारण एकहाती सांभाळणारा मर्यादित ओवरच्या क्रिकेटचा खरा बाप भारतच आहे.

१९५१ मधे केरळमधल्या त्रिप्पुनितुरामधे पहिल्यांदा वनडे सिरीज झाली होती. ही सिरीज ऑल इंडिया पूजा क्रिकेट स्पर्धेच्या नावाने ओळखली जात होती. वनडेची संकल्पना के.वी. केलाप्पन थाम्पूरान या मुलाच्या डोक्यातून आली. पुढे हा मुलगा केरळकडून क्रिकेट खेळला. याचबरोबर केरळ क्रिकेट असोसिएशनचा पहिला सेक्रेटरीही झाला. भारतात वनडे क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर इंग्लंडमधेही काऊंटी क्रिकेटमधे १९६१ ला वनडे क्रिकेट सुरु झालं. त्यानंतर त्याचा विस्तार ऑस्ट्रेलियातही झाला.

खेळाडूंना प्रोफेशनल बनवणारा 'बंडखोर' केरी पॅकर

सध्या क्रिकेट खेळाडूंची नावं फोर्ब्ज सारख्या नामांकित मॅगजीनच्या यादीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेताहेत. पण, क्रिकेटमधली श्रीमंती आणली ती ऑस्ट्रेलियाचे माध्यम सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरी पॅकर यांनी. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाबरोबर प्रसारण हक्कांबाबत त्यांचा वाद निर्माण झाला. त्यानंतर १९७७ मधे त्यांनी आपली स्वतःची वर्ल्ड क्रिकेट सिरीज सुरु केली. त्यांच्या या सिरीजमधे सध्याच्या वनडे क्रिकेटची आणि कल्चरची झलक होती.

रंगीत कपडे, फ्लड लाईट, डे नाईट सामने, लाईव्ह टेलिकास्ट आणि मल्टीपल कॅमेरा शुटिंग असं सगळं त्यांनी या वर्ल्ड सिरीजमधे पहिल्यांदा वापरलं होतं. आजच्या वनडेचा तो एक अविभाज्य भाग बनलाय. पॅकर यांनी या सिरीजमधे अशी एक पद्धत रुढ केली ज्यामुळे जागतिक क्रिकेटचं रुप बदललं. त्यांनी पगारी खेळाडू ही संकल्पना जगासमोर मांडली त्यामुळेच आता फोर्ब्जमधे अव्वल स्थान भुषवणाऱ्या खेळाडूंनी पॅकर यांचे आभार मानले पाहिजेत.

पॅकर यांनीच क्रिकेटमधे व्यावसायिकता आणली. नाहीतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही पोटासाठी नोकरी करणं भाग पडलं असतं. पॅकर यांनी ऑस्ट्रॅलिया क्रिकेट बोर्डाबरोबरच्या एका मिटिंगमधे एक वाक्य उच्चारल्याचं काही सुत्रांनी त्याकाळी सांगितलं होतं. ते वाक्य होतं 'आपल्या सगळ्यांमधे काही प्रमाणात एक वेश्या असतेच, जंटलमन तुमची किंमत काय आहे?'

पॅकर प्रमाणेच भारतातही बीसीसीआयबरोबर प्रसार माध्यम समुहाचा संघर्ष झाला होता. त्या समुहानेही एक क्रिकेट लीग सुरु केली आणि भारतातले दिग्गज खेळाडू आपल्याकडे वळवले पण, हा प्रयत्न फसला कारण लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला नाही.

हेही वाचा: ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

वनडेनं केला टेस्ट क्रिकेटचा गेम 

बंडखोर पॅकर यांनी ऑस्ट्रेलियात सुरु केलेल्या या लीगचा प्रभाव जगभर पसरु लागला. जसजसं वनडे क्रिकेट मोठं होत गेलं तसतसं ओवरची संख्याही कमी होत गेली. पहिल्यांदा ६० ओवरच्या मॅचेस हळूहळू ५० ओवरवर आल्या. पण, या वनडे क्रिकेटमुळे टेस्ट मॅचची स्टँड रिकामी करण्यास सुरवात केली. लोकांचा पाच दिवस चालणारी स्पर्धा पाहण्यातला रस संपत गेला. त्यांना एका दिवसात निकाल लागणं भावू लागलं.

वनडेतला रंगीतपणा, रोमांच यामुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांची पाठ फिरली. त्यांना आता टेस्ट रटाळ वाटू लागली. त्यामुळे वनडेनं टेस्ट क्रिकेटचा गेम केला असंच म्हणावं लागेल. आता टेस्ट क्रिकेट वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रेक्षकांना टेस्ट मॅचकडे  आकर्षित करण्यासाठी प्रेक्षकांच्या सवडीनुसार यात बदल करण्यात येत आहेत.

टेस्ट मॅचला आता रंगीत आणि फ्लड लाईटच्या प्रकाशात उजळून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून पिंक बॉल आणि दिवस रात्रीच्या टेस्ट मॅचचे प्रयोग होत आहेत.

क्रिकेटचा मूळ आत्मा मारण्याचा प्रयत्न?

वनडेमुळे टेस्ट क्रिकेटची प्रसिद्धी कमी झाली. त्याचप्रमाणे टी २० आणि आता १०० बॉल क्रिकेटमुळे वनडेवरही बालट आलं अशी शंका उपस्थित होतेय. टी २० चा झटपटपणा आणि घडी घडीचा रोमांच वनडेला रटाळ ठरवण्याच्या मार्गावर आहे. टेस्टमधे आता एक दिवस कमी करुन तो ४ दिवसांचा करण्याचे प्रस्ताव पुढे येत आहेत. तसंच वनडेच्या ओवरही कमी करण्याचाही प्रस्ताव येईल यात शंका नाही.

फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावून जर आपण क्रिकेटचा मूळ आत्माच मारु लागलो तर हे त्या खेळासाठी घातक आहे. कारण एका क्रिकेटपटूला परिपूर्ण करते ते टेस्ट क्रिकेट. आणि टेस्ट क्रिकेट खेळायचं तर तुमच्याकडे तंत्रशुद्ध बॅटींग, स्विंग, स्पिन करता येणारी बॉलिंग अशी खास गुणवत्ता असायला हवी. ती जर चौकार आणि षटकारांच्या मागणीमुळे मरत असेल कर खरा क्रिकेटरही मरत आहे असं समजावं.

हेही वाचा: 

भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते