प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय.
प्यारे खान. आई-वडील, तीन भाऊ आणि बहीण असं त्यांचं कुटुंब. नागपूरमधल्या ताजबागच्या झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. घरची परिस्थिती फार हलाखीची होती. दहावीत नापास झाले. पुढचं शिक्षण घेतील इतकी घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. पेट्रोल पंप टाकण्यासाठी म्हणून त्यांना दहावी पास होणं गरजेचं होतं. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा दहावीची परीक्षा दिली.
घर आणि पोटापाण्यासाठी म्हणून त्यांनी ऐन तारुण्यात मिळेल ते काम केलं. ६ वर्ष रिक्षा चालवली. नागपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर संत्री विकली. गाड्या धुण्याचं काम केलं. ते करताना मोठा व्यावसायिक व्हायचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी झटून मेहनत घेतली. आज देशातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. पण हा प्रवास साधासोपा नक्कीच नाहीय.
कोरोनाच्या सध्याच्या संकटात 'ऑक्सिजन दूत' म्हणून सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. जातीपातीची सगळी बंधनं झुगारून या संकट काळात ते विदर्भात ऑक्सिजनची व्यवस्था करतायत. एकवेळचं जेवण नसेल तर आपण जगू पण आपला श्वास नसेल तर काय? असा प्रश्न ते विचारतायत. त्यामुळेच या संकटातून प्रत्येकाला वाचवण्यासाठी भारतीय होण्याचं कर्तव्य पार पाडायचं आवाहन त्यांनी केलंय.
हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी
वर्ष होतं २००४. काहीतरी मोठं करायचं स्वप्न प्यारे खान यांना खुणावत होतं. त्यासाठी पैशांची गरज होती. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. बँकेकडून कर्ज घेणं हा एकच पर्याय त्यांच्याकडे होता. त्यासाठी प्यारे खान वणवण भटकले. बँकांमधे पायपीट सुरू झाली. अर्ज, विनंत्या झाल्या. पण बँकांनी कर्ज नाकारलं. हा नकार काही काळ चालूच राहिला.
व्यवसाय उभा करायचा तर ११ लाख रुपयांची गरज होती. अशातच नागपूरच्या आयएनजी वैश्य बँकेनं सकारात्मक प्रतिसाद दिला. बँकेचे अधिकारी घरी आले. पण झोपडपट्टीत राहत असल्याचं कारण देत त्यांना कर्जासाठी नकार देण्यात आला. दुसरा कुणी असता तर विषय सोडला असता. पण प्यारे खान यांनी हिंमत सोडली नाही. प्रयत्न करत राहिले.
पुन्हा दोन दिवसांनी त्याच बँकेकडून फोन आला. कर्ज दिलं तर वेळेत परतफेड कराल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. प्यारे खान यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना तशी हमी दिली. बँकेनंही त्यांच्यावर विश्वास टाकला. ११ लाखांचं कर्ज मंजूर करण्यात आलं. प्यारे खान यांचा प्रवास सुरू झाला. महत्वाचं म्हणजे कर्ज मंजूर करणारी त्या बँकेतली भूषण नावाची व्यक्ती आज त्यांचे आर्थिक व्यवहार पाहतेय.
या पैशातून त्यांनी २००४ ला पहिला ट्रक विकत घेतला. त्या ट्रकमुळे रस्त्यावरची वाहतूक सुरू झाली. पण ६ महिन्यांनी अचानक ट्रकचा मोठा अपघात झाला. सगळं काही संपलं होतं. सगळंच उद्ध्वस्त झालं होतं. त्याचवेळी अनेक मित्रांनी त्यांना या व्यवसायातून बाहेर पडायचा सल्लाही देऊन टाकला. तुझ्याकडून आता काही होत नसतं असा नकारात्मक सूर आळवला. पण प्यारे खान डगमगले नाहीत.
जिथं ट्रकचा अपघात झाला तिथून तो उचलून थेट नागपूरला घेऊन आले. ड्रायवरला हॉस्पिटलमधे ऍडमिट केलं. एव्हाना ट्रक सोबत ड्रायवरही ठीकठाक झाला होता. दोघंही रस्त्यावर चालायला सज्ज झाले. हळूहळू अनेक ट्रक त्यांच्या दिमतीला आले. छोटं मोठं कामही त्यांना मिळालं. तसं आर्थिक उत्पन्न वाढू लागलं. त्याचवेळी ट्रक घ्यायचा सिलसिला चालू राहिला. २०१३ पर्यंत हे सगळं चालू होतं.
हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात
त्यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचं काम वाढू लागलं. असंच एकदा भूतानमधलं काम घ्यायला भारतातल्या अनेक बड्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी नकार दिला. कारण त्या सामानाची साडे सतरा फूट उंची होती. भूतानमधे जिथून ते पलीकडे न्यायचं त्या गेटची उंची होती साडे तेरा फूट. गेट तोडून सामान तिथपर्यंत घेऊन जायला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना हे शक्य वाटलं नाही. प्यारे खान यांनी हे आव्हान स्वीकारलं.
हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ २४ तास होते. त्यांनी डोकं लावलं. प्यारे खान स्वतः भूतानला गेले. ज्या गेटवरून सामना पुढे पाठवायचं ती जमीन चार फूट खोल खोदण्यात आली. सामान पलीकडे म्हणजेच भूतान सरकारकडे पोचतं करण्यात आलं. भूतान सरकारचा हा खूप मोठा प्रोजेक्ट होता.
प्यारे खान यांनी हे आव्हान पूर्ण केल्यामुळे एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यांच्या कंपनीनं मागे वळून पाहिलं नाही. भूतानसोबत नेपाळ, बांगलादेश, दुबई सगळीकडे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीने काम केलं. आजच्या घडीला आपल्याकडे २५० ट्रक असल्याचं 'जोश टॉक्स' या शोमधे त्यांनी सांगितलंय.
सध्या प्यारे खान 'अस्मी रोड ट्रान्सपोर्ट' या नावाने कंपनी चालवतायत. आज त्यांच्याकडे १२०० लोक काम करतायत. असं एका इंटरव्यूमधे त्यांनी म्हटलंय. २००१ मधे रिक्षा चालवून आपल्या दोन वेळच्या पोटाची खळगी भरणारा हा माणूस आज ६०० कोटींचा मालक आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या होत नसतील तर आपण हार मानतो. सगळं काही सोडून देतो. पण प्यारे खान हरले नाहीत.
त्यांचं आयुष्य खाचखळग्यांनी भरलंय. पण दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्दीच्या बळावर त्यांनी यश आपलंसं केलं. या काळात त्यांना अनेकांच्या नकारघंटा ऐकाव्या लागल्या. कसं होईल, यश कसं मिळेल अशा अनेक नकारात्मक शेड्स उभ्या केल्या गेल्या. पण या नकारघंटेला त्यांनी स्वतः नकार दिला. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं. यातच त्यांच्या यशाची गुपितं दडलीत.
'जोश टॉक्स' या शोमधे प्यारे खान म्हणतात, 'मी यश मिळेल की नाही याचा कधी विचारच केला नाही. कायम कामाबद्दल विचार करत राहिलो. कोणताही व्यवसाय छोटा नाही आणि धंद्यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. भलेही छोट्यातला छोटा व्यवसाय असेल पण त्यात काहीना काही चांगलं करायचा प्रयत्न करायला हवा.'
हेही वाचा: जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशभर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पेशंटचे नातेवाईक वणवण भटकत होते. देशातल्या अनेक शहरांमधे आजही ही स्थिती कायम आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. नागपूर शहरात ऑक्सिजनअभावी लोकांचे मृत्यू होत होते. हे हाल बघून प्यारे खान पुढं आले. आपली बाकीची सगळी कामं सोडून त्यांनी ऑक्सिजनची व्यवस्था करायचं ठरवलं. मुस्लिम धर्मात रमजान काळात जकात म्हणजेच दानाला फार महत्व आहे. त्यामुळे ही 'ऑक्सिजन जकात' असल्याचं ते म्हणतात.
ऑक्सिजनचा टँकर केवळ सरकारला मागवता येतो. खासगी व्यक्तीला तो घ्यायचा तर त्यासाठी कोटा ठरलेला असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कोरोना काळात व्यावसायिकांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. प्यारे खान यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नितीन गडकरी आणि नागपूर प्रशासनाची टँकरसाठी मदत झाल्याचं त्यांनी आवर्जून म्हटलंय. आतापर्यंत त्यांनी ८६० ऑक्सिजन सिलेंडर दान केलेत. यातले ५०० सिलेंडर हॉस्पिटलना तर बाकी गरजू लोकांना देण्यात आलेत.
नागपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या सरकारी हॉस्पिटलमधे त्यांनी आतापर्यंत ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पोचवलाय. प्रत्येक टँकरसाठी त्यांनी तिपटीने किंमत दिलीय. तर ऑक्सिजनसाठी ८५ लाख इतकी रक्कम खर्च केलीय. केवळ नागपूरपुरतं त्यांचं काम मर्यादित राहिलं नाही. पूर्ण विदर्भात ते पोचले. त्यांच्यामुळेच लोकांचे जीव वाचू शकले. मागच्या वर्षीच्या कोरोनाच्या संकटातही त्यांनी गरिबांसाठी, ड्रायवर्सना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती.
लल्लनटॉप या साईटला दिलेल्या इंटरव्यूमधे त्यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यावर भाष्य करताना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्यात. जिकडे ऑक्सिजनची गरज नाहीय अशाच ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात जात असल्याचं प्यारे खान यांचं म्हणणं आहे. देशातल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढे यायला हवं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न करायची विनंती त्यांनी केलीय.
देशात ऑक्सिजनचा साठा आहे. फक्त त्याचं नीट व्यवस्थापन व्हायला हवं. असं ते म्हणतायत. वाहतूक आणि संवाद या दोन्हींची कमतरता त्यांना जाणवतेय. जिथं ५ हजार लिटर लिक्विड हवंय तिथं ते १० हजार लिटर पोचतंय. टँकर्सवाल्यांना कोणत्या राज्यात किती मृत्यू होतायत याच्याशी काहीच देणंघेणं नाहीय. त्यांना पैश्याशी देणं आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना सरकारनं बोलावून त्यांच्याशी चर्चा करायला हवी असं प्यारे खान यांचं म्हणणं आहे.
'गरज नसताना ऑक्सिजनचे टँकर्स मागवले जातायत. लिक्विडची गरज कितीय हेसुद्धा ओळखायला हवं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना एकत्र बसवा. गरज असेल तर त्यांच्या गाड्या जप्त करा. हे देशाच्या हिताचं आहे. पैसा कमवायची ही वेळ नाहीय. ऑक्सिजन मॅनेज करता येऊ शकतं फक्त गरज नसताना जे ऑक्सिजनचे टँकर मागवले जातायत त्यावर कडक कारवाई करायला हवीय. तसंच विमान आणि रेल्वेने ऑक्सिजनची व्यवस्था करता येऊ शकेल.' असं लल्लनटॉपच्या इंटरव्यूमधे प्यारे खान यांनी म्हटलंय.
हेही वाचा:
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं
निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही