आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव

०२ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


यंदा २ फेब्रुवारीला संत तुकारामांचा जन्मोत्सव देहूमध्ये पहिल्यांदाच तारखेनुसार साजरा होणार आहे. मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेने त्याच्यासाठी तयारी केलीय. त्यामुळे समाजाला घडवणारे महापुरूष म्हणून संतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो.

जयंती देवाची करायची आणि पुण्यतिथी संतांची, अशी परंपरा महाराष्ट्रात सर्वत्र आहे. पण काळानुसार रूढीपरंपरा बदलायच्या असतात. तशीच ही परंपराही बदलण्याचा निर्धार वाशिम इथे गेल्या ६ जानेवारीला झालेल्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेत झाला.

गेल्या वीस वर्षांपासून तयारी

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद ही मराठा सेवा संघाचा एक विभाग आहे. गेल्या जवळपास वीस वर्षांपासून तिचं काम सुरू आहे. या संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे गाजलं. रामदास महाराज कैकाडी, श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्यासह मान्यवर त्याला उपस्थित होते. त्यात परिषदेतर्फे देहू इथे संत तुकारामांचा जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी घोषित केला.

या निर्णयाच्या प्रक्रियेविषयी सांगताना वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर महाराज कुरुंदकर म्हणाले, `यंदाच्या अधिवेशनाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलताना मी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्मदिन २ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरा करण्याचं आवाहन केलं. ते आवाहन करताना प्रत्येकाने आपापल्या गावात जन्मदिन साजरा करण्याची कल्पना होती. पण पुरुषोत्तम खेडेकर यांनी ती कल्पना उचलून धरली. प्रत्येकाने वेगवेगळी जयंती साजरी करण्याऐवजी देहू इथे संत तुकारामांचा एकत्रित जन्मोत्सव साजरा करुया, असं सांगत त्याला व्यापक स्वरूप दिलं. त्यावर टाळ्यांचा गजर झाला आणि वारकऱ्यांची संमतीच मिळाली.`

संतांची जयंती साजरी करण्यामागची भूमिका

गंगाधर महाराज कुरुंदकर हे कीर्तनकार असून छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीतमय चरित्र सादर करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय ते शेती या विषयावरही संतांच्या विचारांच्या आधारे कीर्तनातून मार्गदर्शन करतात.

संतांची जयंती साजरी करण्याच्या विषयी गंगाधर महाराज कुरुंदकर सांगतात,`संतांची पुण्यतिथी साजरी करण्याची प्रथा कोणी पाडलीय, ते तपासायला हवं. संतांच्या निर्वाणाचा दुःखद क्षण आम्ही का साजरा करायचा, असा आमचा प्रश्न आहे. पुरोहितशाहीच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सर्व संतांच्या निर्वाणाच्या घटना या आकस्मिक आणि संशयात्मक आहेत. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जीवघेणे प्रसंग अनेक आहेत. अशावेळेस त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांनी संतांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणं स्वाभाविक आहे. त्यांनी तोच आनंद साजरा करण्याचं संतांच्या अनुयायांनाही शिकवलं. आता शिक्षणाच्या वाघिणीचं दूध पिऊन आम्ही जागृत होऊ लागलोत. त्यानुसार आम्ही वारकरी जन्मोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहोत.`

संतांचे मृत्यू संशयास्पद

कुरुंदकर महाराज सांगतात तसं बहुसंख्य संतांच्या मृत्यूचं स्वरूप सामान्य नाही. तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन झाल्याची कथा आहे. तो खूनच असावा, असे दावे अनेक अभ्यासकांनी केलेत. संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांनी जिवंतपणी समाधी स्वीकारली. संत चोखामेळा यांचं निधन भिंतीवरून पडून अपघाती झालं. संत नामदेव यांनी आपल्या मोठ्या कुटुंबासह चंद्रभागेत स्वतःला झोकून दिलं. संत सावता माळी यांचं निधन वयाच्या चाळीशीत तापामुळे झालं. संत जनाबाईंना सुळीवर देण्याचा प्रसंग घडला होता. वारकऱ्यांसारखेच धर्मसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या लिंगायत आणि महानुभाव संतांचे शेवटही असेच संशय निर्माण करणारे आहेत.

संतांची जयंती साजरी न होता पुण्यतिथीच होते, ही परंपरा रूढ करण्यामागचं कारण पुरुषोत्तम खेडेकर सांगतात. ते असं, 'पुण्यतिथीच्या निमित्ताने संतांनी समाधी कशी घेतली याचं कौतूक सांगत केवळ चमत्कारांचीच चर्चा केली जाते. तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन जाणारं विमान कसं आलं. तुकाराम बीज साजरा करताना झाड कसं हलतं, अशाच गोष्टींवर बोलताना संतांचा विचार आणि कामगिरी बाजुलाच राहते.'

संतांच्या गावीच जन्मदिन साजरा व्हावा

संतांच्या जयंती आणि पुण्यतिथींचे कार्यक्रम प्रामुख्याने पंढरपुरातच होतात. त्याऐवजी सर्व संतांचे जन्मदिन त्यांच्या त्यांच्या गावी व्हावेत, यासाठी मराठा सेवासंघाने प्रयत्न सुरू केले आहेत. पहिला प्रयत्न हा संत नामदेवांच्या जन्मगावी म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी १९९२च्या आसपास झाला. पण तो दीर्घकाळ सुरू राहिला नाही. मात्र संत चोखामेळा यांचा जन्मदिनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहुणा राजा या त्यांच्या गावी दरवर्षी १४ जानेवारीला होतो.

संत साहित्याचे अभ्यासक ना. रा. शेंडे यांनी ही जन्मतारिख शोधून काढलीय. आता जिल्हा परिषदेकडूनच त्या दिवशी चोखामेळा महाराजांचा जन्मदिन दरवर्षी साजरा होतो. तसेच सर्व संतांचे जन्मदिन हळूहळू राज्यभर साजरे करायची तयारी मराठी सेवा संघाने वारकरी परिषदेच्या मार्फत चालवलीय.

तुकोबारायांच्या जयंतीचा वाद

संतांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी पुरुषोत्तम खेडेकर सांगतात, `शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती साजऱ्या होताना त्यांच्या कार्याला आणि विचारांना महत्त्व असतं. त्याचप्रकारे संत हे ज्ञानवंत समाजासाठी संघर्ष करणारे महापुरुषच होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीला त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जायला हवे. तो मार्ग आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.`

२ फेब्रुवारी १६०८ ही संत तुकारामांची जन्मतारीख सर्वच अभ्यासकांनी मान्य केली. त्याविषयी जास्त वाद नाहीत. ती मान्य नसणारे फारच कमी अभ्यासक आहेत. मात्र पारपंरिक वारकरी मात्र वसंत पंचमी या तिथीलाच तुकाराम महाराजांची जयंती साजरी करतात. सोलापूर आणि मराठवाड्यात नाथमहाराज सोलापूरकर या कीर्तनकारांनी गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात २ फेब्रुवारीला तुकोबारायांची जयंती साजरी करण्याची प्रथा घालून दिलीय.

संत तुकाराम वारकरी परिषदेचा पुढाकार

वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असणारे देहूकर फडाचे प्रमुख बापूसाहेब मोरे – देहूकर यांनी चित्रलेखाशी बोलताना संत नामदेव तुकाराम परिषदेच्या तारखेनुसार तुकाराम जन्मोत्सव साजरा करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय.

ते म्हणाले, ` देहूत मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षी तुकाराम महाराजांचा जन्मदिन माघ शुद्ध पंचमीला साजरा होतो. इतरही कुणी जर तुकाराम महाराजांचा जन्मदिन साजरा करणार असेल, तर त्यांचं स्वागत आहे. भले तो तारखेनुसार असला तरी हरकत नाही. त्यानिमित्ताने तुकोबारायांच्या विचारांचं स्मरण होतं. असे कार्यक्रम भक्तीची प्रेरणा देतात. जयंती केली नाही, पुण्यतिथी केली नाही, तर नव्या पिढ्यांना संत कळणारच कसे?`

दरवर्षी १२ जानेवारीला सिंदखेड राजा इथे भव्य स्वरूपात जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याची सुरवात मराठा सेवा संघानेच केली. आता त्याला राज्यव्यापी सोहळ्याचं रूप आलंय. त्याचप्रमाणे देहू इथल्या संत तुकाराम जन्मोत्सवही रूढ करण्याची तयारी मराठा सेवा संघाची दिसतेय. शिवाय सिंदखेड राजा येथेच वारकरी कीर्तन शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. त्यामुळे या दोन परंपरा मातृतीर्थावर पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतील.

 

(साप्ताहिक चित्रलेखातून साभार)