२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

३० डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे.

कधीकाळी स्टेट्स सिम्बॉल असणारा सेलफोन म्हणजेच मोबाईल आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन बसलाय. म्हणूनच अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांच्या यादीत स्मार्टफोन आणि त्या जोडीला इंटरनेट या दोन गोष्टींचा देखील समावेश केला जाऊ लागलाय. कधीकाळी गमतीत बोलली जाणारी ही गोष्ट आपलं आजचं वास्तव बनलीय, एवढं मोबाईल आणि इंटरनेटवरचं आपलं अवलंबित्व वाढलंय.

दैनंदिन जीवनातली कुठलीही गोष्ट असू दे. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा प्रवासाचं तिकीट बुकिंग किंवा अशा अनेक गोष्टींची यादी संपता संपणार नाही. स्मार्टफोन नावाचा जीन आपल्या सेवेत सतत हजर असतोच. सरतं दशक म्हणजे जवळपास २०१० ते २०१९ चा काळ हा मानवी जीवनातल्या या महत्वपूर्ण टप्प्याचा साक्षीदार राहिलंय. याचाच परिणाम असा की भारत  आज अमेरिकेनंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. 

हेही वाचा : ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

महिन्या महिन्याला मोबाईल बदलत होता

२१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या सुरवातीला म्हणजे २०११ च्या आसपास भारतात स्मार्ट फोनचं नुकतंच आगमन झालं होतं. नोकिया आणि मोटोरोला या दोनच कंपन्यांची या क्षेत्रात दादागिरी होती. पण पुढं जसजसा काळ लोटत गेला तसतशा अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरत गेल्या. भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेतल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झाली.

या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्यांनी आपापल्या स्मार्टफोन प्रॉडक्टवर अनेक प्रयोग केले. त्यामुळेच वर्षच काय तर महिन्या महिन्याला आपल्या हातातला फोन बदलत गेला. हे बदलणं फक्त फोनच्या बाह्य रुपाच्या बदलण्यापुरतं मर्यादित नव्हतं. तर तंत्रज्ञानात होणारे वेगवेगळे बदल आपल्या फोनमधे प्रतिबिंबित होत होते. आपल्या बोटांच्या एका क्लिकवर आपण ते बदल एन्जॉय करू शकत होतो. फ्लिप फोन, स्लायडर फोनपासून क्वार्टी कीपॅड, टच स्क्रिन फोन आला. आता तर ज्याची फक्त चर्चाच होत होती तो फोल्ड फोन म्हणजेच घडी पडणाऱ्या फोन आपल्या हातात आलाय. हुवेई, झावोमी आणि मोटोसारख्या इतरही बड्या कंपन्या हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात.

स्मार्ट फोन वापरायचा म्हणजे इंटरनेटशिवाय मजा नाही. स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा वापर जितका जास्त तितकीच त्यासाठी लागणारी बॅटरी अधिक. हीच गोष्ट लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी तगड्या बॅटरीचे फोन डेवलप करण्यावर भर दिला. सॅमसंगने एमएस ३० एस च्या रुपात त्यांचा ६००० एमएएच क्षमता असणाऱ्या बॅटरीचा फोन मार्केटमधे सादर केला.  त्याला तितकाच चांगला प्रतिसादही मिळाला.

फक्त तगडी बॅटरीच नाही, तर फोन चार्जिंगसाठी फास्ट चार्जर हा देखील या वर्षातला लोकप्रिय ट्रेंड राहिला. त्यातूनच अगदी १० वॅट पासून ते अगदी ६५ वॅटपर्यंतच्या गतीने चार्जिंगची क्षमता असणारे फोन बाजारात उपलब्ध झाले. एवढंच काय तर झायोमीने तर पुढच्या वर्षात १०० वॅट टर्बो फास्ट चार्जिंगच्या तंत्राची घोषणा केलीय.

आता बातम्यांचं शूटिंगही मोबाईलवरच

सुरवातीच्या काळात कॅमेरा फोनचं मोठं आकर्षण होतं. आपण जिथं कुठं आहोत, तो क्षण कॅमेऱ्यात कैद करणं आणि लगेच तो फोटो स्क्रिनवर बघणं हेच मुळात आपल्या सगळ्यांना प्रचंड सुखावणारं होतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल या कॅमेऱ्यावरसुद्धा अनेक प्रयोग झाले. फ्रंट कॅमेरा असणारे फोन बाजारात आले. आणि याच फोननी आपल्याला ‘सेल्फी’ नामक शब्द दिला.

चार-चार कॅमेऱ्याचे फोन आज ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या चारही कॅमेरांची गुणवत्तादेखील तितकीच चांगली असते. या स्मार्टफोनला ४८ मेगा पिक्सलच्या फोनपासून ते १०८ मेगा पिक्सलच्या फोनपर्यंत उडी घेताना आपण बघितलंय. याचाच परिणाम असा की केवळ हौशीच नाही, तर अनेक व्यावसायिक फोटोग्राफरसुद्धा फोटो काढण्यासाठी या फोनचाच उपयोग करताहेत. ‘एनडीटीवी’सारखं न्यूज चॅनेल तर अनेक बातम्यांचं शुटिंगदेखील मोबाईलवरच करतंय.

कॅमेऱ्यानंतर जर कुठल्या गोष्टीने आपल्या फोनचा चेहरामोहरा बदलला असेल तर ते म्हणजे अँड्रॉईड अॅप्स. ऑनलाईन शॉपिंग असो, बँकिंग व्यवहार असोत किंवा अगदी कुठलंही लहान मोठं काम असू दे. त्यासाठी एखादं तरी अँड्रॉईड अॅप उपलब्ध असतंच. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार नोकरीच्या मुलाखतींसाठीसुद्धा आता एक अॅप डेवलप करण्यात आलंय.

हेही वाचा : म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?

आता ‘फाईव जी’ चं दशक!

आपला मोबाईल आता फक्त मोबाईल राहिलेला नाही. तो आपल्यासाठी टीवी झालाय, अनेक गोष्टी शिकवणारा शिक्षक झालाय, नोकरी मिळवून देणारा रिक्रूटर झालाय. अशी बरीच काम मोबाइल आपल्यासाठी करु लागलाय.
 
गेल्या दशकभरात ओटीटी सर्विसची क्रांती आपण अनुभवली. नेटफ्लिक्स, एमेझोन प्राईम यासारख्या असंख्य सर्विसेसनी याच काळात आपल्या मोबाईलचा ताबा घेतला आणि मनोरंजनासाठी टीवीवर अवलंबून असणारे आपण कधी नेटफ्लिक्स, एमेझोन प्राईमकडे वळलो ते आपल्या लक्षातही आलं नाही. जिओच्या उदयानंतर आलेल्या स्वस्त इंटरनेटच्या काळात या सगळ्या सर्विसेसनी आपले पाय व्यवस्थितरित्या रोवले. त्याअर्थाने किमान भारतात तरी जिओने आपला मोबाईल वापराचा अनुभव कायमस्वरूपी बदलून टाकला. जिओचं अर्थकारण, त्याचा इतर टेलिफोन कंपन्यांच्या अर्थकारणावर झालेला परिणाम या वेगळ्या गोष्टी आहेत.

‘वन जी’च्या अॅनालॉग फोनपासून ते आता आपण ‘फाईव जी’च्या दारात उभे आहोत. ‘फाईव जी’च्या आगमनाने आपलं सगळं जीवनच आमुलाग्रपणे बदलेल. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकं ते गतिमान होईल. जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांत सर्वात आधी ‘फाईव जी’ सेवा सुरु होणं अपेक्षित आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अमेरिका आणि युरोपातल्या देशात ‘फाईव जी’ चालू होईल अशी अपेक्षा होती. अर्थात भारतात ‘फाईव जी’ सेवा सुरू होऊन ती सक्रिय व्हायला अजून बराच कालावधी लागणार असला तरी येणारं दशक हे ‘फाईव जी’चं असणार आहे, एवढं नक्की!

हेही वाचा :

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा